आयुष्य फुलांचे फुलताना…

सुकण्यासाठी न फुलांनी,
ना हा जन्म घेतला,
फुलवांया जीवन माझे,
जणू जीव जीव वेचियला..

जे लाभले जरासे,
ते जगणे जगून जाऊ,
तक्रार कोणती ती,
मी कोणास दुःख सांगू?

ते तेज त्या भुईचे,
लेवून भाग्य जे आले.
खुडताच पाकळी फुलाचे,
मग डोळे भरून आले.

हे माहेर दोन दिसांचे,
आभाळी फुलतच राही
दुःखात माय आठवोनी,
जे सुख पांघरून जाई.

देई निरोप मजला,
मी जाण्यासाठी आले,
फुललेल्या वाटांमध्ये,
हरखून एक मी झाले.

ना दिसले मग कोणाला,
ते पाणी डोळ्या मध्ये,
हसलेल्या ओठामध्ये
दव चिंब चिंब भिजलेले.

हा शाप म्हणावा का,
हे जीवनच अल्पायुषी?
जे जसे लाभले ज्याला,
त्या ‘ भोग’ म्हणाले कोणी?

क्षण निरोप, मी निघताना,
ना जीव संपला माझा,
जगण्याच्या वाटेवरती म्या,
जो आनंदे मुठीत धरला!

डॉ. विवेक रणखांबे

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *