भारती विद्यापीठाचे कार्यवाह आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे प्र-कुलगुरू डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. सौ. अस्मिता जगताप या डायरेक्टर, हेल्थ सायन्सेस असताना आणि विविध क्षमतांनी मंडित अशा कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांच्या नियोजन, सामर्थ्यशाली आणि अनुभवी कार्यकर्तृत्वामुळे भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालयाला) A++ (CGPA: 3.60/4.00) असे विशेष मानांकन लाभले, याचा आनंद शब्दातीत आहे. दि. २४ ते २६ ऑक्टोबर, २०२४ या काळात भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालयाचे) नॅक (बेंगलोर) या राष्ट्रीय मुल्यांकन आणि अधिस्वीकृती परिषदेकडून ही तपासणी झाली.
तसे म्हणाल तर इतर शैक्षणिक जगतासाठी हे जरी सर्वसाधारण आणि नियमित मुल्यांकन असले तरी प्रत्यक्षात मात्र ते कितीतरी वेगळे होते. २००३-०४ साली तत्कालीन कुलगुरू डॉ. एस. एफ. पाटील यांच्या नेतृत्वाखाली, २०११-१२ तसेच २०१६-१७ साली प्राध्यापक डॉ. शिवाजीराव कदम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मूल्यांकनाच्या पार्श्वभूमीवर २०२४ मधील मुल्यांकन कितीतरी अर्थाने आगळे-वेगळे होते.
बदलत्या निकषांच्या आणि नियमांच्या पार्श्वभूमीवर नेहमीच्याच पद्धतीने मुल्यांकन होणे अवघड आणि तरीही आवश्यक असताना, कुलगुरू म्हणून नियुक्त होताच डॉ. विवेक सावजी यांनी हेल्थ युनिव्हर्सिटी मॅन्युअल स्वीकारत वेगळी वाट चालण्याचा जो मार्ग स्वीकारला, तो मुळातच कठीण असणाऱ्या मूल्यांकनाच्या प्रक्रियेत, कांठीण्याची पातळी वाढविणारा होता आणि साहजिकच शैक्षणिक जगतातील अनेकांच्या भुवया उंचावणारा होता.
परंतू, प्रा. डॉ. शिवाजीराव कदम सर, डॉ. विश्वजित कदम सर आणि डॉ. सौ. अस्मिता जगताप यांच्याशी सल्लामसलत करुन, एकदा घेतलेला निर्णय बदलतील ते डॉ. सावजी कसले? पहिले सहा महिने तर नवा सारीपाट समजण्यातच गेले. मुल्यांकन प्रक्रियेस सामोरे जाण्यासाठी त्यांना कसाबसा एक-दीड वर्षाचा कालावधी मिळाला. परंतु सर्वात महत्वाचे असे कि जी माणसे आणि साधने, ज्या ठिकाणी ज्या अवस्थेत आहेत, त्यांना त्या त्या क्षमतानिशी जसे होते तसे त्यांनी स्वीकारले, यंत्रणेतील प्रत्येक माणूस, विद्यापीठ, यंत्रणा त्यांनी जशी होती तशी स्वीकारली. त्यात कोणताही बदल केला नाही, कोणाची ट्रान्सफर करून, कोणाला बाजूला सारून, कोणाबद्दल मनात पूर्वग्रह धरून डॉ. विवेक सावजी सर कधीच वागले नाहीत. तर जी माणसे, जी साधने ज्या ठिकाणी होती, त्यांच्या क्षमता वाढवीत, काम करण्याची संधी देत डॉ. सावजी पुढे जात राहिले.
कामाचा वाढता व्याप आणि आव्हानांचा पाठलाग करताना त्यांनी डॉ. शैलेश लेले यांच्या सारख्या मित्राला साद घालीत, आपले गुरु डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या आशिर्वादाने डॉ. सावजी हे एक अविचल वाटचाल चालले असेच म्हणावे लागेल.
जे काम झाले आहे; त्याला पुढे नेत, जे अपूर्ण आहे; ते पूर्ण करीत, आणि जे गरजेचे आहे; त्याची पूर्तता करीत मूल्यांकनाचे काम पूर्ण झाले. त्या वाटेवर, कोऑर्डीनेटर, आयक्यूएसी, मॅनेजमेंट कौन्सिल, अकॅडमिक कौन्सिल, बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स अशा सर्वच स्तरांच्यावर काम करताना डॉ. विवेक सावजी यांची कुठेही कसरत झाल्याचे निदर्शनास आले नाही. याचे कारण आणि उत्तर हे डॉ. सावजी यांच्या क्षमताधिष्ठीत व्यक्तीमत्वात दडले आहे. त्यामुळेच वयाचे, अनुभवाचे थोरलेपण असणारे कितीतरी लोक कडेला असताना, डॉ. सावजी त्यांचेही मार्दर्शक झाले.
काही वर्षापूर्वी भारती मेडिकल कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम करताना ज्यांच्याशी परिचय झाला आणि जे आजही विद्यापीठाच्या सेवेत आहेत, त्यांना डॉ. सावजी यांचा परिचय होताच किंबहुना डॉ. सावजी यांची कुलगुरूपदी नियुक्ती होऊ शकते, या संभावनेचाही सर्वाना आनंद होता.
उपलब्ध मानवी साधन संपत्तीच्या क्षमता वाढविण्यासाठी डॉ. सावजी यांनी विद्यापीठातील मान्यवर प्राध्यापकांची भाषणे असणारी व्याख्यानमाला सुरु केली. त्याच्या एका भागात व्याख्यान तर दुसऱ्या भागात एक-दोन पॉडकास्ट अशी व्याख्यानमाला सुरु झाली.
डॉ. विवेक सावजी हे स्वतः एक निष्णात वक्ते आहेत. माहिती, विषयाचे सखोल ज्ञान, शैक्षणिक जगतात सुरु असलेल्या अद्ययावत बदलांचे भान आणि एकंदर विद्यापीठ चालविण्यासाठी आवश्यक असलेल्या तत्वज्ञानाची बैठक असलेले परिपूर्ण कुलगुरू म्हणून डॉ. सावजी सरांचा उल्लेख करावा लागेल. त्यामुळे कोणत्याही सभेपुढे, कोणत्याही विषयावर डॉ. सावजी सरांचे ओपनिंग रिमार्क्स असणारच.
डॉ. सावजी सर यांच्या मिटींग्जचे वैशिष्ठ्य असे कि या सर्व मिटींग्ज सर्व साधारणपणे २ तास, ३ तास आणि कधी कधी चार साडेचार तास चालल्या. यातील बहुतांश वेळ ते स्वतः बोलले आहेत. त्यावर टीकेचे सूरही उमटले. पण माझ्यामते आपल्या सहकाऱ्यांना कुलगुरुंनी आवश्यक ते ट्रेनिंग दिले आणि त्या द्वारे त्यांच्या क्षमता विकसित केल्या. एखाद्या सभेपुढे इतका वेळ त्या त्या विषयाच्या ज्ञानाच्या खोलीपर्यंत जात, त्याच्या सर्व बाजूंचा आढावा घेत, नेमकेपणाने सभेला निर्णयापर्यंत आणणे हे वाटते तितके सोपे नाही. सर्वात महत्वाचे असे कि डॉ. सावजी सरांच्या या सर्व मिटींग्ज अंती भरपूर नवे काही शिकल्याचा अनुभव निश्चित यायचा. त्यामुळे, प्रदीर्घ काळ चाललेल्या या मिटींग्जमुळे कधी थकवा आला नाही, कि त्याचा त्रास झाला नाही. उलटपक्षी चार तास सलगपणे आणि तेही तत्वज्ञानाच्या, प्रशासकीय आणि व्यावहारिक पातळीवर बोलण्याची क्षमता लाभलेले कुलगुरू भारती विद्यापीठाला लाभल्याचा खूप आनंद असायचा. या प्रत्येक मिटींग्जच्या शेवटी मा. डॉ. शिवाजीराव कदम सर, डॉ. विश्वजित कदम आणि डॉ. अस्मिताताई जगताप यांची हटकून आठवण यायची आणि डॉ. सावजी यांना कुलगुरू म्हणून निमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानावेत, असे कितीदा तरी वाटून गेले.
डॉ. सावजी हे प्रशासक म्हणून अत्यंत कर्तव्य कठोर आहेत, हे अनेकांनी अनुभवले असेल. ते व्यक्तिगत नात्यांचा सन्मान जरूर करतात, माणूस म्हणून आपलेपणाने वागवतात, पण कोणतीही आगळीक ते खपवूनही घेत नाहीत. एखादा विषय जेंव्हा कायद्याला, प्रशासन पद्धतीला संमत असलेल्या पद्धतीने त्यांच्या जवळ पोहोचतो, त्यावेळी त्याचा सोक्षमोक्ष लावल्या खेरीज ते थांबत नाहीत आणि एखादा विषय त्यांनी हाती घेतला तर त्यांच्यावर कोणतीही शक्ती स्वार होऊ शकत नाही. जे मनाला पटते, जे प्रशासन प्रक्रियेने मान्य केले आहे, त्याचा सर्वार्थाने पाठपुरावा करीत आपल्या सहकारी प्राचार्यांच्या पाठीशी उभे राहणारे कुलगुरू म्हणून डॉ. सावजी सरांचा उल्लेख करावा लागेल.
तसे पाहिले तर त्यांच्या सभोवताली काही क्षेत्रांत नामवंत प्राचार्य, संचालक, विद्यापीठाचे अनुभवी पदाधिकारी, विद्वत आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य म्हणून कितीतरी मान्यवरांची मांदियाळी कार्यरत आहे. पण तरीही, डॉ. सावजी सर हे त्यांच्या नेतृत्व क्षमतेने शोभून दिसतात. एखादा विषय नेमकेपणाने समजून घेण्याची, त्याच्या सांगोपांग अभ्यासाची आणि प्रश्नांच्या सोडवणुकीची क्षमता यांमुळे आपल्यापेक्षा वयोवृद्ध, अनुभवसमृद्ध आणि ज्ञानी म्हणून परिचित असणाऱ्या विद्वतजनांचेही नेतृत्व लिलया करताना डॉ. सावजी सर दिसले.
भारती विद्यापीठाने घडविलेले, भारतीतून केएलई सारख्या ‘दुसऱ्या नामवंत विद्यापीठाच्या सेवेत कुलगुरू म्हणून दाखल झालेले, भारती विद्यापीठाचे एक्स्पोर्ट केलेले पहिले कुलगुरू’ होण्याचा मान डॉ. सावजी सर यांना मिळाला. १९८० च्या दशकापासून डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या याच विद्यापीठात प्राध्यापक म्हणून आपली शैक्षणिक आणि प्रशासकीय कारकीर्द सुरु करणारे, पुढे कितीतरी वर्षे भारती मेडिकल कॉलेजचे प्राचार्यपद सांभाळणारे आणि पुढे कुलगुरू म्हणून एक स्वत:च्या आश्वासक कार्यपद्धतीचा ठसा उमटविणारे, आव्हानांना लीलया सामोरे जाणारे, विद्यापीठाच्या इतिहासात स्वत:च्या कारकिर्दीला ऐतिहासिक बनविणारे कुलगुरू म्हणून, डॉ. सावजी यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.
नॅकच्या ४ थ्या आवर्तनाचे शिवधनुष्य सहजतेने पेलताना काही मान्यवरांची बहुमोल मदत झाल्याचे त्यांनी उधृत केले. किंबहुना बहुतांश काम त्यांनी स्वतः जातीने केले असले तरी ते एक टीम वर्क आहे, असे मानत ते पुढे गेले. भारती विद्यापीठाच्या स्थापना दिनाचे अर्थात दि. १० मे, २०२४ चे औचित्य साधून, नॅकला सादर केलेला एस. एस. आर. हा एक याचा प्रत्यक्ष पुरावा मानावा लागेल. मी आजवर वाचलेल्या परिपूर्ण एसएसआर पैकी हा एक. कोणत्याही अपरीचीताला विद्यापीठाचा सहज परिचय करून देणारा, प्रस्तावने पासून निष्कर्षापर्यंत, वेगवेगळ्या निकषांच्या आधारे, त्याच्यात अपेक्षित असलेल्या तांत्रिक तपशिलासह सादरीकरण करताना, भारती विद्यापीठ विश्वविद्यालयाच्या इतिहासाचे नेमकेपणाने दर्शन घडते. हे टीम-वर्क आहे असे डॉ. सावजी यांनी कितीही म्हंटले तरीही, या संपूर्ण ड्राफ्टमध्ये भाषेचे, भाषा सौष्ठवाचे आणि तरीही सहज-सोप्या इंग्रजीचे संस्कार डॉ. सावजी सरांचेच असणार, हे निर्विवाद!
वक्तशीरपणा, आपल्या पदाचा योग्य तो आदर राखण्यासाठी असलेला त्यांचा आग्रह, नियमांच्या अंमलबजावणीसाठी असलेला कटाक्ष, प्रत्येकाच्या अंगी असणारी क्षमता-कौशल्ये या बद्दलचा विश्वास आणि जी साधने हाती आहेत, त्यानिशी विनातक्रार समस्येवर स्वार होत, विजयश्री खेचून आणण्याची क्षमता असलेले कुलगुरू म्हणून डॉ. विवेक सावजी यांची नाममुद्रा या A++ यशामुळे उमटली आहे, हे नि:संशय!
वाय. एम. कॉलेजच्या प्राचार्यपदाची धुरा स्वीकारल्या नंतर मी दोन गोष्टी कटाक्षाने निश्चित केल्या आणि त्या म्हणजे माझ्या कॉलेजचा उल्लेख हा दीक्षांत समारंभ प्रसंगी कुलगुरूंच्या भाषणात असायला हवा आणि त्याचबरोबर त्यांच्या नॅकच्या प्रेझेन्टेशन मध्ये माझ्या कॉलेजच्या काही स्लाईडस असायला पाहिजेत. या दृष्टीने काम करताना, २०२१ साली मी Voyage with Vice Chancellor ही व्याख्यानमाला सुरु केली. प्रथम कुलगुरू डॉ. उत्तम भोईटे सर यांनी त्याचे उद्घाटन केले तर डॉ. एस. एफ. पाटील यांनी दुसरे पुष्प गुंफले. तिसरे आणि अतिशय महत्वाचे पुष्प गुंफण्यासाठी कोणाला बोलवायचे? कारण या व्याख्यानातून सदरचा उपक्रम हा ‘बेस्ट प्रक्टिस’ मध्ये रुपांतरीत होणार होता. साहजिकच डॉ. सावजी हे केवळ कुलगुरू पदावर आहेत, म्हणून नव्हे, तर त्यांच्यातील क्षमतेला अभिवादन करीत आम्ही डॉ. विवेक सावजी सरांना बोलविण्याचे ठरवले. त्यावेळी विद्यार्थ्यांना संबोधित करताना ते म्हणाले होते कि “खूप हालअपेष्टा सहन करून आलेलो आहे, असे माझे जीवन नक्कीच नाही. उलट एका सुखवस्तू कुटुंबातून मी आलो. पण आयुष्याचा मार्ग मात्र मी स्वतःशी प्रामाणिक रहात चाललो. फायमर फेलो होत ईलिओनॉईस विद्यापीठात शिकलो, याचा विशेष अभिमान वाटतो.” हे त्याचं सर्वकाळ असणारं सच्चेपण मनाला भावणारं!
आपल्या विद्यार्थ्यांच्या आनंदात आनंद मानणारे कुलगुरू म्हणून पद्मश्री शितल महाजन हिने माउंट एव्हरेस्ट समोर २३,५०० फुट उंचीवरून मारलेली उडी, डॉ. सुहास मोहिते यांच्या नेतृत्वाखालील ‘पुणे-तिरुपती’ १२०० कि. मी. रॅली आणि जागतिक बुद्धिबळ स्पर्धेची जगज्जेती कु. आकांक्षा यांच्या यशाबद्दल सत्कार समारंभाची वेळ ठरवताना सरांनी तीन वेळा बदल करीत, ती विद्यार्थ्यांच्या सोयीने ठरवली, हे गोष्ट कितीतरी अर्थाने अनुकरणीय आहे.
व्यक्तिगत बोलायचे झाल्यास प्राचार्य आणि डीन म्हणून काम करताना अनेकदा मोडून पडल्यासारखे वाटले, वाटेवरच्या वेदना सहन होत नाहीत त्यामुळे थांबावे वाटले, त्यावेळी डॉ. सावजी यांनी मनी जागविलेला विश्वास, त्यांनी दिलेले बळ, ‘समस्या या प्रत्येक स्तरावर असतातच, त्यांचे स्वरूप पदानुसार अधिक कठीण होत जाते आणि आपण स्थितप्रज्ञतेने त्यातूनच मार्ग काढायचा असतो. गावोगावी मातीच्याच चुली असतात, हे त्यांचे शब्द पुन्हा मार्गस्थ होण्यासाठी, काहीसे वेगळे जगण्यासाठी भाग पाडणारे ठरले.
नॅकच्या संदर्भात डॉ. सावजी सर यांच्या समोर झालेल्या कोणत्याच प्रेझेन्टेशन मध्ये मी माझ्या संपूर्ण क्षमतेनिशी प्रेझेन्टेशन देता आले नाही, याची खूप खंत वाटत होती. त्या अस्वस्थतेत आणि चिंतेत मी कितीतरी रात्री घालविल्या होत्या आणि त्याची काही कारणेही होती. पण नॅक पीअर टीम समोर झालेल्या फायनल व्हिजीट दिवशी मात्र मी १००% समाधान पावलो आणि डॉ. सावजी यांच्या प्रयत्नांच्या यज्ञात ‘एक समर्थ समिधा वाहू शकलो’, हे स्वानंदस्वरूपाचे पारितोषिक मला इतर कोणत्याही समाधानांपेक्षा महत्वाचे वाटते. आमच्या महाविद्यालयाच्या नॅकसाठी अत्यंत कठीण काळात पुढे येत, डॉ. जी. व्ही. माळी सर यांनी समन्वयक म्हणून, डॉ. पी. टी. पाटील आणि डॉ. ओंकार गुरव आदींनी सहाय्यक म्हणून, विभागप्रमुख, क्रायटेरियांचे क्न्व्हेनर्स म्हणून जबाबदारी स्विकारून, ती पूर्ण पार पाडत, जे सहकार्य केले त्याबद्दल मी त्यांचा व्यक्तिश: आभारी आहे.
विद्यापीठाला मिळालेली A++ ही ग्रेड हे डॉ. विवेक सावजी यांच्या नियोजनाचे, नेतृत्व क्षमतेचे आणि डॉ. पतंगराव कदम साहेबांच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘वादळात दिवा लावणाऱ्या’ विजीगिषु वृत्तीचे फलित आहे. मा. कुलसचिव जी. जयकुमार, सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, महाविद्यालयांचे समन्वयक, विद्यापीठाचे समन्वयक डॉ. प्रसाद पोरे, डॉ. अविनाश कणसे, डॉ. किर्ती गुप्ता, डॉ. वर्षा पोखरकर, डॉ. रमा भादेकर, डॉ. सुनिता जाधव, डॉ. सोनाली धर्माधिकारी, डॉ. अरुलमोझी सत्यनारायण, डॉ. शमीम शेख, डॉ. शमिता कुमार, डॉ. अमन मिश्रा, डॉ. ढेरे, डॉ. बनकर, सरांचे स्वीय सहाय्यक श्री. बाळू वाडकर आणि डॉ. शैलेश लेले आदींनी त्यांच्यावर सोपविलेल्या जबाबदारीला न्याय देत ही विजयश्री खेचून आणली. अत्यंत व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढीत डॉ. विश्वजित कदम सर यांनी नॅक समितीस दिलेली धावती भेट, डॉ. शिवाजीराव कदम सर यांचा पाठीवर असणारा हात आणि डॉ. अस्मिता जगताप यांनी पूर्णवेळ उपस्थित रहात, ‘साहेबांच्या माघारी आपली जबाबदारी’ कृतीने साकारत केलेले काम, डॉ. विवेक सावजी नावाच्या अध्यायाचे विद्यापीठाच्या इतिहासातील एक सुवर्णपान ठरले, असेच म्हणावे लागेल. ग्रेडेशन जाहीर झाल्यावर, “ही स्वप्नपूर्ती पहाण्यासाठी आज साहेब असायला हवे होते”, हीच भावना सर्वमुखी होती. ‘नॅक कडून विद्यापीठाला मिळालेली A++ ही सर्वोच्च श्रेणी, हीच साहेबांना खरी श्रद्धांजली! ‘या यशाचे श्रेय हे सर्वांचे, मी निमित्तमात्र आहे,’ या दृष्टीने या ऐतिहासिक यशाकडे पहाणारे डॉ. सावजी सर हे ‘निर्गुणाच्या ठायी वसणाऱ्या निराकार, निगर्वी आणि निश्चल वृत्तीचे दर्शन घडवितात,’ A++ ही सर्वोच्च श्रेणी मिळविणाऱ्या देशातील मोजक्या विद्यापीठांपैकी एक असणाऱ्या भारती विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डॉ. सावजी निश्चित शोभून दिसतात.
…डॉ. विवेक रणखांबे,
अधिष्ठाता, भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय)
प्रभारी प्राचार्य, यशवंतराव मोहिते कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पुणे
Mobile: 9850558404, vivekrankhambe@gmail.com