Art for Art Sake or Art for Life Sake

Plato & Aristotle

कलेसाठी ‘कला’ की, जीवन (जगण्या) साठी ‘कला’?

(कला, ललितकला आणि प्रयोगिक कला शाखांतील: संधी, समस्या, आव्हाने आणि उपाय)  

प्राध्यापक (डॉ) विवेक रणखांबे, भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय), यशवंतराव मोहिते महाविद्यालय, पुणे, vivekrankhambe@gmail.com, Contact No.: 9850558404, Date: 10-05-2021

(“आज कोविडच्या एका विषाणूमुळे जागतिक स्तरावर संपूर्ण मानवी जीवन उद्ध्वस्त झाले आहे. जागतिक स्तरावर अनुभवास आलेला, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातला कदाचित हा असा पहिलाच खडतर प्रसंग असेल. पण जगाच्या पाठीवर शेकडो वर्षांचा इतिहास असणाऱ्या विद्यापीठांच्या इतिहासात मात्र ही घटना काही नवीन नाही. अनंत संकटे झेललेली; जगातील अनेक विद्यापीठे अशा अनेक संकटांचा सामना करत, शतकानुशतके आजही उभी आहेत. त्यांनी त्यांच्या इतिहासात असे अनेक Pandemics बघितले आहेत; पण म्हणून काही त्यांचे ‘फुलणे’ थांबलेले नाही. अगदी त्याच प्रमाणे; आज ओस पडलेली ‘आपली विद्यापीठे; आपली कॉलेजेस’ ऊद्या ‘पुन्हा निश्‍चित फुलतील’, यात शंका नाही. जगाचा इतिहास तरी आपल्याला असेच सांगतो आहे”.…… सिंबायोसिस चे संस्थापक डॉ. शां. ब. मुजूमदार यांनी दिनांक 26 एप्रिल 2019 रोजी भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या स्थापनादिन समारंभ प्रसंगी त्यांच्या मनोगतातून व्यक्त केलेला आशावाद.)

‘कलेसाठी कला की जीवनासाठी कला’? हा एक चिरंतन वाद, सु-संवाद आहे आणि या वादाने; ‘कला क्षेत्राला’ नेहमीच प्रवाहित ठेवलं आहे, नित्यनुतन ठेवलं आहे. हा वाद म्हणजे काही कोणत्याही भूमिकेचा दुराग्रह नव्हें आणि सम्पूर्ण स्विकारही नव्हें. या वादाचे अनेक पैलू आहेत. सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल आदि…पासूनच्या दीर्घ ऐतिहासिक, सामाजिक आणि बौद्धिक परंपरांचे त्याला काही संदर्भ आहेत. परंतु या लेखामध्ये मात्र आपण खूपच सिमित अर्थाने त्याच्याकडे पाहाणार आहोत.

कला शाखेच्या ज्ञानाची उपयोगिता; उपयुक्तता, अर्थात कला शाखेच्या विद्यार्थ्यांकडे चरितार्थासाठी-उदरनिर्वाहासाठी आणि नोकरीच्या माध्यमातून ‘प्रतिष्ठित जीवन जगण्याच्या’ नेमक्या काय संधी आहेत? आधुनिक जगात जीवनाची कोणती क्षेत्रे त्याला खुणावत आहेत? त्यासाठी त्याला कोणत्या कौशल्यांची गरज आहे? किम्बहुना कोविडक्रायसिस मधून वाट काढित; पुढे चाललेल्या जगात, भविष्यत उद्या; कला शाखेच्या विद्यार्थ्याचे नेमके काय भवितव्य असणार आहे? याचा विचार; हाच या लेखाचा चिंतन हेतु आहे. ‘उदरभरणा’ बरोबरच ज्ञानमार्गातून समाजाचं ‘भरणपोषण’ करण्यास प्राधान्य देणारी, ‘जीवन समृद्ध करणारी विद्याशाखा’ म्हणजे ‘कला-शाखा’ होय.

हा लेख लिहीत असताना सभोवार सुरू असणारे मृत्यूचे तांडव, कोरोनाच्या निमित्ताने जीवनाची वाढलेली अनिश्चितता आणि शिक्षणासह सर्व क्षेत्रात झालेले न-भूतो-न-भविष्यति असे अमुलाग्र बदल, यांची दखल घ्यावीच लागेल. थोडक्यात विद्याशाखा कोणतीही  असो, विद्यार्थ्याना स्वत:ला अधिक व्यापक स्वरूपात सिद्ध करावे लागेल; आव्हानांशी दोन हात करावे लागतील; हे मात्र निर्विवाद.

कला शाखेला रुढ़ार्थानं ‘मानव्यशास्त्र विद्याशाखा’ असंही म्हटलं जातं. मानवी जीवनाची नेमकेपणाने मांडणी, तत्त्वज्ञान आणि मानवी समूह जीवनाचा अभ्यास, या विषयी संशोधन आणि मार्गदर्शन करणारी शाखा म्हणून ‘कला-शाखेचे’ महत्त्व अनन्यसाधारण आहे. जगाच्या इतिहासामध्ये असणारी सर्वात प्राचीन इतिहास लाभलेली ‘’ ज्ञानशाखा म्हणजे कला शाखा. पारंपारिक शिक्षणातली तर ही ‘आद्य-शाखा’, कितीतरी विद्याशाखांची हि ‘मातृशाखा’. या शाखेमध्ये अंतर्भूत होणारे सर्वच्या सर्व विषय हे कितीतरी अर्थानं; मानवी इतिहासामध्ये पहिल्यांदा जन्माला आलेले विषय आहेत. त्यामध्ये तत्त्वज्ञान, साहित्य, भाषा, इतिहास, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, ललितकला, वृत्तपत्रविद्या, माध्यमे अशा विविध विषयांनी समृद्ध असणारी शाखा म्हणून कला शाखेकडे बघावं लागेल. जगातील विविध विद्यापीठे या शाखेअंतर्गत अगदी ‘पर्यावरण आणि भुगोलासहित’ विविध विषयांचा समावेश करतात. इतकेच नव्हे तर या विद्याशाखेच्या काही उपशाखाही आहेत. जगभर त्यांना विविध नावानी ओळखले जाते. Faculty of Arts / Humanities & Social sciences / Fine Arts / Performing Arts / Liberal Arts which includes Art, Literature, Linguistics, Philosophy, Religion, Ethics, Modern Foreign Languages, Music, Theater, Speech, Classical Languages, Psychology, Sociology, Politics, Gender Studies, Anthropology, Economics, Media & Mass Communication, Creativity etc.

कलाशाखेची तशी अनेक वैशिष्ट्ये आहेत. अनेक अर्थानी प्रत्येक माणूस हा आजन्म कला शाखेचा विद्यार्थी असतो, या नजरेनं बघितलं तर या शाखेचं सर्वसमावेशकत्व ध्यानात येतं. कला शाखेचा विद्यार्थी असणं; म्हणजे ‘एका व्यापक जगाचे नागरीक होण्यासारखं’ आहे. काळाच्या ओघात केवळ चरितार्थाचे साधन म्हणून एखाद्या विद्याशाखेच्या विद्यार्थ्याना कमी अधिक मागणी होते; म्हणून काही त्या विद्याशाखेच महत्व कमी होत नसते. व्यापक अर्थान विचार केला तर मात्र आपल्याला जीवन समृद्धी करणारी शाखा म्हणून कला शाखेकड़े पहायला हवे. आज मान्यता पावलेल्या इतर विद्याशाखां अस्तित्वात येण्याच्या कितीतरी आधी, कला शाखेच्या माध्यमातूनच माणसाचं जीवन; प्रवाहित होतं आपल्या पर्यंत आलं आहे, हे सर्वांना मान्यचं करावं लागेल.  

स्वातंत्र्य पूर्व काळात लोकमान्य टिळक, पं. नेहरु; महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर आदि मंडळी ही कला शाखेची पदवीधर होती. या लोकांनी देशाचे नेतृत्व केलं. त्या काळात सर्व राजकीय नेते हे ज्ञानसमृद्ध होते आणि विशेषतः ते कला शाखेचे विद्यार्थी होते. देश हाच त्यांच्या चिंतनाचा आणि चिंतेचा विषय होता. या काळात पंतप्रधान; अर्थशास्त्रज्ञ, विविध खात्याचे मंत्री हे कला शाखेचे विद्यार्थी असल्याचे आपल्या ध्यानात येईल. त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळात दहावी आणि बारावी अशा जुजबी शिक्षणावर सेवेची संधी उपलब्ध होती. गुणवंत शिक्षकांच्या पिढ्यानी आपल्या पूर्वजांना घडवलं. त्यानंतर सेवाशर्तींमध्ये संशोधन पदव्याचा समावेश झाला आणि आज संशोधनाबरोबरच, युपीएससी-एमपीएससीच्या धर्तीवर नेट-सेट सारख्या स्पर्धा परीक्षांचे आधारित कला शाखेतील सेवेचे अवकाश खुले आहे. त्यामुळेच इतर शाखांच्या तुलनेमध्ये कला शाखा ही जरी उपयोजनासाठी; चरितार्थाच्या दृष्टीने काहीशी कमी दिसत आहे; हा दोष ‘बाजारातील मागणी’नुसार पुरवठा होत नसल्यामुले आहे. आज मितीला देखील, या शाखेतील मूलभूत क्षमतांधारक पदवीधरांना जगाच्या बाजारामध्ये फार मोठी किंमत आहे, हे विसरून चालणार नाही. आज जगाच्या पाठीवर देश चालवणारे, कठिण काळात देशाचे नेतृत्व करणारे, निम्म्याहून अधिक देशांचे पंतप्रधान-राष्ट्रपति हे कला शाखेचे विद्यार्थी आहेत, हे आपल्याला ध्यानात घ्यावे लागेल.   

या विद्याशाखेची आणि इतर विद्याशाखांशी नोकरीच्या संधीबाबत तुलना करणं चुकीचं ठरेल. त्याचं कारण असं की मानवी जीवनाच्या वेगवेगळ्या कालखंडात प्रत्येक विद्याशाखेची आवश्यकता, अपेक्षा आणि स्वरूप या नेहमीच भिन्न राहिल्या आहेत. अप्लाइड रीसर्च अर्थात उपयोजित संशोधनचा आग्रह कला शाखे कडून करता येणार नाही. त्यामुळे बर्‍याचदा संशोधन क्षेत्रामध्ये या विद्याशाखेत होणाऱ्या संशोधनाला इतर विद्याशाखातील संशोधना इतपत स्कोपस इंडेक्स मध्ये किंवा मान्यताप्राप्त परिमाणा मध्यें तोलता येण्याजोगे ‘मोठेपण’ मिळत नाही. इतर विद्याशाखांच्या मध्ये ‘उद्या लागणारा शोध, हा आधीच्या लागलेल्या शोधाच्या अस्तित्वाला आव्हान देणारा असतो’. (आजचे तंत्रज्ञान अधिक परिणामकारक आणि व्यापक वाटत असले तरी ते शाश्वत नसते. आज अस्तित्वात असाणारी टेक्नोलॉजी उद्या जुनी होते.) परंतु कला शाखेमध्ये होणारं संशोधन हे नेहमीच स्थिर आणि भरीव स्वरूपाचे  शाश्वत योगदान देणारे असते. इतर विद्याशाखा आणि कला विद्याशाखेतल्या संशोधनातला हा मुलभुत फरक आहे. इतर विद्याशाखातील संशोधन हे उपयोजन (वापर) करण्याजोगे, विविध परीमाणात मोजता येण्याजोगे; दृश्य अर्थात भौतिक स्वरुपाचे अथवा दृष्य परिणाम स्वरुप असते तर कला शाखेतील संशोधन हे मानवी संबंधाचा अभ्यास करणारे, सामाजिक आकृतिबंध उलगडणारे; त्यातील बदल, संरचना, मानसिकता, साहित्य, भाषाविकास यांवर भाष्य करणारे असते. साहजिकच मुलत: भिन्न असलेल्या ज्ञानाच्या या विविध अशा संपन्न क्षेत्रांची तुलना करणेच मला चुकीचे वाटते.    

कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी आपल्या पारंपारिक ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. ती काळाची अपरिहार्य अशा स्वरूपाची गरज आहे. आपल्या मूळ विद्याशाखेच्या, विषयाच्या ज्ञानाबरोबरच आपल्याला दुसर्‍या विद्याशाखां विषयी माहिती असणं, त्याच्याशी आपला काही परिचय असणे गरजेचे आहे. कला शाखेचा कौशल्य धारण केलेला कोणताही विद्यार्थी; ही आज जगाच्या बाजाराची खरी गरज आहे. गुणवत्ता धारक; कौशल्यप्राप्त, क्षमता धारक विद्यार्थ्यांची आज जीवनाची सर्वच क्षेत्र वाट पाहत आहेत हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. यासाठी कला शाखेच्या विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता वाढवित, स्वत:ला अधिक सुदृढ़ करणं; समृद्ध करणं मला महत्त्वाचं वाटतं.

ज्ञाननिर्मिती बरोबरच सरकारी सेवा, ट्रस्टस आणि इतर सेवा-संस्था, प्रशासन, शिक्षण, ललितकला, प्रसार माध्यम, साहित्य, भाषा, न्याय आणि विधि, प्राच्यविद्या, पर्यटन, मनोविकास, संगणक आणि मोबाईल उद्योग, व्यवस्थापन, नवनिर्मिति, जाहिरात, टंक लेखन आणि लघुलेखन अशा कितीतरी क्षेत्रात कला शाखेच्या विद्यार्थ्यांची गरज आहे. कला शाखेच्या विद्यार्थ्याना आज पारंपरिक शिक्षणाच्या आणि सलग्नविद्याशाखेतील पदविच्या आधारे जीवनाच्या कितीतरी क्षेत्रात संधी उपलब्ध आहेत. त्यात प्रामुख्याने इतिहासकार, पुरातत्वशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, भाषातज्ञ, राजनितिज्ञ, प्रशासकीय सेवा, राजदूत, दुभाषी, संशोधक; प्राध्यापक, प्राचार्य; शिक्षक, संपादक, Content Writer, जनसंपर्क अधिकारी, अभिवक्ता अर्थात Spokes Person, लेखक, कवी, कथा कादंबरीकार, Tourist Guide,  पर्यटन विकास, स्वत: संस्था उभ्या करून व्यापक क्षेत्र उभ्या करू शकण्याच्या संधी, मोडी, अर्धमागधी यांसारख्या अस्तंगत होत चाललेल्या भाषांचे तज्ञ-जाणकार, जाहिरात, मोडेलिंग, फॅशन डीझाईनर, ग्राफिक डीझाईनर, संगणक तसेच मोबाईल उद्योगात ‘नवनिर्मिति आणि  भाषा विषयक असणारी मनुष्य बळाची गरज’, भाषांतरकार, व्यवस्थापन क्षेत्रातील संधी, इव्हेंट मॅनेजमेंट, समुपदेशन, स्वीयसहाय्यक,  मानसोपचार तज्ञ, समाज कल्याण अधिकारी, मूक-बधिर आणि अंध लोकांसाठी सेवेत अपेक्षित अनेक संधी, न्याय आणि विधिक्षेत्रात मसुदा तज्ञ, विविध भाषांवर प्रभुत्व असणारे सुत्रसंचालक, वक्तृत्व, संभाषण कला, प्रसार माध्यमे, मुलाखतकार, आकाशवाणी, दूरदर्शन निवेदक, कलाकार, संगीत, वादन, नृत्य, नाट्य, निर्माता, दिग्दर्शन, चित्रपट सृष्टि, कीर्तन, शाहिरी आदि लोककला, चित्रकार, शिल्पकार, मूर्तिकार, कॉल सेंटर्स, भाषेवर प्रभुत्व असणारे टायपिस्ट आणि स्टेनो, सर्वच क्षेत्रात नवनिर्मिति अर्थात सर्जनशिलता (Creativity), Graphic Designing, Institute & Image Building अशा कितीतरी संधींचे अवकाश त्यांच्या समोर उभे आहे.    

मग एवढया प्रचंड संधी उपलब्ध असताना आज कला क्षेत्राला ‘एक साचलेपण’ का आलयं? या विद्याशाखेतील पदवीधर बेकारांची संख्या दिवसें दिवस का वाढते आहे? कलाशाखेतील तरूण आज नेमका कुठं मागे पडतोय? कलाशाखेतील तरूण कष्टाला कमी पडतो आहे का? त्याच्या करिअरचे नियोजनाला तो कमी पडतो आहे का? किंबहुना त्याच्या अवतीभवती संधीचं काहीचं अवकाशचं उभं नाही का? आपल्या शाखेला तो स्वत:च, ‘कमी मार्क्स असणार्‍यांची, कमी क्षमतेच्या लोकांची शाखा मानतो आहे का?’. दोन-चार महिन्यात  अभ्यास करून इथं पास होता येतं, असा आपला काही गैरसमज झाला आहे का?. ‘राजकारणानं व्यापलेलं त्याच्या सभोवतालचं विश्व आणि त्यातून मिळणारी जगण्याला मिळणारी प्रतिष्ठा’ त्याला महत्वाची वाटु लागली आहे का? जीवघेण्या आजाराशी जगात झुंज सुरु असतानाही, जेंव्हा या देशात निवडणुकांना प्राधान्य आहे, हे त्याच्या बुद्धिला पटलं नाही तरी त्याच्या राजकारण-विषयक धारणेला, या गोष्टी पुष्टि देणार्‍याच नाहीत का? ‘कमी श्रमात यश; श्रीमंती आणि राजकीय पदामुळे तर, अगदी आयुष्यभरासाठी मिळणारा सन्मान’ त्याला ज्ञाना पेक्षा मोठा वाटत चालला आहे. त्यामुळे, ज्ञानपरंपरांशी असलेली नात्याची वीण घट्ट होण्या आधीच ती दिवसेंदिवस सैल होत चालली आहे. अशा परिस्थितीत काही मुद्दे, निरिक्षने महत्वाचे ठरतात.:  

 • कोणत्याही विद्याशाखेत ‘सुमार क्षमता असलेल्या पदवी धारकांची, जेंव्हा बेसुमार वाढ होते’ तेंव्हा त्या शाखेचे अवमूल्यन सुरु होते, हे आपल्याला मान्यच करावं लागेल..  
 • जीवनाला यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या साधनांची जमवा-जमव ही एका रात्रीत होऊ शकणार नाही, ती करण्यासाठी खूप लहानपणापासून स्वतःचा पाया बळकट केला पाहिजे.
 • आपलं घर, आपलं गाव, आपली माणसं सोडून दुसर्‍या कुठल्या तरी ठिकाणी आपलं स्वतःचे अस्तित्व उभं करणं, आव्हानं स्वीकारणे; ही आज काळाची गरज आहे.
 • प्राध्यापक, पालक यांच्या मार्गदर्शानासाठी विद्यार्थ्यानी स्वतःची क्षमता सिद्ध करण्यासाठी एक संकल्प केला पाहिजे आणि तो संकल्प सिद्धीस जाण्यासाठी, आवश्यक क्षमता धारण करण्यासाठी; जाणीवपूर्वक काही पावलं पुढे टाकली पाहिजेत आणि स्वतःला घडवत पुढे गेले पाहिजे. प्रवेशाच्या वेळी कॉलेजेसनी विद्यार्थ्यांच्या क्षमता विकास तपासला पाहिजे.
 • कोणीतरी निर्माण केलेल्या नोकरीच्या संधीपैकी एखादी नोकरी स्वीकारण्यात आणि त्यातच आयुष्याची धन्यता मानण्यात नेमका काय पुरुषार्थ आहे? कला शाखेचे विद्यार्थी म्हणून आपण या बद्दल विचार कराल काय?
 • विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितीत सभोवतालच्या परिस्थितीला दोष न देता पुढे गेले पाहिजे. काही तरी करून दाखवायचे आहे, याची त्यांना जेव्हा कधी याची जाणीव होईल त्या क्षणापासून काम करायला सुरुवात केली पाहिजे. स्वतःला बळकट, समृद्ध आणि सशक्त केले पाहिजे. चांगलं काय आहे? ते पारखंण्याच बळ त्यांच्या अंगी आलं पाहिजे.
 • पदवी स्तरावर आपल्या देशामध्ये द्वि-लक्षी अभ्यासक्रमाची (एकाच वेळी दोन अभ्यासक्रम पूर्ण करणे) याची वाणवा आहे. दिवसभरातले चार-पाच तास घालवून आपले विद्यार्थी ‘एका वेळी केवळ एकच पदवी’ घेतात. उरलेल्या वेळेत आपण आणखी एखादा अभ्यासक्रम पूर्ण करावा, असे त्यांना का वाटत नाही? एखादी बी.ए./एम्.ए. ची पदवी घेतोय म्हणजे आपण खुप काही करतो आहे, हा त्यांचा साचेबद्ध दृष्टिकोन बदलल्याखेरीज एक शाश्वत परिवर्तन शक्य नाही.
 • ‘ज्याला जग बदलायचे आहे, त्याने जग पहायला हवे’ असे प्राचार्य शिवाजीराव भोसले नेहमी म्हणत. पण आमचा पदवीधर मात्र स्वत:च्याच कोशात अवतीभवती घुटमळताना आपल्याला दिसतो आहे. स्थलांतर, देश-विदेशातील शिक्षणाच्या संधी घेण्याचा  त्याने प्रयत्न केला पाहिजे. त्याचे ‘निमित्त सांगणे’ थांबले पाहिजे.
 • ध्येयप्राप्ती साठी ‘सातत्यपूर्वक आणि दीर्घ परिश्रमाची’ तयारी ठेवावी लागते आणि ही तयारी उत्तम गुरूंच्या उत्तम संस्थांच्या उत्तम वातावरणामध्ये होऊ शकते यासाठी दीर्घ काळाचा एक ‘करियर मॅप’ तयार करणे, दीर्घ काळासाठीचे नियोजन करणे आणि त्याची गांभीर्यपूर्वक अंमलबजावणी करणे हे गरजेचे आहे.
 • आपल्या आधीच्या पिढीत महत्वाचे मानले गेलेले वाचन, उत्तम हस्ताक्षर, व्याख्यानांचा आस्वाद-बहुश्रुतता, पाठांतर, योग्य संगत, चाकोरी बाहेरचा विचार, चिंतन या गोष्टींचा विसर पडून चालणार नाही.
 • आपण जेंव्हा खूप पुढे जातो आहोत, त्या वेळी आपण मागे वळून पाहायला हवं. मागे उभ्या असणाऱ्या परंपरा, सामाजिक  संचित याच्याशी आपलं नातं असलं पाहिजे. आपल्या सांस्कृतिक मुल्यांशी तडजोड नको.
 • भविष्याचा वेध घेणारे नवे शैक्षणिक धोरण नेमके काय आहे, त्याचाही परिचय असणे गरजेचे आहे.
 • एकटेपणात सोबत म्हणून एखादी-दूसरी कला, संगीत, वाद्य यांच्याशी जितक्या लवकर परिचय होईल, तितका चांगला.
 • आजच्या काळात कलाशाखेच्या सर्व विद्यार्थ्यांनी नव्या जाणीवांचा ध्यास घेत, केवळ कला-विद्याशाखेतील शिक्षणाची पूर्तता करून न थांबता, तंत्रज्ञानाची कास धरून; स्वत:ची गुणवत्ता वाढ करीत ‘आंतरविद्याशाखीय अर्थात मल्टी-डिसिप्लीनरी’ अभ्यासातून स्वत:ला पुढे नेणे गरजेचे आहे. कला शाखेच्या अशा बहुआयामी विद्यार्थ्यांची हे जग वाट पहात आहे.
 • ………………………………….
 • Please write your comment in the space provided below the article.

7 thoughts on “Art for Art Sake or Art for Life Sake”

 1. प्रशांत कमल धोंडिबा कसबे

  खूपच सुंदर विवेचन केले आहे सरजी, प्राध्यापक विद्यार्थी समाज यासर्वानीच आत्मचिंतन करण्याची वेळ येऊन ठेपली असून, काळाच्या कसोटीवर टिकण्यासाठी आपण आणि आपले विद्यार्थी सक्षम झालाच पाहिजे, अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही. खूपच छान.

 2. Prashant Salve

  कला ही मानवाच्या जीवनामध्ये किती आवश्यक व आनंद देणारी गोष्ट आहे सर आपण आपल्या लेखातून अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे सध्याच्या कालखंडामध्ये मानवी जीवनाला त्याच्या कलात्मक अंगाने पुन्हा या काळोखातून बाहेर काढता येईल हा आशावाद नक्कीच उभारी देणारा आहे

 3. Asst. prof. sanyogita sasane

  खूपच सुंदर लिखाण.सगळ्यात महत्ववाचे म्हणजे योग्य आणि आजच्या पिढीला आणि त्यांच्या पालकांना साठी अतिशय उपायुक्त विषय. खरं तर ज्ञान शाखेचा विचार करायला गेल्यास कोणती ज्ञान शाखा मोठी किंवा चांगली किंवा उपयुक्त अशी तुलनाच नसते किंवा ती करायची हि नसते कारण सगळ्या च ज्ञान शाखा समान तत्वावर सारख्या च महत्त्वाच्या आहेत.फक्त विध्यार्थ्यांनाचा कल बघणे महत्त्वाचे ठरते. आपण या लेखा मध्ये कला शाखा मागे पडण्याचे कारण आणि महत्ववाचे म्हणजे त्या वरील सुचविलेले ऊपाय फारच महत्त्वाचे आहेत. नक्कीच याचा सगळ्यांना उपयोग होईल . आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कला शाखा किंवा कोणती हि शाखा तिला गरज आहे ती” तंत्रज्ञानाची जोड”.हे खरच महत्त्वाचे आहे.
  अभिनंदन डॉ.विवेकानंद रणखांबे💐💐💐💐💐💐

 4. डाॅ. प्रकाश साळवी

  सर, खुप सुंदर लेखन घडलेले आहे. कला शाखेला उपयुक्तता नाही अशी नेहमीच ओरड होत असते. पण कला शाखेचे महत्त्व, मानवतेशी नाते, कला शाखा ख-या अर्थाने माणूस घडविण्यासाठी मदत करते असा जीवनव्यापी विचार आपण प्रस्तुत केला आहे, तो निश्चितच स्वागतार्ह आहे. केवळ ज्ञानासाठी शिक्षण आणि केवळ जीवनासाठी कला हे दृष्टिकोन जरी जीवनातील अर्थकारणाच्या घुसखोरी मुळे मागे पडले असले तरी, ज्ञानासाठी शिक्षण आणि आनंदी जीवनासाठी कला या गोष्टी महत्वाच्या आहेत, हे नाकारता येणार नाही. नेमकेपणाने आपल्या लेखनातून याचा बोध होतो.

 5. सरजी,कला शाखेबद्दल आपले सुंदर विचार वाचले.
  कला = ज्याच्या अंगात कला आहे तो मारू शकत नाही तो स्वतः जगेल आणि दुसऱ्याला जगवेल.
  कलाशाखेला कमी लेखण्याचे कारण नाही, कलाशाखेचा कोणता ही विषय निवडा पण तो मन लावून जीव ओढून करा.
  आपण मराठी विषय निवडला तर काठावर पास होतो पण,बाबा महाराज सातारकर मराठीतून कीर्तन देऊन लाखो रुपये मिळवतात.
  Dr.बाबासाहेब आंबेडकर कलाशाखेचे विद्यार्थी होते.सर्व कलाशाखेचा त्यांनी अभ्यास केला आणि मानव केंद्र बिंदू मानून आपल्या जगात श्रेष्ठ, भारत देशाला संविधान दिले.
  टी.एन.शेषन कलाशाखेचे विद्यार्थी होते घटनेतील निवडणूक आचार संहिता कलमाची अंमलबजावणी करून निवडणुका कशा असतात व एका मताचे मूल्य किती प्रभावी असते हे भारतीय नागरिकांना पटवून दिले.विविध राजकीय पक्षांना खर्चाबाबत उधळपट्टी ला लगाम लावला.तसे पाहिले तर आपल्या भारत देशात कलाशकेचेच बरेच अधिकारी उच्च पदावर आहेत. प्रशासकीय (I.A.S) यंत्रणा मंत्री संत्री फक्त नावालाच असतात.त्याबाबत भरपूर विचार मांडू शकतो .परंतु थोडक्यात सांगण्याचा विषय आपल्या लेखवाचनात प्रतिक्रिया देऊ शकत नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *