‘गांव-कुसा’ बाहेरून आत येताना’
(या कवितेच्या माध्यमातून, चळवळीतला एक मध्यम-वयीन कार्यकर्ता; सभोवतालच्या परिस्थिती कड़े पहात, समाज आणि आपल्या अनुयायांच्या पुढे काही निवेदन करतो आहे. अजुन काही वर्षे त्याला इथल्या समाजाची साथ हवी आहे, म्हणून त्यांना विनंती करतो आहे. त्याच्या संघर्ष-भरल्या आयुष्याकड़े तो मागे वळून पहातो आहे.)
गावकुसाबाहेरचं जगणं संपलं त्याला काहीं वर्षे झाली;
तरीही; अजूनही…मी उभा आहे;
तुमच्या पापण्यांच्या गावकुसा बाहेर.
या नजरेतलंही गावकुसं मला संपवायचं आहे.
त्यासाठी मला माझ्याच अस्तित्वाची आण आहे.
लोक मोठे होतात,
कुणाच्या तरी दीर्घ सावलीत,
मी मात्र लहानपणीच मोठे झालो;
माझ्या परिस्थितीच्या –हस्व ओझ्याखाली.
आयुष्याच्या ऊर्जेसाठी;
जळून गेलं माझं आख्खं बालपण;
उच्च-निचतेच्या, भेदभावाच्या,
अन ‘त्या’ चार दगडाच्या चुलीत.
जेंव्हा बागेतल्या फुलझाडासारखं मलाही फुलायचं होतं,
तेंव्हा जंगलातल्या झाडासारखं वणव्यात जळत आलो मी..
ओलांडावे लागले अव्यक्त यातनांचे महासागर; समुद्रपक्षाचे पंख लावून;
किमान पुढच्या पिढीला तरी स्वाभिमानाचा पैलतीर दिसावा म्हणून…
कुठल्या तरी पिढीत डोक्यावर;
जे ना कधी उभं राहिलं छप्पर,
‘ते’ही पहिल्यांदाच उभं करायचं होतं.
ना कुठल्या पिढीनं गिरवलं;
पाटीवर कधी एकही अक्षर
‘ते’ही पहिल्यांदा मलाच गिरवायचं होतं.
एकदाच मिळालेल्या आयुष्यात
नसताना कसलीच साथ; अन कसलाच वारसा
नेहरु-अंबानी-अमिताभच काय?
मला विद्रोही तुकारामही व्हायचं होतं.
माझा लढा आहे पिढ्यांपिढ्यांचा,
कितीतरी जणांसाठी अजूनही
अन्न; वस्त्र अन निवाऱ्याचा
पिढ्यां-पिढ्यां कुपोषित राहिल्या,
तरीही एका ‘ज्ञानसाधका’चा.
एकाच पिढीत सगळे प्रश्न,
मी सोडवू तरी कसे?
अश्वथाम्याची जखम घेवुन,
सांगा मला; मी जावू तरी कुठे?
माझ्यातल्या क्षमतेला, अज्ञानाला,
काहीच गाठीशी नसल्या संचिताला;
इथे कितीदातरी हिणवलं, नाकारलं, अव्हेंरलं.
नजरेत जवळीकीचं प्रेम कुठलं?
‘भाग्य’ नेहमीच ‘भोग’ होवून आलं.
आभाळ फाटलं म्हणायला,
आभाळ आधी एक असावं लागेल;
हे मला माहीत आहे.
चिंध्यानीच भरलेलं आयुष्य माझं,
नेमकं फाटलयं तरी कुठे कुठे?
तेही मलाच शोधावं लागेल.
दुरवर कुठेतरी कोसळणारया विजेच्या उजेडात;
भयाण काळोख्या रात्री; एखाद्या निबीड अरण्यात;
अहो शोधावी कुणी वाट,
अगदी तसाच दिवसाच्या लख्ख उजेडात;
आयुष्यभर चाचपडत आलोय इथे.
आयुष्याच्या संध्याकाळी आता; म्हणताच कुणी ‘उजेड’
उघडण्यापुर्वीच; डोळे दिपून जातात इथे’.
आता अंधाराचीच झाली आहे; इतकी सवय
की ‘उजेडा’च्या नुसत्या चर्चेंचीही; उरात खोल जखम होते.
दूर तिकडे ‘देहुच्या डोहात’; भुकेजल्या कितीतरी पोटात
आकाशातल्या वीजे सारखी; अजूनही उठते आहे कळ.
त्या तुकारामालाच विचारा ‘मलमपट्टी’ने सहजच;
विरून जातात का हो पाठीवर उठलेले;
‘अव्यक्त जखमांचे वळ’?
‘उजेडा’तल्या पाच-पन्नास वर्षानी,
संपतो का असा शतकां-शतकांचा अंधार?
जेंव्हा इथे प्रत्येकाच्याच पायात आहे;
एक ‘असमान भूतकाळ’…
जेंव्हा इथे प्रत्येकाच्याच पायात आहे;
एक ‘असमान भूतकाळ’.
(फुलब्राईट स्कॉलरशिप विजेते, माझे मित्र ‘प्रा. डॉ. बळीराम तथा बी. एन. गायकवाड’, मुंबई यांना स्नेहपूर्वक अर्पण)
प्राध्यापक (डॉ) विवेक रणखांबे, पुणे
Website: vivekrankhambe.com, 9850558404
दि. ११ मे, २०२१
अप्रतिम सरजी, एका क्षणात तुम्ही माझ्या आयुष्याचा जीवनपट अलगद उलगडल्याचा अनुभव मिळाला, माझ्यासारख्या लाखो करोडो तरुणांच्या आयुष्याची फरपट आणि त्यांनतर आलेलं आमच्याच समाजातील काही लोकांच्या (सो कॉल्ड समाजातील) नजरेतील गावकुसबाहेरच परकेपणा तुम्ही अगदी चपखलपणे मांडले आहे, स्वतःला वरच्या वर्गाचे समजणाऱ्यांच्या खाडकन कानशिलात देऊन त्यांचीही नकळतपणे कान उघडणी केलीत, माझ्यातला साचलेपणा काही प्रमाणात रिता झाल्यासारखं वाटलं, तुमच्या या कवितेने समाजातील खडतर प्रवास केलेल्या अव्यक्त आणि दुर्लक्षित नायकाला आवाज दिलात.