‘सातारा-रोड: एक अर्ध्यदान’

‘सातारा-रोड’च्या निर्मितीचे अधिष्ठान झालेल्या, श्रीमान शेठ वालचंद-हिराचंद, श्री. विनोदशेठ, श्री. चकोरशेठ दोशी, कूपर कंपनीत काम केलेले ऑफिसर्स, कामगार, सेवक, कूपर इंग्लिश स्कूलचे शिक्षक-विद्यार्थी आणि या भूमीचा परीसस्पर्श झालेल्या प्रत्येकाला …‘हा लेख सविनय अर्पण’…

या मातीने लळा लावला असा की, सुखदु:खाला परस्परांच्या हसलो-रडलो, याने तर हा जीवच अवघा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो… …ना. धो. महानोर 

गंगेच्या पवित्र प्रवाहातील आणि तिच्या कोणत्याही डोहातील ओंजळभर पाणी जरी हातात घेतले तरी, त्याला योग्यता ‘तीर्थाचीच’ असते. आपल्या आयुष्याच्या वाटेवर चैतन्य निर्माण करणाऱ्या त्या सूर्यनारायणाकडे पहात डोळे मिटून घ्यावेत आणि ‘त्यानेच निर्माण केलेले, त्यालाच अर्पण करावे’, असेच हे ‘अर्ध्यदान’ सातारा-रोडच्या चैतन्यमयी सूर्यासाठी करताना, आज मनोमन वाटणारी धन्यता शब्दातीत आहे. या भूमी प्रति, माणसांप्रति, इथल्या इतिहासाप्रती, इथल्या भूतकाळा प्रति, इथं घालवलेल्या प्रत्येक क्षणाविषयी कितीतरी पिढ्यांच्या मनात कमालीचा जिव्हाळा, आदर आणि आपलेपण साठलेलं आहे. या एका अदृश्य नात्याची केमिस्ट्री ज्याची त्यालाच आणि ज्यांनी ज्यांनी ती अनुभवली त्यांनाच ठावूक आहे. ते एक अनामिक नाते, ज्या पिढ्यांच्या बरोबरच सुरु झालं त्या पिढ्यांना उदरात घेवूनच, हे पुढे काळाच्या पडद्याआड जाईल. आज या भूमी पासून कित्येक मैल दूर असतानाही, इथला प्रत्येक क्षण, इथली आठवण आजही आपल्या आयुष्याचे अधिष्ठान होते. नव्हे इतक्या दूर आपल्या पंगु-पाया खाली पांडुरंगाची वीट होते. म्हणूनच ‘सातारा-रोड’ या भगवंतासाठी कितीतरी पिढ्यांच्या प्राणाचा मृदुंग घुमू लागतो. 

स्वातंत्र्य मिळून दशक उलटलेल होतं. स्वातंत्र्याच्या पहाटे जन्मलेल्या पिढ्या आताशा कुठे यौवनात उभ्या होत्या. तो असा काळ होता, कि जेंव्हा लग्नाची वऱ्हाडं अजूनही बैलगाडीतून जायची, सातारा-परळी आणि सातारारोड या मार्गावर ब्रिटीश काळातल्या फोर्ड कंपनीच्या टँक्सी सर्विस सुरु होती. नांगरट सुरु असताना कुळवावर दोराला धरून बसायला, नवरदेवाच्या पुढ्यात घोड्यावर बसायला, लहान मुलं उत्सुक असायची, जत्रेत तमाशा हा मूळ स्वरूपातील गण-गौळणीसह सादर व्हायचा. ऑर्केस्ट्रा तर अजूनही पाळण्यातच होता, ‘घरात रेडीओ असणं’ हा स्टेटस सिम्बॉल होता, बीटल्स आणि बेल बोटमची फँशन होती, परकर-पोलक्यातल्या मुली आणि खाकी पँट-शर्ट घातलेले विद्यार्थीच आपली शाळा शेणानं सारवायचे. शाळा हे जेंव्हा खऱ्या अर्थाने ‘जीवन शिक्षण मंदिर होतं’ असा तो काळं. परिसराच्या संपन्नतेची खुण म्हणून ‘पुणे-कोल्हापूर’ हा  ‘जुना-एक-पदरी हायवे’ होता.

याच हायवेवर उभं राहून साताऱ्याकडे पाठ फिरवून पूर्वेकडे तोंड केलं कि समोर ‘वाढे’ नावाचं गाव येतं. स्वामी समर्थांची शिष्या ‘वेण्णास्वामी’ हिचं नाव धारण केलेली ‘वेण्णा’ नदी, ही या गावाची जीवनदायिनी. ती ओलांडली की पुढे टेकावर येतो, तो पुनर्वसित असलेला ‘पाटखळ माथा’. या अरुंद रस्त्याचा उतार जिथे संपतो तिथे, कृष्णेच्या ऐलतीरावर ‘आरळे’ तर पैल तीरावर ‘वडूथ’ ही गावं. कृष्णेच्या पावित्र्याची साक्ष देणारी नदीकाठावरची मंदिरं. उजव्या हाताने पुढे दोन-अडीच किलोमीटर अंतरावर लागणारे ‘जरंडेश्वर रेल्वे स्टेशन’ आणि मग पुढे सुरु होतो तो चार-दोन वळणांचा एक छोटा घाट. 

 घाटमाथ्यावर उभे राहताच नजरेच्या दीर्घ टप्प्यात मावणारा सारा आसमंत. उजव्या हाताला उभा असलेला जरंडेश्वर, डावीकडे दूरवर चंदन-वंदन हे जुळे डोंगर, तर समोर, दत्तगुरूंच्या भजनात आणि भगवान पार्श्वनाथाच्या प्रार्थनेत समाधिस्त झालेला ‘नांदगिरीचा डोंगर’. घाणेरी, करवंदीच्या झुडपांच्या गर्दीत हरवून गेलेल्या या दोन्ही डोंगरांच्या पायवाटा. वर्षानुवर्ष दोन्ही डोंगरावर असलेली, दुरून दिसणारी वडाची दोन मोठी झाडं आणि डोंगरावरचे मारुती मंदिर. त्या अरुंद डांबरी रस्त्याच्या कडेला लावलेली मोठाली वडाची झाडं. त्यांच्या फांद्या एकत्र येत झालेली, ‘पॉवरहौसच्या जवळची नैसर्गिक स्वागत कमान’, गर्द सावली आणि त्याखालून वाट काढत पुढ जाणारा रस्ता. सकाळी डोंगरावर चरायला जाणारी, नदीवर पाण्यासाठी जाणारी गुरं आणि या म्हैशींवर बसण्यातही आनंद मानणारी मुलं. 

                घाटावरून वेगाने खाली उतरणाऱ्या या रस्त्यावर मध्येच पाण्याचा पाट लागतो. पाटावरून डावीकडे ‘बाबाची-वाडी’ तर उजवीकडे ‘पाडळी’ गावाचं बाह्य वळण. समोर जात राहिलो कि तिथून पुढे पॉवरहौस आणि वसना पुलाचा बस-थांबा.  उजवीकडे पाडळी गावाचा मुख्य रस्ता. इथं आपण वसनेच्या पुलावर उभे असतो, तर पैल तीरावर, विस्तीर्ण क्षेत्रात वसलेली एक दुनिया उभी असते….जिचं नाव आहे ‘सातारा-रोड’. 

                सातारा-रोड? हो, सातारा-रोड. जसं मुंबईचं ‘चर्नी-रोड, आर्थररोड, लिंकिंग-रोड, नाशिक-रोड’ तसचं हे आमचं सातारा-रोड. अमेरिकन इंग्लिश मध्ये रेल्वेला ‘रेल-रोड’ म्हणतात आणि ‘भारतीय-इंग्रजी’ हे ‘ब्रिटीश-आणि-अमेरिकन’ या इंग्रजीच्या दोन्हीं प्रमाणांच्या संयुक्त प्रभावाखाली येत असल्यानं, इथल्या रेल्वे-स्टेशनला ‘द-वे-टू-सातारा’ म्हणून ‘सातारा-रोड’ असं संबोधलं गेलं असावं. ब्रिटीश काळात आणि अगदी १९६९ सालापर्यंत इथं रेल्वेस्टेशन होत. (ब्रिटीश काळात बांधलेल्या, या जुन्या पुणे-सातारा रेल्वे मार्गावर ‘आदर्की  आणि वाठार-स्टेशन अशी गावं लागतात. ‘वाठार’ हे पूर्वी रेल्वेइंजिना साठीचं Water-Station होतं,  म्हणून पुढे त्याचे ‘वाठार-स्टेशन’ झालं, तर पुण्याकडून निरेचा घाट-चढताना जिथे इंजिनाला ताकत देण्यासाठी जादा चावी (Other-Key) लावावी लागायची, ते स्टेशन ‘आदर्की’ झालं. यशवंतराव चव्हाण यांना ‘सातारा-कराड’ शहराचा विकास करण्यासाठी, जिल्ह्याच्या ठिकाणी रेल्वे-स्टेशन्स हवी होती आणि मग यामुळेच पुढे सातारा-रोडचं रेल्वे स्टेशन ‘जरंडेश्वर’ या आजच्या ठिकाणी गेलं. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटीश ऑफिसर्सना केवळ काही ‘लायसन्स धारक’ मेस मध्येच जेवायची परवानगी होती. यापैकी सातारा वगळता एक मेस पाटण इथं आणि दुसरी ‘देऊर-वाठार’  रस्त्यावर, ब्रिटीश कालखंडापासून आजही सुरु असलेली ‘दुर्गा खानावळ’.

                वसनेचा पूल ओलांडून गावात शिरता-शिरता, डाव्या हाताला एक ‘पाणंद’ अर्थात पायवाट लागते. कूपर कंपनीने लावलेला, ‘हा-रस्ता-रहदारीचा-नाही’ असा बोर्ड इथे दिसतो. या गाडीवाटेने पुढे गेलो कि पलीकडच्या एकर-दोन-एकर जागेत कामगारांच्या दोन चाळी होत्या, त्या चाळी पत्र्याच्या होत्या. या परिसरात बांधकामाला लागणारा चुना तयार करण्याची भट्टी होती म्हणून या परिसराला “चुनाभट्टी-चाळ”, “पत्र्याची चाळ” म्हणूनही ओळखायचे. नांदगिरीच्या डोंगरातून उगम पावलेला ‘‘जांभळीचा-ओढा’ इथेच वसनेला मिळतो. त्या नागमोडी ओढ्याच्या दोन्ही काठावर, हिवाळ्यात फुललेल्या कन्हेरीच्या फुलांनी ओढ्याचं पात्र अच्च्छादल जायचं. इथं चुन्याच्या रंगाची पांढरी चुनखडी मिळायची. ती चूल सारवायला उपयोगी यायची. हे ठिकाण गावापासून दूर, निर्जन असल्यानं या ओढ्याच्या काठावर, अगदी लहान वयात निधन झालेली मुलं इथं दफन केली जायची. पण याची आम्हाला कधीच भीती वाटली नाही. अत्यंत जाणीवपूर्वक, मुख्य गावापासून काहीसं दूर असलेलं हे ठिकाण, डॉ. गदगकर यांनी रुग्णसेवेसाठीही निवडलं होत, पण प्रत्यक्षात ते घडलं नाही. साहजिकच या निसर्गरम्य वातावरणाची माझ्या आई-वडिलांना भुरळ पडली नसती तरच नवल! ठरलं. इथेच घर बांधायचं.

                एखाद्या कादंबरीच्या कल्पना विश्वात शोभावी तशी ती दोन-अडीच गुंठ्या जागा. कडेला घनगर्द झाडी, शेतं, वरती निरभ्र आकाश, एकीकडे बारमाही वाहणारा ओढा, दुसरीकडे हाकेच्या अंतरावर वहाणारी ‘वसना’. दारात उभं राहिल, कि होणारं ‘जरंडेश्वराचं आणि नांदगिरी डोंगराच दर्शन’, घरामागून चरायला जाणाऱ्या गुरांच्या घंट्याचे आवाज, पक्षांच्या किलबिलाटाने सुरु होणारा दिवस, निरव शांतता’ अशा वैभवानें नटलेला नितांत सुंदर परिसर. नवल असे, कि शिवाजी सावंतांच्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीत वर्णन केलेले बहुतेक पक्षी आम्ही आमच्या घरच्याच परिसरात अनुभवले. इथेच आम्ही गो. नी. दांडेकरांच्या ‘मोगरा फुलला’, ‘गाडगे-महाराज’, बाबासाहेब पुरंदरे यांचं ‘राजाशिवछत्रपती’, ‘मृत्युंजय’, ‘छावा’ या कादंबऱ्याची, ‘वहातो हि दुर्वांची जुडी, रायगडाला जेंव्हा जाग येते’ या नाटकांची आणि महापुरुषांच्या चरित्रांची अक्षरश: पारायण केली. दारात तुळस, जाई-मोगरा-गुलाब, पांढऱ्या-नारंगी-जांभळ्या-पिवळ्या रंगाच्या फुलांनी डवरलेली गुलमुसाची झाडं, शिताफळीची कितेक झाडं, वडिलांनी मुद्दाम होवून आणून लावलेली ‘रामफळ’, शेवगा, लिंब, बाभळ असे कितेक वृक्ष. वैशिष्ट्य असं कि आमचं हे वैभव, आजही २०२० साली, आहे त्या जागी जसच्या तसचं उभं आहे. 

भिंतींच घर बांधण्यासाठी लागणारे पैसे नव्हते. शेवटी पत्र्याचं घर बांधायचं ठरलं. नवा पत्रा महाग होता. डांबरी रस्त्याची काम सुरु असल्याने डांबराचे ३०-३५ जाड लोखंडी बँरल स्वस्तात मिळाले. कंपनीत केमिकल्सचे बँरल्स यायचे तेही स्वस्तात मिळाले. मग ते फोडून, त्याचा जाड पत्रा सरळ  करून आई सौ. सुभद्रा आणि वडिल श्री. अर्जुनराव यांनी घर उभे केले. छप्पर म्हणून डोक्यावर साधा पन्हाळी पत्रा घातला. पावसाळ्यात तो गळायचा. मग त्यावर, आण्णा  ‘वरून-आणि-आतून’ ‘लांबी’ भरायचे. घराचे दारही पत्र्याचेच. घराचा पाया म्हणून ‘वीट-दोन-वीट’ बांधकाम वर चढवून त्यांनी त्यावर पत्रे उभे केले. आतून लाकडी बँटन्सनी पत्रे सांधले. याच चार छोट्या खोल्यांच्या घराला आम्ही दिवाळीला डीस्टेम्पर कलर लावायचो, घर छान दिसायचे. पूर्वी या डीस्टेम्पर रंगाच्या पुडयात १ रुपयाचे नाणे मिळायचे, त्यामुळे तो रंगाचा पुडा फोडण्यासाठी विशेष स्पर्धा असायची. या घराचे वैशिष्ट्य असे कि गावापासुन इतक्या दूर असूनही, लाईट-पाण्याची सोय नसतानाही, या चार खोल्यात १९६५ सालच्या आसपास भोई, गोंजारी आणि काथवटे अशी आणखी तीन कुटुंबेही भाडयाने रहायला होती. एका अर्थाने हि गोष्ट, त्याकाळात सातारा-रोडच्या स्मृद्धीचीच ओळख होती. 

गर्द झाडी, विस्तीर्ण शेतं यामुळे सापांचा वावर सहज होता. या परिसरामध्ये आम्ही मोठे मोठे साप-नाग-धामण-अजगर बघितले. अतिशयोक्ती नव्हे, पण त्यानंतर ते फक्त ‘यु—ट्यूब आणि डीस्कव्हरीतच’ दिसले. ‘आमच्या वस्तीचा काही भाग ग्रामपंचायतीचा, तर रस्ता कंपनीचा’. त्यामुळे सुधारणा नेमकी करणार कोण? या मुळे करणामुळे आमच्या वस्त्यांपर्यंत लाईट-पाणी यायला बराच उशीर झाला. आमच्या घरात तर अगदी २० वर्षापूर्वी म्हणजे १९९८ साली लाईट आली. या सर्व बाबींचा साक्ष म्हणून आजही हा परिसर जसाच्या तसा उभा आहे.  

आमच्या घराजवळील ‘जांभळीच्या ओढ्याच्या” पैलतिरावारची शेकडो एकर जमीन कूपर कंपनीच्याच मालकीची. याला ‘कंपनीचं शेत’ म्हणून ओळखलं जायचं. पाटाच्या कडेनं ‘सातारा-रोड ते भक्तवडी’ मार्गावर पाटाच्या दोन्ही बाजूला हि शेती पसरलेली आहे. आधुनिक पद्धतीन शेती करण्याकडे कंपनीचा कल होता. कंपनीची आमराई होती. कंपनीच्या स्वतच्या मालकीच्या ६०-७० म्हैशी होत्या, गोठा होता. या गोठ्यांची देखभाल करणारे भोसले साहेब-गौतम-परश्या यांच्याशी सलगी असणं, हे आमच्यासाठी मोठं ‘प्रीविलेज’ असायचं. ते न-चुकता या म्हैशी दररोज वसनेच्या पुलाजवळील विस्तीर्ण पात्रात धुवायला आणायचे. एक-दोन तास पाण्यात मनसोक्त डूंबल्यावर त्या म्हैशी परत फिरायच्या. या वेळी या म्हैशींचं शेण पकडण्यासाठी आम्ही धावायचो. शेणानं भरलेली पाटी  घेवून मग घरी परतायचं. जळगाव रस्त्यावर एक  सॉ-मिल होती तिथून लाकडाचा भूसा आणलेला असायचा. त्या शेणात तो भुसा घालून गोळे तयार करायचो, त्यावर दुसऱ्या दिवसाचा बंब पेटायचा. तांब्याचा तो बंब, ‘लिंबवा’ने घासला कि बॉलीवूडच्या हिरो सारखा चमकायचा. कंपनीच्या रानात बोरं, करवंद आणि ओढ्याच्या कडेला झाडावर बसून पोटभर जांभळं  खाणं यात दिवस कसा जायचा, ते कळायचं नाही. याचं परिसरात आणि विशेषतः वसनेच्या काठावर ‘करंजीच्या’ झाडांची रेलचेल असायची. या करंजीच्या शेंगाना, एरंडयाना बाजारात मागणी असायची. त्या विकून पैसे उभे करायचे. सह्याद्री बँकेने मुलांचे पैसे साठवण्यासाठी एक छोटी पण जाडजूड पेटी दिली होती, त्यात ते साठवायचो.

आता आपण परत एकदा सातारा-रोडच्या मुख्य रस्त्यावर येवू. वसनेच्या पुलाचे लोखंडी कठडे जिथे संपतात तिथे श्री. गुजाबा फाळके यांच्या दारात आपण उभे आहोत. उजव्या-डाव्या बाजूला लागते ती वसलेली फाळके आणि माळी समाजातील कुटुंबांची काही घरे. डाव्या हाताला दिसणारी बोर्डाची शाळा. उजवीकडे कौलारू वास्तूत जुन्या गदगकर शाळेचे दोन-चार वर्ग भरायचे. बोर्डाच्या याच शाळेसमोरून वाहणाऱ्या ओढयाचे नाव आहे ‘बाळकुबाचा ओढा’. या ओढ्याच्या अलीकडच्या काठावर ऐसपैस पसरेलेलं सत्यशोधक श्री. ज्योत्याजीराव बयाजीराव पाटलांचं घर. त्यांच्या पत्नीला सगळा गाव काकू म्हणून ओळखायचं. काकूंचा आमच्यावर जीव होता.

श्री. संग्राम फाळके यांचे वडील श्री. संभाजी फाळके अर्थात तात्या पाटील यांनी ८० च्या दशकात आधुनिक पद्धती ‘जर्शी-होस्टनं’ गाईंचा मोठा गोठा उभा केला. पॉवर-हौसला श्री. हणमंतराव फाळके, स्टेशनवर श्री. अंकुशराव फाळके यांनी केलेल्या यशस्वी वाटचालीने परिसरात समृद्धीची जाग आली. प्रगतीच्या या नव्या अध्यायामुळ आणि प्रचंड कामामुळ व्हेटर्नरी डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या जांभळे डॉक्टरांची ‘लक्ष्मी-गाडी’ पाडळी-सातारारोड परिसरात दिवसभर फिरत असायची. १९७५ ते १९८५ दरम्यानची हि सातारा-रोडची स्थिती. परिसरात पोल्ट्री उद्योगही बहरला.

पाटलांच्या दारात असणाऱ्या बोर्डाच्या शाळेच्या दगडी भिंती आजही स्पष्ट पणे नजरेत भरणाऱ्या. आपल्या करारी व्यक्तीमत्वासासाठी प्रसिध्द असणाऱ्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सावंत बाईंचा तो बालेकिल्लाच म्हणायचा. शाळेसमोर समोर प्रशस्त रिकामी जागा. गावात हंगामी उद्योगांसाठी येणाऱ्या माणसांचं मुक्कामासाठीचं ते हक्काचं ठिकाण. त्यांनी बरोबर आणलेली छोट्या उंचीची ‘पंढरपुरी घोडी’, त्यावर अगदी नीटनेटका रचलेला सगळा संसार, घोड्याच्या पाठीवर घातलेल्या अंथरुणाच्या-वाकळेच्या घड्या, लाकडाची कैची तयार करून मग त्यावर अडकवलेल्या घागरी, पातेली, भांडी, कोंबड्या आणि त्यावर बसवलेलं एखादं लहान मुलं. हे सार काही विलक्षण वाटायचं. याच ठिकाणी कधी-कधी रस्त्याच्या कडेला पडलेली लमाणांची पालं, भांड्याला कलई करून देण्यासाठी आलेली मंडळी, तांब्याच्या आणि पितळेच्या घागरी-हंड्याना एकसारखे नक्षीदार ठोके मारून देणारे कारागीर, मध्येच कापूस पिंजण्याच्या भात्याचा आवाज करत जाणारे गादिवाले नदाफ, ‘सुया-कानकोरण-चाफ-पिना-टिकल्या’ विकणाऱ्या आणि अंगावर नजरेत भरेल असं ‘गोंदणं’ ल्यालेल्या, कडेवर तान्हं मुल घेवून घरोघरी अनवाणी फिरणाऱ्या बायका, हप्त्यावर संसार उपयोगी वस्तू विकणारा एखादा गाडा, मध्येच एखाद्या ट्रँक्टर मधून, कर्नाटकातून ऊस तोडीसाठी आलेल्या कामगारांच्या बायकांचा येणारा गाण्याचा आवाज ‘बाळकूबाच्या’ ओढ्याच्या पलीकडे; ज्ञानबा पैलवान यांच्या घराच्या भोवती, ‘साळवी-पाटील काकू आणि सोपान राऊत’ यांच्या दुकानांच्या मागे, अर्थात कुपर शाळेच्या मागील भिंतीच्या कडेला, दाटीवाटीने उभी असलेली कामगारांची काही घरं. रस्त्याच्या डावीकडे लोहारांचा, ‘बैलगाड्याच्या लाकडी चाकांना लोखंडी धावा बसवण्याचा’ आणि ‘बैलांच्या पायात नाल ठोकण्याचा’ उद्योग. त्याशेजारी ठोंबरे कुटुंबीय. शेवटी कुपर कारखान्यातील छोटी-मोठी कामे बाहेरून पूर्ण करून पुरवणाऱ्या यादव बंधूंचा कारखाना. 

डावीकडे इथून पुढचा रस्ता माझे मित्र श्री. दीपक विठ्ठल फाळके यांच्या घराकडे जातो तर रस्त्याच्या उजवीकडे असलेले उभे पिढ्या पिढ्यांना घडवणारे एक तीर्थक्षेत्र, ‘कुपर इंग्लिश स्कूल’. माझ्या माहितीनुसार (दीपक नानांच्या निमित्ताने इथे एक आठवण सांगावीच लागेल. ती अशी की याच सातारा-रोडने हत्तीवरून निघालेल्या नवरा-नवरीच्या दोन वराती पहिल्या. एक होती ती सौ. विमल आणि श्री. विलास शंकरराव चव्हाण यांची आणि दुसरी सौ. ज्योती आणि श्री. दीपक विठ्ठलराव फाळके यांची.)  

मुख्य रस्त्याने आपण तसेच पुढे जातो तर लागते एक ‘गेट’ नावाचे ठिकाण. सातारा-रोडच्या दुनियेसाठी त्याचं महत्व ‘गेट-वे-ऑफ इंडिया’ पेक्षा काही कमी नव्हतं. याला गेट एवढ्यासाठी म्हणतात कारण कि इथून पुढे मोतीचंदनगर, कुपर कॉलनीत आणि मुख्य बाजारपेठेतही इथूनच प्रवेश करता यायचा. कॉलनीच्या दिशेचं हे गेट पुढे अचानक ते बुजवलं गेलं आणि पुन्हा सुरूही झालं. (वदंता अशी की कंपनी फायद्यात यावी म्हणून कुण्या एका ज्योतिषान ते बंद करायला सांगितलं होतं.) डावीकडे ‘मिलन टुरिंग टाँकीज’चा तंबू. मधोमध उभी असलेली ‘रॉकेट कंपनीची’ आकाशी-निळ्या रंगाची टूरिंग टाँकीजची गाडी. रात्री ९ वाजता सुरु होणारी सनई आणि लगबगीनं धावत जावून तिकीट काढणारे लोक. तिकीट बघून आत सोडणारे, देखणे व्यक्तिमत्व लाभलेले श्री. तानाजी-काका फाळके. गेट जवळ श्री. गणपतराव यांचं फळाचं दुकान. शेजारी वडावर टांगलेले सध्या सुरु असलेल्या चित्रपटाचे पोस्टर, त्याखाली पिक्चर मधल्या आठ-दहा आकर्षक सीन्सचे पोस्टर. कंपनी गेटच्या आत सिक़्युरिटी केबिन. बाहेर नवरंग मध्ये दाखवण्यात येणाऱ्या आगामी पिक्चरचं टायटल, त्यातल्या नट-नट्यांची नावं, असा आकर्षक पद्धतीन लिहिलेला ‘बोर्ड’. सिक़्युरिटी केबिन शेजारी ‘रेल्वेचं चाक उलटं टांगून’, त्याची केलेली ‘घंटा’. संध्याकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत  त्या घंटेवर दिले जाणारे टोल, हे सातारा-रोडच एक सामुदायिक घड्याळ होतं.

या गेटच्या लगतच डावीकडे मोतीचंद नगरच्या बैठ्या चाळी सुरु होतात. त्यापलीकडे उभ्या तीन मजली इमारती. मधोमध मोतीचंद नगरचे छोटे ग्राउंड. शेजारी बिडकरांची लायब्ररी. त्यापलीकडे नाना कुलकर्णी यांचा क्लास, पुढे पाण्याचा खोल पाट. अलीकडून पुढे सरकणारा रस्ता हा श्री. जे. एम. कदम सर यांच्या क्लास वरून, हत्तीवाले आणि दारुवाल्या पवारांच्या घरावरून स्टँड जवळ येतो.

पण आपण मात्र थोडे मागे परत एकदा गेटवर जावूयात. कारण इथूनचं पुढं सुरु होते १९७५ ते १९८५ सालातली सातारा-रोडची मुख्य बाजारपेठ. गेटवर डावीकडे उभं असलेलं ‘विठ्ठल-रुक्मिणीचं देवळ’, नाजुकशा टाळांच्या तालावर दुपारनंतर तिथं चालणारी महिलांची भजनं, त्याच्या दारात असणारा पार आणि पाठीमागचं तुळशी वृंदावन. ‘झाडाखाली बघून सावली’ बसणारे चांभार, चौकाचौकात उभ्या असलेल्या पानपट्ट्या, त्यावर ‘जगाच्या आणि वडीलधार्यां’च्या नजरा चुकवत उभी असलेली ‘तरुणाई’. गेटला लागून असलेलं श्री. गाढवे यांचे किराणा मालाचे दुकान. शेजारी तानाजी-काकाचं ‘विशाल जनरल स्टोअर्स’, उजवीकडे श्री. महादेव आणि पांडबा यादव यांचं बंधूंचं सलून, त्या शेजारी ‘मिरवणुकीत डोक्यावरून वाहायच्या गँसबत्त्यांचे’, स्टोव्ह रिपेअरी, पंक्चर काढण्याचे अल्लाउद्दिन/इब्राहीम चाचांचे थ्री-ईन-वन शॉप. याच काळात पुढे भर्रर्र करणाऱ्या रॉकेलच्या स्टोव्हची जागा, सायलेन्सर बर्नरच्यां स्टोव्हने घेतली. आमच्यासाठी ती एक क्रांती होती. गँस सिलेंडर, प्रेशर-कुकर आला. (प्रेशर कुकरचे झाकण उडू शकते, त्यासाठी झाकणावर वौल्व दिला आहे, असे भांडी-दुकानदाराने सांगितल्याने, भीतीपोटी पहिले काही दिवस आम्ही, कुकर लावल्यानंतर घरासमोर व्हरांड्यात बसून त्याकडे  एकटक बघत राहायचो, हे अजूनही स्मरते.) यादवांच्या सलून शेजारी बाळासाहेब फाळके यांचे रेडीओ दुरुस्ती आणि इलेक्टिक सामानाचे दुकान तर श्री. सतीश गाढवे यांचे किराणा माल दुकान. त्यापलीकडे एक डंक, त्याला लागुनच सायकलीचे दुकान. उंचावर पुढे पिठाची गिरण. त्यापलीकडे पाडळकरांची डेअरी. शेजारी सावंतांची वखार. डावीकडे या सगळ्यांच्या पुढ्यात डाव्या बाजूला ९० च्या दशकात उभारलेली छोटी-छोटी दुकाने, शब्बिरचे मटण शॉप ही तेंव्हाच सुरु झाले.

पुढे डावीकडे उंचावर सौ.उषा रावसाहेब मोरे (मूळ गाव: आसले) यांचा चटणीचा डंक. माझे मित्र उमेश आणि महेश मोरे हि त्यांचीच मुलं. आईला चटणी चाळायचा त्रास नको, म्हणून डंकाच्या पायालाच त्यांनी मोठी चाळण बसवली. त्या शेजारी ‘दिलराज बँगल्स स्टोअर्स’, शेजारी गायकवाड यांचे ‘नूतन स्टेशनर्स’. पलीकडे श्री. खलील शेख यांचा फोटो स्टूडीओ आणि शेजारी ‘भांडीवाले पवार’. ९० च्या दशकात मुस्लीम बंधूनी सुरु केलेला ‘सुप्रीम टेलरिंग व्यवसाय’ आणि बोळाच्या अलीकडे जयवंत पैलवान यांचे घर. 

                त्याच बाजूला पुढे, स्वतः स्वच्छ आणि कडक पांढऱ्या कपड्यात राहणारे, देखणे व्यक्तिमत्व लाभलेले श्री. किसन नाना परीट यांची लाँड्री. त्या शेजारी उपाळेबंधू टेलर्स. समोर ज्ञानोबा गोंजारी यांची लाकडाची वखार, काहीकाळ या वखारीत आमचीही भागीदारी होती. वखारीत काम करणारे बनसोडे, खरात, माने या सगळ्यांनी आमच्यावर खूप प्रेम केलं. त्यालगत चंद्रकांत व सुनील तांबोळी याचं धान्य दुकान आणि धंजी मामा दिवसे यांचे किराणा मालाचे दुकान. समोर बघितलं तर गालिंदे याचं मटण-शॉप.

धंजी मामांच्या दुकानाला खेटून ‘स्टार’ ही  केरळवाल्यांची बेकरी, दोशी मेडिको, आणि त्यापलीकडे तोडकर यांचा डंक व त्यांचे इतर व्यवसाय. या पाठीमागे मुस्लीम बांधवांची घरं आणि मशीद. इथं माझ्या वडिलांचे वर्गमित्र, ‘भारत बेकरीचे मालक’ श्री. मोमीन यांच्या मुलांबरोबर मी १० वीचा अभ्यास केला. मशिदीत अजान देणारा आमचा मित्र अबुब आणि त्याचा भाऊ अयुब यांनी खूप प्रेम दिलं. इथेच त्यांची बेकरीची भट्टीही होती. त्यात ब्रेड-बटर-खारी कशी तयार होते, तेही जवळून बघितलं. मुसा यांची दुध डेअरी देखील याच मोहल्ल्यात.  

रस्त्याच्या अलीकडे सातारा-रोड मधील मुख्य व्यापार्यांपैकी एक, ‘साखरे-बंधू’ यांचे दुकान. चर्म व्यावसायिक माने, पुढे लाला फाळके यांचे सायकल दुकान, खेमचंद यांचे पवन-शु-मार्ट, सह्याद्री सहकारी बँक आणि महाजन डॉक्टरांचा दवाखाना. अत्यंत हुशार म्हणून ओळखला जाणारा त्यांचा मुलगा निशिकांत तथा ‘बबलू महाजन’ आज आपल्यात नाही, याचं खूप वाईट वाटतं. २००४ साली माझं पीएच.डी.चं ‘पॉवर पौइंट प्रेझेन्टेशन’ तयार करायला त्याची खूप मदत झाली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय परिषदांच्या निमित्ताने मी अमेरिका, कॅनडा, फ्रांस असे अनेक देश फिरलो, PPT च्या Advanced Versions आल्या, पण त्या सारखं सुंदर प्रेझेन्टेशन परत कधीच तयार झालं नाही.

सातारा-रोडच्या परिसरातल्या बहुतेक गावात, घराघरात टी.व्ही बसवण्याचं भाग्य श्री. चंद्रकांत राऊत याला लाभलं. बोळाच्या पलीकडे ‘निलकमल’ हे पांढरी लुंगी लावणाऱ्या उडप्यांच हॉटेल तर समोर श्री. आप्पा घाडगे याचं सलून, सुतार यांचं प्रसिद्ध ‘रॉयल पान शॉप आणि त्यांचंच हार्डवेअरचे दुकान’. त्या समोर, दिवसभर वसना नदीत पकडलेले ‘वाम-मासे-खेकडे-झिंगे’ यांची विक्री करणारे कातवडी समजातील लोक उभे राहायचे.

                आता आपण सातारा-रोडच्या गजबजलेल्या मुख्य चौकात उभे आहोत. डावीकडे सर्वात जुने असे  विचारे टेलर्स, खटावकर-म्हेत्रे यांची कपड्यांची दुकाने, पटवर्धन डॉक्टरांचा दवाखाना, (त्यांची मोरपंखी रंगाची पद्मिनी कार श्री. मुजावर चालवायचे.) उजवीकडे अविनाश फाळके (बापट) यांच्या कपड्याच्या दुकानाला लागून असलेले ‘श्री नरसिंह मेडिकल स्टोअर्स’, सायकल दुकाना  शेजारचं थोरल्या बापटांचे किराणा स्टोअर्स, शेजारी ‘ज्ञानगंगा स्टेशनर्स यांचे वह्या, पानशॉप आणि लॉटरी स्टॉल. समोर खुशालभाई शहांचे किराणा मालाचे दुकान. रस्त्याच्या कडेने बसलेले भाजीवाले, आंबेवाले, शेवटी चिरमुरेवाल्या माने मावशी. पलीकडे ‘पाटील पेपरवाले’ आणि सदैव प्रसन्न असलेल्या, कानात बाळी घातलेल्या ‘चंदू टीन मेकर’चे स्टोव्ह दुरुस्तीचे दुकान. स्वयंपाक घरातल्या कोणत्याही उपकरणाची, संसारोपयोगी साधनाची दुरुस्ती आणि न सुटलेले प्रश्न इथं नेमके सुटायचे.

या दुकानांच्या पाठीमागे सातारा-रोडची ग्रामपंचायत, झेंड्यासाठी उभारलेला तीन पायऱ्यांचा गोल चौथरा आणि त्या वेळचं पोलीसस्टेशन. ग्रामपंचायतीच्या भोवती, या मध्यवर्ती असलेल्या जागेत दर’ बुधवारी’ एक गच्च बाजार भरायचा. असा बाजार पुन्हा कधीच बघितला नाही. इथं काय मिळायचं नाही? सार काही असायचं. लालसर वांगी, टोमँटोने शिगोशिग भरलेल्या पाट्या, पालेभाज्या, कोथिंबीर यांनी ओसंडून वाहणारी पोती, ताजे आले-लिंबू, मसाले, कडधान्ये, फळे, कपडे, मासळी सारं सारं काही इथं मिळायचं. ‘घेता का आलेपाक’, अशी आरोळी ठोकणाऱ्या त्या विक्रेत्याची, ‘घेता का उंदराला, पिस्वाला, घुशीला भारी औषेध’…असं म्हणणारा अंध मित्राची आज हटकून आठवण येते. 

बाजारात सगळा ताजा भाजीपाला सकाळी मिळायचा, बाजाराची ती चलतीची वेळ, त्यामुळे सधन कुटुंबातल्या बायका सकाळी बाजार करायच्या, खिशाला परवडणारा बाजार हा दुपारचा असायचा. त्यामुळे दुपारी कामगारांच्या बायका बाजारात यायच्या. गोरगरिबांचा बाजार संध्याकाळी भरायचा. दिवसभर मालाच्या विक्रीसाठी जोरजोरात ओरडणाऱ्या या बाजारात, शेवटी संध्याकाळी ऐकलेली आणि गिऱ्हाईकाला निर्वाणीचा इशारा देणारी, ‘घेताय, का इस्काटू (विस्कटून टाकू)?’ ही हाक सातारा-रोड सोडून कुठेच ऐकली नाही. आता उरला-सुरला माल घरी नेवून करायचं तरी काय? आणि तो नेण्यासाठी भाड्याचा टेम्पो कशासाठी करायचा? त्या ऐवजी  तो शेतकरी तो उरला-सुरला माल तिथेच सोडून जायचा. 

ग्रामपंचायतीच्या पूर्वेला असलेल्या  कौलारू इमारतीत गदगकर शाळेचे आणखी एक-दोन वर्ग भरायचे. इथली भिंत चांगलीच आठवते. कारण कॉलनी वगळता, बाहेर सातारा-रोड मध्ये जे पहिले काही टीव्ही आले ते ग्रामपंचायतीत, फाळके-पाटलांच्यात आणि साखरेबंधू यांच्या घरी. टीव्ही बघणा-या आम्हां मुलांचा त्रास फाळके-पाटील आणि साखरे कुटुंबियांना कधीच वाटला नाही. नेहमीच, त्यांनी येईल त्याला प्रेमानं जागा दिली, हे आज  कृतज्ञतेन नमूद करावं लागेल. बाजारातल्या गदगकर शाळेच्या याच भिंतीत ग्रामपंचायतीचा टीव्ही असायचा. ‘रामायण, छायागीत, चित्रहार’, असे कार्यक्रम बघायला गर्दी व्हायची. इथेच पलीकडे पाण्याच्या टाकीजवळं जनावरांचा दवाखाना देखील होता आणि एका कडेला दक्षिणमुखी मारूतीचं मंदिर. पाठीमागे विचारे चाळ, श्री. वसंतराव गाढवे आणि कुटुंबीयांची घरं. इथून बस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर.

तिथेच पलीकडे ‘कटावणी, पहार, मोठ्या हातोड्या, आणि घण दिसायचे. लोखंडी वस्तूंना आकार देणारे, दंडात ‘काळा दोरा’ बांधणाऱ्या पिळदार शरीर-यष्टी लाभलेले भीमा घिसाडी याचं कुटुंब. ‘ऐरणीच्या देवा तुला ठिणगी, ठिणगी वाहुदे,’ या गीताची आठवण करुन देणारा तिथला भाता, त्याच्या पुढ्यात जळणारे कोळसे आणि पाठीमागे, शाळा संपवून घरी आल्यावर आई-वडीलांना मदत करणारे-भाता ओढणारे चिमुकले हातं.   

मला आठवतं की, अगदी सुरुवातीला एसटी ही महावीर कपड्यांच्या दुकाना समोर थांबायची. अलीकडे जयवाणी हॉटेलात कामगार दुपारचे डबे उघडायचे. दोशी यांच्या कापड दुकानाला लागून श्री. गाढवे याचं  आणखी एक दुकान, त्यापुढे पुढे कपाळाला भस्माचे पट्टे ओढलेल्या गुळवे यांचे चिरमु-याचं, श्री. ढवण यांचे बांगड्याचे दुकान, सुभाष भुवन, आनंदाश्रम हॉटेल. स्टँड वरून उजवीकडचा रस्ता पोलीस–स्टेशन वरून थेट कालिदास कॉलनीत जातो. याच रस्त्याला पुढे लगेचच, श्रीमान कालिदास शेठ यांचा ‘बर्माशेल रॉकेलचा डेपो. पुढे डावीकडे रेल्वेच्या मोठ्या गोदामात भरणारे गदगकर शाळेचे वर्ग. 

हाताच्या आठ बोटात, सोन्याच्या लखलखीत मोठ्या अंगठ्या घालणारे आणि डोक्यावर लाल फेटा बांधत, ‘काय मालक’ म्हणून हाक मारणारे, माझ्या वडिलांचे मित्र, श्री. शंकरराव भाऊसो चव्हाण, हिरवा फेटा बांधणारे सयाजी तात्या, बुलेटवर स्वार असे नंदू पैलवान, धोतरावरती काळा-कोट, हातात लांब दांड्याची छत्री घेणारे नांगरे-पाटील, ‘ईन-शर्ट करून भर पावसाळ्यातही छत्री न घेता, दररोज न-चुकता जरंडा चढणारे फाटक साहेब’, सातारा-रोडच्या तालमीचे सर्वेसर्वा ज्ञानबा पैलवान आणि शिवाजी पैलवान, अनेक वर्ष सरपंच म्हणून काम करण्याची संधी मिळालेले श्री. संभाजी फाळके, परिसरावर प्रभाव असलेले आणि डबलबार बंदूक सहजपणे हाताळणारे प्रकाशआबा पाटील, बाबाच्या वाडीतले माजी आमदार आनंदराव फाळके, रस्त्याने जाताना जवळ येणाऱ्या प्रत्येक मुलाच्या हातावर छोट्या लेमन गोळ्या ठेवणारे आणि हिरवा फेटा बांधलेले मुस्लीम चाचा, शिवाजीराव आणि कान्ताभाऊ फाळके यांचे वडील ह. भ. प. श्री. गोविंदराव फाळके, भारदस्त व्यक्तिमत्वाचे श्री. राम फाळके, रस्त्यावर कुणाशीही मुक्त संवाद करणारे आणि नेहमीच हसतमुख दिसणारे विठ्ठलकाका, वसंतराव फाळके, वसंतराव शेटे, वसंतराव गाढवे, त्रंबक फाळके, भक्तवडीचे श्री. भगवान आवडे, हत्तीवाले पिता-पुत्र, कामगार संघटनेचे काम करणारे आणि कामगार-निवेदनाच्या बोर्डावर शेवटी ‘आपला मुंढे पी. पी.’ या स्वाक्षरीने भेटणारे कार्यकर्ते, श्री. अंतोन गार्ड, अत्यंत आपलेपणाने पत्र-तारा-निरोप आणून देणारे पोस्टमन्स, दररोज दैनिक ऐक्य मधून ‘सुर्यफुल’ या लेख-मालिकेद्वारे भेटणारे जयवंत गुजर, एकांकिका व कला क्षेत्रात श्री. विजयसिंह परदेशी, राम शिंदे, सदाकळे, खडकीकर, नारायण पतंगे,  रवी वैद्य, हमकास कोणत्याही बॉलवर सिक्सर ठोकणारे रमजान, मुलांच्यासाठी संस्कार मंदिर झालेल्या आदरणीय नवरे बाई अशी कितीतरी नावे. गदगकर शाळेचे अनेक वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केलेले आर. वाय. मास्तर, कुपरचे श्री. जमदग्नी सर, पोतनीस, भाकरवाडीचे काळे सर अशी कितीतरी माणसं, आजही जशीच्या तशी नजरेसमोर उभी आहेत. असं हे सातारा-रोड सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांचं गावं म्हणूनही प्रसिद्ध होतं.  

पाडळी हे गाव फाळके याचं ७०० उंबऱ्याच गाव. तर माळी समाजातील राऊत हे देखील याचं पांढरीचे मूळ मालक. बहुतेक जणांची नावं सारखीच. त्यामुळे गोंधळ व्हायचा. यासाठी एखाद्याच्या अनुपस्थितीत, त्याचा संदर्भ देताना आदरपूर्वक वडिलांच्या नावाचा उल्लेख केला जायचा. फाळक्यांच्यात, ‘शिवाजीराव-बळवंतराव, सुरेशराव-ज्योत्याजीराव, शिवाजी-गोविंदराव, त्रंबक-गोपाळ, रामचंद्र-कोंडी, अंकुश-बाळकृष्ण, श्रीरंग-विठ्ठल, विठ्ठल-सखाराम, दिलीप-गणपत’ असे नावांचे उल्लेख व्हायचे तर राऊतांच्यात ‘सुभाष-गणपत, चंद्रकांत-धर्मू, सोपान-नामदेव’ अशा पद्धतीने आदरपूर्वक केलेल्या उल्लेखामुळे नावात, साधर्म्य असलं तरी माणूस नेमका ध्यानात यायचा. पश्चिम महाराष्ट्रात भावकी मोठ्या असलेल्या गावात हि पद्धत सहजतेने आढळते.   

बसायला बेंच, तसेच फरशी असलेल्या समृद्ध अशा कूपर शाळेत प्रवेश मिळाला, की विद्यार्थ्याला स्वतःची काहीतरी पत वाढल्यासारखं वाटायचं. सायकल तीही ‘फुल-चेनकव्हर-मडगार्ड-डायनेमो-फ्रंटकॅरिअर-सहित’ बघायलाही मजा वाटायची आणि स्वतःच्या मालकीची असेल तर बातच काही और असायची. काँलनीतल्या साहेबांची, ऑफिसर्सची मुलं आमच्या वर्गात असायची. आमच्या या वर्गमित्रांच्या वडिलांना, कूपर कंपनी नेहमी टूर्सवर पाठवायची. त्यांच्या त्या परराज्यातल्या प्रवासाच्या अर्थात टूर्सच्या कथा आमच्यासाठी मोठ्या कुतूहलाच्या होत्या. या मुलांचे वडील त्यांच्या मुलांसाठी, टूर वरून येताना घड्याळे, नवे कपडे घेवून यायचे, वेगळ्या आकाराचे कंपास आणायचे. शाळेत मधल्या सुट्टीत दुध-बोर्नव्हिटा पिवून येणाऱ्या साहेबांच्या पोरांचा; त्यांच्या इस्त्री केलेल्या कपड्यांचा, त्यांच्या जवळील कॅमलच्या कम्पास-बॉक्सचा आम्हाला हेवा  वाटायचा. कॅमलचा तोच कम्पास-बॉक्स मिळायला, आम्हाला दहावीचं वर्ष उजाडावं लागलं. अंगाबरोबर बसणारा गणवेश आम्हाला कधीच मिळाला नाही. ‘महावीर रेडीमेडस’ मधून आमची आई, अत्यंत दूरदर्शीपणाने,  ‘तोच गणवेश पुढे किमान दोन वर्ष तरी वापरता येईल, अशा मापानचं निवडायची. त्यामुळे मुळातच सैल होणारी ती पँट, जाड चड्डीवर घातल्याखेरीज, वरून करदोडयाने बांधल्याशिवाय, आमच्या कमरेत कधी बसलीच नाही आणि आमचं ते ‘ध्यान बघून’, त्या वयात कुणी आमच्या प्रेमातही पडलं नाही. वर्गातल्या कितीतरी  मित्रांची ‘व्यक्त न झालेली’ अशी कितीतरी लग्न, मनातल्या मनात जुळली आणि ‘लग्न न होताच’ मनातल्या मनात ती मोडली. असा तो काळ.

आमच्या लहानपणी पाचचाळीच्या मागे असलेल्या चीलावळीच्या शंकराच्या मंदिरात शंकराचार्य आले होते. त्यावेळी गर्दीनं फुललेले ते रस्ते, ‘पाच-चाळ ते पाडळी’ या रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली चिंचेची भली मोठी झाडं, पुढे नदी काठावर उभं असलेलं महादेवाचं देवळ. संध्याकाळी संघाची शाखा इथं चालायची. श्री. हणमंतराव भाऊ फाळके हे सातारा-रोडचे पहिले स्वयंसेवक. बोर्डाच्या शाळेच्या दारात, मोतीचंद-नगरच्या मैदानावर, गेटवर श्रीरंग गायकवाड यांच्या गरामागे रिकाम्या जागेत, स्टेशनवर संजय फाळके यांच्या घराच्या अंगणात, अशा कितीतरी ठिकाणी संघाची शाखा भरायची. ‘नमस्ते सदा-वत्सले मातृ भूमे’ या प्रार्थनेचा, ‘खरी देश भक्ती कृतीने दिसावी’ या ओळींचा अर्थ इथेच कळाला. माझे वडील, श्री अर्जुनराव रणखांबे, यांचं शनिवारी मौन-व्रत असायचं. याचं स्मरण, शनिवारी त्यांना भेटणाऱ्या प्रत्येकाला असायचं. रा. स्व. संघाचे ते तालुका कार्यवाह होते. पुण्याच्या तळजाई शिबिरा पासून त्यांचा हा प्रवास सुरू झाला. पुढे गुजरात राज्यात डांग या आदिवासी जिल्ह्यातही त्यांनी पूर्ण वेळ प्रचारक म्हणूनही काम केलं. 

संघाचे बरेचसे उत्सव हे दारूवाले पवार यांच्या माडीवर झाले. दसऱ्याच्या दहा दिवसात पहाटे होणाऱ्या प्रभातफे-याना खूप मोठा प्रतिसाद मिळायचा. पेठेतले व्यापारी हे मुलांना गोळ्या-चाँकलेटस वाटायचे, उच्चरवाने देशभक्तीपर उठावणीचे श्लोक म्हणत, ही प्रभात फेरी एका तासाने परत शाखेवर यायची. ‘जात-पात-धर्म-विरहीत’ जगाचे ते एक सुंदर दर्शन होते. संघाच्या सहा उत्सवा साठी साताऱ्याहून वक्ते यायचे. उच्चविद्याविभूषित असूनही त्यांचा वावर सहज असायचा, त्यात अभिनिवेश नसायचा. त्यांच्या कडून प्रेरणा घेवून आम्हीही कोरेगाव, नांदगिरी, किन्हई, भक्तवाडी, पिंपोडे, पळशी, आसंगाव इथं गुरुपौर्णिमा, रक्षाबंधन असे उत्सव साजरे करायला जायचो. मला आठवतं की, एकदा रात्री १० वाजता किन्हईचा उत्सव संपवून मी, संजय फाळके आणि आमचा मुख्य-शिक्षक श्री. टेकबहादूर गुरखा असे आम्ही तिघेजण किन्हई वरून, पिंपोडे-नांदगिरी मार्गे चालत पहाटे सातारा-रोडला परत आलो होतो. नात्यांचा तो त्याकाळी बांधलेला बंध, आजही तसाच कणखर आहे, जिवाभावाचा आहे, याची धन्यता वाटल्या खेरीज रहात नाही. या क्षणांनी आयुष्यात उमेश मोरे, तानाजी माने, आमळेकर बंधू, विलास राऊत, चंद्रकांत राऊत हे मित्र कायमसाठी दिले.    

सातारा-रोडच्या जत्रेत भरणारा कुस्त्यांचा भला मोठा फडं हा नुकतीच नांगरट करून ढेकळे फोडलेल्या शेतात व्हायचा. उघड्या अंगात ढेकळ रुतायचे, पण ‘जोश होता आणि इलाजही नव्हता’. उद्घाटनासाठी फोडल्या जाणाऱ्या नारळाचे खोबरे आम्हां मुलांना बक्षीस म्हणून मिळायचे. मला तर वाटायचं की मोठ्या पहिलवानांच्या कुस्त्या चांगल्या व्हाव्यात म्हणून. आम्हां लहान मुलांच्या कुस्त्यांच्या निमित्तानं रानातले ते ढेकूळ बारीक करून घेतले जायचे. पण ढेकळाना घाबरून, ‘माघार घेण-निमित्त सांगण’ आम्हाला ‘माहितही नव्हतं आणि मान्यही नव्हतं.’ पहिलवानांच्या हातात हात घालून, धोतराचा सोगा सावरत फडात फिरणारे वस्ताद आणि फडाच्या माईकवरून संचालन करीत ‘वस्तादांनी फिरतं ऱ्हावा, एका जागी थांबू नका’, असा होणारा पुकारा. फडाच्या दुसऱ्या कोप-यावर लांबवर चाललेली एखादी प्रेक्षणीय कुस्ती. प्रतिस्पर्ध्याला ढाकेवर अस्मान दाखवणारा पहिलवान हा मग एका पायावर नाचायचा, आपल्या वस्तादाचं नाव घ्यायचा आणि पळत-पळत आपल्या माणसांच्यात यायचा, कुणीतरी वडीलधारा माणूस पुढ होत त्याला उचलून घ्यायचा, ‘वा रे फाकड्या’ म्हणत पाठीवर थोपटायचा. प्रेक्षकातून त्याच्यावर पैशाचा वर्षाव व्हायचा. हे सार दर्शन सातारा-रोडला घडलं. मित्र मंडळी बरोबर  सायकल वरून शेजारच्या गावच्या जत्रेतील कुस्त्यांचे फड हे पुसेगाव पर्यंत केल्याच्या गोड आठवणी आजही ताज्या आहेत.

1980 च्या दरम्यान महाराष्ट्रात पुलोदचा प्रयोग झाला. कोरेगाव मतदार संघातून श्री. शिवाजीराव जिजाबा फाळके यांना उमेदवारी मिळाली. मी वयाने लहान होतो, पण सार्वजनिक सभांतून आण्णांनी लिहून दिलेली भाषणे करायचो, त्यामुळे दादांच्या प्रचारात त्यांच्याच शेजारी बसून तालुक्यात बऱ्याच गावात फिरलो. शरद पवार यांच्याशी दादांचा चांगलाच परिचय होता. याच निवडणुकीत शरद पवार साहेब सातारहून वडूथ मार्गे फलटणला जाणार होते. त्यावेळी त्यांनी दादांना वडूथला बोलवलं होतं. त्यावेळी पवार साहेबांच्या मागे-पुढे असलेल्या पाच-पन्नास गाड्यांचा ताफा बघून हबकून गेलो  होतो. ज्यांच्या निमित्ताने तालुक्याला विधानसभा सभापतीपद मिळालं त्या श्री. शंकरराव जगताप यांच्या काळात जरंड्यावर लाईट आली. जरंड्याच्या पायथ्याशी झालेल्या त्या  कार्यक्रमाला मी आवर्जून उपस्थित होतो. ज्यांच्या निमित्ताने तालुक्यात चिमणगावला साखर कारखाना झाला त्या श्रीमती शालिनीताई पाटील यांनी तालुका राजकारणात सक्रिय व्हावं, म्हणून गावकऱ्यांनी आयोजित केलेल्या सभांनाही उपस्थित राहिल्याचं माझ्या स्मरणात आहे. हा सारा काळ १९८०-९० च्या आसपासचा आहे.

हा सर्व पसारा ज्याच्या भोवती उभा होता, ती दुनिया होती शेठ वालचंद-हिराचंद यांनी उभ्या केलेल्या ‘कूपरच्या कारखान्याच्या भोवती’. हजारो एकरचा तो विस्तीर्ण परिसर, शेकडो एकरात पसरलेला मुख्य कारखाना, तो बघण्याची मजाच काही और होती. घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्यासाठी, घराच्या अजेंड्यावर ठरलेला तो एक मुख्य कार्यक्रम होता. निळ्या रंगाच मुख्य गेट, त्यावर उभे असलेले देखणे गुरखे, त्यांचा ‘निळीच्या रंगाचा सदैव’ नवाच दिसणारा, कडक इस्त्री केलेला पोशाख, पायात पाँलिश केलेले शूज, कमरेला लावलेला बिचवा आणि डोक्यावरच्या टोपीत खोचलेला सप्तरंगी तुरा असा त्याचा रुबाबच न्यारा असायचा. 

कारखान्याच्या मुख्य गेट समोर असणारे गाड्यांचे गॅरेज, त्या अलीकडे असणारा डायरेक्टर बंगला. त्याचा थाट आणि या बंगल्या बद्दल वाटणारे आमच्या मनीचे कुतूहल न्यारे होते. बंगल्या समोर पसरलेले लॉन, बंगल्याच्या बागेत फुललेली गुलाबाची फुले, लांबून दिसणारे छोटे तळे, त्यातली कमळे, ही आम्ही कामगारांच्या सायकल-स्टँडच्या जाळीतून बघायचो. त्यातल्या वैभवाचा मोठा हेवा वाटायचा. इथल्या कोण्या एका शेठ्जीनं म्हणे मुंबई चित्रपट सृष्टीतल्या एका नामवंत हिरोईनशी लग्न केलं होतं. ही गोष्ट आम्ही आमच्याकडे येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला आवर्जून सांगायचो. थोडक्यात मुंबईच्या नट्यांनी प्रेमात पडावं, असेच आम्ही आहोत, आम्हाला कमी लेखू नका, असाच याचा गर्भितार्थ असायचा. 

लाईटची सोय झाली होती पण लाईट गेली तर कारखाना कसा चालणार? झाले…कारखान्यात डिझेलचे मोठे जनरेटरर्स बसले. ते सुरु झाल्याचा धड-धड आवाज सगळ्या गावभर पसरायचा. सकाळी ६.३० चा भोंगा सगळ्या पंचक्रोशीला उठवायचा. नंतरचा ७.२० चा मोठा भोंगा आणि ७. ३० चा छोटा भोंगा कामगारांना काम सुरु करायला सांगायचा. दुपारी १२ च्या भोंग्याला कामगार गेटवर येवून थांबायचे आणि ज्या गतीने घर गाठायचे ते दृष्य बघण्यासारखे असायचे. १२.३० ला सर्व कामगार परत कामावर हजर. वर्षातून एकदा, ३० जानेवारीला सकाळी ११ वाजता भोंगा वाजायचा. गावाचे सारे व्यवहार जिथल्या तिथे थांबायचे. राष्ट्रपित्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी सगळे गाव उभे राहायचे.   

सातारा-रोडची हि सारी सृष्टी, ‘वालचंद-हिराचंद’ या दृष्ट्या पुरुषाने वसवली. पुढे विनोद दोशी, चकोर दोशी ही नावे पिढयापिढयाच्या मनात घर करून राहिली. आपल्या पदरी काम करणाऱ्या कामगाराच्या पोटात, भर दुपारी १२ च्या उन्हात चार घास सुखाचे पडावेत, म्हणून त्याकाळात पाच-पन्नास एकर परिसरात, विजेच्या खांबांवर कर्णे लावून ‘मकरंद प्रिय हा मिलिंद….उगवला चंद्र पुनवेचा…ही नाट्यगीते आणि ‘भातुकलीच्या खेळामधली’ भावगीते लावणारा, असा सहृदयी आणि रसिक मनाचा उद्योजक शोधूनही  सापडणार नाही .

‘कंपनीचा दवाखाना’ हा या परिसरासाठी वरदान होता. मुन्शी-जोशी डॉक्टर्स, वालुबाई, कामत, जोशी बाई या नर्स, त्यांची लगबग  आणि त्यांच्या आपुलकीची आजही आठवण येते. केसपेपरच्या दालनात समोर ठेवलेली, काचेची मोठी ‘लाल औषधाची बाटली’, आतले ड्रेसिंगचे कौंटर आणि सगळ्यात आत पडद्यामागे इंजक्शन रूम. केसपेपर काढायला इथल्या बाकड्यावर बसलो की समोर ‘पुरुष गर्भावस्थेत असल्याचे’चित्र दिसायचे. “पुरुषांवर अशी अवघड वेळ आली असती, तर त्यांनी निश्चितच काळजी घेतली असती’, असा मजकूर असलेली ती जाहिरात, ‘स्त्रियांनी गर्भावस्थेत काळजी घ्यावी,’ यासाठीच लावलेली होती, हे सुज्ञास सांगणे न लगे. ‘या जाहिराती मागे असलेला परिवर्तनाचा आग्रह, नेमका परिणाम साधण्याची कला आणि नवनिर्मिती क्षमता’ याचे गारुड आजही कायम आहे.

“नवरंग” हे शेठ वालचंद आणि दोशी कुटुंबिय यांच्या स्वप्नं-सृष्टीतलं एक सर्वांग-सुंदर शिल्प. ज्या हातांना त्यांनी काम दिलं, त्या हाता मागच्या अंतकरणाला साद घालणारा, मनाला रुंजी घालण्याला महत्व देणारा तो एक औलिया उद्योजक होता. शेठ वालचंद यांच्या या संकल्पनेला मूर्त रूप देणाऱ्या, नवरंग या वास्तुचं निर्माण करणाऱ्या श्री. कोटणीस या वास्तू-विशारद तज्ञाला आज मानाचा मुजरा करावा वाटतो.  

आख्या गावाने सहज उभे रहावे, अशी झेंडा वंदनासाठीची भव्य खुली जागा…“नवरंग”च्या चारी बाजूनी असलेला दहा-बारा फुट रुंदीचा, दोन पायरी उंचीचा चौथरा. यातच डावीकडे कामगारांच्या साठीची मेस. मेघानी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार होणारे इथले जेवण, चहापावडरच्या रिकाम्या खोक्यातून नेले जाणारे शाबूदाणा आणि बटाटे वडे, भजी, यांची चवं जिभेवर आजही रेंगाळते आहे. कामगारांसाठीच्या खास आयताकृती स्टीलच्या ताटात वाढलेल्या त्या चपात्या, दोन मुदी भात, डाळीची आमटी, इसेन्स घातलेली मुगाची आमटी, कोशिंबीर, पापड, भाज्या…असे ते भरगच्च ताट असायचे. ते हि फार थोड्या पैशात मिळायचे.         

                उजवीकडून पुढे गेलो कि ‘सरस्वती महिला मंडळा’चा हॉल. नवरात्रात इथे मोठे कार्यक्रम व्हायचे. नवरात्रात इथल्या देवीला दररोज आमच्या घरासमोरच्या गुलमुसाच्या फुलांचा हार आमची आई नऊ दिवस घालायची. त्या समोर कॅरम आणि इनडोर-स्पोर्ट्स, जीना चढून वरती गेलो की एक प्रशस्त हॉल. इथे व्याख्याने व्हायची. आता या पुढे नवरंगचा मुख्य भाग. 

पांढरी शुभ्र बॉर्डर असलेले, काळ्या रंगात रंगवलेले जाड पत्र्याचे मोठे दरवाजे, त्याच्या आत काळेच पडदे,  ते उघडून आत जातो तेंव्हा ‘एका भव्य सिनेमा गृहात’ आपण प्रवेश करतो. उजव्या हाताला भव्य शुभ्र पडदा. त्याच्या दोन्ही बाजूला भव्य विंगा. समोर प्रेक्षकांसाठी केलेली तीन स्तरांन्च्यावरची बैठकीची रचना. पिक्चरच्या प्रवेशासाठी A, B, C आणि D असे पास असायचे. कामगारांना परवडणारी जमिनीवरची भारतीय बैठक, ऑफिसर्स वर्गासाठी खुर्च्या, आणि सगळ्यात वर अधिकारी मंडळींसाठी बाल्कनी. याच नवरंग मध्ये दक्षिणेच्या भिंतीला चिकटून गणपती उत्सवाची आरास मांडलेली असायची. शेजारीच भगवान महाविराचे ‘पर्युषणपर्व’ साजरे व्हायचे. समोर रांगोळी स्पर्धेच्या रांगोळ्या, दुर्वा स्पर्धा असे कितीतरी कार्यक्रम. ‘नवरंग’ या प्रेक्षागृहाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. एकाच वेळी ‘बंद थीएटर’ तर दुसऱ्या बाजूने ‘विस्तीर्ण खुले प्रेक्षागृह’ असलेले, महाराष्ट्रातील हे ‘एकमेव थीएटर’ असावे. महाराष्ट्रातील नामांकित संगीत नाटके, गाजलेले चित्रपट, तमाशे, कीर्तने सातारा-रोडच्या याच भूमीत संपन्न झाली. 

WGT अर्थात वालचंद-ग्रुप-टूरनामेंटस’ सारख्या कामगारांच्या स्पर्धासाठी पुणे-मुंबई इथून परीक्षक यायचे. शेठ विनोद हे स्वतः जातीने प्रत्येक गोष्टीत लक्ष द्यायचे. श्यामची आई या चित्रपटात काम केलेले माधव वझे पुण्याहून दिग्दर्शनासाठी यायचे. वाई इथल्या राज्यनाट्य स्पर्धेसाठी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘फुटपाथ’ या एकांकिकेत मला ‘मन्या’ ही चांभाराच्या मुलाची भूमिका करायला मिळाली. या इथल्या कार्यक्रमानीच आमचे बालपण सजले, इथेच अजाणतेपणी सांस्कृतिक मुल्यांची पेरणी झाली. मराठीच्या देदीप्यमान परंपरांशी आमचे नाते जोडले. केवळ भाग्ययोग म्हणून अगदी आपोआपच आम्ही, ‘कधी आणि कसे धन्य होत गेलो’, ते आमच्या ध्यानीही आले नाही. 

                ‘कूपर इंग्लिश स्कूल’ हा या साऱ्या स्वयंप्रकाशित दुनियेचा आत्मा होता. प्राथमिक, माध्यमिक, उच्चमाध्यमिक स्तरांवर अगदी आपले पणाने शिकवणा-या शिक्षकांच्या पिढ्यांनी आम्हांला घडवले. बालवाडीत प्रभाताई कुलकर्णी यांनी शिकवलेल्या: ‘हंस वाहिनी सरस्वतीच्या पदकमली रमते, माझे मन पावन होते,’ या प्रार्थनेच्या ओळी आजही सहज ओठावर येतात. बेदरकर आणि माडगुळकर सरांनी त्यांच्या सुंदर हस्ताक्षरांत लिहिलेला फळा पुसताना आम्हाला वाईट वाटायचे, भागवत सर  ‘सुकेशिनीचा आणि कोकेवाल्याचा’ धडा शिकवताना आम्ही रडायचो, जमदग्नी सरांना दारात उभे बघताच धूम ठोकायचो, नांदगावकर, बोपलकर आणि कंटक पती-पत्नी, गिजरे टीचर, मंत्रवादी बंधू, सय्यद बंधू,  सु. रं. काळे, परांजपे, चावरे टीचर, सौ. विमल सावंत (हाबळे) बाई, पाटील बाई, पिटके बाई अशी कितीतरी नावे आज आमच्यासाठी प्रात:स्मरणीय झाली आहेत. 

इथल्या जीवशास्त्राच्या प्रयोग शाळेतल्या ‘मानवी हाडांच्या सांगाड्याची’ मनातल्या मनात खूप भीती वाटायची आणि बरोबर इथचं हाबळे बाईंचा भाऊ आनंद हाबळे आमची स्नेहसंमेलानाची प्रॅक्टिस घ्यायचा. गाण म्हणता-म्हणता काचपेटीतल्या त्या हाडाच्या सांगाड्याकडे लक्ष जायचे आणि पुढचे कडवेच आठवायचे नाही. पण एखाद्या महाविद्यालयातही नसतील अशा भौतिकशास्त्र-रसायनशास्त्र-जीवशास्त्रविषयाच्या प्रयोग शाळा, टेक्निकल विभाग यांनी आमची शाळा समृद्ध होती.

शाळेच्या मुख्य इमारतीवर असलेल्या चौकात वकृत्व स्पर्धा व्हायच्या. स्वर्गीय आण्णांनी लिहून दिलेल्या भाषणाला केवळ सादर करणेचं बाकी असायचे. अर्धे मैदान आधीच मारून झालेले असायचे. आण्णांचे एक-एक वाक्य एकेका परीछेदा एव्हडे असायचे. १ ऑगस्ट रोजी टिळकांच्या वर भाषणाची सुरुवात करताना आण्णांनी असं लिहिलेलं होत: “चंदन कापुराच्या अग्नीनं, देशभक्तीन पेटलेल्या लक्षावधी  साश्रू नयनांच्या साक्षीनं, लोकमान्यांच्या ज्या पवित्र देहाला पंचमहाभूतांचे स्परूप प्राप्त झाले, त्या दिवसाच्या पवित्र आठवणींचा हा दिवस”. वाक्य संपताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट व्हायचा, पहिला नंबर मिळायचा. अशी कितीतरी बक्षिसे याच शाळेत मिळाली. आमच्या बॅचचं वैशिष्ट्य असं कि आमच्या बॅचमध्ये १० वीच्या परीक्षेत मोहनसिंग गुरखा हा नेपाळी मुलगा पहिल्या तीन क्रमांकात आला होता. टेकबहादूर धनबहादूर गुरखा आणि कोमल गुरखा हि गुरख्यांची मुलं असूनही, भाषेची अडचण असूनही वर्गात हुशार म्हणून गणली जायची. 

‘नवरंग’च्या जवळ चढावर गुरखा-चाळ होती. सोसायटीचे कंझ्यूमर स्टोअर आणि रेशन दुकानही होत. लांबच-लांब रांगेत तास-न-तास उभं राहुन, ‘पाच लिटर रॉकेल’ मिळाल्यावर ‘पद्मविभूषण’ मिळाल्याचा आनंद व्हायचा. घरातले सगळे दिवे (या दिव्यांना सुंदऱ्या म्हणायचे), स्टोव्ह, आरगीन (ओगलेवाडी इथे तयार होणाऱ्या डेरेदार काचेचा हा दिवा) असं सर्व दिव्यात मग आम्ही रॉकेल भरायचो. फुटलेली काच टिकली साठी वापरल्या जाणाऱ्या ‘सिंदूर’च्या लाल गंधाने चिकटवायचो. राखेवर थोडे रॉकेल ओतून बंब पेटवायचो.

गेटच्या आत कूपरची मुख्य कॉलनी. वळणावरचं भागवत, नागराजन साहेब यांचे बंगले. उजव्या हाताला शाळेचे क्रीडांगण. डाव्या हाताला सुंदरम साहेब, जे. डी. जाधव यांचे बंगले. सरळ खाली पुढे तीन-खोल्या व दोन-खोल्याच्या बैठ्या चाळी, हीच कामगार आणि ऑफिसर्स यांची मोठी वस्ती. रस्त्याच्या कडेला लावलेली गुलमोहर (राजा-राणीची) आणि बुचाची उंचच उंच झाड. शाळेजवळ याच कॉलनीच्या एका कडेला, जोशी-पोतनीस सरांच्या घरांमागे, ‘कॉलनी ऑफिस-इलेक्ट्रिक-आणि सुतारकामाचा’ विभाग होता. खाली एक छोटे मैदान, त्यात झोपाळे-जंगलजिम-आणि तिथे एक फिरते लोखंडी चाकही होते. भरपावसाळ्यात अगदी चिखलातहि इथे खेळताना मजा वाटायची. 

मोतीचंद नगर मधलं बिडकर यांच्या घरीच चालवलं जाणारं गोष्टीच्या पुस्तकाचं ग्रंथालया मुळे,  चांदोबा-किशोर-इसापनीती आणि कितीतरी छोट्या गोष्टींच्या पुस्तकांच्या वाचनातून, संघाची पद्ये यामुळे  भाषा समृद्ध होत गेली.  कथा कांदबरीचा  आणि ईतर पुस्तकाचं उत्कृष्ठ दालन असलेलं ‘नवयुग वाचनालय, हे सर्वांच्यासाठी एक पर्वणीचं ठिकाण होतं.

‘नसे राउळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हाथ तेथे हरी’ असे मानून, कामगार दुनियेतला प्रत्येक सोहळा सहकुटुंब अनुभवला जायचा. ‘कामगार-भवन’ च्या भव्य वास्तूचे भव्य उद्घाटन झाले. जेष्ठ पत्रकार श्री. जयवंत गुजर यांनी संपादित केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशनही झाल्याचे स्मरते. ‘मानवतेचे मंदिर माझे, आत लावल्या ज्ञान ज्योती, श्रमिक हो घ्या इथे विश्रांती’ हे गीत त्या कार्यक्रमात स्वागत-गीत म्हणून सादर केले होते. पण कामगारांच्या श्रमातून उभारलेल्या, याच कामगार भवनाचा हॉल हा ‘विश्रांतीसाठीचं  काय, पण चिरविश्रांती घेतलेल्या ‘एका कामगारा’च्या श्रद्धांजली सभेसाठी’ नंतर उपलब्ध होवू शकला नाही, हे देखील खेदाने नमूद करावे वाटते. 

‘सातारा-रोड’ मध्ये अगदी कशाचीच कमी नव्हती. वारकरी संप्रदायाच्या परंपरा पाडळी गावाने वर्षानुवर्षे चालवल्याच होत्या पण स्टेशनवर पारायण व्हावे, या इच्छेने जोर धरला. व्यासपीठ चालक ह. भ. प. उत्तम महाराज आदर्कीकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. तानाजी दादा यांच्या अथक प्रयत्नातून आणि हत्तीवालेशेठ पिता-पुत्र यांच्या संपूर्ण आर्थिक सहकार्यातून संपन्न झालेल्या ‘पारायण सोहळ्या’ मुळे, उरली-सुरली ही उणीवही भरून निघाली. इथेच ज्ञानेश्वरीची कितीतरी पारायणे करण्याचा भाग्ययोग लाभला.              सातारा-रोड मध्ये सुतार मिस्त्री हे भविष्य सांगण्यासाठी प्रसिद्ध होते. धर्माने मुस्लीम असलेल्या या औलीयाचा ‘रमण-शास्त्राचा’ अभ्यास होता. काही कौटुंबिक वादातून माझे चुलत आजोबा श्री. शिवरामदाजी पुणदीकर एकदा घर सोडून निघून गेले. माझ्या वडिलांच्यावर  त्यांचा खूप जीव होता. तीन-चार दिवस शोध घेतला पण ते सापडले नाहीत. भविष्य सांगणा-यावर विश्वास नसतानाही, केवळ आईच्या आग्रहाखातर आण्णा हे सुतार मास्तरांच्या कडे पोहोचले. मी बरोबर होतोच. प्रश्न विचारताच मास्तरांनी हातात यंत्र घेतले, जमिनीवर ठेवले, त्याकडे बघत काही गणित मांडले. वडिलांना उद्देशून म्हणाले “उद्या सकाळी पहिल्या गाडीने सातारला जायचे, तिथे स्टॅड वर उभ्या असलेल्या पहिल्या गाडीत बसायचे आणि त्यानंतर येणाऱ्या पहिल्या स्टेशनवर उतरा. तुमचे चुलते तुम्हाला भेटतील”. दुसऱ्या दिवशी अण्णांनी पहिल्या गाडीने सातारा गाठला. समोर सकाळी सातची पुणे-पणजी ही एसटी उभी होती, तिचा पहिला स्टॉप कराड आला, आण्णा गाडीतून खाली उतरले आणि बघतात तर समोर माझे चुलत आजोबा बाकड्यावर बसलेले दिसले’.  सुतार गुरुजींच्या भविष्यवाणीचा एक दबदबा होता.

आणखी एक असाच एक प्रसंग. एकदा आमच्या घरी, ‘सेवागिरी महाराजांचा दास’ आहे असं सांगत एक वयोवृद्ध साधू आले. अशा लोकांपासून थोडं दूरच असावं, या उद्देशान आई मला कडेवर घेवून उंबऱ्याच्या आतूनच बोलत होती. तो साधूहि आपली मर्यादा सांभाळत उंबऱ्या बाहेरच बसला. आमचा लाकडी उंबरा पाण्यामुळे झिजला होता. घर झाडून-लोटून स्वचछ केल्यावरही, जो केर चिमटीतही मावत नाही, अशा  मातीत तो उंबरा रुतला होता. खाली बसलेल्या त्या साधू महाराजांनी त्यांच्या खांद्यावरच्या भगव्या पिशवीतून, ‘सेवागिरी महाराजांचा फोटो’ बाहेर काढला. उंबऱ्यातली चिमुटभर माती आपल्या हातात घेतली आणि महाराजांच्या फोटोवर त्यांच्या पाया जवळ नेली, डोळे मिटले आणि मला म्हणाले, “बाळ, हात पुढे कर. मी हात पुढे करताच, ‘उंबऱ्यातली तीच माती, पेढ्याचे चूर्ण झाल्यासारखी’ माझ्या हातावर पडत होती. त्या अद्भुत प्रसादाची गोडी आणि तो प्रसंग मला आजही धन्य करून जातो. सातारा-रोडच्या अद्भुतरम्य जगाशी असणारं आमच  हे नातं, विज्ञाननिष्ठ अशा आजच्या या जगातही कधीच विसरता येणार नाही.

                पहाटे सहा वाजता सुरु होणारा बेदरकर सरांचा संस्कृतचा वर्ग, धीर-गंभीर आवाजात म्हंटली जाणारी सुभाषिते, काळे सरांच्या घरातून ऐकू येणारे भगवद्गीता पठणाचे स्वर, शाळेतल्या मुलांना बँड    शिकविणारे, ‘जरंडयावर उभे राहून सज्जनगडावरची घरं, आपल्या दुर्बिणीतून मोजणारे’ शिव-शाहीर पुरुशोत्तम इंगळे, त्यांचा इतिहासाच्या अभ्यासाचा दबदबा, सु. रं. काळे सरांच्या शेजारी श्री. विठ्ठल आणि शांताराम दयाळ या पिता-पुत्रांच्या तबल्यातून, दादऱ्याच्या तालावर ‘अंबरात फुलणारी ती बगळ्यांची माळ’, थोड्या अंतरावर कारवार आकाशवाणीवर गाणाऱ्या सौ. रजनी पाच्छांपुर बाईंच्या घरी सदैव फुललेली संगीताची बाग, साथीला तबल्यावर विठ्ठल-काका फाळके, पेटीवर जयराम दयाळ, सुरेश दयाळ यांनी त्यांना केलेली सुरेल सोबत…अशा कितीतरी आठवणी आज दाटून येतात. या भारलेल्या आणि मंतरलेल्या वातावरणात आम्ही मोठे झालो, हे आमचे भाग्य.

                 १९८५ च्या सुमारास या दुनियेला ग्रहण लागले. कदाचित महिंद्रा आणि महिंद्रा साठी डिझेलची जी इंजिने कूपर कंपनीत तयार व्हायची, त्याची ऑर्डर बंद झाली. ‘मालक-कामगार-युनिअन-पुढारी-नेते’ यांच्यात वाटाघाटी सुरु झाल्या. चार-पाच ऑफिसर्स-नेते मंडळी एकेका कामगाराला समोर बोलवून, कंपनीच्या अवघड होत चाललेल्या आर्थिक परिस्थितीची कल्पना द्यायचे आणि स्वेच्छा सेवानिवृत्तीचा प्रस्ताव त्याच्या समोर ठेवायचे. हतबल झालेले बिचारे कामगार एकमेकात चर्चा करायचे, पण ईलाज नव्हता. संसारावर येवू घातलेल्या या संकटाची चाहूल घरात लागलेली असायची. नदीवर धूणं-भांडी करणाऱ्या बायकांच्यातही दबक्या आवाजात, भीतीदायक स्वरात याची कुजबुज सुरु असायची. या वावटळीत शेकडो संसार उध्वस्त झाले, उजाड झाले. बाहेरगावाहून आलेले कामगार आपल्या मूळ गावी परतायचा विचार करायचे, नवा आसरा शोधायचे, मिळेल ते काम करण्यासाठी तयार असायचे. कारखान्यात ऑफिसर म्हणून काम केलेली अशीच एक व्यक्ती पुढे साताऱ्यात दत्त मंदिरा जवळ चहाचा गाडा चालविताना माझ्या वडिलांना भेटली, त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरची खिन्नता आणि जीवनाची हतबलता अजूनही डोळ्यासमोर तशीच आहे. काळाच्या ओघात भरडलेल्या संसारात एक घर आमचेही होते. माझ्या वडिलांनी स्वतः पंढरपूरला श्री. एकनाथ फाळके, या त्यांच्या मित्राच्या शेतीच्या देखभालीची जबाबदारी स्वीकारली. 

१९८६ साली आम्ही  तसा सातारा-रोडचा निरोप घेतला. जे बांधून घेता आले ते घेवून, सातारा-रोडच्या घराला कुलूप घालून निघालो. माझ्या दोन्ही बहिणी ‘सुनंदा आणि वसुंधरा आणि मी’ शिक्षणासाठी कोल्हापूरला, तर ‘मोती’ या आमच्या लाडक्या कुत्र्याला ट्रॅकटरच्या ट्रॅालीत घेवून आई-आण्णा पंढरपूरला निघाले. त्या मुक्या प्राण्याला काय कळले कुणास ठावूक? पण सातारा-रोड सोडताना आमचा ‘मोती’ रडतो आहे, हे बघून आख्खी वस्ती रडली होती.  

२६ जानेवारी आणि १५ ऑगस्ट हे सातारा-रोडसाठी विशेष दिवस. घराघरात जिलेबी आणली जाणारं, असा जणू इथला एक अलिखित नियमच होता. स्टेशनवर जागोजागी जिलेबीचे विशेष स्टॉल  लागायचे. नवरंगच्या समोरील प्रशस्त मैदानात होत असलेला ध्वजारोहणाचा कार्यक्रम. फक्कीने आखून घेतलेली परेडची सीमारेषा. ध्वजारोहणा बरोबर सुरु होणारी ‘झंडा उंचा रहे हमारा….जन-गण-मन’ ही  राष्ट्रगीते, बेदरकर सरांच्या पेटीतून बाहेर पडणारे गोड स्वर, धीरगंभीर आणि उल्हासपूर्ण वातावरणात पार पडणारा तो कार्यक्रम. परेडसाठी आखलेल्या फक्कीच्या आत, कवायती सादर करणारे आम्ही विद्यार्थी. लेझीम आणि घुंगुरकाठ्यांचे तालबद्ध मंजुळ आवाज. मागे सुरु असणारा बँड. गुरख्यांचे तालबद्ध असे अप्रतिम संचलन. त्यानंतर सुरु होणारा बक्षीस समारंभ. पुढे  महाविद्यालयीन जीवनात १९९१ साली मला दिल्लीच्या २६ जानेवारीच्या परेड मध्ये भाग घेण्याचं भाग्य लाभलं. देशातील सर्वोत्कृष्ठ स्वयंसेवक म्हणून तत्कालीन पंतप्रधान श्री. चंद्रशेखर आणि राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग, उपराष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते सत्कारही झाले, पण तरीही सातारा-रोडच्या परेडची नशा काही औरच होती, हेच खरे. त्यामुळे सातारा-रोड सोडल्या नंतरही जरी कुठेही झेंडा वंदनाला गेलो, तरी  केवळ मीच काय आपणा पैकी प्रत्येकजण मनानं मात्र नवरंग समोरच्या ग्राउंडवरच उभा असतो, हेच खरं.

या कार्यक्रमात सर्वात शेवटी असायचा तो निवृत्त-कामगारांचा निरोप समारंभ. निवृत्त होणाऱ्या कामगाराचं नाव पुकारताच, तो कामगार पुढं यायचा. धोतर-नेहरू शर्ट, डोक्याला फेटा किंवा गांधी टोपी घातलेला तो कामगार, त्याचं नाव, गाव, कंपनीच्या कोणत्या विभागात त्याने किती वर्षे सेवा केली, त्याचा अत्यंत कृतज्ञतेने केलेला उल्लेख आणि नंतर मॅनेजर साहेबांच्या हस्ते त्याचा केला जाणारा सन्मान. निवृत्तीच्या सत्कारा निमित्त, त्याच्या हाती यायचा तो अत्यंत उच्च प्रतीच्या स्टीलच्या ताटांचा-तांब्यांचा सेट, पूर्ण पोशाख, पत्नीसाठी साडी, शाल-श्रीफळ-भविष्य निर्वाह निधीचा धनादेश. या हि पेक्षा विशेष असं की, ‘आपल्या आजोबांनी घरी येताना आपल्यासाठी काय आणलंय?’ त्याची उत्सुकतेने वाट पाहणाऱ्या नातवंडांसाठी ‘रावळगावच्या चॉकलेटस’नी भरलेला डबा. म्हातारपणात सवंगड्यांच्या सोबत खेळण्यासाठी दिलेले, ‘पत्त्याचे दोन कॅटही’ त्यातच असायचे. हे सगळे गुलाबी रंगाच्या कागदात व्यवस्थित गुंडाळलेले. हा निरोप घेताना, प्रत्येक कामगार अवघडून जायचा. समोर बसलेले आम्ही मात्र, वेड्या सारखे “आमचे वडील कधी निवृत्त होणार आणि मग आमच्या घरात हा सत्कार-सन्मान कधी येणार?” त्याची भाबडेपणाने वाट बघत असायचो. आमच्या मनीची ती निष्पापता आम्ही अजूनही अनुभवतो. मनोमन सातारा-रोड आठवतो. 

 सातारा-रोडशी असलेल्या आमच्या या नात्याची केमिस्ट्री भविष्यातील पिढ्यांना  कळणं अवघड आहे. जन्मभूमी, कर्मभूमी, बालवयातील क्रीडाभूमी, रम्य-नगरी याही पेक्षा सातारा-रोड ही एक ‘संस्कारभूमी’ म्हणून आम्हाला भावते. इथल्या वास्तव्याच्या आठवणीने आजही कंठ दाटून येतो. ‘भूतकाळात रमणं’ हि माणसाची ‘मानसिक गरज’ असते पण आमच्यासाठी ती, ‘यापेक्षा कितीतरी अधिक वेगळी आणि ‘संपूच नये’ असं वाटणारी एक ‘आवश्यकता’ आहे. 

सातारा-रोडच्या त्या दुनियेपासून आज खूप दूर, व्यवधानांच्या कुशीत, आयुष्याचा मार्ग आक्रमित असताना, ‘सातारा-रोड हे एक शक्तीपीठ’ होवून डोळ्यासमोर येतं. पुन्हा एकदा मन हे ज्या दिशेने आलो त्या घाटमाथ्याकड मार्गस्थ होतं. हातातल्या ओंजळीतून निसटणारं पाणी ‘अर्ध्यदान’ होवून पश्चिम क्षितिजावरच्या सूर्यनारायणा जवळ जावून पोहोचत. अनंत आठवणींच्या महासागरानं, स्वतःच्या कुशीत जन्माला घातलेले स्मृतींचे असंख्य ढग आमच्या वर्तमानाच्या अवकाशात दाटून येतात. पापण्यांच्या कडा ओलावतात. आता निरोप घेताना डावीकडे निश्चल उभा असतो तो जरंडेश्वर आणि पाठीमागे उभा नांदगिरी, त्यामध्ये स्थिर झालेला, ‘सातारा-रोड’ नावाचा एक ‘भगवंत,’ केवळ आमच्यासाठी उभा असतो. त्या निर्गुण-निराकार-सगुण-साकार आणि अव्यक्त ब्रह्माच्या रूपाचे दर्शन घेताना, त्याच्या पुढे भक्तिभावाने नतमस्तक होताना दोन्ही हात आपोआपच कधी जोडले जातात, ते कळतही नाही. 

डॉ. विवेकानंद अर्जुनराव रणखांबे,

Associate Professor, Bharati Vidyapeeth, Pune 

9850558404, vivekrankhambe@gmail.com     

11 thoughts on “‘सातारा-रोड: एक अर्ध्यदान’”

  1. तानाजीराव काशिनाथ माने.

    सातारारोड चं यथार्थ वर्णन मी जरी डॉ.विवेकानंद यांच्या पेक्षा वयानं लहान असलो तरी विवेक सरांना आहो जावो करत नाही कारण विवेक दादाचं व माझं नातं हे सातारारोड मधल्या निसर्गरम्य व संस्कारक्षम भुमीत रुजलेलं आहे.आम्ही एका आईच्या पोटि जरी जन्मघेतला नसला तरी आम्हि सहोदर आहोत अशी शिकवण आम्ही आण्णांच्या सहज आचरणातुन शिकलोय.कोण कुठले आण्णा रणखांबे पण सातारारोड च्या या पांढरीत आम्ही लहानाचे मोठे झालो.विवेकदादानं कर्मभुमि म्हणून जरी पुणं निवडलंतरी त्याची जन्मभुमीसंदर्भातली ओढ व आपुलकी लंका विजया नंतर झालेल्या प्रभुश्रीरामांसारखीच आहे.
    “जननी जन्मभुमीश्च स्वर्गात दपीगरी अशी”

    1. virbhadra doddamani

      It is a heart touching, can’t stop drops of tears old memories of satara road with us, forever.

  2. Bhagyashri Kakade

    Amazing
    सर्व सर्व डोळ्यापुढे उभं राहिलं
    आणि आसवांच्या धारा कधी वहायला लागल्या कळंलंच नाही विवेक.

  3. अनिता गिंडे पाटकर

    विवेक, अरे काय बोलू? 1984 ला जशी कूपर co हळू हळू उतरणीला लागली तसे आम्हाला सतारारोड नाईलाजाने सोडावं लागलं…10 मे 1984 तो दिवस मी कधीही विसरणार नाही ….सतारारोड सोडल तर अजून दुसऱ्या कुठल्या जागेत आपल्याला गुजराण करावा लागेल हे कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं…पण अशा पद्धतीने आमचं सातारारोड माग पडलं…हळू हळू बऱ्याच गोष्टी विस्मृतीत गेल्या….पण आज तुझ्यामुळे ती इतक्या वर्षांची साठलेली धूळ झटकली गेली आणि सतारारोड लख्ख डोळ्यासमोर साकार झालं.…खूप खूप धन्यवाद🙏👍

  4. Shriram S. Patil

    खूप छान पद्धतीने आठवणींना उजाळा देऊन तत्कालीन सातारारोड ची श्रीमंती मांडली आहे. सातारारोड कर ला या आठवणी परत परत मनाला उभारी देत राहतात. प्राध्यापक विवेक रणखांबे धन्यवाद.

  5. Kishore Dhadame

    Hi
    Dr. Vivek Rankhambe
    Sampurna balpan jase hote te pudhe
    rahile
    Thanks for the this lovely recall of sweet memories .
    Tu kelele Cooper school madhe office che var library samor kelele Lokmanya Tilkache bhashan- aajun aathavate. Tu khup phude Janar ase tya veles janavale hote..

  6. Bajrang Bhausaheb Gaikwad

    Your article on our village Satara-Road is very nice, very interesting. I enjoyed it.This took me to flashback of my childhood days……..looking forward for more such articles

  7. Bajrang Bhausaheb Gaikwad

    Your article on our village Satara-Road is very nice and interesting, I enjoyed it. This took me to flashback of my old days. Looking forward for more such articles…….

  8. विवेक,

    लेखक जेव्हा वाचकांच्या मनातलं लिहितो त्या वेळेला तो भावतो.. आपण जगलेल खेड्यातील समग्र जीवन तू रेखाटल आहेस.. खऱ्या अर्थाने आठवणीच्या डोहात डुंबला आहेस.. खऱ्या अर्थानं तू साताररोड जगला आहेस.. सातारारोड संस्कार भूमी .. सातारा रोड च्या मातीशी जोडलेली घट्ट नाळ गावाविषयी इतकं भरभरून लिहिण्यास कारणीभूत आहे.. दिलेलं “अर्ध्यदान” शीर्षक अगदी समर्पक ! मला वाटतं तू तिथला कायमचा साताररोडकर व्हावंसं.

    मी तुझ्या पीएचडी व्हायवास हजर होतो. बबलू ने तयार केलेले स्वयं:स्पष्ट प्रेझेंटेशन श्रवले होते. वाई तालुक्यातील माझे गावदेखील एक खेडे.. येथे देखील माणसांना त्यांचे नाव व त्यांच्या वडिलांचे नाव याने ओळखले जाई.. उदाहरणार्थ गेणू-हरी, बापू-मारुती, कृष्णा-सतू, कोंडी-कृष्णा, येशू-केसू… अरे, तेव्हा वर्षाकाठीचा शाळेचा गणवेश म्हणजेच आपली कपडे ! रंगीत कपडे आपल्यासाठी लग्जरी गोष्ट ! फूटपाथ … मन्या … हे माझ्यासाठी नवीन ! “अण्णांनी लिहून दिलेल्या भाषणाला केवळ सादर करण्यात बाकी असायचे…” व्वा… म्हणजे तुझं वक्तृत्व ही अण्णांची देणं आहे तर.. सुतार गुरुजींनी कमाल केली राव … माझी पण श्रद्धा आहे….

    कूपर ने हळूहळू नोकर कपात केली आणि तुमच्या कुटुंबाची झालेली अवस्था … इथून पुढे वाचताना मात्र अंगावर काटा येतो.. कदाचित आपल्या नशीबाची परीक्षा असेल.. खरच तुम्ही सर्वजण नशीबवान आहात… मावशी-अण्णांच्या पोटी तुझा जन्म म्हणजे माझ्या मनात क्षणार्धात हे वाक्य येते.. “अशीच अमुची आई असती सुंदर रूपवती आम्हीही सुंदर झालो असतो” वदले छत्रपती !

    व्वा किती गोड शेवट.. आपल्या ज्ञानाने, अनुभवाने, भाषेवर खूपच प्रभुत्व मिळवले आहे. लिखाणास आवश्यक साज चढवण्याची तुझी कला लाजवाब.

    तुझ्या स्मृतिस आणि लेखणीस सलाम !

    – डॉ केशव राजपुरे

  9. Prathamesh Phalke

    You wrote a very wonderful article on our village and helped us to know such amazing things about Satara-road. Thank you very much Sir😊

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *