डॉ. वैभव ढमाळ: ‘शहाणीव देणारी पुस्तकं’

‘जागतिक शहाणीवेशी’, ‘मराठी शहाणीवे’चं नातं जोडणारा एक संदर्भ ग्रंथ

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रा. मिलींद जोशी यांची प्रस्तावना लाभलेला, त्यांच्याच प्रेरणेतुन साकार झालेला आणि ‘शहाणीव’ या शिर्षकापासून सुरु होणारा, डॉ. वैभव ढमाळ यांच्या ‘शहाणीव देणारी पुस्तकं’ या पुस्तकाचा प्रवास, हा वाचकाच्या हाती ‘त्याच्या आजवर न सुटलेल्या कितितरी प्रश्नांची उत्तरे’ देवून संपतो. ‘कशासाठी आणि जगावे कसे मी? असा प्रश्न पडणाऱ्या जिवांसाठी एक प्रकाशवाट होतो. जगण्याची नवी दिशा दाखवतो. समस्यानी ग्रासलेल्या आणि स्वत:च्या क्षमते बद्दल ‘अकारण न्यूनगंड’ बाळगणाऱ्या तरुणाईवर सहज उपचार करून जातो.

विद्यार्थी दशेत ग्रामीण महाराष्ट्रातुन पुण्यात आलेल्या वैभव ढमाळ नावाच्या एका तरुणाचा, स्वत:च्या आयुष्याचा ‘एक सावध आणि जाणीवपूर्वक केलेला प्रवास’ म्हणूनही या पुस्तकाकड़े पहावं लागेल. पुणे विद्यापिठात शिकत असताना आणि नंतर पुढे कुलपति डॉ. शिवाजीराव कदम या कर्तृत्ववान माणसाचा प्रदीर्घ सह्वास लाभेलेले वैभव ढमाळ, यांना आजवर अनेक कर्तृत्ववान माणसं भेटली. अभ्यासातून आणि जगण्यातुन त्यांनी ती अनुभवली. अभ्यासाचा मुख्य विषय हा ‘इंग्रजी’ असल्याने ‘विषयव्याप्ति’ ही विश्वव्यापी’ होती आणि आकलनक्षमताही तशीच विस्तारत गेली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळेचं या ग्रंथाच्या निमित्ताने होणारा वाचकांचा प्रवास जगातील कितीतरी व्यक्ति, विचारप्रवाह, समिक्षा आणि सरते-शेवटी जगण्याची उर्मी यांची भेट घडवून जातो.

मातीशी असणारं नात डॉ. ढमाळ यांच्या लेखणीला भूरळ घालतं आणि म्हणूनचं की काय या मातीच्या आत्मतेजाचा परिचय करून देण्यालाही ते प्राधान्य देतात. मला या ग्रंथात आवडलेली सर्वात सुन्दर गोष्ट म्हणजे प्रत्येक लेखाचा सुरवातीचा परिच्छेद. वाचकाला एका नव्या प्रवासासाठी मार्गस्थ होताना त्याच्या मनी कुतूहल जाग करणारा, त्या लेखाच्या अन्तर्यामी वसलेल्या तत्त्वचिंतनाचे कवडसे दाखविणारा, आणि स्वत:ची भूमिका मांडणारे असे सर्व लेखांच्या सुरुवातीचे परिच्छेद, वाचकाला एका चिंतन समाधिचा अनुभव देतात.  

जागतिक स्तरावर गाजलेल्या या पुस्तकांच्या लेखकांचे परिचय, त्यांचा ध्येयवेडेपणा आणि उपलब्ध साधनांच्यानिशी त्यानी निर्माण केलेली ‘स्वत:ची जागा’ याचा सहज परिचय, हे या पुस्तकाचं सामर्थ्य आहे. याला अनुसरून मला महत्वाची वाटते ती डॉ. ढमाळ यांची भाषा शैली, त्यांच लीलया प्रकटलेलं ‘भाषा सौष्ठव’. लेखक म्हणून ती त्यांच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा परिचय देतं. साहित्य कृतीचा, लेखकाचा जीवनपरिचय करून देताना मध्येच न राहवून त्यांनी व्यक्त केलेले स्वत:चे चिंतन, वाचकाला निसंदिग्धपणे समृद्ध करतं.

एकतर या पुस्तकाच्या माध्यमातून ते मराठी वाचकाला त्याला माहीत नसलेली, ‘दूरदेशीची  माणसे आणि त्यांच्या जीवन कथांचा परिचय घडवितात. लेखांत येणाऱ्या व्यक्ति, या त्यांच्या ‘नील’, ‘बोटम’, यां नावान्मुळ पुरुष आहेत की स्त्री? ही प्रदेशांची नावे आहेत की त्याचे काही सिम्बोलिक वॅल्युज देखिल आहेत? हे पण जिथे समजुन घेतल्या खेरीज समजत नाही, तिथे डॉ. ढमाळ, हे त्या व्यक्तींच्या आयुष्यात आलेल्या प्रश्नाना त्या व्यक्ति कशा सामोऱ्या गेल्या? ते दाखविण्याचा आग्रह सोडत नाहीत. लेखकाचं हे वेडेपण, त्याने हाती घेतलेल्या संकल्पसिद्धिसाठीचा त्याचा आग्रह, वाचकांच्या मनाला भावून जातो.    

‘शहाणीव’ हां केवल प्रेरणा दायी व्यक्तिम्त्वांचा आणि त्यांच्या जीवन कथांचा परिचयचं नाही, तर त्या साहित्य कृतिंच्या निर्मिती नंतर, प्रकाशना नंतर त्या साहित्य कृतीला लाभलेला प्रतिसाद आणि समीक्षकांच्या लेखणीतुन झालेले त्याचे मूल्यमापन, त्या त्या देशाच्या सांस्कृतिक, साहित्यिक इतिहासात लाभलेले स्थान आणि त्या कथावस्तुला समजुन घेण्यासाठीची साधने ही देखिल डॉ. ढमाळ सहजपणे समोर मांडतात.

उदहारण म्हणून आपण ‘सुला’ या टोनी मोरिसन यांच्या कादम्बरी वरील लेखाकड़े बघू. इथे डॉ. ढमाळ हे फर्डिनांड-डी-ससुर याच्या Structuralism अर्थात ‘भाषिक संरचनावादाचा’ आवर्जुन परिचय करून देतात. कादंबरीच्या नेमक्या आकलनासाठी, त्याची थेअरी वाचकाला समजुन सांगण्याचा प्रयत्न करतात. अपरिचित अशी सामाजिक आणि वांशिक उलथापालथ समजणे जिथे अवघड, या कादंबरीतील पात्रांचे वागणे हे असे कसे? अशा प्रश्नानी वाचनाचा प्रवास थांबेल की काय? अशी भीती असताना, त्याच्या आकलनासाठी डॉ. ढमाळ हे समिक्षेचे सहाय्य घेतात. खुप असे हे अवघड आणि क्लिष्ट वाटणारे हे काम ज्या सहजतेने लेखकाने केले आहे, त्याला तोड़ नाही. थोडक्यात असे की ‘त्या व्यक्ति आणि त्यांच्या साहित्यकृति’ यां दोन्ही प्रवासांवर ते अधिकारवाणीने बोलतात.

डॉ. वैभव ढमाळ यांच्या निमित्ताने ‘ग्रामीण महाराष्ट्राच्या शहाणीवेचा झालेला हा प्रवास’ आजवर त्यानी स्वत:च सजगपणाने केलेल्या, स्वत:च्याच  जडण-घडणीचे ‘संचित’ म्हणून वाचकांच्या पिढ्या उरिशिरी धरतील, या बाबत शंका नाही.  या पुस्तकाच्या निमित्ताने ‘गोल्डनपेज प्रकाशनाच्या’ प्रकाशक, सौ. अमृता खेतमर यांनी ‘जागतिक शहाणीवेशी’, ‘मराठी शहावेणी’चं एक नातं जोडलं आहे, असचं म्हणावं लागेल. प्रदीप खेतमर यांनी रेखाटलेले आणि पुस्तकाच्या हेतुला नेमकेपणाने साकारणारे बोलके मुखपृष्ठ वाचकाला लेखनहेतुचे दर्शन घडवणारे आहे.

प्राध्यापक  (डॉ) विवेक रणखांबे, पुणे 9850558404     

1 thought on “डॉ. वैभव ढमाळ: ‘शहाणीव देणारी पुस्तकं’”

  1. Dr. Vaibhav Dhamal

    मा. सर, या सविस्तर परीक्षणासाठी मी आपला मनपूर्वक आभारी आहे.
    इंग्रजी साहित्याचा विद्यार्थी, मराठी पुस्तकांचा वाचक म्हणून वाचनाचा छंद जोपासत गेलो. त्यातून आपले आकलन नव्या वाचकांसाठी लिहून ठेवावे या एका साध्या विचारातून या पुस्तकाचा जन्म झाला.
    आपण कौतुक केले आणि बहुमूल्य सूचनाही केल्या, माझ्यासाठी दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
    आपण इंग्रजीचे उत्तम प्राध्यापक तर आहातच त्याचबरोबर नारदीय कीर्तनकार म्हणून आपण नामसंकीर्तनाचा नवा अध्याय आरंभला आहे. आपणासारख्या व्यासंगी व बहुश्रुत प्राध्यापक, संशोधक आणि रसिक वाचकाकडून प्राप्त झालेला हा अभिप्राय माझ्यासाठी अत्यंत आनंददायी आहे.
    आपल्या सूचना व आपल्या आशीर्वाद यामुळे मला अधिक चांगले काम करायला प्रेरणा मिळेल. मी पुन्हा एकदा आपला आभारी आहे.

    स्नेहांकित ,
    प्रा.‌ डॉ. वैभव ढमाळ

Leave a Reply to Dr. Vaibhav Dhamal Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *