‘वहिनीसाहेब’:भारती विद्यापिठाचं ‘शक्तिपीठ’

वहिनीसाहेब: भारती विद्यापीठाचं शक्तिपीठ

मा. विजयमाला पतंगराव कदम तथा वहिनीसाहेब यांना, नुकतेच “रमाई-रत्न” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पार्श्वभूमीवर या आधी २ जून या त्यांच्या वाढदिवसा निमित्त प्रकाशित, संस्थेच्या ‘विचारभारती’ या मुखपत्रात प्रसिद्ध झालेला लेख…

भारतीय संस्कृतीनं स्त्रीला देवत्व बहाल केलेलं आहे, तिला ‘शक्तिरूप’ मानलं आहे. ‘या देवी सर्व भूतेशु, मातृरूपेण संस्थित:I या देवी सर्व भूतेशु; शक्ति रूपेण संस्थित:I’ अशा प्रार्थनेतुन तिच्याकड़े आशिर्वादाची प्रार्थना केली जाते आणि आपल्या मंगलमय जीवनाची कामनाही केली जाते. शक्तिपिठांच्या या देवता आपल्या आयुष्यातील संकल्पांना, सत्कार्याला शक्ती प्रदान करतात; अशी धारणा आहे. माझ्या मते; आपल्या व्यक्तिगत जीवनांतही, आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी देणारी, आपल्या आयुष्याचं, आपल्या प्रगतीचं अधिष्ठान झालेली मा. वहिनीसाहेबां सारखी व्यक्ति देखिल, एखाद्या ‘शक्तिपीठा’सारखीच असते. गेल्या तीस वर्षांच्या ‘माझ्या व्यक्तिगत सहवासावर’ आधारीत (काही ठिकाणी ‘आत्मस्तुतिचा अपरिहार्य दोष’ स्वीकारुन), त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लिहिलेला हा लेख, भारती विद्यापीठ परीवारातील आपणां सर्वांच्याच मनात मा. वहिनीसाहेबांच्या प्रति असणाऱ्या कृतज्ञतेच्या भावनेची, ‘एक प्रातिनिधिक अभिव्यक्तिचं’ आहे.

आंतरराष्ट्रीय किर्ती लाभलेलं आपलं ‘भारती विद्यापीठ’; हे आज देशातील एक अग्रगण्य शिक्षण संस्था म्हणून ओळखलं जातं. अशा या संस्थेची नेमकी बलस्थानं काय आहेत? या संस्थेचे नेमके ऊर्जा-स्त्रोत काय आहेत? या संस्थेची नियंत्रण केंद्रे कोणती आहेत? याचा जर विचार केला; तर यामध्ये आपल्या हे सहज ध्यानात येईल, की मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब हे नांव, या संस्थेच्या केंद्रस्थानी आहे. केवळ मा. साहेबांची पत्नी म्हणून नव्हे, तर ‘स्वतंत्र व्यक्तिमत्व लाभलेल्या वहिनीसाहेब’ यांनी प्रदीर्घ त्यागातुन स्वत:ची अशी एक जागा निर्माण केली आहे.  

२०१५-१६ सालची ती घटना असेल. वेळ संध्याकाळची ५-६ ची असावी. काही कारणानिमित्त मा. वहिनीसाहेब संस्थेच्या ‘कोथरुड कॅम्पस’ मध्ये आल्या होत्या. तेंव्हा तिथे उपस्थित होते, भारती विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु डॉ. उत्तमराव भोईटे सर. एका समारंभाच्या नियोजनासाठी, चर्चेच्या निमित्तानं त्या संवादप्रसंगी मी ही त्या ठिकाणी उपस्थित होतो. ‘आयएम्ईडी’च्या दारात उभं राहून वहिनीसाहेबांनी एकदा सभोवार पाहिलं. औषधनिर्माणशास्त्र विद्याशाखेतलं देशातलं अग्रगण्य महाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फार्मसी कॉलेजची देखणी ईमारत, संस्थेचं उच्चशिक्षणातलं पहिलं पाऊलं म्हणून ओळखलं जाणारं यशवंतराव मोहिते कॉलेज, तीन आद्य महाविद्यालायांपैकी एक असणारं आयएमईडी, होस्टेल्स, भारती विद्यापीठाच्या प्रगतीची आणि ऐतिहासिक प्रवासाची एक नि:शब्द साक्षीदार म्हणून उभी असलेली प्रेस, आतंरराष्ट्रीय किर्ती लाभलेल्या लॉ कॉलेजची आणि एम.एस.डब्ल्यू.ची उंच इमारत, त्या पलिकडे इंग्लिश-मीडियम आणि भारती विद्यापीठाची आद्य-शाखा असलेलं, एका विचारवंताचं स्मारक ठरलेलं ‘शंकरराव मोरे विद्यालय’.  

कॅम्पसकड एक दृष्टीक्षेप टाकत भोईटेसर म्हणाले की ‘वहिनीसाहेब, या उंच उंच इमारतींचा पाया काही दगड-विटांनी भरलेला नसून, तो तुम्ही केलेल्या संसारसुखाच्या त्यागाने भरलेला आहे.’ त्यावर उत्तरादाखलं त्या म्हणल्या, की ‘खरं आहे सर, आयुष्यातले कितीतरी दिवस आणि रात्री; या मी केवळ साहेबांची वाट बघण्यात घालवल्या आहेत’. तोचं संवाद थोडा पुढे नेत भोईटे सरांनी प्रख्यात इंग्रजी कवी जॉन मिल्टनच्या ओळी ऐकविल्या. ‘O’er land and ocean without rest: they also serve who stand and wait’ (याचा अर्थ असा की, ईश्वराच्या विश्वप्यापी कार्यासाठी जे सदैव तत्पर असतात आणि सेवेची संधी लाभावी म्हणून जे ईश्वरीआज्ञेची आतुरतेने वाट पहातात, ते लोकही ‘ईश्वरसेवेतच’ असतात.) योगायोगाने नेमकी हीच कविता मीही त्यावेळी वर्गात शिकवत होतो आणि त्या ओळींचा आशय, हा गेली तीन दशके; मी अनुभवलेल्या वहिनीसाहेबांच्या व्यक्तिमत्वाला आणि त्यागाला अधोरेखित करणाराच होता.     

अपवाद वगळता, भारती विद्यापिठाच्या कोणत्याही कार्यक्रमात वहिनीसाहेब प्रेक्षकांत बसणं पसंत करतात, प्रसिद्धीपरांन्मुख जगणं पसंत करतात. संस्थेचा विचार करता; प्रत्येक ठिकाणी असणारा त्यांचा वावर; हा दृश्य स्वरूपाचा असो वा नसों, प्रत्येक ठिकाणचं त्यांचं अस्तित्व मान्यचं करायला लावणारा असतो. त्यामुळेचं मुंबई, पुणे, सांगली-सातारा-कोल्हापुर-सोलापुर सह, दिल्ली पासून-तिकडे काळम्मावाड़ी पर्यंत, इकडे सोलापुर-जत पासून बंदरकाठा-जव्हार पर्यंत, जवळपास २०० हुन अधिक शाळा-कॉलेजेसच्या आणि सलग्न संस्थांच्या माध्यमातून देशसेवेत उभ्या असणाऱ्या या संस्थेचा पसारा, ज्या केंद्रीय सत्तेंच्या नावे सांभाळला जात आहे, त्या ‘गुरुत्व-बलाचे’ नाव आहे, ‘वहिनीसाहेब’. आयुष्यभर केलेल्या त्यागातुन निर्माण झालेल्या या संस्थेचा  देशाच्या विविध भागात चालणारा सारा कारभार, बारकावे आणि तिथे चाललेल्या घड़ामोडी यांच्या कड़े त्यांचे बारकाईने लक्ष असते. संस्था मोठी होताना, संस्थेच्या कोणत्याही कालखंडात अत्यंत मनोभावे; सेवावृत्तीने काम करणाऱ्या सेवकांच्या पाठीवर हात फिरविणाऱ्या, चांगल्या कामासाठी प्रेरणा देणाऱ्या, कोणताही संबंध नसताना संस्थेप्रती स्नेहार्द भाव असणाऱ्यांसाठी, त्यांच्या मनात नेहमीच एक कृतज्ञतेची भावना असते.   

मा. साहेबांच्या बरोबर विवाहोत्तर सुरु झालेला संसार, हा कधीच केवळ एका ‘दाम्पत्याचा, पति-पत्नीचा संसार’ नव्हता. अगदी पहिल्या दिवसा पासून तो संसार व्यापक स्वरूपाचा, समाजाचा, आयुष्यात आलेल्या प्रत्येकाचं सुख-दुःख हे आपलं मानून केलेला, इतरांच्या आनंदात आपला आनंद मानणारा, कुटुंबिय, नातेवाईक आणि भारती विद्यापीठ परिवारातील सदस्यांना आवश्यक तिथे; आवश्यक ती ताकत प्रदान करणारा; असाच होता.   

साहेब राज्याचे उद्योग मंत्री आणि कॉंग्रेसचे सर्वात जेष्ठ नेते होते, त्या वेळचा एक प्रसंग. महाराष्ट्रातल्या तीन राजकीय नेत्यांच्या पत्निंच्या मुलाखती, पुण्यात ‘केसरीवाड्यात’ आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये होत्या नामदार श्री. सुशिलकुमार शिंदे यांच्या पत्नी सौ. उज्ज्वला शिंदे, श्री. प्रमोद नवलकर यांच्या पत्नी सौ. वंदना नवलकर आणि मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार नामदार डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या पत्नी सौ. विजमाला कदम तथा वहिनीसाहेब. मुलाखतकार होते प्रसिद्ध निवेदक श्री. सुधीर गाडगीळ.  

वहिनीसाहेबांना प्रश्न विचारताना सुधीर गाडगीळ म्हणाले, ‘वहिनीसाहेब, महाराष्ट्रातच्या मंत्री मंडळातील सर्वात कर्तृत्ववान मंत्री म्हणून साहेबांचा उल्लेख करावा लागेल. महाराष्ट्रात साहेबांच्या नावाचा मोठा दरारा आहे आणि अधिकारी वर्गात तर त्यांचा एक आदरयुक्त धाकही आहे. पण प्रश्न असा आहे की अशा साहेबांची घरात सत्ता किती चालते? प्रश्न गंभीर होता; तरी देखिल सभागृहात हास्याची एक लकेर उमटलीच आणि त्याही पेक्षा या प्रश्नाचं उत्तर वहिनीसाहेब काय देणार? त्याचीही सर्वाना उत्सुकता लागली. उत्तरादाखल वहिनी साहेब म्हणाल्या, ‘सुधीर, महाराष्ट्रात साहेबांनी जे काम उभे केले आहे, त्याचा त्यांची पत्नी म्हणून मला सार्थ अभिमान आहे. पण मी माझ्या व्यक्तिगत आयुष्यात एक सूत्र मानते. कोणतीही, कोणाचीही आणि कुठेही  सत्ता येण्यासाठी; त्या व्यक्तीचा तिथे काही विशेष त्याग असावा लागतो. ‘ज्याचा जिथे त्याग; त्याची तिथे सत्ता’ हे सूत्र मानले तर, ‘जिथे साहेबांचा त्याग आहे, त्या तिथे महाराष्ट्रात त्यांची सत्ता आहेच’ आणि त्याचं सूत्रानुसार, ‘घरात माझा त्याग अधिक असल्याने घरात माझी सत्ता चालते.’ वहिनीसाहेबांच्या या उत्तरावर सभागृहात टाळयांचा  जो कडकडाट झाला, तो त्यांच्या बुद्धिचातुर्याला आणि जीवनविषयक तत्वज्ञानाच्या मांडणीला सभागृहाने केलेला सलामचं होता.   

१९९० च्या दशकातली गोष्ट. कड़ेगांव मध्ये आयोजित केलेल्या संक्रांतीच्या हळदीकुंकू समारंभासाठी खास वहिनीसाहेब येणार होत्या. साहेबांसारख्या कर्तृत्ववान पुरुषाच्या पत्नीला जवळून भेटण्याची ग्रामीण भागातल्या महिलांसाठी ती नामी संधी होती. मी मतदार-संघातलाचं असल्याने; या कार्यक्रमासाठी माझी आई देखिल हजर होती. समारंभानंतर घरी आल्यावर तिनं मला सारा वृतांत कथन केला. तो समारंभ हा सर्वच वयोगटातील स्त्रियांच्यासाठी कुतूहलाचा विषय होता. त्याच बरोबर आणखी विशेष असं की ‘हळदी कुंकवाचे वाण’ म्हणून तिथे आलेल्या सुवासिनिंना वहिनीसाहेब नेमकं काय देणार? याची ‘स्त्री-स्वभाव-सुलभ-उत्सुकता’ देखिल सगळ्यांच्याच मनात होती. संध्याकाळी सहा-साडेसहा वाजता वहिनीसाहेबांचं आगमन झालं. जतच्या सरदार घराण्यात जन्मलेल्या, प्रभावी व्यक्तिमत्व लाभलेल्या वहिनीसाहेबांनी, आपल्या शालीन आणि कुलीन व्यक्तिमत्त्वानं सर्वांनाच जिंकून घेतले. कुणालाही काही कळायच्या आत; तिथे जमलेल्या महिलांच्यात त्या मिसळून गेल्या. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून बोलू लागल्या. वयानं जेष्ठ असलेल्या महिलांनी वहिनीसाहेबांच्या चेहर्‍यावरून हात फिरवत त्यांना मायेने जवळ घेतलं. आलेल्या प्रत्येकीला वहिनीसाहेब हळदी-कुंकू लावत होत्या. रानात कष्ट करणाऱ्या; मोलमजूरी करणार्‍या; दररोज फडक्यातून भाकरी बांधून नेणाऱ्या आपल्या भगिनींच्यासाठी, त्यांनी अत्यंत विचारपूर्वक संक्रांतीच्या ‘हळदी कुंकवाचं वाण’ म्हणून, ‘तीन-कप्प्याचा जेवणाचा डबा’ आणला होता.       

सगळीकडे आनंदाचे वातावरण होतं, परंतु बाहेर एका कोपर्‍यात मात्र काही महिला वहिनीसाहेबांना ‘फक्त भेटायला’ आल्या होत्या. हळदीकुंकवाच्या त्या कार्यक्रमाशी त्यांना काहीच देणं-घेणं नव्हतं. वयान तशा त्या तरुणचं होत्या आणि तरीही कार्यक्रमात त्या पुढेही  येत नव्हत्या….. ना त्यांच्या गळ्यांत मंगळसूत्र होतं आणि  ना त्यांच्या कपाळी कुंकू. ऐन तारुण्यात त्यां स्त्रियांचे पती निवर्तलेले होते. वैधव्य आल्या मुळे कुंकवाच्या जागेवर उरलेलं त्यांच्या ‘कपाळावरचं गोंदणं’ ‘चटकन’ नजरेत भरतं होतं आणि बघणार्‍याच्या डोळ्यांत ‘टचकन’ पाणीही उभं करणारं होतं. पुढं होतं, वहिनीसाहेबांनी त्या महिलांची स्वत: जातीने चौकशी केली. ‘वहिनीसाहेब, आता ना मी सासरची, ना माहेरची उरले’, असं म्हणत वहिनीसाहेबांच्या खांद्यावर डोकं टेकवून त्यांनी त्यांच्या अश्रूंचा बांध रीकामा केला. गहिवरून गेलेल्या वहिनीसाहेबांनी त्यानंतर साहेबांशी बोलून कडेगांव इथे ‘ग्रामीण महिला औद्योगिक प्रशिक्षण केंद्रा’ची सुरुवात केली. त्या महिलांना प्रशिक्षित केलं. अबला-परित्यक्ता अशा कितीतरी महिलांच्या हाताला काम दिलं. हळूहळू त्या ठिकाणी भारती विद्यापीठाच्या शाळां आणि इतर शाळांचे युनिफॉर्म्स देखिल शिवले जावू लागले. मोडून पडलेले संसार आर्थिक पायावर उभे राहु लागले. त्या परित्यक्ता बाईच्या पोटी असलेल्या चिमुकल्या जिवांची चार घासाची सोय झाली. परिसरातल्या अनेक घरांच्या, निराधार स्त्रियांच्या आयुष्याच्या वहिनीसाहेब उद्धारकर्त्या झाल्या.  

‘संस्थेप्रति निष्ठा, प्रामाणिकपणा, मर्यादा, शिस्त आणि प्रशासकीय निर्णयांची कठोर अंमलबजावणी’ ही  वहिनीसाहेबांच्या प्रशासनाची महत्वाची वैशिष्ट्ये मानावी लागतील. या गोष्टींचे त्या स्वत: जसं पालन करतात; अगदी तसच या ‘तत्वांची आणि मुल्यांच्या पालनाची त्या इतरांकडूनही अपेक्षा करतात. भारती विद्यापीठ परिवाराच्या तर त्या प्रमुख आहेतच, तरीही प्रशासकीय दृष्टीने; भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाच्याही त्या ‘अध्यक्षा’ आहेत. महिलांच्या सर्वांगींण विकासाला वाहिलेल्या ‘कडेगांवच्या शैक्षणिक संकुलाची सम्पूर्ण जडण-घडण, भारती बझार, तसेच या आधी उल्लेख केलेला ‘महिला औद्योगिक संस्था’ अशा कितीतरी जबाबदाऱ्यांकड़े त्यांचे विशेष लक्ष असते. स्थापनेचा रौप्य-महोत्सव साजरा केलेल्या या सर्व संस्था वहिनीसाहेबांच्याच देखरेखीखाली मोठ्या झाल्या. इतकेच नव्हें तर १९९६ च्या दरम्यान मतदार संघात तरुण युवा उद्योजक घडावेत म्हणून, मी आयोजित केलेल्या कड़ेगांव, कोतिज आणि रामानंदनगर इथल्या ‘ग्रामीण उद्योजकता शिबिरांची’ उद्घाटने करण्यासाठीही वहिनीसाहेब जातीने उपस्थित होत्या.  

शालेय शिक्षण हा भारती विद्यापीठ संस्थेचा पाया आहे. अध्यक्षा म्हणून असलेल्या उत्तरदायित्वापोटी शालेयशिक्षण विभाग हा वहिनीसाहेबांनी एका विशेष शिस्तीत वाढवला आहे. त्यामुळेच भारती विद्यापिठाच्या सर्वच्या सर्व शाळां आणि सर्व विषयांचे निकाल हे ९५ ते १००% लागतात. बहुतेक शाळांना  ‘किर्लोस्कर फ़ौंडेशन’ सारख्या महाराष्ट्रातील नामांकित संस्थांचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. उच्चशिक्षणात नॅक-नॅब कडून केली जाते तशीच; काही निकषांवर आधारित होणारी ही शाळा तपासणी; वाटते तितकी सोपी नसते. गुणवत्तेच्या बाबतीत केलेली कोणतीही तडजोड वहिनीसाहेबांना कधीही चालत नाही. त्यामुळचं; काही-काही शाळांना तर हे पुरस्कार कितीतरी वेळा सलग मिळाले आहेत.     

वहिनी साहेबांच्या प्रशासनाचा एक वेगळा कायदा आहे. ‘इथे चुकीला माफी नाही’. हा एक साधा पण प्रभावी मापदंड आहे. परंतु यामुळे भारती विद्यापीठाच्या देशभर पसरलेल्या कानाकोपऱ्यांतल्या शाखांमध्ये आज त्यांच्या नावाचा एक आदरयुक्त धाक कायम आहे. उच्चशिक्षण असो की शालेय शिक्षण, सलग्न संस्था असो की भारती विद्यापीठाच्या नावाने चाललेला कोणताही उपक्रम, कोणताही निर्णय घेताना वहिनीसाहेबांच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रभावाची नोंद अवश्य घ्यावी लागते. कोणताही निर्णय घेणाऱ्यांना; त्या निर्णया बद्दल येणारी  वहिनीसाहेबांची संभाव्य प्रतिक्रियाही; निर्णय घेण्यापूर्वी ध्यानात घ्यावीच लागते.

कौटुम्बिक, सामाजिक, शैक्षणिक अशा वेगवेगळया क्षेत्रात काम करीत असताना आपले ‘स्वतंत्र अस्तित्व’ निर्माण करणाऱ्या, त्या अस्तित्वाचा आग्रह धरणाऱ्या वहिनीसाहेब, कितीतरी भूमिकांतुन आपल्याला भेटतात. ‘लग्न’ असो वा ‘वास्तुशांत’, ‘आजारपण’ असो की कुणाचं ‘सांत्वन’…वहिनीसाहेब, बाळासाहेब किंवा कदम कुटुम्बियां पैकी कुणीतरी सदस्य; हे तिथे उपस्थित असणारचं, हा भारती परिवारातील सदस्यांचा सार्वत्रिक अनुभव आहे. किम्बहुना अशा प्रसंगी केवळ उपस्थित न रहाता; ‘कृतिने पुढे व्हा; हातीं असलेल्या साधनांनी तिथल्या तिथे प्रश्न सोडवा, मदत करा’; हा संस्कारही वहिनीसाहेबांचाच.  

१९९८ च्या डिसेम्बर महिन्यातली गोष्ट. दि. १० डिसेम्बर रोजी देशाचे तत्कालीन पंतप्रधान श्री. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या नातीचे हैद्राबाद इथे लग्न होते. ही नात भारती विद्यापिठाच्या पुण्यातल्या मेडिकल कॉलेज मध्ये शिकली. त्या मुलीचे पुण्यातील पालक म्हणून आणि नरसिंहराव यांचे कौटुम्बिक स्नेहांकित म्हणून, साहेब आणि वहिनीसाहेब यांना त्या लग्नाचं विशेष निमंत्रण होते. तर दुसऱ्याच दिवशी दि. ११ डिसेम्बर रोजी कराड इथे माझं लग्न होतं. साहेब-वहिनीसाहेब यांना त्यांची सुरक्षा यंत्रणा रात्रीचा इतका मोठा प्रवास करू देणार नाही आणि ते माझ्या लग्नाला उपस्थित राहू शकणार नाहीत, याची मला खात्री होती. साहेब-वहिनीसाहेब लग्नाला नसणार याचं खुप वाईट वाटतं होतं. परंतु, अगदी शेवटची मंगलाक्षता संपत असतानाच साहेब-वहिनीसाहेब स्टेजवर आले आणि म्हणाले ‘अरे बघ, रात्रभर ‘बायरोड’प्रवास करून हैद्राबादहुन दोघंपण आलो. बाहेर इतकी गर्दी आहे की आम्हाला पण आत यायला जागा मिळंना, शेवटी पोलिसांनी विशेष व्यवस्था करून वरती आणलं.’ माझ्या आयुष्यातल्या त्या क्षणाची धन्यता आजही शब्दातीत आहे. हे प्रेम त्यांनी भारती विद्यापीठ परिवारातल्या प्रत्येकाला दिलं. प्रत्येकाला आपल्या कुटुम्बाचं सदस्य मानलं. २००५ सालच्या अक्षयतृतीयेला माझ्या पुण्यातल्या घराची वास्तुशांत होती. सकाळी सकाळी साहेबांचा दिल्ली वरून फोन आला, ‘अरे, मला दिल्लीत थांबावं लागलयं, पण काळजी करू नको, ‘ही’ तुझ्या  वास्तुशांतीला येणार आहे.” वहिनीसाहेबांच्या त्या भेटीच्या कितीतरी सुखद आठवणी आजही ताज्या आहेत.   

आपल्या कुटुंबा समवेत वहिनीसाहेबांनी आजवर जगातल्या अनेक देशांना भेटी दिल्या आहेत. गेल्या २८ वर्षांच्या माझ्या सेवा काळात मलाही अमेरिका, कॅनडा आणि फ्रान्स अशा देशांना भेटी देण्याचं भाग्य  लाभलं. या आधी नमूद केल्या प्रमाणे, ग्रामीण भागातून पुढे आलेल्या माझ्यासारख्या एका कामगाराच्या मुलाला, हे केवळ साहेब आणि वहिनीसाहेब यांच्या मुळेच शक्य झालं. कृतज्ञतेच्या भावनेने, प्रस्थाना पूर्वी आम्ही उभयतां जेंव्हा नमस्कार करण्यासाठी वहिनी साहेबांना भेटलो तेंव्हा त्यांनी त्यांचे; त्यां त्यां देशांच्या भेटींचे अनुभव आमच्याशी शेअर केले आणि त्या त्या देशातल्या काही ठिकाणी अवश्य जावून या, असेही सांगितले. ‘परदेशात जाताना सोबत पत्नी सौ. मेघनाला घेवून जातोयस, याचा मला विशेष आनंद आहे’, हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत.

साहेब आणि वहिनीसाहेब यांच्याशी, भारती विद्यापीठ परिवारातील सदस्य म्हणून ज्या ज्या लोकांचं नातं जोडलं गेलं, त्या त्या प्रत्येकाचे आज दिल्ली-पुणे-मुंबई सारख्या शहरात स्वत:चे फ्लॅटस आहेत, गावाकडं बंगले, बागायत शेती आहे, मुलं उच्चं शिक्षित झाली, काहींची मुलं परदेशांत शिकतायत, त्यांना उत्तम पगाराच्या नोकऱ्या आहेत, मुलांची लग्नं थाटांमाटांत होतायत, अनेकांचे परदेश प्रवास झाले, पिढ्यां-पिढ्यांचे भाग्य उजळले आहे. जीवनाला सर्वार्थाने प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. याचे सर्व श्रेय हे साहेब-वहिनीसाहेब आणि कदम कुटुंबियानाचं द्यावे लागेल.     

आपण सरदार घराण्यातल्या असल्याचा, राजघराण्यांशी आपली सोयरीक असल्याचा वहिनीसाहेबांना नितांत अभिमान वाटतो. असाचं एक प्रसंग. भारती सहकारी बँकेच्या कडेगांवच्या शाखेच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी राज्याचे तत्कालीन सहकार-मंत्री श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले आले होते. साहेबांना उद्देशून आपल्या भाषणामध्ये ते म्हणाले होते की ‘साहेब आमचं राजेपण, हे वंशपरंपरागत; पण खरे राजे तर तुम्ही आहात. आपल्या असीम कर्तृत्वामुळे आज आपल्या दारी संपदेचे आणि संपन्नतेचे हत्ती झुलत आहेत. साक्षात गजांतलक्ष्मी आपल्या घरी पाणी भरत आहे. राजकीय सत्तेपोटी असणारा आमच्या डोक्यांवरचा लालदिवा कधी येईल-कधी जाईल, परंतू कुलपति म्हणून राजवैभवाची शोभा वाढवणारा; तुमच्या गाडीवरचा लाल-दिवा मात्र आयुष्यभर ‘तहयात’ कायम राहील.’      

२००८ सालच्या ३१ जानेवारीची घटना. विद्यमान शाहूमहाराज यांच्या मातोश्री; छत्रपति प्रमिलाराजे यांचे निधन झाले होते. त्या दिवसाची सगळी नियोजित कामे बाजूला ठेवून वहिनीसाहेबांनी बाळासाहेबांना कोल्हापूरला जायला सांगितले. प्रमिलाराजे आणि वहिनीसाहेब या दोघींचंही ‘जत’ हेचं माहेर. त्यांच्याशी वहिनीसाहेबांचे खुपच जिव्हाळयाचे संबंध होते. त्यामुळे श्रीमंत छत्रपति शाहू महाराज आणि छत्रपति संभाजी महाराजांच्या भेटीसाठी बाळासाहेब कोल्हापूरला रवाना झाले. मलाही त्यांच्या बरोबर जाण्याचा योग आला. छत्रपति संभाजीराजांचं सांत्वन करताना बाळासाहेब म्हणाले की “आपल्या आज्जी प्रमिलाराजे, यांचा माझी आई विजयमाला यांच्यावर खुप जीव होता; एकदा तर जतला आल्या असताना, माझ्या आईला भेटण्यासाठी त्या घरी आल्या होत्या. माझे आजोबा श्रीमान शरदराव शिंदे सरकार (वहिनीसाहेबांचे वडिल) हे देखिल राजाराम कॉलेजचे विद्यार्थी असताना याच ‘न्यू-पॅलेस’ राजवाड्यात राहून शिकले आहेत” छत्रपतिंच्या घराशी असलेल्या या नाते संबंधाबद्दल वहिनीसाहेबही  मनं भरभरून बोलत रहातात.

वहिनीसाहेबांचं ‘विजयमाला’ हे नावही; ‘माजी खासदार श्रीमंत छत्रपतीं विजयमाला राणीसाहेब’ यांच्या नावावरुनचं, सुचवलं गेलं आहे. वहिनीसाहेबांच्या जेष्ठ भगिनी मा. पुष्पलता गायकवाड यांचा  संदर्भ देवून, वहिनीसाहेबांचे बंधू श्री. अनंत उर्फ़ बाबा शिंदे यांनी या बद्दल मागे एकदा एक आठवण सांगितली होती. वहिनीसहेबांच्या जन्मानंतर कोल्हापूरच्या एका जाणकार आणि अधिकारी व्यक्तिनं असं  सांगितलं होतं की ‘या मुलीच्या (वहिनीसाहेबांच्या) आयुष्यात आलेला ‘प्रत्येकजण’ विजयी होईल. तिचं उभं आयुष्य हीच विजयी आयुष्यांची एक मालिका असेल आणि काळाच्या ओघात आपलं ‘विजयमाला’ हे नाव ती सार्थ करील.” करवीरनिवासिनी आई जगदंबेच्या दारी; त्या कुण्या द्रष्टया पुरुषांन वर्तवलेलं ते भाकित आज सत्य होताना आपण अनुभवित आहोत.     

साहेबांच्या माघारी नामदार डॉ. विश्वजीत कदम सर यांच्या पाठीशी आदरणीय वहिनीसाहेब, डॉ. सौ. अस्मिताताई जगताप, सौभाग्यवती स्वप्नालीताई आणि सोबत समस्त कदम आणि लाड परिवार ठामपणे उभा राहिला. यामुळेचं महापूर असो की कोरोनासारखं जीवघेण संकट, डॉ. विश्वजित आणि डॉ. सौ. अस्मिताताई, या भावंडांनी; भारती हॉस्पिटलच्या पुणे आणि सांगली शाखांच्या माध्यमातून केलेल्या कामाची विशेष नोंद ही राज्य; राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. सिरमच्या लशिची पुण्यातली पहिली चाचणी करणारं हॉस्पिटल म्हणून ताईसाहेबांच्या मार्गदर्शना खाली एक ऐतिहासिक पाऊल उचललं गेलं. प्रसंगी पीपीई कीट घालून; कोरोना पेशंटच्या वार्डमध्ये; अगदी आतपर्यंत जाऊन त्यांची विचारपूस करणारे, त्यांना धीर देणारे हे बहिण-भाऊ, अनेक अर्थाने साहेबांच्या कार्याचे ‘कृतीशील-वारस’ ठरतात. संकटाशी अशा पद्धतीने लढायला शिकवणारे त्यांच्यावर झालेले संस्कार, हे निर्विवादपणे वहिनीसाहेबांचेच आहेत.  

 आपल्या पतीच्या अमर्याद कर्तृत्वापोटी, नात्यापोटी, पदापोटी वहिनीसाहेबांच्या कडून प्रत्येकाच्याच काही अपेक्षा असतात. त्यां सर्वांच्या अपेक्षांची परीपूर्ती; ही देखिल आपली एक अपरिहार्य जबाबदारी मानून, वहिनीसाहेबांनी ती नेहमीच आपलेपणाने आणि आनंदाने पार पाडली आहे. त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे त्यांनी भरभरून दिलं आहे. त्यामुळेच कुटुंबिय, नातेवाईक आणि भारती विद्यापीठ परिवारातील प्रत्येक सदस्याच्या मनात वहिनीसाहेब यांच्या विषयी एक आदराची भावना आहे.     

२०१४ साली; ‘सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने श्री. अनंत दीक्षित, डॉ. अरुणा ढेरे, प्रा. मिलिंद जोशी आणि मी, अशा आम्हां चौघांच्या संपादन समितीला वहिनीसाहेब यांनी एक दीर्घ मुलाखत दिली होती. प्रा. मिलिंद जोशी यांनी शब्दांकन केलेली ही मुलाखत; नंतर स्मरणिकेत प्रकाशित करण्यात आली. मेडिकल कॉलेजच्या सभागृहात, स्मरणिका-समिती सदस्यांना साहेबांनीही दिलेल्या एका विशेष मुलाखतीत, ‘भारती विद्यापीठाच्या उभारणीत वहिनीसाहेबांच्या दिलेल्या योगदानाचा विशेष उल्लेख केला होता. ‘भारती विद्यापीठाच्या देशभर कार्यरत असणाऱ्या बहुतेक सर्वच शाखांच्या इमारतींचं भूमिपूजन आम्ही उभयतांनी केले आहे’, हे देखिल साहेबांनी त्यावेळी आवर्जुन सांगितले होते. कदम कुटुंबियां व्यतिरिक्त भारती विद्यापिठाच्या या सर्व शाखांना भेट देण्याचं भाग्य; खुपच  कमी लोकांना मिळालं आहे. ‘सुवर्ण महोत्सव स्मरणिका संपादन समितीचा सदस्य’ म्हणून, आणि कार्यक्रमांचा सूत्रसंचालक म्हणून; क्वचित अपवाद वगळता, भारती विद्यापिठाच्या बहुतांश शाखांना भेटी देण्याचं भाग्य मला लाभलं आहे. जीवनाची ही धन्यता मांडण्याचा मोह मला या क्षणी आवरता येत नाही. साहेब आणि वहिनीसाहेब यांनी दिलेल्या संधीमुळचं ते शक्य झालं, हे वेगळ सांगण्याची आवश्यकता नाही.  

आदरणीय डॉ. राजेंद्र जगताप यांच्या निमित्ताने जावई म्हणून तर मा. सौ. स्वप्नालीताई यांच्या रुपाने भविष्यकाळाला आकार देणाऱ्या, ‘समर्थ; शालिन आणि कुलीन सुनबाई’ या परिवारात समाविष्ट झाल्या. अभिजितदादा, साहेबांच्या आणि आई ति. स्नेहलता यांच्या जाण्यानं रिकामं झालेलं वहिनीसाहेबांचं आकाश हळू-हळू नातवंडांच्या येण्यानं पुन्हा भरून गेलं. रितं झालेलं गोकुळ पुन्हां एकदा दुधा-तुपांत न्हावून निघालं. बाळासाहेब आमदार झाले, नामदार झाले. एक आगळा-वेगळा आनंद कुटुंबामध्ये प्रवेश करता झाला, जगण्याची नविन उर्जा देवून गेला.  

डॉ. विश्वजित कदम यांच्या बालपणा पासून ते २००६ साली त्यांनी सेक्रेटरी पदाचा पदभार गृहण करेपर्यंत आदरणीय वहिनीसाहेबांनी बाळासाहेबांची ज्या पद्धतीने जड़ण-घडण केली आहे, तीच बाळासाहेबांच्या यशस्वी वाटचालीचा पाया ठरली. वहिनीसाहेबांची ही सारी तपश्चर्या; आज नामदार डॉ. विश्वजित कदम यांच्या क्षमतांमधुन व्यक्त होतं आहे. त्यांचे मराठी आणि इंग्रजी या भाषांवरचे प्रभुत्व असो, आखीव-रेखीव मांडणी असलेली प्रभावी भाषणे असोत, खेळाच्या मैदानावरची खिलाडू वृत्ती असो, मा. सोनियाजी, राहुलजी गांधी, मा. शरद पवार साहेब, खासदार सौ. सुप्रियाताई सुळे, मा. पृथ्वीराज बाबा चव्हाण अशा राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील मातब्बर जेष्ठ नेत्यांच्या बैठकीतील सहज वावर असो, मातीत ज्यांचे जन्म मळले’, त्या भूमीपुत्रांच्या सुखदु:खाशी त्यांचे एकरूप होणे असो, भारती विद्यापीठा सारख्या एव्हडया मोठ्या संस्थेचे सहजतेने नेतृत्व करणे असो, या सर्व बाबी, वहिनीसाहेबांनी केलेल्या जडणघडणीतुन पुढे आल्या आहेत.

अत्यंत छोट्या-छोट्या पदापासून कामाचा अनुभव देत त्यांनी बाळासाहेबांच्या अंगी क्षमता निर्माण केली आणि त्यामुळेच आज पदार्पणातचं नामदार बाळासाहेब हे पूर्ण क्षमतेने, कितीतरी खात्यांचे मंत्री म्हणून, या देशातले सर्वात लहान वयाचे प्र-कुलगुरु म्हणून आणि भारती विद्यापीठाचे कार्यवाह म्हणून संस्थेचेही नेतृत्व करू शकतात. त्यांचे राजबिंडे व्यक्तिमत्व, प्रशासन, नेतृत्व, वक्तृत्व, माणसाला जिंकण्याची हातोटी, कोणालाही पहिल्या भेटीतचं प्रकर्षान जाणवणारी कमालीची नम्रता, परिवारा प्रती असणारा ओलावा, शांतता आणि संयम, संकटे झेलण्याची क्षमता, संघटन कौशल्य, प्रसंगी सर्वस्व पणाला लावण्याची वृत्ती आणि आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला, ‘ताटा मधला घास देण्याचा संस्कार’ हा ‘साहेब आणि वहिनीसाहेबांचा ते एक अंश आहेत’, हेच सिद्ध करतो.

आपल्या सर्वांच्याच वतीनं वहिनीसाहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना आणि लेखाला पूर्णविराम देताना, मी एव्हडचं म्हणेन की “व्यक्तिगत आयुष्यात आलेल्या संकटावर स्वार होणं आणि समाजासाठी पुन्हा उभं रहाणं” म्हणजे वहिनीसाहेब. जीवनात भव्य-दिव्य असं काही गाठण्यासाठी; संयमाने केलेलं प्रदीर्घ-नियोजन म्हणजे वहिनीसाहेब. अवघड प्रसंगी स्वतःला सावरण्याची क्षमता म्हणजे वहिनीसाहेब. प्रसंगी प्रशासकीय कठोरता, स्वभावाची सोशिकता, मनाचा हळुवारपणा आणि दुसऱ्याबद्दल जाणवणारी संवेदना म्हणजे वहिनीसाहेब. हाती असणाऱ्या साधनांच्यात जिंकण्याची ताकत निर्माण करणं म्हणजे वहिनीसाहेब. ‘रक्ता बरोबरचं; प्राधान्यानं रक्ता-पलीकडलं नातं जपणं’ आणि सभोवार मृत्युचं भयाण तांडव सुरु असताना; ‘पोटच्या पोरांना लढायला पाठवणं’, म्हणजे वहिनीसाहेब. कृतज्ञतेपोटी दाखवलेलं असीम औदार्य म्हणजे वहिनीसाहेब, ‘जिथे रक्तामासाचे हरतात, तिथे फक्त कदम उरतात’, हे सिद्ध करणारया बाळासाहेबांच्या सारख्या नेतृत्वाला जन्म देणारे मातृत्व म्हणजे वहिनीसाहेब. ‘भारती विद्यापीठाची ‘शालीनता आणि कुलीनता’ म्हणजे वहिनीसाहेब आणि…‘साहेब नावाच्या सौभाग्यसुर्याचं विशाल अवकाश म्हणजे वहिनीसाहेब’. या अर्थानं आपल्याही जीवनाकड बघितल्यास भारती विद्यापिठाच्या या ‘शक्तिपीठाचं’ आपल्या आयुष्याशी काही नातं असणं, हे एक ईश्वरी वरदानच नव्हे काय?

प्राध्यापक (डॉ) विवेक रणखांबे भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) यशवंतराव मोहिते महाविद्यालय, पुणे 9850558404

*******

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *