‘जयोस्तुते’: प्राध्यापक (डॉ.) जया विकास कुर्हेकर गौरवांक (संपादकीय)

Ideals are like the stars: we never reach them, but like the mariners of the sea, we chart our course by them. Carl Schurz

‘ऋषिप्रधान संस्कृती’ लाभलेल्या या देशात, ज्ञानपरंपरेशी नातं जोडीत, आजवर अनेकांनी या क्षेत्राला काही विशेष योगदान दिलं आहे. गुरुकुल पद्धती पासून ऑनलाईन शिक्षणापर्यंतचा सारा प्रवास आज आपण अनुभवत आहोत. शिक्षण क्षेत्राला अनेक प्रकारांनी योगदान देणाऱ्या कितीतरी ज्ञात अज्ञात व्यक्तींनी आपल्या सेवाभावानं, संपूर्ण आस्थेनं आणि जीव ओतून या क्षेत्राला काही योजनं पुढे नेलं आहे. आपल्या सर्वांच्या स्नेहांकित, प्राध्यापक (डॉ.) सौ. जया कुऱ्हेकर या, ‘अशा ज्ञानसाधकांपैकी’ एक आहेत!

सभोवतालच्या परिस्थिती बद्दल तक्रार न करता, उपलब्ध साधन संपत्ती आणि अंगी असलेल्या क्षमतांचा मेळ घालं, स्वतःहून अंगिकारलेल्या ध्येयाशी, कसं एकरूप होता येतं, याचं एक उत्तम उदाहरण म्हणून डॉ. जया यांच्या आजवरच्या आयुष्याकडे पाहावं लागेल. ‘प्राध्यापक’ हे उच्चशिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च क्षमतादर्शक पद धारण करणाऱ्या, शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील ‘मायक्रोबायोलॉजी अर्थात सूक्ष्मजीवशास्त्र‘ या विषयाच्या पहिल्या ‘प्राध्यापक’ म्हणून आणि भारती विद्यापीठ या नामांकित संस्थेच्या गेल्या ६० वर्षांच्या इतिहासात (अनुदानित महाविद्यालयांतील पहिल्या) ‘प्राध्यापक’ होत, एका अर्थी त्यांनी आपली कारकीर्द ऐतिहासिकच केली आहे. किंबहुना, त्यांच्या अंगी असलेल्या गुणवत्तेची आणि क्षमतेची ही खूपच बोलकी आणि अभिमानास्पद ओळख आहे.  

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात, ‘सूक्ष्मजीवशास्त्र’ विभागातील प्राध्यापक, विभागप्रमुख म्हणून, विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून त्या एक अनुकरणीय जीवन जगल्या आहेत, यात निश्चितच दुमत नाही.  “आभाळमाया”च्या एक क्रियाशील सदस्य म्हणून, पर्यावरण जागृती कार्यात देखील त्यांनी विशेष योगदान दिलं आहे. जीवनाच्या विविध क्षेत्रात आज कार्यरत असलेल्या त्यांच्या असंख्य विद्यार्थ्यांच्या मनात मॅडम विषयी एक विशेष कृतज्ञतेची भावना आहे. यामुळेच, त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं, त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाला आणि वाटचालीला प्रतिबिंबीत करणारा एक ‘सेवा गौरव विशेषांक’ प्रकाशित करण्याच्या संकल्पाचे सूतोवाच झालं.

मित्रहो, डॉ. जया कुऱ्हेकर यांच्या जीवनप्रवासाचे आपण सर्वजण एक ‘प्रत्यक्षदर्शी’ आहोत. ‘जयोस्तुते’ हा प्राध्यापक (डॉ.) जया विकास कुऱ्हेकर गौरव विशेषांक ‘सर्व स्नेहांकितांच्या अणि भावी पिढ्यांच्या’ हाती देतांना आम्हाला विशेष आनंद होतो आहे अणि त्याची तितकीच काही विशेष कारणं देखील  आहेत. एका शाश्वत ईश्वरी सत्तेचा आशीर्वाद लाभलेला ‘जयोस्तुते’ हा एक नाविन्यपूर्ण उपक्रम आहे. परंपरेला काही पावलं पुढं नेणारा, वर्तमानाचं नेमकं भान असणारा अणि भविष्याच्या वाटेवर वाचकाला चिंतनाच्या डोही डुंबायला लावणारा तो एक विशेष अनुभव आहे. आदरणीय संभाजीराव भिड़े गुरूजी म्हणतात तसं; ‘कशासाठी आणि जगावे कसे मी? विचारा मनाला असा प्रश्न नेहमी!’

काही तरी निश्चित ध्येयानं प्रेरित होत, परंतु तरीही आपल्यासारखंच जीवन जगणाऱ्या, आपल्यातल्याच एका माणसाचा, हा एक ‘उत्सव’ आहे. क्षणभर मागे वळून पहाण्याचा तो एक प्रयत्न आहे. थोर इंग्रजी समीक्षक, लेखक अणि कवी टी. एस. ईलीएट त्याच्या ‘Tradition and Individual Talent’ या जगप्रसिद्ध निबंधात असं म्हणतो की ‘गुणवत्ता ही प्रत्येकाच्या ठायी असते, परंतु त्या गुणसमुच्चयांचा एक स्त्रोत ‘परंपरेचे रूप धारण करुन’ आपल्या पुढच्या पिढ्यां पर्यंत पोचलेला असतो. त्या मुख्य प्रवाहाशी, भूतकाळाशी नातं जोडंत, आपण आपल्या अंगी असलेल्या गुणवत्तेचा साक्षात्कार घडवला पाहिजे, अशी वडीलधाऱ्यांची एक सामान्य अपेक्षा असते. या अंकाच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘डॉ. जया कुऱ्हेकर’ या अशाच गुणवान  व्यक्तींपैकी एक असल्याचं मत, अनेकांनी, अनेकदा, अनेक ठिकाणी, व्यक्त केलं आणि त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने पहिला लॉकडाऊन संपता, संपता, ‘जयोस्तुते’च्या निर्मितीच्या वाटेवर पहिलीवहिली काही पावलं पडली.

या अंकाच्या लेखकांमधील सर्वच लेखक हे काही डॉ. जया कुऱ्हेकर यांच्या सहा दशकांच्या व्यक्तीगत जीवनप्रवासाचे किंवा त्यांच्या ३७ वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दिचे साक्षीदार आहेत, असं मुळीच नाही. ण्यापुऱ्या दोन वर्षांचा अणि तोही एक सहकारी म्हणून स्नेहबंध गाठीशी असलेले (परंतु लाभलेल्या सहवासाला काही अंतरावरूनही तितक्याच गांभीर्याने जपणारे) माझ्या सारखे कितीतरी जण ‘डॉ. जया आणि डॉ. विकास कुऱ्हेकर’ या दांपत्या प्रति असणाऱ्या आदरभावामुळे या उपक्रमाशी सहजपणे बांधलो गेले.

‘जयोस्तुते’ म्हणजे नेमकं काय हो, असा प्रश्न आपल्या मनात येणं साहजिक आहे. या प्रश्नाचं साधं सोपं आणि सरळ उत्तर असं की, माणसाच्या अंगी असलेल्या चांगुलपणाचा शोध म्हणजे ‘जयोस्तुते’! सुयेनं भरलेल्या या जगात, अजूनही ज्यांच्या अंत:करणाच्या आरशाचा पारा, आयुष्यात आलेल्या व्यक्तीचे ‘जसं आहे तसं’ चित्र प्रतिबिंबित करण्याचं काम करतो आहे, त्यांच्या निर्मळ अंत:करणाचं ‘जयोस्तुते’ हे एक ‘प्रतिबिंब’ आहे. डॉ. जया कुऱ्हेकर यांच्या अंगी असणाऱ्या, व्यक्ती विशेषांनी मंडित झालेल्या लेखांनी सजलेला, पारंरिक गौरव विशेषांकांच्या पठडीशी नम्रपणे फारकत घेणारा, तरीही सहजपणे व्यक्त होणारा आणि संग्राह्य असा हा अंक असावा, असा विचार पुढे आला. गौरवमूर्तीचा गौरव अभिप्रेत असलेला, तरीही लौकिक अर्थाचा उदो-उदो न करता, सवंगपणे  प्रसिद्धीस जाणारा तो एक क्षुद्र प्रयत्न नसावा, याकडे विशेष लक्ष ठेवूनच या अंकाची निर्मिती होत गेली. श्री. अमोल वंडे यांच्या आग्रहाच्या निमित्तानं, अनेकांच्या मनात सुप्तपणे वसलेल्या भावनेनं  जन्म घेतला आणि या गौरवांकाच्या निर्मितीचा प्रवास सुरु झाला.   

डॉ. सौ. जया कुऱ्हेकर यांची कुणालाही प्रथम दर्शनी भावते ती त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या ठायी वसलेली ‘शालीनता!’ शिक्षणक्षेत्रातील सर्वोच्च क्षमतादर्शक असं ‘प्राध्यापक’ पद भूषविणाऱ्या, थोड्याशा सहवासानं देखील  सहजपणे ध्यानात येणारी त्यांची गुणवत्ता आणि तरीही ‘मी निमित्तमात्र आहे’ असं मानून श्रेय नाकारणारी नम्रता, मनाच्या गाभाऱ्यात उमटणारी आदरयुक्त जुता, अशा गौरवमूर्ती लाभलेल्या या अंकाचा, शीर्षकापासूनचा प्रवास हा ‘ईश्वरी’ संकेतांनी भरलेला होता, हे आपणास सांगताना होणारा आनंद शब्दातीत आहे. डॉ. सौ. कुऱ्हेकरांचं नांव म्हणून आणि महाकाव्य परंपरेशी जोड़णारं शीर्षक म्हणून, प्रथमदर्शनी केवळ ‘जया’ याच नांवानं हा विशेषांक देखील  असावा, अशी कल्पना होती; परंतु या आधी उद्धृत केलेल्या सर्व गुणवैशिष्ट्यांच्या अभिव्यक्तीसाठी हे शीर्षक अपुरं वाटत होतं. नेमक्या अशाच वेळी ‘जयोस्तुते’ हे एक तेजोमय शीर्षक सुचून गेलं आणि दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पवित्र आठवणींनी अंगही शहारून गेलं. या शब्दाच्या पावित्र्याला शोभणारं ‘निष्कलंक’ जीवन डॉ. सौ. कुऱ्हेकर जगल्या आहेत, याचा उल्लेख कितीतरी अधिकारी व्यक्तींनी या अंकातील त्यांच्या लेखांमध्ये केलेला आहे. स्वातंत्र्यवीरांच्या लेखणीने जो शब्द चिरंतन झाला, त्या शब्दातील पवित्रता मॅडमच्या व्यक्तिमत्वा ठायी आहे; त्यांच्या गौरवाचा, स्तुतीचा हा एका अर्थी ‘जयघोषच’ आहे. वस्तुस्थिति अणि स्तुती यांत कमीत कमी अंतर आहे, हे ध्यानात येत गेलं. अशा पार्श्वभूमीवर, स्नेहांकितांनी, सहकारी मित्र मैत्रिणींनी एकत्र येन, स्नेहानं काठोकाठ भरलेल्या अंत:करणानं, कुऱ्हेकर दांपत्याचा केलेला हा उत्स्फूर्त सत्कार, हा त्यां उभयतांच्या आयुष्यातील एक ‘सर्वांग सुंदर सोहळा’ आहे, असं म्हल्यास, फारसं वावगं ठरु नये. 

आभाळमाया’ या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि ख्यातनाम वास्तुविशारद श्री. प्रमोद चौगुले यांनी या अंकाच्या निर्मितीच्या वाटेवर पुढचं महत्वाचं पाल उचललं. स्नेहांकितांनी योजिलेल्या या उपक्रमाचं सूतोवाच, निवडक लेखकांच्या पर्यंत पोहोचविण्याचं आणि उपक्रमाचे सूत्रधार म्हणून आवश्यक त्या सर्व जबाबदाऱ्या स्वयंस्फूर्तीने पार पाडण्याचं काम श्री. चौगुले यांनी केलं. स्नेहांकित प्रतिनिधीबरोबरच, ‘उच्चशिक्षण क्षेत्राचं प्रतिनिधित्व’ करीत डॉ. एच. एम्. कदम सर यांनीही यजमानपद स्वीकारलं आणि मग खऱ्या अर्थानं कामानंती घेतली.

या आधीच नमूद केल्याप्रमाणं श्री. अमोल वंडे यांनी मुद्रण आणि अंकाला मूर्त रूप देण्याचं काम केलं. दुसरीकडं डॉ. कुऱ्हेकर दांपत्याच्या जीवनात आलेल्या स्नेहांकित, नातेवाईक, सहकारी, कार्यकर्ते अशा संभाव्य लेखकांची यादी तयार झाली अणि सहज उत्स्फूर्त लेखनाच्या प्रवासाने जोर धरला. जानेवारी, २०२१ च्या पहिल्या आठवडयातच जवळपास २५ लेख जमा झाले. ‘ज्याचे जेवढे जगणे, त्याचे तितकेच लिहिणे’, या अपेक्षेमुळं अंक वस्तुस्थितिशी नातं राखंत गेला आणि याच जिवंत लेखनातून अंकाला ताकमिळत गेली.

१९९९ साली बदली होन मी सांगलीतील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात रुजू झालो. मी इंग्रजी विषयाचा प्राध्यापक, तर मॅडम मायक्रोबायोलॉजी या विषयाच्या. सूत्रसंचालने, बौद्धिक चर्चा, भाषा साहित्य, अध्यात्म आणि एकमेकांप्रति असलेल्या आदरभाव पुढं कौटुंबिक स्तरापर्यंत वृद्धिंगत झाला. सांगलीतील माझ्या केवळ दोन वर्षांच्या सहवासात डॉ. सौ. अणि श्री. कुऱ्हेकर यांच्या दोघांच्याही व्यक्तिमत्वानं, साधेपणानं मी प्रभावित झालो. २००१ सालची गोष्ट असेल! शंतनू त्या वेळी १० वीत होता. बरेच दिवस मॅडम कॉलेजमध्ये आल्या नव्हत्या. एक दिवस सहजपणे भेट झाली. साहजिकच इतके दिवस रजेवर का होतात? म्हणून विचारले. तेंव्हा मॅडम म्हणाल्या, ‘अहो सर, एक तर कुऱ्हेकर सरांची ही अशी अत्यंत जबाबदारीची सरकारी नोकरी, घरचा फोन सतत खणखणत असतो. अभ्यासातून प्रत्येक मिनिटाला उठून शंतनूला फोन अटेंड करावा लागतो. शेवटी मीच ठरवलं की त्याचं १० वीचं वर्ष आहे, परीक्षेच्या काळात तरी रजा घे.आपल्या मुलाच्या क्षमतेवर विश्वास असणारी ही माऊली, आपल्या घरातील बौद्धिक संपदेची कशी काळजी घ्यावी, हे सहजपणे मला सांगून गेली. कुटुंबवत्सलतेचे गूज सांगून गेली. बाहेर कोणत्याही ट्यूशन न लावता, आपल्या मुलाला अध्ययनपूरक शिक्षण स्वत: देणारे डॉ. विकास कुऱ्हेकर, आपल्या अंगी असलेल्या मोठेपणाला, सातत्याने साधेपणाशी जोडणारं हे दांपत्य, ‘देववृक्षांनी’ बहरलेल्या ‘कान्हा’ या निवासात देवाप्रति नितांत श्रद्धा, अंतर्बाह्य शूचित्व राखणारा व्यवहार, दररोज घडणाऱ्या लहान मोठ्या घटनांकडे स्थितप्रज्ञतेने पाहण्याची त्यांची सवय, संवेदनेच्या संस्कारांनी प्रेरित होन, कुणाच्याही ठायी असणाऱ्या न्यूनतेला आपल्या क्षमतेनं झाकीत त्यांचं पुढे जाणं, काम कोणतंही असो ते पूर्णत्वास नेण्यासाठी पडेल ती जबाबदारी, आपल्या पदाचा वा मोठेपणाचा विर्भाव न आणता सहजपणे पार पाडणाऱ्या मॅडम, या अशा गौरव अंकाच्या केंद्रस्थानी विविधरुपांत सहजपणे भेटतात. जगण्याच्या या सोहळ्यात सहजपणे मोठेपण प्राप्त करून जातात.

यामुळच की काय त्यांच्यातील अनुवादक, इंग्रजी अणि मराठी या दोन्ही भाषांवर असणाऱ्या प्रभुत्वापोटी पडलेला प्रभाव, उभयतांच्या अध्यात्म साधनेत यशाचे गम्य शोधण्याचा मोह डॉ. इंद्रजीत देशमुखांना होतो. ‘एक स्त्री दुसऱ्या स्त्रीकड़े कशी पाहू शकते’, एखाद्या प्रपातासारखी स्तुतीची संततधार वाहावी तशी व्यक्तिमत्व वैशिष्ट्यांची मांदियाळी ठरावी, अशी मॅडमच्या गुण वैशिष्ट्यांची ओळख करून देणारी सौ. मालेकर यांची कविता, एक क्षमताधारक सहकारी म्हणून प्रा. राम पवार यांच्या लेखातून भेटणाऱ्या मॅडम, एक रिसर्च स्टुडंट – सहकारी, म्हणून मॅडमच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणारा डॉ. बोधनकर यांचा लेख, ‘गुणवत्ता’ या एकाच धाग्यात गुंफता येईल, अशी सारी प्राध्यापक म्हणून केलेल्या सेवेची कारकीर्द आणि त्यावर प्रकाश टाकणारा डॉ. एम. एस. सगरे सर यांचा लेख, माहेरच्या आणि सासरच्या अंगणातल्या मॅडम प्रतिबिंबित करणारे स्फूट लेख, मॅडमच्या कारकिर्दीकड़े एक सर्वस्पर्शी दृष्टिक्षेप टाकणारा डॉ. संतोष माने यांचा लेख, कृतज्ञतेच्या भावनेनं ओथंबलेले विद्यार्थ्यांचे लेख केवळ वाचनीयच नाहीत, तर मॅडमनी  अंगिकारलेल्या जगण्याच्या काही आगळ्या वेगळ्या परिमाणांची ओळख करून देणारे आहेत.   

ज्या जीवनाची माणूस अपेक्षा त जगतो, ते त्याला कधीच लाभत नाही अणि जे लाभलं आहे त्यात तो समाधानी नसतो. अशा वेळी जगाच्या या रंगमंचावर प्रत्येकालाच नायकाची भूमिका करायला मिळणार नाही, हे ध्यानात ठेवून वाट्याला आलेल्या भूमिकेला जो समर्थपणे साकार करतो, कोणतीही तडजोड न करता नैतिक, कौटुंबिक, सामाजिक अणि व्यक्तीगत पातळ्यांवर दृश्य अदृश्य नियमांनी स्वत:लाच बांधून घेत, जो ध्येयाप्रती वाटचाल करतो, तोच ‘जीवन जगला’ असे मानता येईल. डॉ. सौ. जया कुऱ्हेकर यांच्या बाबतीत कितीतरी अर्थानं हे खरं आहे. सभोवतालच्या परिस्थितिबद्दल कोणतीही  तक्रार न करता, उपलब्ध साधनांचा नेमका मेळ घात, त्यांनी केलेली वाटचाल ही आदर्शवतच आहे. आज शिक्षण क्षेत्रातील प्रदीर्घ सेवेनंतर, व्यावसायिक रंगमंचावरील नाटक संपल्यावर आणि मॅडमच्या भूमिकेबद्दल दाद  देताना अनेकांच्या ही गोष्ट ध्यानात आली आहे की, प्राचार्य, कुलगुरु या अधिक क्षमतेच्या भूमिका जरी त्यांच्या वाट्याला आल्या असत्या, तर त्या देखील  त्यांनी समर्थपणे पेलल्या असत्या. विविध विद्यापीठांच्या कुलगुरुंचा समावे असलेल्या नॅक समितीला केव एक दोन नव्हे, तर तब्बल १५ वर्षे सामोरं जाणं, आपल्या महाविद्यालयाच्या सहकाऱ्यांच्या कार्यांचा, विद्यार्थ्यांच्या बलस्थानांचा परिचय देणं, ‘कुणाचंही उघडं पडणारं न्यून झाकून नेणं आणि त्यांच्या मनात आपल्या महाविद्यालयाची, संस्थेची आणि स्वत:ची एक जागा निर्माण करणं, हे वाटतं तितकं सोपं नव्हतं. डॉ. जया कुऱ्हेकर यांनी ‘सोन्याच्या संधीची वाट पाहण्यापेक्षा मिळालेल्या संधीच सोनं कसं करावं,’ हेच दाखवून दिलेलं आहे.

स्थितप्रज्ञतेचा शोध घेत माणूस आयुष्यभर प्रवास करतो; परंतु हीच स्थितप्रज्ञता ज्यांना ईश्वरी वरदान म्हणून लाभते, त्यांचं भाग्य ते काय वर्णावं? माणसाचं आयुष्य हे एखाद्या ‘जैन थाळी’ सारखं, सर्व चवीच्या पदार्थांनी काठोकाठ भरलेलं असतं .... साहजिकच आपल्या आयुष्यात सुद्धा काही प्रेम करणारी, काही स्वार्थी, काही निमित्तमात्र, कधी प्रभाव टाकणारी, कधी हेवा करणारी, असूयेनं भरलेल्या अंत:करणाची तर कधी त्यांच्यावरील प्रेमानं भारावून जात आयुष्यभर पसरावी असं वाटतील अशी! थोडक्यात चांगलं जगता, जगता माणसाचं आयुष्य हाच एक महोत्सव होन जातो. मग ह्या महोत्सवात गुणावगुणांची वस्त्र लेन आपण कसं सजतो आणि सुख दु:खाला कसं सामोरं जातो, ते महत्वाचं. या सार्वत्रिक अनुभवाला डॉ. सौ. जया कुऱ्हेकर याही अपवाद नाहीत; पण आयुष्यात कसं जगायचं हे नेमकेपणानं ठरवलेल्या, विचलित होण्याच्या क्षणी डॉ. विकास कुऱ्हेकर यांच्या सावलीत, त्यांच्याच सहवासानं, सल्ल्यानं सावरलेल्या आणि जीवनाच्या वाटेवर आलेल्या प्रत्येकाला अधिक चांगला अनुभव देत पुढे जाणाऱ्या मॅडम, सहजपणे प्रभाव टाकून जातात, हा एक सर्वानुभव आहे.      

ज्ञान व विज्ञानाची कास धरूनही अध्यात्माची साथ सुटली नाही, असंच डॉ. विकास कुऱ्हेकर यांच्याबद्दल आवर्जून नमूद करावं लागेल. ह्या निरीक्षणाचं स्पष्टीकरण असं की सांगली ते गोंदवले ११० किलोमिटरचं अंतर महारांजाच्या प्रती असलेल्या भक्तीभावा पोटी निष्ठेनं चालंत जाणं आणि त्यावेळी आपल्या ज्ञानसंभाराच्या अभिनिवेशाचं ओझं सहजपणे बाजूला टाकून देणं हे डॉ. विकास कुऱ्हेकर यांनीच करावं.

मस्तकी सहावे टाकियासी जाण, तेंव्हा देवपण भोगावे ते| आपुलिये स्तुती, निंदा अथवा मान, टाकावा थुंकून पलीकडे||

अशा वृत्तीनं हा माणूस जगत गेला. त्यामुळं देवळातला दगडातला देव आणि रस्त्यावर भेटणारा दगड हा त्यांच्यासाठी देवच होत गेला. किंबहुना साधेपणाचा, संयमाचा, स्थितप्रज्ञतेचा अलंकार धारण करणारा एक साधक म्हणून स्वतःला घडवंत गेला.

‘इतरांचे ठायी वसणारे व्यक्तीविशेष, माझ्या अंगी यावेत’, अशी प्रार्थना करण्याजोगी माणसं आयुष्यात आहेत, हेही भावी पिढयांचे भाग्यच म्हणावं लागेल. मॅडम या तुमच्या आमच्या सारख्या एक सर्वसामान्य व्यक्ती आहेत. कन्या, पत्नी, आई, बहीण, सासू, अनुवादक, मुख्यपदस्थ व्यक्ती, सहकारी, साधक, कलाकार, आपली ‘बकेट लिस्ट पूर्ण करण्यासाठी मार्गस्थ झालेल्या एक साधक, एक पथिक’ अशा नानाविध रूपात त्या आपल्यातल्या प्रत्येकाला भेटल्या आहेत आणि आपण सर्व जण या वाटेवर त्यांच्या या प्रवासाचे प्रत्यक्षदर्शी! जणू हा ‘सुख सुखाला भेटतं आहे’, असाच योग! निमित्त कोणतं आहे? यापेक्षाही ‘गौरवमूर्ती’ सोबतच आपलंही आयुष्य सुंदर होत आहे, हे महत्वाचं आहे!   

प्राध्यापक (डॉ.) विवेक रणखांबे, (प्रमुख संपादक: जयोस्तुते), भारती विद्यापीठ, यशवंतराव मोहिते कॉलेज, पुणे  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *