मृदू आणि ऋजू औलिया: डॉ. पी. ए. अत्तार Dr. P. A. Attar: The Man Who Influenced Many Lives

(इंग्रजी विषयाचे देशातील एक गुणवंत प्राध्यापक आणि शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे माजी विभागप्रमुख प्राचार्य डॉ. पी. ए. अत्तार सर आपल्यातुन निघून गेले त्याला एक वर्ष होतं आहे.  संपूर्ण वर्षभरात त्यांच्या आठवणींच्या वेदनेशिवाय सरला, असा एकही दिवस नाही. स्वतःच्या जीवनकाळात ज्यांनी आयुष्यभर इतरांना आनंदच वाटला आणि आयुष्यभर माणसांच्या, विद्यार्थ्यांच्या चालत्या-बोलत्या गुढ्याचं उभ्या केल्या, त्या अत्तार सरांच्या आठवणींचा शाश्वत प्रभाव ही त्यांच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याची  तितकीच शाश्वत  शिदोरी आहे. डॉ अत्तार सरांची कल्पनेतली ही स्मृती, हे आज खरोखरीच एक तीर्थक्षेत्र झाले आहे. डॉ. अत्तार हे या भूमीच्या पाठीवर जिथे चिरविश्रांती घेत आहेत, त्या पाटण तालुक्यातील तारळे या त्यांच्या समाधी स्थळाचे गेल्याच आठवड्यात समाधी स्थळाचे दर्शन घेऊन आलो. यानंतर बोलत असताना प्राचार्य डॉ. एम. ए. शेख सर म्हणाले की “प्रत्येक शुक्रवारी जवळच्या नातेवाईकांनी समाधी स्थळावर जाऊन  दुवा मागवा, कृतज्ञाता व्यक्त करावी, असा रिवाज आहे.” आयुष्यातील प्रत्येक कृतीमागे आणि कामाच्या परिपूर्णते मध्ये ज्यांनी दिलेल्या संस्कारांचा मोलाचा वाटा आहे, किंबहुना, आम्ही ज्या संस्थांत काम करतो तिथे आम्हाला संस्थारुप काम करण्याचे बाळकडू ज्यांनी दिले, त्या अत्तार सरांचे स्मरण आणि शब्दरूप दर्शन भावी पिढ्यांना व्हावे, या एकाच हेतूने हा लेख लिहिला आहे. 
डॉ पतंगराव कदम साहेब, डॉ शिवाजीराव कदम सर यांच्याशी, भारती विद्यापीठ आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्व विद्यालया बरोबर पीएच. डी संशोधक मार्गदर्शक आणि स्नेहांकीत म्हणून त्यांचे अत्यंत सौहार्दाचे नाते होते. आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला उचलून घेणारे त्यांचे हात आजही ईश्वराच्या दरबारातून पुढे येतील, या भाबड्या आशेसह या लेखाच्या माध्यमातून सरांच्या स्मृतींना आपल्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन.)

व्यासंगी, विद्वान, विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आणि श्रीपतराव चौगुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पीरमोहम्मद अबू तथा पी. ए. अत्तार यांचे मंगळवार दि. ३० जुलै रोजी वयाच्या ६४ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाल्याचे वृत्त देशभर वाऱ्यासारखे पसरले आणि डॉ. अत्तार यांचा सहवास लाभलेल्या प्रत्येकाने आपले स्वतःचे, शिक्षक समुदायाचे आणि समाजाचेही निश्चित काही नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली. एक कायमची पोकळी निर्माण झाली. माणूस म्हणून श्रेष्ठ असणाऱ्या एका विद्वान प्राध्यापकाच्या जीवाला चटका लावून जाणाऱ्या या शेवटाने, सारेच हळहळले. विद्यार्थ्यांचा आधार गेल्याची, मोकळेपणाने बोलण्याची जागा हरवल्याची भावना व्यक्त झाली. ज्ञानपरंम्परेप्रति निष्ठा जपणारा, विद्वानांच्यात आणि सामन्यांच्यात तितक्याच सहजतेने रमणारा, आपले मोठेपण सहजपणे कळो न देणारा, ‘मातीत ज्यांचे जन्म मळले’ त्यांना उचलून घेणारा, अभिनिवेश विरहीत जीवन जगणारा ‘एक माणूसवेडा प्राध्यापक’ म्हणून डॉ. अत्तार परिचित होते. त्यांच्या जाण्याने देशभर पसरलेल्या त्यांच्या मित्र-परिवारावर आणि विद्यापीठ क्षेत्रावर साहजिकच शोककळा पसरली.

सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळे या गावी दि. ९-१२-१९५५ रोजी त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण तारळे येथे पूर्ण करून १९७६ साली रयतच्या शिवाजी कॉलेजमधून बी.ए.ची पदवी संपादन केली.   

१९७८ सालची गोष्ट आहे. एम. ए. च्या परीक्षेचे पेपर तपासत असताना सुंदर हस्ताक्षरात लिहिलेली, भाषा-सौष्ठवाने अलंकृत, मुद्देसूद मांडणी केलेली एक उत्तरपत्रिका एका प्राध्यापकांच्या हाती आली. अशा प्रज्ञावंत विद्यार्थ्याच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकावी या हेतूने परीक्षेच्या निकालानंतर त्यांनी बैठक क्रमांका वरून त्या शिक्षकाने त्या विद्यार्थ्याचा शोध घेतला. तो विद्यार्थी म्हणजे रयतच्या शिवाजी कॉलेज मधील श्री. पी. ए. अत्तार. अधिक चौकशी करता त्या प्राध्यापकांना असेही कळाले कि हा विद्यार्थी बी. ए. लाही विद्यापीठात पहिला आला होता. शिवाजी विद्यापीठात इंग्रजी विषयात बंडो गोपाळा मुकादम सुवर्ण पदक मिळवीत डॉ. अत्तार यांनी आपल्या विशेष व्यक्तिमत्वाची ओळख करून दिली.

डॉ. पी. आर. खेर “एंग्लोइंडिअन लिटरेचर” या क्षेत्रात, प्रख्यात इंग्रजी लेखक “पॉल स्कॉट यांच्या ‘राज क़्वार्टेट’ या कादंबऱ्यांचा चिकित्सक अभ्यास” या विषयावर संशोधन करून त्यांनी पीएच.डी संपादन केली. या कामात डॉ. एस. के. देसाई यांचेही त्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

डॉ.अत्तार हे कराडमध्ये वेणूताई चव्हाण कॉलेज मध्ये असतानाच एक प्रसंग. गोल्ड मेडल मिळवलेली डॉ. अत्तार यांचीच एक विद्यार्थिनी आणि ग्रामीण भागातील एका कॉलेज मधील एक विद्यार्थी दोघेही सरांच्या कडे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एम. फील करण्याचा प्रस्ताव घेवून आले. या दोन्ही पैकी एकाचीच निवड सर करू शकत होते. ज्याच्या कडे जास्त क्षमता आहे त्याला निवडण्याकडे लोकांचा कल असताना, डॉ. अत्तार यांनी मात्र त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची निवड केली. त्याचे कारण विचारता, ते म्हणाले होते, कि “सुवर्णपदक” मिळवलेल्या या मुलीला कुणीही मार्गदर्शन करेल, पण या मुलाच्या निमित्ताने ग्रामीण भागातील एक महाविद्यालय सक्षम होईल, त्याचा आत्मविश्वास वाढेल आणि संशोधनाच्या परंपरा विस्तारित होईल. पुढे भविष्यात त्या मुलीनेही सरांच्याच मार्गदर्शनाखाली पीएचडी पूर्ण केली. असा  कृतीने ताकत प्रदान करणारा शिक्षक विरळाच.

स्टाफ मध्ये काम करताना वयाने जेष्ठ असणारे कोणतेही प्राध्यापकही डॉ. अत्तार यांचे मत विचारात घेत. आपल्या सर्व सहकाऱ्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे आणि मैत्रीपूर्ण संबंध होते. कुणावरतरी ते रागावल्याचे क्वचितच कुणी पाहिले असेल. “ज्याचं काम आपण करतो तो आपले गुणगान गातो, ज्याच्या काम व्हावं म्हणून आपण प्रयत्न करतो, पण त्याचं काम होत नाही, तेंव्हा तो आपल्यावर नाराज होतो, स्वाभाविक आहे. माणसाच्या समोर आणि माघारीही आपण प्रामाणिक असावं”. डॉ. अत्तार यांची हि विचारसरणी यासाठीच मार्गदर्शक अशीच आहे. या स्वभावामुळेच कुणीतरी केलेल्या स्तुतीने ते कधी भारावून गेले नाहीत आणि निन्देने, प्रसंगोपात झालेल्या पराभवाने ते कधी खचलेही नाहीत.

विद्यार्थ्यांनी देश-विदेशांतील ग्रंथालये पाहिली पाहिजेत, कोलकत्ता, मुंबई येथील एशियाटिक सोसायटी, आयएसई शिमला, कोलकत्ता, हैदराबाद येथील अमेरिकन स्टडीज रिसर्च सेंटर, ब्रिटीश कौन्सिल लायब्ररीज, धारवाड आणि इतर नामांकित विद्यापीठांची ग्रंथालये धुंडाळल्या खेरीज थेसिस सादर करणे नाही, असा त्यांचा दंडक होता. संशोधनाचे सादरीकरण करताना विज्ञान आणि वाणिज्य शाखेत प्रभावी ठरलेले पीपीटी, साहित्य क्षेत्रातील संशोधन करतानाही वापरले गेले पाहिजे असा त्यांचा आग्रह असायचा.

कराड येथे वेणूताई चव्हाण कॉलेजमध्ये काम करताना, विद्यापीठात विभागप्रमुख म्हणून आणि श्रीपतराव चौगुले महाविद्यालयातही संस्थाचालकांचे, कुलगुरूंचे सल्लागार म्हणून त्यांनी नेहमीच महत्वाची भूमिका पार पाडली. संस्थाचालक आणि प्राध्यापक यांचे संबंध सौहार्दपूर्ण असावे, प्राध्यापकांचे प्रश्न संस्थेने समजून घ्यावेत आणि प्राध्यापकांनीही कर्तव्याचा विसर पडू न देता अधिकार-हक्क यापलीकडे जात संस्थारूप होत काम करावे, हीच भूमिका डॉ. अत्तार यांनी वेळोवेळी मांडली. जो अधिक सक्षम आहे, उंचावर आहे त्याने, जो दुर्लक्षित आहे, अडचणीत आहे त्याला मदत करण्याचे धोरण ठेवले, दुसऱ्याच्या जगी जावून प्रश्न समजून घेतला कि प्रश्न सुटतो, अशीच त्यांची धारणा होती.    

पन्हाळा तालुक्यातील कोतोली या ग्रामीण परिसरामध्ये कार्यरत असलेल्या कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून ते कार्यरत होते. त्यापूर्वी शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे प्राध्यापक आणि विभागप्रमुख म्हणून त्यांनी सुमारे १० वर्षे काम पाहिलं. या काळात इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक म्हणून ही जबाबदारी त्यांनी अत्यंत समर्थपणे पार पाडली. या पदावर विराजमान होणारी व्यक्ती ही प्रशासकीय कौशल्यापेक्षा येथे विषयतज्ञ, अभ्यासू आणि विद्वान असणे गरजेचे असते, या अपेक्षेला प्रमाण मानून ते राहिले.

विद्यापीठ परिक्षेत्रातील शेकडो महाविद्यालयांतील इंग्रजी विभाग शैक्षणिक पातळीवर बळकट झाले पाहिजेत, तिथे शिकविणाऱ्या प्राध्यापकाचे संशोधनाशी नाते असले पाहिजे, प्राध्यापकांचे व्यक्तिमत्व हे संशोधन पदवीने मंडित झालेले असले पाहिजे आणि विद्यापीठाच्या विभागाचा प्रमुख या नात्याने आपण त्यांना सर्वतोपरी मदत करून नेतृत्व सिद्ध केले पाहिजे, यावर त्यांचा भर होता.

एखादे संशोधन पुढे सरकताना मार्गदर्शक, विद्यार्थी आणि प्रशासकीय स्तरावर असणाऱ्या न्यूनतेमुळे विद्यार्थ्याचे होणारे नुकसान होताना पाहून ते व्यथित होत. त्याचा प्रश्न समजून घेत. त्यावर सर्वमान्य तोडगा काढण्याकडे त्यांचा भर असायचा. माणसांचे व्यक्तिगत स्वभाव, अंगी असणाऱ्या क्षमतेचे रितेपण, कार्यालयीन अडचणी आणि त्यामुळे होणारे विद्यार्थ्याचे नुकसान यावर ‘माणूस’ उपाय शोधणारे विभागप्रमुख म्हणून त्यांचे नेहमीच स्मरण होईल. यामुळेच त्यांच्या विभागप्रमुख पदाच्या काळात विद्यापीठ परिक्षेत्रातील ग्रामीण महाविद्यालयातील कितीतरी प्राध्यापकांना संशोधनाची संधी मिळाली, कितीतरी जणांनी ती पूर्ण केली आणि विद्यापीठ परिक्षेत्रातील कितीतरी महाविद्यालयांना NAAC मूल्यांकनात याची मदत झाली. ग्रामीण भागात शिकविताना, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांत आपले संशोधन निबंध सादर करताना जो आत्मविश्वास गरजेचा असतो, तो त्या प्राध्यापकात निर्माण करण्याचे श्रेय डॉ. अत्तार यांच्या विभागप्रमुख पदाच्या कारकिर्दीत झाले हे मान्यच करावे लागेल.

वेणूताई चव्हाण कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. प. ता. थोरात, कोईम्पू युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि शिवाजी विद्यापीठाच्या इंग्रजी विभागाचे माजी विभागप्रमुख डॉ. एस. के. देसाई, डॉ. चंद्रशेखर जहागीरदार, वडील बंधू सुलतानभाई अत्तार, प्रा. एम. ए. शेख, बंधुतुल्य मित्र प्रा. शरद नावरे, डॉ. अशोक थोरात यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या कारकिर्दीवर आणि व्यक्तिमत्वावर विशेष प्रभाव असल्याचे ते अभिमानाने सांगत. १९७८ सालापासून सुमारे ४२ वर्षे या विभागाशी विद्यार्थी व प्राध्यापक या नात्याने ते जोडले गेले होते. एका अर्थाने या विभागाच्या आणि विद्यापीठाच्या प्रदीर्घ वाटचालीचे ते एक प्रत्यक्षदर्शी होते. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांनी कितीतरी जणांना फायदा झाला, त्यांचे आयुष्य घडले, संसार उभे राहिले. प्रशासनाला मानवी चेहरा कसा असावा, याचे आदर्श उदाहरण म्हणून डॉ. अत्तार यांच्या प्रदीर्घ अशा कारकिर्दीकडे बघावे लागेल.

२००४ साली वेणूताई कॉलेज, पुढे शिवाजी विद्यापीठ आणि नुकतेच जुन, २०१९ मध्ये  चौगुले महाविद्यालाचे झालेले मुल्यांकन यात डॉ. अत्तार यांचे मोलाचे योगदान आहे. काम करताना ते कधीच कुणावर रागावले नाहीत. त्यांच्या मते “क्षमता नसणारा माणूस काम टाळतो, सबबी सांगतो, यात त्याची चूक नसते, त्याच्यात आपण क्षमता निर्माण केली पाहिजे आणि शाश्वत अशा साधनात त्याचे रुपांतर झाले पाहिजे. प्रसंगी आपल्याला कुणीतरी वापरून घेतय, असाही भास होतो, पण ज्याने मदत मागितली त्याला ती वृथा अभिमान न बाळगता करावी. निष्पाप मनाने करावी.” हाच संस्कार त्यांनी विद्यार्थ्यांवर केला.

तारळे येथील मशिदीत आपल्या गोड आवाजात नमाजाची अजान म्हणणारा आणि अगदी लहान वयात मुअज्जीन अर्थात इमाम म्हणून लौकिक मिळविलेला, बहुजन समाजातून पुढे येत हा मुलगा पुढे एका विद्यापीठाच्या विभागाचे प्रमुखपद भूषवतो, प्राध्यापकपदी विराजमान होतो, भविष्याच्या वाटेवर सुमारे २० विद्यार्थ्यांना पीएच. डी. आणि १५ विद्यार्थ्यांचा एम. फील साठी मार्गदर्शक होतो, आपल्या आयुष्यात आलेल्या या विद्यार्थ्यांना गुरुकुल शिक्षण पद्धतीने शिकवतो, जाती-धर्म-भाषा-पंथ या भेदांच्या भिंतीपलीकडे जात माणूस म्हणून उरतो, हे डॉ. अत्तार यांचे मोठेपण होते. संशोधक म्हणून त्यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ठ्य असे कि ज्यांनी महाविद्यालयात असताना डॉ. अत्तार सरांचे शिक्षक असलेल्या प्राध्यापकांनीही भविष्यात पीएच. डी.चे शिक्षण आपल्या या विद्यार्थ्याच्या मार्गदर्शनाखालीच पूर्ण केले. उच्च शिक्षण क्षेत्रात असे उदाहरण आपणास क्वचितच पाहायला मिळेल.

एखाद्या प्रबंधाचे लेखन करताना संशोधकासमोर अनंत अडचणी असतात. वर्गात शिकवणे वेगळे आणि संशोधन समाधी वेगळी. या समाधीसाठी आवश्यक असणारे मूलद्रव्य, भाषा, भाषेचं सौष्ठव, मांडणी, विचारांची गुंफण, प्रस्तावानेपासून अनुमानापर्यंत त्याचं उलगडत जाणं, त्यातील सहजता, विषयाला अनुसरून केलेली समीक्षा, शीर्षक देण्यापासून ते संशोधन शुचीत्वा पर्यंतच्या साऱ्या गोष्टी, अत्यंत प्रगल्भतेने केलेली सैद्धांतिक मांडणी, उपलब्ध निकषांच्या आधारे प्रस्तावित विषयाचे केलेली तपासणी हे सर्व करणारा प्रत्येकजण काही परिपूर्ण असत नाही. त्याला सहजपणे, अभिनिवेश विरहितपणे मदत करणे हे अत्तार सरांनी नेहमीच आपले उत्तरदायित्व मांडले. अशा संशोधकाने कृतज्ञतेने स्वत:ला परिपूर्ण करण्याचा, क्षमता वाढवण्याचा प्रवास सुरु ठेवावा, अशीच त्यांची अपेक्षा असे.     

डॉ. अत्तार यांची जीवनशैली अत्यंत शिस्तबद्ध होती. मोजका आहार, व्यायाम-विहार, अभ्यास, वाचन, मानवी संबंधाना प्राथमिकता देत सरणारा दिवस, छोटे-छोटे प्रसंगहि साजरे करण्याची त्यांची वृत्ती ही त्यांचे आणि त्यांच्या सहवासाचे भाग्य लाभलेल्या प्रत्येकाचे आयुष्य सुंदर करून गेली.

आयुष्याच्या वाटेवर “आधी केले, मग सांगितले” हे ध्यानात धरून त्यांनी लिहिलेले २० संशोधन निबंध, “द ब्रिटीश राज नॉवेल्स” हे पुस्तक, युरोपातील विविध देशात केलेला प्रवास, संशोधन प्रकल्प, देशभर विविध विद्यापीठात आयोजित केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांत केलेली भाषणे, देशातील कितीतरी विद्यापीठांच्या समित्यांवर तज्ञ सल्लागार म्हणून केलेले काम, शंभराहून अधिक थेसिसचे परीक्षक म्हणून डॉ. अत्तार यांच्या आयुष्याचा प्रवास हा  भविष्यकाळातील पिढ्यांना मार्गदर्शक असाच आहे.

१९८६ साली डॉ. अत्तार यांचा डॉ. यास्मिन अत्तार यांच्याशी विवाह झाला. राजाराम कॉलेजमध्ये मायक्रोबायालॉजी या विभागाच्या विभागप्रमुख म्हणून त्या कार्यरत आहेत. दाम्पत्य जीवनाच्या वाटेवर सुमारे तीन दशकाहून अधिक काळ डॉ. अत्तार यांची पत्नी म्हणून जगत असताना त्यांच्या जीवनध्येयाशी एकरूप होत अत्यंत अबोलपणे त्यांनी दिलेले योगदान हे निश्चितच वंदनीय आहे. 

आयुष्यभर शिस्तीने जगलेला एक माणूस इतक्या घाईने, इतक्या बेशिस्तीने गेलाच कसा? हा प्रश्न मनाला पडल्यावाचून रहात नाही. जिथे डॉ. अत्तार यांचा जन्म झाला त्याच गावी तारळे येथे, निसर्गाने मुक्त हाताने जिथे सृष्टीसौंदर्याची उधळण केली आहे, त्या भूमीत ते आता चिरविश्रांती घेत आहेत, मृत्यू हा एक “सर्वांग सोहळा” करीत सर निघून गेले? विद्यार्थ्यांच्या भावी पिढ्यांना आदर्श जीवनाचा वस्तुपाठ घालून देत एक साधक, एक औलिया याच भूमीत समाधिस्त झाला आहे. त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.   

1 thought on “मृदू आणि ऋजू औलिया: डॉ. पी. ए. अत्तार Dr. P. A. Attar: The Man Who Influenced Many Lives”

Leave a Reply to Jaya Kurhekar Cancel Reply

Your email address will not be published. Required fields are marked *