“डॉ. विश्वजित कदम साहेब यांच्या नेतृत्वाखाली, कडेगावच्या इतिहासातील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद, ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये नोंद होत संपन्न”

दि. ३ ऑक्टोबर रोजी रेडीओ सुरु केला, तेंव्हा सकाळचे ७ वाजून १० मिनिटे झाली होती. “आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. पराग चिंचोळकर प्रादेशिक बातम्या देत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याला ३ ऑक्टोबर २०२६ रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्त राज्य सरकारने अभिजात भाषा संशोधन आणि उत्कृष्टता केंद्र पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या पदव्युत्तर विभागात सुरु करणार आणि ‘जागतिक अभिजात भाषां आणि साहित्य: महाकाव्य, काव्य तसेच भारतीय ज्ञान परंपरा’ या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे भारती विद्यापीठाच्या ‘मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम महाविद्यालय, कडेगाव येथे दि. 28 आणि २९ रोजी आयोजन,” ही बातमी अंगावर शहारे उभी करून गेली. कारण कडेगावच्या स्टाफने गेल्या महिनाभर केलेल्या कष्टाची ती पोचपावती होती. त्या बातमीला प्रा. जॉय कुवर यांनी तांत्रिक-दृष्ट्या संपादित केले आणि महाविद्यालयातील प्रत्येकाने, त्यांच्या महिन्याभराच्या कामाला समाज आणि प्रसार-माध्यमांनी उचलून घेत असल्याचा अनुभव घेतला.
युनायटेड नेशन्स आणि युनेस्को या जागतिक संघटनांनी २०२२ ते २०३२ हे दशक, ‘आंतरराष्ट्रीय प्रादेशिक, मूल-निवासी, स्वदेशी, स्थानिक, आदिवासी भाषा जतन करण्यासाठी घोषित केले आहे. याच ऑक्टोबर महिन्यात मराठीला अभिजात भाषा दर्जा मिळाल्यास सुमारे २ वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच युजीसीने नविन राष्ट्रीय धोरणात स्थानिक भाषाभ्यासाला प्राधान्य देत, भारतीय ज्ञान परंपरेच्या अध्ययनाचा आग्रह प्रतिपादन केला आहे. अशा वेळी जुलै महिन्यात सांगलीहून कडेगावला प्राचार्यपदी बदली झाली. २७ ऑगस्ट रोजी या कॉन्फरन्सचा प्रस्ताव तयार केला आणि मा. कार्यवाह यांच्या मंजुरी साठी पाठवला.
राज्याच्या मराठी भाषा विभागाचे माजी मंत्री म्हणून डॉ. विश्वजित कदम यांनी मोलाचे काम केले आहे. भारती विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांच्या उत्तरदायित्वाच्या परंपरा पुढे नेणे, ही देखील एक नैतिक जबाबदारी असल्याचे मानीत आम्ही मार्गस्थ झालो. संकल्प करायचे तर ते शून्यातून विश्व निर्माण करण्याची क्षमता असणाऱ्या आपल्या संस्थापक डॉ. पतंगरावजी कदम साहेब यांच्या कार्यकर्तृत्वाला शोभेल असा. परिषद घ्यायचीच आहे, तर ती एखाद्या दुसऱ्या अभिजात भाषेची का? मराठीला जरी अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असला तरी त्या निमित्ताने, जगातल्या सर्वच १९ अभिजात भाषा आणि साहित्याचे चिंतन करू. असा विचार संकल्पाला बळ देऊन गेला.
अभिजात भाषा म्हणून मराठीला ऑक्टोबर महिन्यात दर्जा मिळाल्याने, ही परिषद ऑक्टोबर महिन्यात होणे अपेक्षित होते. पण उण्या-पुऱ्या दोन महिन्यात, कडेगाव सारख्या थोड्या आडगावात, एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे स्वप्न पहाण, हे काहीसं हास्यास्पद होत. एखादी आंतरराष्ट्रीय परिषद घेण हे काही चॉकलेट खाण्या इतपत सोपी गोष्ट नाही. त्यातच पुन्हा ती द्वी-दिवसीय असेल तर अजून अवघड. याला परदेशातून वक्ते आणण्यापासून, प्रस्ताव, छपाई, संशोधनपर निबंध, आर्थिक नियोजन, परिषदेची आखणी आणि अंमलबजावणी, राष्ट्रीय स्तरावरील वक्त्यांचे नियोजन, मानधन असे कितीतरी प्रकारचे नियोजन होते. पण पाठीशी उभे होते, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजित कदम साहेब आणि महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब आणि सोबत होता इतिहास घडविण्याची क्षमता असणारा कडेगाव कॉलेजचा शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफ.
पुणे येथील यशवंतराव मोहिते महाविद्यालयात घेतलेली ‘भारतीय ज्ञान परंपरेची आंतरराष्ट्रीय परिषद, ऑक्टोबर २०२५ मध्ये सांगली येथे डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात घेतलेली अभिजात भाषा या विषयावरील पहिली आंतरराष्ट्रीय परिषद आणि आता कडेगाव येथे दि. 28 आणि २९ ऑक्टोबर २०२६ रोजी संपन्न होत असलेली मालिकेतील दुसरी आणि स्थानिक इतिहासातील पहिलीच परिषद. त्यातच ती डॉ. विश्वजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली आणि भारती विद्यापीठाच्या वतीने संपन्न होत असल्याने मनावर मोठे दडपण होते. अशा वेळी, कडेगाव सारख्या ठिकाणी, आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी अपेक्षित सर्व आयाम, सर्व परिमाणे पूर्ण करणे, सहजपणे शक्य नव्हते. पण डॉ. पतंगराव कदम नावाच्या चैतन्याच्या सहवासात घालविलेली तब्बल २५ वर्षे आधारभूत झाली आणि कडेगावच्या स्टाफच्या मदतीने कामास सुरुवात झाली. वयाने लहान असला तरी संस्थारूप होत काम करण्याचा आणि कामातून घडलेला सहकारी म्हणून ज्याचा उल्लेख करावा लागेल असा या परिषदेचे ओर्गनायझिंग सेक्रेटरी डॉ. महेश माळी यांचा सल्ला महत्वाचा ठरला. दुसऱ्या सत्रात बरीच कॉलेजेस ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या कॉन्फरन्सचे आयोजन करतात, आपण ते प्रथम सत्रातच करू. त्याला उदंड प्रतिसाद मिळेल, हे त्याचे भाकीत खरे ठरले.
कॉन्फरन्सला उत्तम वक्ते येणे महत्वाचे होते. यशस्वी कॉन्फरन्सचे तेच खरे सूत्र असते. पहिला फोन डॉ. अरुणा ढेरे यांना केला. २००८ मध्ये अमेरिकेतील पहिल्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाला त्यांच्या सोबत उपस्थित राहण्याचे आणि पुढे डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या हयातीत, भारती विद्यापीठ सुवर्ण महोत्सव इतिहास लेखन समितीचा सदस्य म्हणून त्यांच्या सोबत काम केल्याचे भाग्य गाठीशी होते. अरुणाताई येतो म्हणाल्या पण उद्घाटक म्हणून बोलेन असे सांगतानाच, बीजभाषणासाठी दिल्ली विद्यापीठातील संस्कृत विभागाचे प्राध्यापक डॉ. बलराम शुक्ल यांचे नांव त्या सुचवून गेल्या. महाकाव्य हा कॉन्फरन्सचा एक मुख्य विषय असल्याने आणि पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेने महाभारताची प्रमाणप्रत तयार केल्याने विद्वत परंपरेचे आगर लाभलेल्या या संस्थेशी निगडीत, इन्फोसिसच्या फेलो म्हणून मान्यता पावलेल्या डॉ. सुचेता परांजपे आणि डेक्कन कॉलेज मधील माजी प्राध्यापिका डॉ. माधवी कोल्हटकर यांचे येणे परिषदेला ताकत देऊन गेले.
गुजरात केंद्रीय विश्वविद्यालयातील इंग्रजी-संस्कृत-फारसी-उर्दू अशा बहु भाषा आणि साहित्याचा अभ्यास असणारे डॉ. प्रशांत धर्माधिकारी यांच्या निमित्ताने पोलंड येथील डॉ. फिलीप रुसिंस्की यांचा परिचय झाला होता, त्यांचे या परिषदेसाठी खास पोलंडवरून येणे, हे परिषदेचा आणखी एक आंतरराष्ट्रीय आयाम पूर्ण करून गेले. अमेरिकेत सध्या स्थायिक असणारे आणि पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इंग्रजी विभागप्रमुख आणि फुलब्राईट स्कॉलर डॉ. इंतेखाब हमीद खान यांच्यावर एक आपुलकीचा हक्क होता. तर शिवाजी विद्यापीठाच्या तसेच ‘ब्रहत’ या संपूर्ण भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासासाठी वाहून घेतलेल्या हैदराबाद येथील संघटनेचे संस्थापक श्री. ए. राघव कृष्ण मोहन यांनी निरोप समारंभाचे अतिथीपद भूषविणे मान्य केले. साहजिकच उद्घाटनासाठी डॉ. विश्वजित कदम आणि समारोप समारंभासाठी मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब येणे हे शिष्टाचार संमत होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनिश कामत आणि कार्यबाहुल्यामुळे गुजरात विद्यापीठाचे डॉ. प्रशांत धर्माधिकारी येऊ शकले नाहीत, परंतु भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांच्या येण्याने, साधेपणाच्या संस्कारातून त्यांनी सहजपणे निमंत्रण मान्य करणे, यातून ही कॉन्फरन्स एका उंचीला पोहोचली. त्यांच्या येण्या मागे जसे माझे निमंत्रण होते तसेच त्याचे श्रेय हे डॉ. सुहास मोहिते यांच्या आग्रहासही जाते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष आणि विचार्भारती या भारती विद्यापीठाच्या मुखपत्राचे संपादक प्रा. मिलिंद जोशी, साहित्य-संकृती मंडळाचे; साहित्य अकादमीचे माजी सदस्य आणि ‘केल्याने भाषांतर’ या संघटनेचे प्रा. अविनाश सप्रे सर यांच्या निमित्ताने सांगली आणि कडेगाव या दोन्ही कॉन्फरन्सचे दुवे जोडले गेले.
ही कॉन्फरन्स अनेक महत्वाच्या गोष्टींसाठी स्मरणात राहील. यापैकी एक म्हणजे, या कॉन्फरन्स साठी डॉ. विश्वजित कदम यांनी केलेले स्वत:चे रजिस्ट्रेशन. हा बहुमान प्राप्त झालेली भारती विद्यापीठाच्या इतिहासातील ही एकमेव कॉन्फरन्स ठरली. बीज भाषक डॉ. बलराम शुक्ल यांचे बीजभाषण हे या परिषदेचा कळसाध्याय ठरले. अभिजात भाषां या समाजाचे संचित असतात, त्या मुख्य प्रवाहात असल्या-नसल्या तरी, वर्तमानातील सामाजिक आणि भाषिक प्रवाहांच्या अस्तित्वासाठी त्यांचे अस्तित्व आवश्यक असल्याचे प्रतिपादन करीत डॉ. शुक्ल यांनी कितीतरी मूलगामी विचारचिंतन मांडले. भाषा हे केवळ संवादाचे साधन नसून, समाजाच्या ज्ञानाचे, संस्कारांचे आणि सांस्कृतिक स्मृतींचे संवाहक असल्याचे त्यांनी सांगितले. ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या सारखी महाकाव्ये ही भाषेच्या सामर्थ्याचा, वैभवशाली सांस्कृतिक वारशाची साक्ष देतात. त्यांच्या चिंतनपर भाषणातून ही परिषद तत्वज्ञानाच्या परिषदेत रुपांतरीत झाली, असेच म्हणावे लागेल. आपल्या उद्घाटनपर भाषणात डॉ. अरुणा ढेरे यांनी जागतिकीकरणाच्या युगात मानवी नातेसंबंधांच्या परीक्षणाची गरज प्रतिपादन केली. प्रचलित संकेतांच्या अनुसार परिषदेतील सत्रांचे माध्यम हे इंग्रजी असणे अपेक्षित होते, यासाठी मराठीत झालेल्या डॉ. अरुणा ढेरे यांच्या भाषणाचा गोषवारा आणि संपूर्ण लेखाचे भाषांतर इंग्रजी मध्ये करण्याचे काम हे अनुक्रमे डॉ. जया कुऱ्हेकर आणि डॉ. दिपाली अवसरे यांनी तितक्याच समर्थपणे केले. त्यामुळे अ-मराठी सहभागी सदस्यांना त्यांच्या मौलिक विचारांपर्यंत पोहोचता आले.
महाविद्यालयाच्या प्रांगणात सर्व प्रमुख अतिथींच्यासह काढण्यात आलेला विद्यार्थ्यांचा अविस्मरणीय फोटो परिषदेच्या यशस्वी आयोजनावर मोहोर उठविता झाला. ज्यांचे साहित्य मुलं वर्गात अभ्यासतात, अशा कितीतरी साहित्यिकांना जवळून पाहण्याची, अनुभवण्याची पर्वणी या निमित्ताने त्यांना लाभली. कॉन्फरन्सच्या निमित्ताने अनेक विद्वान, अधिकारी, विद्यापीठातील विभागप्रमुख यांना निमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या आगमनापासून प्रस्थानापर्यंत सर्व व्यवस्था चोख ठेवणाऱ्या महाविद्यालयाच्या प्रतिनिधी प्राध्यापकांनी एकही तक्रार येऊ दिली नाही. कु. विभावरी फिरमे, कु. यादव आणि यांनी भारती विद्यापीठ गीताने केलेली समारंभाची सुरुवात तर त्याला जोडून झालेले नांदीचे सादरीकरण, अभिजात कलेशी, सांस्कृतिक संचिताला जागे करते झाले.
डॉ. विश्वजित कदम आणि डॉ. अस्मिता जगताप यांनी कोरोना काळात केलेली मानवसेवा, त्याचसोबत आरोग्य क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव करीत, इंग्लंड मधील सॅलफोर्ड युनिव्हर्सिटीने त्यांना ‘मानद प्राध्यापक’ ही पदवी बहाल केली. या पार्श्वभूमीवर, प्रमुख अतिथी डॉ. अरुणा ढेरे यांच्या हस्ते डॉ. विश्वजित कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तर साहेबांच्या पश्चात भारती विद्यापीठाला नक पुनर्मूल्यांकनात 3.60 CGPA सह A++ मिळवून देणाऱ्या डॉ. विवेक सावजी यांचा डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते साहेबांच्या पदस्पर्शाने धन्य झालेल्या भूमीत हृद्य सत्कार मनाला भावून गेला.
या प्रकल्पात सर्वात मोठी अडचण होती ती सहभागी प्राध्यापकांना शोध निबंध लिहिण्यासाठी किमान कालावधी मिळणे आवश्यक होते. कारण गेल्या वर्षी सांगली येथे सुमारे ९ भाषांतील २०५ पेपर्स दोन खंडात (इंग्रजी लेख आणि भारतीय भाषातील लेख) अशा दोन खंडात प्रकाशित झाले होते. त्यासाठी डॉ. नरेश पवार यांनी सांगली येथे घेतलेले कष्ट मला माहित होते. कडेगाव येथे तर तब्बल ३२१ रिसर्च पेपर्स आले. पुन्हा दोन खंडात प्रकाशन. हे सहज सोपे नव्हते, पण अत्यंत स्थितप्रज्ञ वृत्ती लाभलेल्या डॉ. विशाल नाईक यांनी डॉ. महेश माळी यांच्या सहकार्याने ते आव्हान लीलया पेलले. त्यांच्या आणि प्रा. जॉय कुवर यां सायन्स विद्याशाखेच्या दोन प्राध्यापकांच्या सहभागातून बहुविद्याशाखीय परिमाणाची पूर्तता होत असल्याचे मोठे समाधान होते.
ऑफलाईन, ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणाऱ्या या कॉन्फरन्सला विक्रमी वेळेत शिवाजी विद्यापीठातील सर्व महाविद्यालये, देश-परदेशांत नेणे, विक्रमी संख्येने रजिस्ट्रेशन्स पूर्ण करणे, याचे सर्वस्वी श्रेय हे तासिका तत्वावरील स्टाफसह, महाविद्यालयाच्या सर्वच शिक्षक आणि शिक्षकेतर स्टाफला द्यावे लागेल. कॉन्फरन्स साठी रजिस्ट्रेशन झालेल्या ८३२ आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्डने मान्य केलेल्या ७६८ या संख्येचे तेच शिल्पकार आहेत, हे अधोरेखित करताना मला आनंद होतो आहे. ही कॉन्फरन्स ऐतिहासिक होण्यामागे या स्टाफने घेतलेले कष्ट, मा. संस्थापक, कार्यवाह आणि संस्थेप्रती त्यांच्या मनात असणाऱ्या निष्ठेची अभिव्यक्ती म्हणून या परिषदेच्या यशाकडे बघावे लागेल.
इंग्रजी, मराठी आणि हिंदी या भाषांची डिपार्टमेंटस संखेने अधिक त्यामुळे साहजिकच या विभागांच्या प्रमुखांवर परफॉर्मन्सचा ताण येणे साहजिक होते. परंतु आपल्या करिअरच्या सुरुवातीपासून इंग्रजी विभागाचे विभागप्रमुख डॉ. महेश माळी, हिंदी विभागाचे डॉ. मच्छिंद्र कुंभार आणि मराठी विभागप्रमुख म्हणून काम करणाऱ्या डॉ. सविता माळी यांनी आपापल्या विभागांचे दमदार प्रतिनिधित्व केल्याचे मान्यच करावे लागेल. प्रा. नंदकुमार मोहिते आणि प्रा. इराप्पा बिज्ज रगी यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांनी ही कॉन्फरन्स आपली मानली आणि उण्यापुऱ्या दोन महिन्यात सुमारे ५ वेळा आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि विविध वर्तमानपत्रे आणि दृकश्राव्य माध्यमातून आलेल्या १०० हून अधिक बातम्यांतून या परिषदेला ऐतिहासिक न्यूज कव्हरेज मिळाले. लाखो रुपये खर्च करूनही न मिळणारी, प्रसंगी सहा-सात कॉलमच्या बातम्या प्रसिद्धी माध्यमांनी दिल्या. मा. साहेबांच्या सोबत काम केलेला माजी प्राध्यापक आणि स्टाफ आवर्जून उपस्थित राहिल्या बद्दल मा. डॉ. विश्वजित कदम यांनी विशेष समाधान व्यक्त केले. या शैक्षणिक आणि सामाजिक संकल्पाला समाजमाध्यमांनी उरीशिरी धरले, या बद्दल त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो.
दि. 28 आणि दि. २९ ऑक्टोबरया दोन्ही दिवशी प्रा. जॉय कुवर, श्री. अमोल माने, डॉ. महेश माळी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या टीमने ऑनलाइन पेपर प्रेझेन्टेशनचे शिवधनुष्य लीलया पेलले. एकीकडे भारतीय ज्ञान परंपरा या विषयांतर्गत औंध संग्रहालयाचा अभ्यास दौरा सुरु असताना इकडे महाविद्यालयात सहभागी सदस्यांचे पेपर रीडिंग सुरु होते. तांत्रिकदृष्ट्या ते पूर्ण होणे, अडचणी येऊ न देणे, रेकॉर्ड ठेवणे, हे खूप महत्वाचे होते. भारती विद्यापीठाच्या मध्यवर्ती कार्यालयातील श्री. मयूर शहा यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत सांगली विभागासाठी कार्यरत श्री. अमोल माने आणि टीमने उत्तम साथ दिली.
या कॉन्फरन्सच्या उद्गाटन सोहळ्याचे औचित्य साधून इंग्रजी विषयात विद्यापीठात पहिली आलेल्या कु. धनश्री तानाजी करडे, हिंदी विषयात गुणवत्ता यादीत आलेल्या पूनम विकास सोनतटे तर मराठी विषयात पहिल्या दहा विद्यार्थ्यांच्यात आल्या बद्दल कु. धानम्मा चंद्रकांत स्वामी यांचा कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उद्घाटन समारंभाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी प्रा. डॉ. जया कुर्हेकर यांनी, त्यानंतर प्रा. सौ. श्वेता देशपांडे यांनी डॉ. सुचेता परांजपे आणि डॉ. माधवी कोल्हटकर यांच्या सत्रांची, आमची १२ विची विद्यार्थिनी कु. रेणुका माळी हिने डॉ. फिलीप रुसिंक्सी यांच्या सत्राची, तर डॉ. वर्षा यादव आणि डॉ. रुपाली येवले यांनी समारोप समारंभाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडली.
सर्व कामे हातघाईने सुरु असतानाच, दि. २७ रोजी सकाळी एकूण रजिस्ट्रेशन्सचा आकडा हा ५०० पार करून गेल्याचे ध्यानात आले. कार्यक्रमाच्या तयारीची आणि परिषदेला मिळत असलेल्या उदंड प्रतिसादाची चर्चा सर्वत्र सुरु असतानाच, कितीतरी अनुभवी आणि जाणकार आजी-माजी प्राचार्यांनी हा आकडा शिवाजी विद्यापीठ परिक्षेत्रातील कॉन्फरन्ससाठी सहभाग नोंदविणाऱ्या प्राध्यापक संख्येचा विक्रमी आकडा असल्याचे सांगितले. मग तातडीने इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसला फोन केला. पण त्यांची रु. ९७,००० इतकी फी भरण्याचे धाडस होत नव्हते. अशा अवघड वेळी डॉ. सुहास मोहिते यांचा आधार मोलाचा ठरला. धाडस करून पैसे भरले. कार्यक्रम संपताच डॉ. महेश माळी, डॉ. विशाल नाईक, डॉ. मच्छिंद्र कुंभार, डॉ. सविता माळी आणि प्रा. जॉय कुवर यांच्या टीमने दि. २९ रोजीच रात्री उशिरा पर्यंत थांबून, फोटो, व्हिडीओज, रजिस्ट्रेशनचे रेकॉर्ड, टेबल प्रोग्रॅमस, बातम्या सारे सारे पुरावे सादर केले. जे जे काम ज्याला ज्याला सोपवले, त्याने ते अत्यंत धर्मभावनेने मनलावून पूर्ण केले. त्यामुळेच पुराव्यांचे सादरीकरण करताना त्रास झाला नाही.
प्रा. शीला मोहिते यांनी स्टेज आणि बैठक व्यवस्था सांभाळली तर प्रा. बी. के. माने, डॉ. एम. के. माळी यांनी विविधरंगी झेंडे लावीत कॅम्पस सुभोभिकरणातून महत्वाचे काम केले. एखादे काम पूर्ण करताना, सहकाऱ्यांकडून करवून घेताना, कधीतरी प्रसंगी कठोर व्हावं लागलं, आपलेपण-कर्तव्य आणि व्यावसायिक उत्तरदायित्वाची तसेच परिपक्वतेची जाणीव करून देताना, नात्याच्या नाजूकपणाला सावरावं लागलं. अशा अवघड क्षणी सर्व सहकाऱ्यांनी मानवी-स्वभाव दोष बाजूला सरीत काम केल्यानेच ही कॉन्फरन्स ऐतिहासिक होऊ शकली, यात तिळमात्र शंका नाही. सर्व शिपाई बांधवांनी परिसराची केलेली चोख स्वच्छता ही मनाला प्रसन्न करती झाली. दि. ३ नोव्हेंबर रोजी सर्व पुरावे व्यवस्थित तपासल्यावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या अधिकारी मा. गुंजन कचरू यांचा ‘कडेगाव येथील ‘अभिजात भाषा आणि साहित्य या विषयावरील आजवरची सर्वाधिक सदस्य संख्या लाभलेली पहिली कॉन्फरन्स’ म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये या कॉन्फरन्सची नोंद होत असल्याचा मेल आला. साहेबांच्या स्मृतीत अभिमंत्रित झालेली, मा. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली, मा. विजयमाला कदम (वहिनीसाहेब) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेली, डॉ. विवेक सावजी यांच्या येण्याने बहरलेली आणि विचारवंतांच्या मांदियाळीने संस्मरणीय ठरलेल्या या कॉन्फरन्सच्या यशाचे श्रेय हे टीम-मातोश्रीच्या सन्माननीय सदस्यांचे आहे, महिना दीड महिन्याच्या अवधीत दोन वेळा इन्जिओप्लास्टी सारखी अवघड शस्त्रक्रिया झाली असतानाही, माझ्या सोबत रात्र-रात्र काम करणाऱ्या श्री. दिनेश पाटणकर यांच्या सारखीच सर्वच सहकाऱ्यांनी मदत केली. हे पुन:श्च उधृत करीत मा. कार्यवाह आणि मा. वहिनीसाहेब यांचे या ऐतिहासिक कामाची संधी दिल्या बद्दल आभार मानतो.

