उषाताई: एक, ‘श्रम संस्कारांची शाळा’!

8 मे, 2022, सकाळी 9.45 ची वेळ. अरे विवेक, “आई गेली”, फोन वर हे सुनिलचे शब्द मला निःशब्द करून गेले.

पुण्याहून सौ. मेघनाला घेवून आसल्याच्या दिशेने निघालो खरा, पण वाटेत उषाताईंचे संघर्षमय आयुष्य डोळ्या समोर उभे रहात होते, अन् पापण्यांच्या कडा पाणावत होत्या.

उषाताई ही दयाळांची लेक. दयाळ हे वाई तालुक्यातल्या व्याहळीचे. 1950 च्याही आधीचा तो काळ. गावं पुनर्वसनात उठलेली. साहजिकच दयाळ कुटुंब साताऱ्याच्या शेजारी, शेठ वालचंद हिराचंद यांनी वसवलेल्या सातारारोड या गावी आले. ते ही स्वातंत्र्य पूर्व काळात. व्याहळी ते सातारारोड, सातारा असा प्रवास या कुटुंबाचा प्रवास झाला, त्याला जवळ पास शतक पूर्ण होईल.

उषाताई यांच्या यजमानांचे नाव श्री. रावसाहेब मोरे. मोरे मंडळी ही व्याहळी शेजारच्या भवानी वाडीची (आसले गावंची). रावसाहेब मोरे यांची आई राधाबाई, ही दयाळ कुटुंबीयांचीच लेक. साहजिकच नात्यात आत्याच्या मुला बरोबर उषाताईंचे लग्न झाले.

तसे दयाळ हे एक संपन्न कुटुंब. ‘चेहऱ्यावरची प्रसन्नता ही दयाळ यांची श्रीमंती’. मोरे मंडळी ही त्या तुलनेत सामान्य कुटुंबातली. दयाळ कुटुंबातल्या सर्व सख्या, चुलत भावांची भेट हटकून व्हायची. या मंडळींना आम्ही पण मामा म्हणायचो. ‘गायन-वादन-संगीत’ हा दयालांचा हक्काचा प्रदेश. तुकाराम, नामदेव आणि नाना दयाळ यांनी सातारारोड परिसरात एक आदराचे स्थान मिळवले होते. त्यांच्याशी नात सांगताना कुणालाही अभिमान वाटायचा. या पिढ्यांशी आमचं काही नात आहे, याची आज धन्यता वाटते.

रावसाहेब मोरे हे कूपर कंपनीत सुतार काम करायचे. आम्ही त्यांना मामा म्हणायचो. एक सतेज, प्रसन्न चेहरा लाभलेले मामा पांढरी शुभ्र विजार आणि पंख्याचा सदरा वापरायचे. मामांना पान आवडायचे. वयाचा मुलाहिजा न ठेवता आम्हालाही ‘विवेक, पान खातो का? असं मामा विचारायचे. पानपट्टीतून आणलेली ओली पान विजारीवर पुसून, त्याला काथ, चुना लावून, सुपारी टाकून मामांच्या बरोबर खाल्लेल्या क्षणांच्या आठवणी अजून ताज्या आहेत.

उषाताई आणि रावसाहेब मोरे यांना सतिश, महेश आणि उमेश ही तीन मुले.

अहोरात्र कष्ट म्हणजे काय? ते आम्ही उषाताई यांच्या निमित्ताने बघितले. माझ्या आईसह, असे कष्ट करणाऱ्या एका पिढीच्या त्या प्रतिनिधी.

1980 च्या आसपास मोरे मंडळी सातारारोडच्या चुनाभट्टी परिसरात रहायला आली. शिदू महादू दुपटे, रावसाहेब मोरे, तुकाराम सूणगार अशी ती तीन कुटुंब. तीन गुंठा जमिनीत त्यांची तीन घरे. ती ही पत्र्याची, सारवलेल्या कुडाने एक मेका पासून वेगळी केलेली. एकाच खोलीत मधोमध एक लाकडी कपाट किंवा धान्य भरायचे लोखंडी धान ठेवून त्या जागेत दोन खोल्या केलेल्या. नंतर काही वर्षांनी व्हरांडा म्हणून त्याचं घराचं एक्स्टेंशन केलेलं.

एका बाजूला मोरी, त्यावर स्वच्छ घासून ठेवलेली पाण्याची भांडी, एक पितळेचा हंडा आणि एक अल्युमिनियमची ‘डीचकी’. घरा मागे बाग. त्यात जमतील तेवढी सर्व झाडं लावलेली. हा मामांचा छंद. आसल्याच्या शेतात लावलेल्या फळ झाडांना पाणी घालण्यासाठी मामा कारखाना सुटल्यावर संध्याकाळी ५ वाजता जायचे. इतकं त्याचं झाडांच्यावर प्रेम. या प्रेमाचं आम्हाला मोठ अप्रूप वाटायचं.

घरात कपाटावर ठेवलेली सुर पेटी. दिवस भर दमून आलं तरी संध्याकाळी पोरांनी काहीतरी वाजवलं पाहिजे, हा मामांचा शिरस्ता. मामांना मुलांनी म्हंटलेल्या गौळणी आवडायच्या. “नेसले ग बाई, मी चंद्र कळा ठिपक्याची, तिरकी नजर माझ्यावर या, सावळ्या हरीची’, हि मामांची आवडती गौळण. आत घरात, उषा ताईंचा स्वयंपाक सुरु असायचा. एखादी लेक पोटाला असती तर बरे झाले असते, असं त्या नेहमी म्हणायच्या.

घरात एक लोखंडी कॉट. त्यावर गादी. स्वच्छ बेडशीट.ओढ्यातल्या पांढऱ्या चुनखडीच्या मातीने सारवलेली चूल. चुली समोर पाट. एक चटई. हा होता उषा ताईंचा संसार. एक मोठा कंदील तर दोन छोट्या सुंद्र्याचे दिवे. रॉकेल वाचविण्यासाठी त्एयातला एकच लावायचा. 5 लिटर रॉकेल मिळाले, तर पद्म भूषण मिळाल्याचा आनंद चेहऱ्यावर दिसायचा.

जगण्याच्या संघर्षाशी मुलांचं नातं अगदी लहानपणा पासूनचं. आमच्या वस्ती वरचा सतिश हा ITI झालेला पहिला मुलगा. चोरून त्याच्या गॅदरिंगला गेल्याचं अजूनही आठवत. वस्तीवर आमची इन-मिन आठ दहा घरं. चुनाभट्टी चाळ. तिथे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वीस एक घर. या परिसरात न लाजता सतिश पहाटे पाव विकायचा.

घरात ही सर्व मूलचं. पण उषाताई डंकावरून परत येई पर्यंत घर जिथल्या तिथे ठेवलेले असायचे.

उन, वारा, पावूस याची पर्वा न करता, पहाटे चारच्या सुमारास उमेश (सुनील) सायकल घेवून कोरेगाव गाठायचा. तिथून रहिमतपूरची एस. टी. आणि तसाच परत 30 किलो मीटर प्रवास. कधी कधी सायकल पंक्चर झाल्याचे पहाटेच्या अंधारात ध्यानात यायचे.

कॉलेज संपवून आल्यावर आईला डंकावर मदत. दिवसभर वाळलेल्या मिरच्या, घमघमीत मसाला, डंकाचा असह्य आवाज, उषांताईंचे पुढे आयुष्यभराचे ऐकणे बंद करून गेला.

उषाताईंचा डंक हा आमच्या साठी एक सहानुभूतीचा विषय होता. मिरची पूड, त्या पुडीची चाळण, कुटलेला मसाला बाजूला करताना वापरायचा अल्युमिनियमचा हात चमचा. मशीन चालू असताना जीव धोक्यात घालून कुटलेला मसाला बाजूला करायला लागायचा. चटणी पूड डोळ्यात अन् नाकात जायची. चाळण वापरताना हात दुखायचे, उषाताईंचे खांदे भरून यायचे. त्यातच त्या शिलाई कामही करायच्या. कुठून तरी चार पैसे मिळवावेत आणि स्वाभिमानान चूल पेटवावी, हाच एक उद्देश असायचा.

आईची ही दयनीय अवस्था मुलांनाच काय कुणालाच पहावत नव्हती. कसा शोध लागला कोणास ठावूक? पण डंक चालू असतानाच आपोआप चटणी चाळणारी चाळण आली. आणि उषाताईंचे कष्ट कमी झाल्याने प्रत्येकाला आनंद झाला. हा शोध आमच्यासाठी विज्ञानातील कोणत्याही शोधा पेक्षा कमी नव्हता.

डंका जवळच पुढे उजव्या हाताला मुख्य बाजार पेठेत मामांचे सुतार कामाचे वर्क्स शॉप. कंपनीतील काम संपले की मामा रात्री पर्यंत तिथे काम करायचे. मुलांच्याया निमित्ताने या सर्व कष्टांना पुढे यशाचे दिवस येत गेले. आसले येथे पक्के घर झाले. मुलांची लग्न झाली. चांगल्या घरातून सुना घरात आल्या. कष्ट आणि माणसे जोडण्याचा वारसा या सुनानीही चालू ठेवला. नातवंडे अंगा खांद्यावर खेळली. कुणीही माणूस आयुष्यात अपेक्षित करतो ते सुख दारी उभे असताना, उषा ताईंचा इहलोकीचा प्रवास संपला. आयुष्यभर अबोल राहिलेली एक श्रम संस्कारांची शाळा आम्हीच काय, उषा ताईंच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाने अनुभवली. उषा ताईंचे पार्थिव अग्नीच्या स्वाधीन होत असताना, श्रद्धांजलीच्या निमित्ताने याचं कष्टाचा आठव पुन्हा झाला. आयुष्यभर अविश्रांत कष्ट करून, कृष्णामाईची लेक कृष्णा माईच्या कुशीत शांत झाली!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *