‘गुरुनाम गुरु: प्रा. यशवंत तथा वाय. एस. कळमकर’ Gurnam Guru: Pradhyapak Yashwant Tatha YS Kalamkar

इंग्रजी विषयाचे ख्यातनाम प्राध्यापक, ’गुरुनाम गुरु’ प्रा. यशवंत तथा वाय एस कळमकर (माजी प्राध्यापक, किसनवीर महाविद्यालय, वाई) यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी, सोमवार दि. १६ नोव्हेंबर, २०२६ रोजी संध्या ७.३० वा. पिंपरी चिंचवड येथे दुःखद निधन झाले. विद्यार्थी-प्राध्यापकांच्या अनेक पिढ्या घडविणाऱ्या प्रा. यशवंत कळमकर यांच्या निमित्ताने संपूर्ण शिक्षणक्षेत्र आणि विद्वत जगत, एका व्रतस्थ आणि मूल्याधिष्ठित जीवन जगलेल्या, आयुष्यभर कमालीचे साधेपण ल्यालेल्या, शुचित्व आणि सभ्यतेच्या संस्कारांनी मंडीत व्यक्तिमत्वास मुकल्याची भावना व्यक्त होत आहे.   

वाई येथील प्राज्ञ पाठशाळा, विश्वकोश मंडळ, इतिहास संशोधन मंडळ, पुणे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, राज्यातील विविध विद्यापीठादि संस्थांच्या जडणघडणीत त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. बुद्धीला पटलेलं आणि विद्यार्थी हिताचं जे जे समोर येईल ते ते काम, अगदी ज्याच्या साठी ते करायचं त्याच्या कडून, कृतज्ञतेच्या अभिव्यक्तीसह, कोणत्याही प्रकारच्या अपेक्षेविना पूर्ण करायचं आणि ते विसरूनही जायचं, हा सरांच्या व्यक्तिमत्वातील एक विशेष पैलू.

विषय कोणताही असो तो तत्वज्ञानाच्या पातळीवर, जागतिक संदर्भासह आणि त्याच्या व्यापक ऐतिहासिक जडणघडणीचे अचूक संदर्भ देत मांडणं, एखाद्या विषयाच्या मांडणीसाठी योग्य, समर्पक आणि अभ्यासपूर्ण संदर्भ निवडणं, नव्या आव्हानांना सामोरे जाताना, अपेक्षित समस्या, साधनांचे उपयोजन आणि स्वत: तरीही सर्व काही करूनही अबोल राहणं, या कितीतरी गोष्टी सरांच्या कडून शिकता आल्या. केलेल्या कामा बद्दल स्तुती, आत्मस्तुती लांबच पण तिची वाच्यता कुणी करावी, एवढी देखील अपेक्षा त्यांनी केली नाही आणि कुणाच्या विनंती वरून काही काम अथवा मदत केली म्हणून त्यांच्या नजरेतही ते कधी दिसले नाही.

आयुष्यात जे जे पुस्तकं हाताशी आलं ते ते त्यांनी आधाशासारख वाचलं. मनावर आणि शरीरावर, इंद्रियांवर असे काही संस्कार केले की अगदी वयाच्या नव्वदित विस्मरणाने ग्रासले असतानाही, समोर आलेल्या प्रबंधातील चुका अगदी मृत्यूपूर्वी गेल्या आठवड्या पर्यंत त्यांनी बिनचुकपणे उधृत केल्या होत्या.

बौद्धिक सामर्थ्य इतके प्रभावी आणि व्यापक होते की एकाच वेळी कितीतरी वर्गांच्या अभ्यासक्रमांच्या पुस्तक लेखनाचे काम ते लीलया पार पाडायचे. स्वत:चे काम पूर्ण करून लहान धाकट्या इतर सहकाऱ्यांना त्यांचे काम पूर्ण करून द्यायचे. आजकाल एखाद्या क्रमिक पुस्तकातील एखादा धडा एखाद्याने संपादित केला तरी त्याचे मोठेपण माणसे आयुष्यभर मिरवतात, अशा वेळी केवळ एक दोन नव्हे तर प्रत्येक तीन वर्षानंतर बदलणाऱ्या सर्व कला, वाणिज्य आणि विज्ञान विद्याशाखेच्या सर्व वर्गांच्या पुस्तकांचे लेखन, मदत आणि मार्गदर्शन करणे हे सोपे नव्हते.

प्राध्यापक म्हणून स्वत:च्या व्यक्तिगत आयुष्यातील उत्तरदायितवासह सामाजिक उत्तरदायित्व म्हणून वाई येथील प्राज्ञ पाठशाळा, विश्वकोश, इतिहास संशोधन मंडळ, पुणे, महाराष्ट्रातील इतर नामवंत पारंपारिक आणि मुक्त विद्यापीठे ही उभी रहात असताना, अभ्यासक्रमांची रचना, क्रमिक पुस्तकांचे लेखन, कालसुसंगत बदल, आव्हानांचे भान ठेवीत, विद्यार्थ्यांच्या पचनी पडेल असे लेखन करणे, यासाठी प्रा. यशवंत कळमकर सदैव स्मरणात राहतील.

१९९१ च्या सुमारास शिवाजी विद्यापीठात, सर्वच वर्गांसाठी केवळ गद्य पद्य उताऱ्यांच्या अभ्यासक्रमा ऐवजी, कम्युनिकेशन स्किल्स या नव्या अभ्यासक्रमाची सुरुवात झाली. पुस्तक लेखनासह हे आव्हान पेलण्याची मानसिकता, क्षमता निर्माण करण्यासाठी प्रा. यशवंत कळमकर यांनी अहोरात्र कष्ट घेतले.

१९८०-९० च्या दशकापासून, सकाळी वाई येथील किसन वीर महाविद्यालयात पदवी आणि पदव्युत्तर वर्गांचे तास घेऊन, तिथून पुढे मिळेल त्या एस. टी. ने १५० किलो मीटरचा प्रवास करून कोल्हापूरला येऊन दुपारी मिळणाऱ्या वेळेत विद्यापीठात पोहोचून काम करणे आणि दुसऱ्या दिवशीच्या तासांसाठी परत वेळेत वाईला जाणे, एकही तास न चुकविणे आणि चुकलाच तर विद्यार्थ्यांचे समाधान होई पर्यंत जादा तास घेणे, हे सरांनी आयुष्यभर पाळले.

विद्यार्थी दशेपासूनच त्यांनी जागतिक स्तरावर मान्यता पावलेल्या ग्रंथांचे परिशीलन केले. कार्ल मार्क्स, लेनिन, कितीतरी पाश्चात्य विचारवंत, जागतिक चळवळी आणि संघर्षांचा इतिहास, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय इतिहासाचे, स्वत: पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांचेही साक्षीदार असल्याने, देशातील नामवंत संस्था, विद्यापीठे, ख्यातनाम प्राध्यापक आणि तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या सारख्या विद्वानांचे जवळून कार्यसानिध्य आणि सहवास लाभलेले सर, हे आपल्या मनावर त्यांची शाश्वत नाममुद्रा उमटवून जातात.

स्वतंत्र भारतीय शैक्षणिक इतिहासातील,  बहुतेक सर्व शैक्षणिक बदलांचे, धोरणांचे आणि त्यांच्या अंमलबजावणीचे सर साक्षीदार होते. समाज उभा करण्यासाठी, वर्गातील विद्यार्थी नेमके कसे घडले पाहिजेत? याचे त्यांना भान होते आणि त्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपाय योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करण्याची त्यांच्यात विलक्षण क्षमता, स्थितप्रज्ञता आणि सभ्यता त्यांच्या अंगी होती. कोणतेही काम करताना मी कोणत्या पदावर आहे? मी इतरांपेक्षा कसा वेगळा आहे? माझे योगदान कसे अधिक आहे? सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांना काम करताना काही अडचणी असतील तर त्यांना हिणविणे, कमी लेखणे, त्यांचा सहवास आणि संपर्क टाळणे, असे सरांनी कधीच केले नाही. उलट अबोलपणे सर्वांना मदतच केली. त्या मदतीचा कुठेही उल्लेख होणार नाही, याची त्यांनी आयुष्यभर काळजी घेतली.

इ. स. २००० पासून पुढे नॅकचे वारे वाहू लागले. ग्रामीण भागातील महाविद्यालयांना हे फार मोठे नवे आव्हान होते. संस्थाचालक, प्राचार्य आणि प्राध्यापक सर्व स्तरावर चिंतेचे सावट असताना प्रा. यशवंत कळमकर सर यांनी शिवाजी विद्यापीठ परुक्षेत्रातील कितीतरी महाविद्यालयांना एसएसआर तयार करून देण्यासाठी, मोलाची मदत आणि मार्गदर्शन केले आहे. सर्वात मोठी अडचण होती ती नॅकच्या पॅरामीटर्स मधील प्रश्नावली समजून त्यातील संकल्पना आणि टर्मिनोलॉजी त्याचे आकलन, उच्च शिक्षणातील त्याचा रिलेव्हन्स, पुराव्यांची उपलब्धता आणि नॅकला अपेक्षित असलेल्या चौकटीत संबंधित महाविद्यालयाने स्थापने पासून दिलेल्या योगदानाची, सांख्यिकी, माहितीपर आणि तत्त्वज्ञानाच्या पातळीवर मांडणी करीत, महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या अंगी विश्वास निर्माण करणाऱ्या मोजक्या प्राध्यापकांच्यात प्रा. यशवंत कळमकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

आयुष्यात आलेल्या कोणाही बद्दल त्याच्या समोर अथवा माघारी अपशब्द बोलणे, कुणाचा तरी पाणउतारा करणे, मुल्यांपासून फारकत घेणे, हे त्यांच्या व्यक्तिमत्वात कुठेच नव्हते. कुठेतरी मानधनासाठी, पैशासाठी काही काम करणे, व्यावसायिक उत्तरदायित्वाशी तडजोड करणे, या बाबी त्यांना कधी शिवल्याच नाहीत. त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत कठोर, स्वयंशिस्ती साठी प्रसिद्ध होते. आयुष्यभर कार्यमग्न जीवन जगल्याने सवंग लोकप्रियता, वाचाळता, पदांचा हव्यास यापासून ते सहजपणे दूर राहिले.

त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या ठाई जे शुचित्व, पावित्र्य, अभ्यासासोबत कष्टाने दिसणारे विद्वत्तेचे तेज आणि व्यक्तिमवातील अंतर्बाह्य पारदर्शीपण, विद्यार्थ्यांच्या भावी पिढ्यांना मार्गदर्शन करेल, यात शंका नाही.

जगात सर्व साधारणपणे तीन पद्धतीचे लोक आढळतात. जे सर्वार्थाने आणि सर्व प्रकारे सामान्य असतात आणि जे सामान्य म्हणून जगाचा निरोप घेतात. दुसऱ्या प्रकारातील लोक असामान्य असतात आणि ते त्यांचे असामान्यत्व सिद्ध करून देह ठेवतात, पण तिसऱ्या प्रकारातील लोक हे मात्र असामान्य असूनही आपले असामान्यपण कुणाच्याही ध्यानात येणार नाही इतक्या सहजपणे आपले साधेपण आयुष्यभर जपतात, अंशत: का होईना, आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला आपल्या अंगी असलेले मोठेपण बहाल करीत इहलोकीचा निरोप घेतात. मला वाटते प्रा. कळमकर सरांचे आयुष्य हे या तिसऱ्या प्रकारात मोडते.

या देशाला महान अशी गुरु परंपरा लाभली आहे. विद्वत शिक्षकांची मांदियाळी प्रत्येक पिढीने अनुभवली आहे. अशा वेळी, देशभक्तीने पुलकित होत, उच्च शिक्षण क्षेत्रात स्वातंत्र्यानंतर हा देश उभा करण्यासाठी, अत्यंत अबोलपणे योगदान देत, महाराष्ट्राच्या आणि विशेषत: शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रावर, सेवेत असताना आणि स्वयंप्रेरणेने निवृत्ती नंतरही, पायाभूत कार्यसिद्धीतून योगदान देणारे प्राध्यापक म्हणून प्रा. यशवंत कळमकर यांचे वेगळेपण दीर्घ काळ स्मरणात राहील, यात शंका नाही.

काही वर्षापूर्वी त्यांच्या सौभाग्यवतींचे निधन झाले. मूल्याधिष्ठित जीवन जगणाऱ्या आपल्या पतीला त्यांनी तितक्याच पवित्रतेने साथ दिली. आज सरांच्या पश्चात त्यांची दोन्ही मुले श्री. नितीन आणि सचिन, स्नुषा सौ. उमा आणि सौ. संगिता हे विविध कंपन्यात उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, कर्तृत्ववान नातवंडे ही देश-परदेशात कार्यरत आहेत. आपल्या काकांच्या विद्वत्तेचा वारसा पुढे चालवीत सरांची पुतणी डॉ. दिपाली अवसरे हिने इंग्रजी विषयात पीएच. डी. पदवी धारण करीत भाषांतरकार म्हणून स्वत:ची नाममुद्रा उमटविली आहे. परंतु जीवनाच्या विविध क्षेत्रात, जगातील विविध ठिकाणी जीवन व्यतीत करताना, त्यांच्या ठायी भरून उरणार साधेपण, अभिनिवेश विरहीत सहजता आणि संस्कार, हे प्रा. यशवंत कळमकर यांच्याच व्यक्तिमत्वाशी एकरूपतेचेच दर्शन घडवितात.     

प्राचार्य डॉ. विवेक रणखांबे

भारती विद्यापीठ

मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगांव (जि. सांगली)

संपर्क: ९८५०५५८४०४

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *