‘जखमा’

जखमा,
काही शारीरिक, बऱ्याच मानसिक,
काही सुकणाऱ्या,
काही कधीच अन कशानेच
भरून न येणाऱ्या.
तर काही वेदनेच्या वाटेवर,
आयुष्यभर नकळत सुखावणाऱ्या

जखमा,
काही जगाने दिलेल्या,
काही स्वत:चं करून घेतलेल्या
कधी स्वाभिमाना पोटी
कधी अहंकारा पोटी
कधी राखेखाली जागसुद निखाऱ्यात,
जाणीवपूर्वक जपण्यासाठी,

जखमा उरातल्या,
रात्रीच्या काळोखात चिंब भिजण्यासाठी
आयुष्यभर हळूवारपणे
कधी कुढण्या अन कुरवाळण्यासाठी

कधी अपमान म्हणून
कधी अवहेलना होवून
कधी विरहाचे रूप घेवून
त्या आयुष्यभर भेटत रहातात.
अश्रुंच्या रंगात,
पापण्याआड रात्रीचे
महाल रंगवून निघून जातात.

जखमाच करतात आयुष्याला,
सहनशीलता वाढवणारी
अन जगणं शिकविणारी
एक प्रयोग शाळा.

इथला प्रत्येक धडा
न चुकता रहातो ध्यानात
अन् खुणावत रहातो अंर्तयामी
हरल्यानंतरही जिंकणारे गांव,
कधी बदला घेण्याचा भाव
तर कधी पुरून उरतो,
सुड विचाराचा दीर्घ श्वास.

कुणी नसेल जर सोबतीला,
तेंव्हा जखमा हटकून येतात.
सोडून अस्तित्वाची खूणगाठ
नातं नव्यानं बांधून जातात.

पण
अश्वत्थाम्याची ‘ती’ जखम,
न भरण्यातही काही सुख आहे,
त्याच्या चिरंतन वेदनेच्या स्वरात,
माझ्या आक्रंदनाचा अंश आहे.

प्रत्येक जिवाच्या जखमेशी
अश्वत्थाम्याचंही एक नातं आहे!
छे! छे! जखमेशिवाय जीवन,
हीच एक व्यर्थता आहे!

कसेही असो, काहीही असो,
एक मान्य करायलाचं हवं,
जखमाचं आयुष्याला जागं ठेवतात,
अन जखमाचं जगणं जिवंत करतात.

जखमाच उभं करतात
माणसाचं आयुष्य,
अन जखमाच पेटवतात
माणसाच्या उरामध्ये जिद्द!

प्राध्यापक (डॉ) विवेक रणखांबे, पुणे
9850558404
२६-०३-२०२२

7 thoughts on “‘जखमा’”

 1. Lovely, especially
  पण
  अश्वत्थाम्याची ‘ती’ जखम,
  न भरण्यातही काही सुख आहे,
  त्याच्या चिरंतन वेदनेच्या स्वरात,
  माझ्या आक्रंदनाचा अंश आहे.
  Great going!!!

 2. Meharaj Pasha Shaikh

  जखमाच करतात आयुष्याला,
  सहनशीलता वाढवणारी
  अन जगणं शिकविणारी
  एक प्रयोग शाळा.

  सत्य आहे सर! सहनशीलता वाढवणारी एक प्रयोग शाळा म्हणजे “जखमा”! एक नविन विचार जो की पुर्वी कधी कोणी मांडला असावा असे मला वाटत नाही. खुप छान लिहीलेली कविता.

 3. प्रा. नितीन पाटील

  काही जखमा तीव्र वेदना देतात तर
  काही जखमाचे व्रण आयुष्यभर मिरवावेसे वाटतात
  म्हणून कधी कधी जखमाच जगायला शिकवतात !

 4. मुकुंद बोधनकर, पुणे

  खूप सुंदर आणि जीवनाचे सत्य विशद केले. मला वाटतं की हा प्रत्येकाचा अनुभव आहे आणि अशा जखमा नाईलाजाने सहन करून पुढील वाटचाल करावी लागते. यातून माणूस ओळखता येतो, खर खोटं समजतो आणि अनुभवातून शिकून पुढे यशस्वी होता येत.
  यामुळे तुमची नवीन प्रतिभा समजली. हा छंद वाढवा.
  धन्यवाद.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *