“हे मृत्यो!”
सध्या कुणाच्या तरी मृत्यूने मी सहजपणे हेलावून जात नाही.
मी इतका शून्य, असहिष्णू, अमानवी कसा झालो,
की संपून गेल्यात माझ्या संवेदनांच?
याचा एक निश्चित ताळेबंद मांडतो आहे…
भवताली मृत्युच्या असह्य वारंवारतेने
मी पुरता थंड पडलो आहे.
आणि हुंदकेही विरू लागलेत
दुरवर; खोलवर…ते ही अगदी आतल्या आत
सभोवताली चिताही आता एकांतात जळत आहेत.
जणू ऐकावेत स्टॉक एक्स्चेजचे उसळी घेतलेले बाजारभाव तसे;
ऐकतो आहे दररोज हजारोनी वाढणारे मृतांचे आकडे आणि
जाणून घेतो आहे त्याच बाजारात माझ्याही उरलेल्या आयुष्याची खरी कींमत….
खरच कळत नाही मला की,
एखाद्या ‘निधन-वार्ते’ पुरतं जगण्यासाठी मी आलो होतो का इथे?
आणि जे काही जगलो; त्याला नाहीच उरला काही अर्थ?
या माझ्याच निष्कर्शाने ग्रासलो गेलो, पुरता इथे.
अरे, पूर्वी अंत्ययात्रेतल्या माणसांचा महासागर सांगायचा
इथे जगून गेलेल्या माणसाच्या आयुष्याची श्रीमंती
आता उरल्या आहेत भवताली,
चितेच्या कडेला उभ्या अशा त्या
काळ्याकुट्ट भेसूर भिंती
भाग्यवान असाल तरच
चितेला भडाग्नी देतो तुमच्याच रक्ता मांसाचा गोळा…
नाहीतर उरतात ते चार अनोळखी खांदेकरी,
आणि शेवटच्या प्रार्थनेसाठी जुळलेले ते हातही असतात अपरिचित,
स्मशाना पर्यंत नेणारया
रक्ता पलीकडल्या एका अनामिक नात्याचे
एखाद्या परदेशी भाषेत; माझा स्वदेशी विचार मांडताना
जसा शोधत राहतो मी शब्द आणि मग अनुभवतो एक अव्यक्ताचे भिकारीपण,
अगदी तसाच या जगात शोधतो आहे, आज मी न पेटलेले एखादे तरी स्मशान
आणि अनुभवतो आहे मीच माझ्या;
अंतिम इच्छेचे नि:शब्द वांझपण..
हे मृत्यो,
हृदय विकाराच्या झटक्यातुन सावरताना
मागे एकदा भेटला होतास ओझरता,
तेंव्हा म्हणाला होतास की
‘सोडून देतो तुला!’ कारण; अरे, अजुन तू जगलाच नाहीस’,
खरयं तुझं हे मृत्यो; कारण;
तस पाहिलं तर, आयुष्य सुंदर करण्याच्या नादात,
दररोज खोडून टाकत आलोय;
माझ्याच हातांनी; मी माझंच अस्तित्व
आणि गिरवित आलोय प्रत्येक रात्री
दिवसाची मीच रेखाटलेली काळीकुट्ट चित्रं…
हे मृत्यो, तुला सामोरे कसे जातात, ते माहीत नव्हते का मला?
पण तुझे अलिकडचे हे रूप? ते मात्र मला नवे आहे…
कितीतरी रुपांत भोवताली माझ्या;
भीती, ‘आत-बाहेर’ उभी आहे…
अरे, मृत्यु नंतरची इथली;
‘हळहळ’ आता संपली आहे,
कुणाच्या तरी खांद्यावर डोके टेकणे, ते ही आता संपले आहे.
पायावर होणारा आसवांचा अभिषेक
शेवटचे ते डोळाभर दर्शन,
सारे सारे संपले आहे,
रडायचे तरी कुणी, कुणासाठी आणि रडायचे तरी कितीदा?
अश्रुंनाही असतो रे बांध?
आता त्यांचे फूटणेही थांबले आहे…
हे मृत्यो, तशी जवळची अन जिवातली माणसे,
तू नेतच असतोस सदैव… त्या बद्दल माझी तक्रार नाही.
पण मनाची तयारी नसताना; ही अशी?
पर्थिवाच्या दर्शनाशिवाय नेतो आहेस,
चिता सोडून; अंत:करणाची स्मशानेच पेटवतो आहेस.
अरे थंड निजल्या शवागारात,
प्रेतालाही सोबत असते प्रेतांची,
कुलुपाचा आवाज येताच जागी होतात रे ती!
आपल्या माणसांच्या दबक्या आवाजानं…
पण इथे माणसांच्या या दुनियेत
अमानवीपणाने तूच रचु लागला आहेस,
एकाकीपणाचे दररोज एक नवीन सरण
अन संपवला आहेस तू इथे,
शवागारातला त्यांच्या हक्काचा शेवटचा ‘विसावा’ सुद्धा.
शेवटी चेहऱ्यावर घातले जाते एक कफन; अन
पायाच्या अंगठ्यावर अडकवलेली जाते एक चिट्ठी,
तीच ठरते तुमचा शेवटचा ‘आधार’
अन तीच ठरते अखेर
तुमच्या झाकलेल्या चेहऱ्याची शेवटची ओळख…
उद्या दिल्या जातील विसर्जनासाठी;
अग्नी दिल्या त्याच पर्थिवाच्या अस्थी, असेच काहीसे मानून चलं.
तशी नसते म्हणा अस्थी ओळखन्याची दूसरी कुठली खूण!
पेटून राख झालेल्या आयुष्याला असते का रे कुठले ऋण?
हे मृत्यो!, पूर्वी तसा तू माणुसकीने वागायचास, आता ते तू विसरला आहेस
अलीकडे तुझी क्रूरता वाढली आहे, या बद्दल माझी तक्रार आहे
घरेच काय, तू गावे उध्वस्त करत चालला आहेस. या बद्दल माझी तक्रार आहे.
चिता पेटवणारऱ्या शरीरांनाही लागते रे इथे विश्रांती,
तू तेही विसरला आहेस.
वाहून वाहून थकल्यावर तरी,
तू माणसांना ‘सोडून देणे’ विसरला आहेस…
या बद्दल खरी तक्रार आहे
……………………………………………….
(डॉ. विवेक रणखांबे, भारती विद्यापीठ, पुणे 9850558404)
ह्रदयस्पर्शी कविता डॉक्टर विवेक
प्रत्येक माणसाच्या व्यथा खुप विचारपूर्वक मांडल्या आहेत. खूप छान सर.
Excellent, हेलावून टाकणारी निर्मिती, काय आणि कसं बोलावं यावर? अनुभव, अनुभूती, भय, भीती, या सगळ्यांचाच परिपाक आणि वस्तुस्थिती!