“शेठ वालचंद-हिराचंद: एक कर्मयोगी” (वालचंदनगर इंडस्ट्रीज लि. संचालित कुपर इंजिनीअरिंग मधील ‘एक कामगार’, स्व. श्री. अर्जुनराव नारायण रणखांबे, यांच्या लेखन संग्रहातून संपादित लेख)
“कर्मयोगी” हा शब्द आपणाला ‘भगवद्गीतेने’ दिला आहे. कर्म म्हणजे काम आणि जो काम करतो तो “कर्मयोगी”. मग आपणही कारखान्यात-घरी सर्वत्र काम करतोच म्हणजे आपणही एका अर्थी कर्मयोगीचं आहोत. वालचंद शेठजींनी केलेल्या कर्मात आणि आपण केलेल्या कर्मात काही मुलभूत फरक आहे. आपण आपला संसार उभा करण्याचं स्वप्न पाहतो, तर शेठ वालचंद यांनी जगाचा संसार आपला मानून आयुष्य वेचलं. “आकाशाला गवसणी घालू पाहणारी” त्यांच्या कल्पकतेची, उद्दात ध्येयाची, गरुड झेप आपल्याला कधी घेता येईल का? कि आपण फक्त नोकरीचाच शोध घेणार? आयुष्याच्या वाटेवर ‘परिवर्तनाचं’ एक शाश्वत उदाहरण होत, शेठ वालचंद यांनी त्यांच्या जीवन काळात, कृतीने जगासमोर आदर्श घालून दिला.
जन्मा नंतर केवळ दहा-पंधरा दिवसात ज्याचं मातृछत्र हरपलं, त्या बाळाची ज्योतिषानी कुंडली मांडली. “दशा-हुंबड जातीत, दिंगबर पंथी, जैन धर्मात, उत्तरेश्वर गोत्री, शके १८०४, २३ नोव्हेंबर १८८२ गुरुवार रात्री १२ वाजून ४ मिनिटांनी भरणी नक्षत्रावर, चौथ्या चरणांत मध्य नाडीत, मनुष्य-गणांत, स्वामी मंगळ असताना, क्षत्रिय वर्णी, गजयोगी, मेषराशी, पंचाग स्थित असताना” या महान कर्मयोग्याचा जन्म झाला. १५ दिवसांनी आई राजूबाई वारली. चुलती उमाबाई हिने शेळीच्या दुधावर बाळाला जगवले.
१८९० साली ते s.s.c झाले. १९०३ साली ते इतिहास व अर्थशास्त्र घेवून बी.ए झाले व त्याच वर्षी मुंबईत प्लेगची साथ येऊन दोन्हीही थोरले बंधु थोरली भावजय मृत्युमुखी पडले. अशा परीस्थीत बी.ए न होताच शेठजींनी कर्तव्याचा भार आपल्या शिरी घेतला. शेठजी ८ एप्रिल १९५३ ला कालवश झाले. म्हणजे १९०३ ते १९५३ म्हणजे पूर्ण ५० वर्षाचा कालखंड हा कालखंड म्हणजेच शेठजींच्या इतिहासाची सुवर्ण पाने होत. याच पन्नास वर्षांनी वालचंद उदयोगसमूहाला जन्म दिला. अंगाई गाईली हालवलं-झुलवलं आणि दुडूदुडू भारतमातेच्या अंगणात खेळवलं. या महान पुत्राच्या कर्तृत्वातूनच डिझेल इंजिनीचा कारखाना साकार झाला. आगबोटीचा कारखाना, विमानांचा कारखाना, साखर उदयोग, रावळगाव, इंडियन हयूम पाईप, वालचंद नगर अशा नानाविध मौल्यवान तेजस्वी रत्नांचा हार या बालिकाने भारत मातेच्या गळ्यात घातला. भारतमाता संतोषली आनंदली. बाळही आनंदले. भारतमातेच्या दिन दुबळ्या अडाणी बालकांच्या सुखासाठी रात्रं-दिवस झुंजणाऱ्या या कर्मयोगीच्या घरी लक्ष्मीनेही भरभरून पाणी वाहिले.
कर्मयोगाचा आदर्श म्हणून राजा जनकांकडे पहिले जात. जनकाचा एक पाय चुलीला जळत असायचा तर दुसरा पाय त्याच्या दासदासी अत्तर लावून चोळीत असायच्या. महाकार्मयोगी राजा जनकाला जळणाऱ्या पायाचे दुखःही नव्हते आणि दासदासी चेपीत असलेल्या पायाचे सुखही नव्हते. त्याचप्रमाणे शेठ वालचंदही क्लब जीवनापासून, मोठमोठ्या भोजन समारंभापासून आलिप्त राहिले. इतकेच नव्हे तर पूर्व आयुष्यात वापरत असलेले खादीचे कपडे त्यांनी शेवटपर्यंत वापरले. संपत्तीच्या सागरांत राहूनही चैन, विलास यापासून आलिप्त राहिले. २४ ऑगस्ट १९३८ साली त्यांनी आपल्या संपत्तीचे वाटप पत्र केले. १९४६ साली त्यांनी आपल्या वाटणीस आलेले माथेरान-पुणे येथील बंगल्यासह सर्व संपत्ती सौ. कस्तुरीबाईस देवून त्यांच्या कडून ट्रस्ट करविला. कस्तुरीबाई हयात असे पर्यंत या ट्रस्टचे उत्पन्न त्यांना मिळावे व त्यांच्या पश्चात ते शिक्षण, वैदकीय साह्य, ग्रामीण भागांत विहिरी तलाव बांधणे. वाचनालये, ग्रंथालये स्थापणे इत्यादी लोक हिताच्या कार्यात खर्च व्हावेत अशी व्यवस्था केली. वालचंद शेठजींनी आपले सर्व आयुष्य देशहितासाठी खर्ची घातले. आणि आपली संपत्ती ही कुणा एकास न देता ती समाजासाठी पाठीमागे ठेवली.
शेठ वालचंद हे लौकिक अर्थानं ७१ वर्षे जगले, ते गेले त्याला आज (२०२० साली) ६७ वर्षे झालीत. उतार वयात अर्धागाचा झटका आला. खूप तीर्थक्षेत्री हिंडले. तीर्थयात्रेच्या प्रवासांतच ते सिद्धापूर या गावी १८ एप्रिल १९५३ ला कधीही न उठण्यासाठी भारतमातेच्या मांडीवर डोके ठेवून झोपले. पण, स्वत:मात्र कमलपत्राप्रमाणे पैसा, कीर्ती या पासून आलिप्त राहिले. उदयोग-धंदयाच्या तीर्थक्षेत्रांनी नटलेल्या नटवलेल्या या भारत मातेच्या महान कर्मयोग्यास सातारा-रोडच्या भूमिपुत्रांच्या, कामगार सृष्टीच्या वतीने भावपूर्ण अंत:कारणाने, त्यांना आदरांजली अर्पण करूया..
ज्या काळात ते जन्मले तेंव्हा, एकीकडे देश स्वतंत्र होत होता तर दुसरीकडे स्वातंत्र्या नंतरचा भारत उभा करायचा होता. शेठ वालचंद यांच्या सारख्या द्रष्ट्या पुरुषाचा ‘परिस-स्पर्श’, सातारा-रोडच्या लोह-सृष्टीला झाला आणि सातारा-रोडचा ‘तो कालखंड’ हजारो कुटुंबांचे सोने करून गेला. देशातील नामवंत, कीर्तिवंत तज्ञ इथे मँनेजर, तज्ञ कामगार, सेवक म्हणून आले. केरळ, तमिळ नाडू, आंध्रप्रदेश, गुजरात अशा शेजारच्या राज्यातील लोकांची-व्यापाऱ्यांची वर्दळ वाढली. त्या निमित्ताने सातारा-रोड देशाच्या राष्ट्रीय नकाशावर आले. जाती-प्रांत-भाषा-धर्म या भेदांच्या भिंतीपलीकडे, एका ‘सर्वधर्मीय’ भारताचं सातारा-रोड हे एक ‘समर्थ-प्रतिबिंब’ होतं. देशातल्या अग्रगण्य कारखान्यात, फौंड्री उद्योगात, या उद्योगनगरीच नाव मोठ्या आदरानं घेतलं गेलं. आपल्या उण्यापुऱ्या ७१ वर्षांच्या आयुष्यात शेठ वालचंद यांनी नेहमी त्यागालाच महत्व दिले. केवळ उद्योग उभारून कामगारांच्या उदरनिर्वाहाची सोय करून न थांबता, त्यांनी या भूमीच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक भरणपोषणाचे जे महत्वाचे काम केले, ते भविष्यातील पिढ्यांनी वंदनीय ठरेल असेच आहे. यामुळेच कामगारातील गुणवंतांना, कलावंताना, लेखकांना आपले व्यक्तिमत्व साकारता आले. भर दुपारी १२ च्या उन्हात घरी जाताना, कानात नाट्य-गीताचे सूर साठवून मनाला रुंजी घालता आलं. राष्ट्रीय-अन-आंतरराष्ट्रीय स्तरावरील कलाकारांना इथे पाचारण करून, कामगारांना मार्गदर्शन करणाऱ्या शेठ वालचंद यांचा वारसा त्यांच्या कुटुंबीयांनी तितक्याच समर्थपणे पुढे चालविला आहे. त्यामुळेच दोशी कुटुंबीयांच्या अस्तित्वाची, प्रत्येकाच्या मनी त्यांच्या प्रति असणाऱ्या कृतज्ञ भावनेची जाणीव, कामगारांच्या घरातील प्रत्येक माणसा पर्यंत होती. असा हा ‘औलिया’ स्वातंत्र्या नंतर देश उभा करणारा ‘खरा देशभक्त’ होता. कर्मवीर भाऊराव यांच्या रयत सारख्या ज्ञान-यज्ञामध्ये मोलाचे योगदान देताना, शेठ वालचंद यांनीदेखील “पाखीफुटया पाखरासाठी पवित्रसा वट-वृक्ष रोविला, जो आला त्याला ताटा मधला घास दिला”. उण्यापुऱ्या ४०-५० वर्षाच्या काळात, विमानुद्योग, जहाज बांधणी, मोटारी असे कितीतरी उद्योग उभारीत, एक माणूस ‘जल-पृथ्वी-आकाश’ या तीन तत्वांना भारून टाकणारे काम उभे करतो, आयुष्यात आलेल्या प्रत्येक संकटावर स्वार होत, माणसांच्या चालत्या-बोलत्या गुढ्या समर्थपणे उभ्या करतो, तोच भारत मातेचा खरा सुपुत्र ठरतो. या भावनेने भारत सरकारनेही शेठ वालचंद यांचे चित्र असलेले टपाल तिकीट काढले, त्या राष्ट्रीय गौरवाचा अविभाज्य भाग असल्याचा “सातारा-रोड” वासी असलेल्या प्रत्येकाला सार्थ अभिमान आहे.
“स्थिरमेरूचे पुत तुम्ही, अन नवपवनाचे दूत तुम्ही, संसाराचे सार झोकुनी, अनासक्त अवधूत तुम्ही नित्य-नव्या यज्ञाचे दीक्षित, विस्मरला अपसव्य तुम्ही, मातीहून माती असुनीही, हिमालयाहून भव्य तुम्ही”
Professor (Dr) Vivekanand Arjunrao Rankhambe, Pune Contact: 9850558404
अप्रतिम वर्णन व मांडणी.