एक पूल, ज्याने कितेक पिढ्या पाहिल्या सांधल्या, बांधल्या अन ज्याने झेलले अनेक पूर, तो पूल काल पडला…
तसा त्याच्या चिरेबंदीत, तो अजूनही भक्कम होता, पण सांगतात ना जसे डॉक्टर, आता शरीराचे नकोत हाल, आणि मग अखेरचे काही श्वास, घरीच घेतो बाप, अगदी तसेच, पिढ्या पिढ्या उभ्या करून, वसनापुल सोडून गेला.
'तो' एक इतिहास होता, पिढ्यानपिढ्याचा अभिमान होता, इतिहासाच्या कितीतरी सुवर्ण क्षणांची तो एक साक्ष होता. इथल्या प्रत्येकासाठी तो आयुष्याचा अविभाज्य भाग होता.
त्याच्या वार्धक्यातही तसा तो भक्कमच होता, अविश्रांत काम करीत; आतून थोडा थकला होता.. खाटेवर निपचित पडला तरी, जसा अजूनही हवा असतो ना बाप, अगदी तसाच तो, इथल्या प्रत्येक पिढीला हवा होता. घरातला वडील माणूस जावा तसा, काल प्रत्येकजण डोळ्याआड रडला होता...
या पुलावर कित्येक सूर्य उगवले आणि मावळले, दोन्ही तिरांना सांधताना, कित्येक संसार इथेच सुखावले दोन्ही तीरावर जन्माला आलेली माणसेच काय? कितीतरी देव या इथेच विसावले.
विलायती असलेल्या कुण्या द्रष्ट्या इंग्रजाने कधीकाळी याचे निर्माण केले, कुणास ठाऊक, भूतकाळात कुठल्या क्षणी निर्माण करून शेवटी जाताना, या भूमीचा निरोप घेताना, याचे चिरेबंदी दगड घडविलेल्या त्या पाथरवटांच्या डोळ्यात जसे दाटले असेल ना पाणी, तसेच ते आज आमच्याही डोळ्यात साठले.
शेवटी दगड-मातीचाच तो, असा लावतं का कोणी जीव? असे एक का अनेक? जगात किती पडले असतील पूल.. पण ज्याच्याशी जडली होती नाती आणि लागला होता त्याच्याशी प्रत्येकाचा जीव, असा तो एकटाच होता... धन्यतेने भरून उरलेल्या, 'कूपर नावाच्या सुवर्णकाळाचा' तो एक साक्षीदार होता..
असतोना निर्जीवातही जीव, मानला तर त्या जिवातही असतो 'शिव', नसतात ते नुसतेच दगड, कौशल्याने बांधलेले, काळाने सांधलेले कितेक पिढ्यांच्या कष्टात, अन आई-बापाच्या संसारचुलीत, कुठल्या तरी आशा घेऊन, आयुष्यभर फुललेले.
दोन्ही तीरावर त्याला कोसळताना पाहून, जसा पाझरावा एखादा भला मोठ्ठा माठ, अनंत क्षणांच्या आठवणी साठवत, काल तसेच दाटून आले, वसनेचे दोन्ही काठ.
कधी नव्हे तो वसनेचा ऊर, पाऊस नसतानाही भरून आला. पूल पडताना पुलावर, बाप माझा भेटून गेला.
प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे, भारती विद्यापीठ, पुणे 9850558404