स्वातंन्त्र्येतिहासाचे ‘रंग-दे-बसंती’ स्मरण : गगन दमामा बाज्यो!


पुणे: भगतसिंग नावाचे ‘लिजंड’ युवा पिढीला नेहमीच संमोहित करत आले आहे. भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरु असताना भगतसिंग, सुखदेव अन राजगुरू यांच्या बलिदानाचा आठवं, ‘गगन दमामा बाज्यो’ या काफिला निर्मित दोन अंकी नाटकाच्या निमित्ताने अधोरेखित होतो आहे. श्री. पियुष मिश्रा यांच्या मूळ हिंदी लेखनाचे श्री. सतिश तांदळे यांनी केलेले मराठी रूपांतरण मनाला निश्चितच भावते. ‘काफिला’ या कोल्हापूर स्थित हौशी तरुण कलाकारांच्या टीमने ‘गगन दमामा बाज्यो’ या नाटकाचे ‘शिवधनुष्य’ सहज पेलले आहे, असेच म्हणावे लागेल.

‘गगन दमामा बाज्यो’ हे शिर्षक कितीतरी अर्थी योग्य शिर्षक आहे. या र्शिषकाला तत्वज्ञानाचे अधिष्ठान आणि पावित्र्याचा स्पर्श आहे. शिखांचा पवित्र धर्मग्रंथ ‘गुरु ग्रंथ साहेब’ यातील हा कबीराचा ११०५ क्रमांकाचा दोहा आहे. त्याचा स्वैर अनुवाद असा की ‘मनाच्या अवकाशात युद्धाचे पडघम घुमू लागलेत, आता विजय निश्चित आहे आणि त्याने वीरांच्या जखमा भरून आल्या आहेत!’ हा आशय ध्यानात घेत जेंव्हा आपण नाटकाचे सादरीकरण बघतो तेंव्हा भगतसिंग आपल्याला हेच तत्वज्ञान सांगतना दिसतो. ‘युद्ध (अर्थात मनाचे द्वंद्व) सुरु झाले आहे, लढायला सिद्ध हो! परिणामांचे काय करायचे? ते नंतर बघू. भारतीय स्वातंत्र्य दृष्टिपथात आले आहे! आता जर ते स्वातंत्र्य हि केवळ औपचारिकता उरली असेल आणि जर माझी प्राणाहुती ही पूर्णाहुती ठरणार असेल, तर त्यासाठी भगत सिंग तयार आहे! अशा आशयाची मांडणी करणारे शिर्षक म्हणून ‘गगन दमामा बाज्यो’ कडे बघावे लागेल! संपूर्ण नाटकात आणि भगत सिंगाच्या संवादातून याचांच प्रत्यय येतो.

श्रोत्यांना सहजपणे स्वातंत्र्याची कथा सांगत, भगत सिंगाला नायकाच्या रुपात तितक्याच सहजपणे उभा करीत, श्रोत्यांच्या मनी स्वातंत्र्याच्या इतिहासा बद्दल अनुत्तरीत असणाऱ्या कितीतरी प्रश्नांची उत्तरे देत, या नाटकाचे कथानक पुढे सरकते. सशस्त्र क्रांती की सविनय कायदेभंग? मानसिक द्वंद्व, भावनांचा कल्लोळ, क्लिष्ट स्वरूपाच्या ऐतिहासिक घटनांची सोडवणूक करीत झालेले सादरीकरण रसिकांच्या अनेकदा टाळ्या मिळवून जाते. श्रोत्यांच्या मनात असणाऱ्या इतिहासाशी, त्यांच्या मनात असणाऱ्या स्वातंत्र्य वीरांच्या प्रतिमांशी साधर्म्य सांगून जाते.

मराठी नाट्य रुपांतरण करणारे लेखक श्री. सतिश तांदळे यांनीच समर्थपणे साकारलेली भगत सिंगची भूमिका श्रोत्यांची दाद मिळवून जाते. वडिलांच्या पार्थिवावर २४ तासांपूर्वी अंत्यसंस्कार करून आलेला अक्षय पोळके, सुखदेवाची भूमिका वठविताना; रंगभूमी आणि रंगभूमीच्या इतिहासात; भविष्यातील रंगकर्मीच्या पिढ्यांसाठी मागे उत्तरदायित्वाचे परिमाण ठेवून जातो. ज्यांना बघितल्यावर खऱ्याखुऱ्या चंद्रशेखर आजाद यांची आठवण यावी, अशी पिळदार शरीर यष्टी आणि चेहरा लाभलेला तरुण श्री. पार्थ कोठावळे, तर योगेश हवालदार हे ‘राजगुरूंच्या’ भूमिका वठवत इतिहासाला जिवंत करतात.

प्रभावी सादरीकरण, नेपथ्य, वेशभूषा या बरोबरच नाटकात जीव ओतते, ती या सांगीतिक नाटकाचे संगीत आणि ऋषिकेश देशमाने यांचा लोकगीतांना शोभणारा आवाज. ढोल, डफ, गिटार यांची जादू श्रोत्यांना पंजाब-लाहोरच्या सीमारेषेवर नेवून ठेवते. कलावंत मराठी आणि (त्यातही कोल्हापूरचे असले) तरी पंजाबी, हिंदी, हिंग्लिश आणि इंग्रजी भाषांतील संवाद फेक नेमके पणाने झाल्याचे दिसते.

नाटकातील विनोद हे उपरोधिक आहेत. ब्रिटीश सरकारच्या आणि तुरुंगात छळणाऱ्या अधिकाऱ्यांशी झालेले संवाद, हे ध्येयाप्रती स्वातंत्र्य वीरांच्या भूमिकेचा निर्धार दर्शवितात. भगतसिंगाचे आई-वडील, व्यक्त न झालेले त्याचे नि:शब्द प्रेम, अनेक क्रांतिकारकांच्या आयुष्याचे प्रातिनिधिक सादरीकरणचं मानावे लागेल. ज्यांची मुलं फासावर चढली, त्या कुटुंबियांची झालेली मानसिक उलघाल या नाटकात नेमकेपणाने सादर झाली आहे.

मनाचा ठाव घेणारी गीते, संगीत आणि ऋषिकेश देशमाने यांच्या सुरातून, तत्कालीन राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक परिप्रेक्ष निर्माण करण्यात दिग्दर्शक शंतनू पाटील कमालीचा यशस्वी झाल्याचे पटते. नाटकाच्या पूर्वार्धात रेंगाळणारे कथानक, पूर्वार्धात जाणविणारे पार्श्वसंगीताचे अपुरेपण, भगत सिंग आणि इतर क्रांतिकारकांच्या ओठी; अपवादाने पण अवश्य आलेले अशक्यप्राय शब्द लेखकाला, अनुवाद कर्त्याला जरूर टाळता आले असते, असे वाटून जाते. त्या मुळे एका प्रतिष्टीत विषयाला आणि आदरयुक्त इतिहासाला ‘सुमारपणा’ आल्याचे पाहून मन खिन्न होते. ऐतिहासिक नाटकाच्या लेखकाला ‘प्रतिभा अविष्काराचे कितीही स्वातंत्र्य असले’ तरी काही विषयावर त्यांनी हाती घेतलेल्या विषया संबंधी जनमानस ओळखून काही बदल केले पाहिजेत, हि अपेक्षा रास्तच आहे.

सुमारे तीस हून अधिक कलाकारांनी हे नाटक सादर करण्यासाठी घेतलेली प्रचंड मेहनत, कितीतरी सांगितिक आणि सामुदायिक संवादाच्या सादरीकरणाची लक्षणीय एकरूपता, नाटकाच्या भाषेत सांगायचं तर एवढ्या मोठ्या संख्येने असणाऱ्या कलाकारांनी ‘टायमिंग’ बद्दल इतक्या लीलया साकारणे, हे नाटकाच मोठ बलस्थान आहे. ‘भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांच्या फाशीचा क्षण, त्या वेळी ‘माना टाकताना असलेले कलाकारांचे टायमिंग’, हा या नाटकाचा कळसाध्याय मानावा लागेल. भारतीय नाट्य, मराठी संगीत नाट्य परंपरा आणि प्रायोगिक रंगभूमी यांच्या एकत्रित संचिताच्या संगमावर हे नाटक नेवून ठेवण्यात, लेखक, अनुवादक, कलाकार आणि दिग्दर्शक हे कमालीचे यशस्वी झाले आहेत, यात शंका नाही.

हे नाटक जरी १९१९ जालियानवाला बाग हत्याकांड ते १९३१ या दशक भराच्या काळाचा आढावा मांडत असले, तरी १७५७ ते १९४७ या देशाच्या स्वातंन्त्र्येतिहासाचा एक प्रभावी अविष्कार सादर करण्यात, ‘काफिला’ मराठी रंगभूमीच्या इतिहासात स्वतःच्या अस्तित्वाच्या आणि क्षमतेच्या पाऊलखुणा ठेवून जातो आहे. स्वातंत्र्यानंतर निस्तेज होत चाललेल्या समाजमनाला चैतन्य प्रदान करणारे, धमण्यातील रक्त तापविणारे आणि अभिजात अर्थात ‘क्लासिक’ नाट्यकृती म्हणून ‘गगन-दमामा-बाज्यो’ रसिकांच्या आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासात ध्यानात राहील, असाच निष्कर्ष रसिक काढतील, यात शंका नाही. आपले आयुष्य समृद्ध करणारी कलाकृती म्हणून ‘गगन दमामा बाज्यो’ आपल्याला निश्चितच आवडेल. आपण हे नाटक सहकुटुंब अवश्य पहा.

प्राध्यापक (डॉ) विवेक रणखांबे, पुणे
9850558404

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *