शिवाजी विद्यापीठ ‘A++’: गुणवत्तेची गरुड भरारी!

(सर्व वाचकांना नम्र विनंती: सन १९८८ ते २००४ या काळात (FYBA to Ph. D) मी शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी होतो. विद्यापीठा विषयी वाटणाऱ्या कृतज्ञतेपोटी; भूतकाळ जसा समोर आला, तसा लिहित गेलो आहे. हा लेख त्या कालखंडाला जागवणारा आहे, परंतु त्या पूर्वीच्या आणि नंतरच्या काळाशी निगडित असलेले, इतर विद्याशाखांचे विद्यार्थी-प्राध्यापक, संस्था-महाविद्यालये; त्यांच्याशी सम्बंधित घटक; माझ्या अनुभवाची मर्यादा आणि संदर्भाच्या काही उणीवा असतील, तर त्या ते समजुन घेतील, हीच अपेक्षा: लेखक)

मराठी भाषेला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळवून देणाऱ्या वि. स. खांडेकरांनी, कुसुमाग्रजांच्या ‘विशाखा’ या ‘ज्ञानपीठ’ विजेत्या काव्यसंग्रहाची प्रस्तावना म्हणून जे वाक्य लिहिलं आहे, त्याचे स्मरण व्हावे, असा हा क्षण… खांडेकर लिहितात, “रत्नहाराचं तेजस्वी सौन्दर्य कुणाला समजावून सांगावं लागत नाही, डोळ्यांना ते आपोआपच जाणवतं. रातराणीच्या सुगंधाची कुणी चर्चा करीत बसत नाही, वाऱ्याच्या झुळकेबरोबर आला की मन कसं प्रसन्न होतं, लहान मुलाच्या नाजुक पाप्याची अवीट गोडी समजण्यासाठी काही पुस्तकी पांडित्याची आवश्यकता नाही.” अगदी त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाला नॅक मानांकनाची ‘A++’ ही श्रेणी मिळाल्यामुळे आम्हाला झालेला आनंद आम्हीही शब्दांत व्यक्त करू शकत नाही.

पंचगंगेच्या तीरावर वसलेली ताराराणीची शाहू नगरी; ‘कोल्हापुर’! दक्षिणकाशी म्हणून प्रसिद्धी पावलेल्या या कोल्हापूरात प्रवेश करताच समोर उभा ठाकतो, तो ‘रणरागिणी-ताराराणीचा’ भव्य अश्वारुढ पुतळा. तर पश्चिमेकडे कोल्हापूरकरांच्या विस्तीर्ण अंत:करणाची साक्ष देणारा रंकाळा तलाव, पंचगंगेच्या दक्षिण तीरावर विसावलेला उत्तरेश्वर, शालिनतेची, सर्वधर्मसमभावाची,  स्वाभिमानाची शाल पांघरलेली शिवाजी पेठ, आई भवानीचा जागर मांडणारा भवानी मंडप, करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर, कायम गजबजलेले महाद्वार-कपिलतीर्थ, उत्तरेकडे ऐतिहासिक पन्हाळा-जोतिबा, गंगावेश, शाही रुबाब मिरवणारा दसरा चौक, आंतरराष्ट्रीय मल्लांनाही खुणावणारं खासबाग मैदान, व्ही. शांताराम, भालजी पेंढारकर, चंद्रकांत-सूर्यकांत मांढरे या नावांशी नातं सांगणार कलाविश्व, शालिनी आणि जयप्रभा स्टूडिओ, कलावंतांची काशी असलेलं केशवराव भोसले नाट्यगृह, आधुनिकतेला सामावून घेतानाही आपल्या पारंपरिक कौशल्याला जपणारं उद्यमनगर,  रस्त्याने आपल्याच रुबाबात चालत कट्ट्यावर निघालेल्या लांबच लांब शिंगाच्या म्हैशी, चोवीस तास धारोष्ण दुधाचा अभिषेक करणारी आणि मायेची ऊब देणारी कोल्हापूरची संस्कृती, देशाच्या कानाकोपऱ्यातील मल्लांना आईच्या मायेनं सांभाळणाऱ्या तालमी, कोल्हापूरच्या सौंदर्याचा मुकुटमणि न्यू पॅलेस, कलामहर्षी बाबुराव पेंटर, आबालाल रेहमान यांच्या पाऊलखुणा जपणारी ही भूमी, लहरी हैदर, पिराजीराव, पठ्ठे बापुराव आणि अगदी परवा निवर्तलेल्या शाहीर कुन्तिनाथ करके यांच्या डफाची थाप जिथे आजही ऐकू येते, त्या कोल्हापूरच्या इतिहासात, शिवाजी विद्यापीठाच्या या यशाच्या  निमित्ताने ‘शिक्षण क्षेत्रातही एक ऐतिहासिक दिवस उजाडला.

प्रात:स्मरणीय शिवशककर्त्या छत्रपती शिवरायांचे नाव धारण केलेल्या शिवाजी विद्यापीठाला, राष्ट्रीय स्तरावर भूषणावह ठरावे, असे A++  मानांकन मिळाले. अशा वेळी परिवर्तनाची वाट चालणारे, विचारवंतांच्या आणि स्वाभिमानी देशभक्तांच्या वारसदारांचे विद्यापीठ म्हणून एका नव्या परिप्रेक्ष्यातून ‘शिवाजी विद्यापीठ’ समजून घ्यावे लागेल. कोल्हापूरच्याच मातीत जन्मलेले कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि जगातील दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत सन्मानाने स्थान मिळविणारे प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि कुलसचिव डॉ. व्ही. डी. नांदवडेकर यांच्या नेतृत्वाखाली, विद्यापीठात कार्यरत असलेल्या प्राध्यापक आणि प्रशासकीय सेवकवर्गाच्या संघ-शक्तीचा एक तेजस्वी अविष्कार म्हणून विद्यापीठाला मिळालेल्या या मानांकनाकडे बघावे लागेल. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी त्यांच्या लेखात लिहिल्याप्रमाणे स्थापनेनंतर ‘आणखी एक खानावळ’ म्हणून निर्भर्त्सना झालेल्या या विद्यापीठाने, टीका करणाऱ्या या वृत्तीला, काळाच्या ओघात आपल्या आत्मतेजाची ताकत दाखवून एका अर्थाने शाश्वत उत्तरच दिले आहे.

यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांसारख्या सक्षम आणि लोकाभिमुख कार्य करणाऱ्या नेत्यांच्या द्रष्टेपणातून १९६२ साली स्थापन झालेल्या या विद्यापीठाची मुहूर्तमेढ डॉ. आप्पासाहेब पवार या तितक्याच द्रष्ट्या कुलगुरूंनी रोवली. डॉ. आप्पासाहेब पवार यांनी त्या काळात जे पायाभूत काम केले, त्यामुळेच त्यांच्या नावाचे ‘गारुड’ आजही या विद्यापीठाशी निगडित असलेल्या प्रत्येकाच्या मनावर स्वार आहे. देशाचे तत्कालीन राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत पार पडलेला विद्यापीठाच्या उद्घाटनाचा भव्य समारंभ, यशवंतराव चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडलेला पहिला पदवी प्रदान समारंभ, अशा कितीतरी आठवणी सांगणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या पिढ्या त्या कालखंडाबद्दल भरभरून बोलत राहतात. 

‘ज्ञानमेवामृतम’ हे शिवाजी विद्यापीठाचं बोधवाक्य. या लेखाच्या निमित्ताने प्रा. राम पवार सर यांनी डॉ. द. ना. धनागरे सर  यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत त्या बोधवाक्या सम्बंधिची एक आठवण सांगितली. बहुधा तो विद्यापीठाचा पायाभरणी किंवा पहिला पदवीदान समारंभ असावा. त्या समारंभात महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री नामदार श्री. यशवंतराव चव्हाण साहेब यांनी आपल्या भाषणात त्यानी सांगितलली ही कथा. देव आणि दैत्यानी समुद्र मंथन करून अमृताचा कलश बाहेर काढला. त्यानंतर तोच अमृताचा कलश मिळविण्यासाठी देव आणि दानवांचं युद्धही झाल्याची कथा आहे. सरते शेवटी, घनघोर अशा या युद्धात अमृताचा तो कलश कुठे तरी सांडून गेला. तो कुणाच्याच हाती लागला नाही. तेच ‘अमृत’ आज कलियुगात ‘ज्ञान’  रूपात उपलब्ध आहे. त्याच्या प्राप्तिसाठी विद्यार्थ्याच्या भावी पिढ्यानी कष्ट घ्यावेत; अभ्यास करावा, ही खूणगाठ विद्यार्थ्यानी मनी बांधावी, म्हणून या विद्यापीठाचे बोधवाक्य हे ‘ज्ञानमेवामृतम’, असे निश्चित करण्यात आले आहे.

विद्यापी ‘डॉ. आप्पासाहेब पवार कमवा आणि शिका’ योजनेतून पुढे आलेल्या, शिक्षणासाठी कोल्हापूरला यायलाही ज्यांच्याजवळ पैसे नव्हते, कधी अक्षरशः पायी तर कधी गावातल्या स्वातंत्र्यसैनिकासोबत; सवलतीचा पास दाखवत प्रवास करून शिक्षण घेतलेल्या पिढ्यांच्या डोळ्यांत आज विद्यापीठाच्या या यशाने आनंदाश्रू उभे केले, यात कोणतीही अतिशयोक्ती नाही. विद्यापीठाच्या या यशाने आम्हा सर्व माजी विद्यार्थ्यांचे वयाचे, प्रतिष्ठेचे, विद्वत्तेचे सारे आविर्भाव गळून पडले आणि या पिढ्यांचे डोळे आनंदाने वाहून गेले.

वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, यशवंतराव मोहिते यांच्या सहकार्याच्या आणि इच्छाशक्तीच्या सावलीत उभे राहिलेले हे विद्यापीठ. शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक आणि चित्रा नाईक यांनी मौनी विद्यापीठाच्या, तर श्री. व्ही. टी. पाटील यांनी महिलांच्या उत्थापनासाठी ताराराणी विद्यापीठाच्या माध्यमातून याच भूमीत काही प्रयोग केले. पश्चिमेकडून वहात येणाऱ्या पंचगंगेच्या प्रवाहांनी समृद्ध केलेली कोल्हापूरची भूमी, कृष्णा आणि कोयनेच्या तीरावर पसरलेला सातारा-सांगली आणि चंद्रभागेच्या उभयतीरावर विसावलेली देवभूमी पंढरपूर-सोलापूर, हे या विद्यापीठाचे अनेक वर्षे कार्यक्षेत्र होते. जरी अलीकडे सोलापूरला स्वतंत्र विद्यापीठ झाले; परन्तु शिवाजी विद्यापीठाच्या या देदीप्यमान यशामुळे या इतिहासाशी नाते सांगणाऱ्या लाखो अंतःकरणे शब्दातीत आनंदाने भरून जावीत, असा हा धन्यतेचा क्षण!

राजारामपुरीतून आपण पूर्वेकडे जातो, तेव्हा तिथे आपल्या ‘मुलांना विद्यापीठाची दिशा दाखविणाऱ्या बाईचा’ (खरे तर आईचा) पुतळा लागतो आणि पूर्वेकडे दिसते ते पंढरीच्या पांडुरंगासारखे आपल्या कुशीत येणाऱ्या मुलाबाळांचे मायबाप होत, उंच सागरमाळावर विसावलेलं शिवाजी विद्यापीठ! आपल्या नजरेत सामावणाऱ्या उभ्या पश्चिम महाराष्ट्राचं पालकत्व स्वीकारणारं, अर्धशतकाहूनही अधिक काळ घडलेल्या इथल्या परिवर्तन प्रवासाचे कृतीशील साक्षीदार शिवाजी विद्यापीठ. या मातीतल्या ग्रामीण गुणवत्तेचे; मार्गदर्शक-पालक विद्यापीठ म्हणजे ‘शिवाजी विद्यापीठ’. इथला एक एक विद्यार्थी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, विचारवंत केवळ तत्त्वज्ञानाचा बोलका सुधारक न राहता आयुष्याच्या वाटेवर एक कर्ता-सुधारक झाला. जीवनाच्या वाटेवर मातृसंस्थेने बिंबविलेल्या तत्त्व-मूल्यांपासून तसूभरही ढळला नाही, यातच या विद्यापीठाच्या यशाचे खरे गमक आहे. 

विद्यापीठाला A++ मानाकन मिळाल्याची बातमी समजली, तशी डोळ्यासमोर उभी राहिली ती विद्यापीठाची देखणी इमारत. तिच्यासमोरील छत्रपती शिवरायांचा अश्वारुढ पुतळा, सभोवतालची देखणी बाग. प्रत्येकाच्या मोबाईलच्या स्टेटसमध्ये ती दिसू लागली. दिसू लागल्या त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या विविध विभागांच्या इमारती, होस्टेल्स. हवेशीर जागा मिळावी म्हणून प्रवेशासाठी आम्ही जिच्या दारात पहाटेपासून उभे असायचो; ती ‘विमान बिल्डिंग’, भव्य स्पोर्टस काम्प्लेक्स, ज्या मातीत अनेक ‘शिवछत्रपति पुरस्कार विजेते’ घडले; ते भव्य क्रीडांगण, बॅ. खर्डेकर ग्रंथालय, विद्यापीठाची प्रेस, दवाखाना, कंझ्युमर स्टोअर्स, जुने-नवे गेस्ट हाऊस, कुलगुरूं-प्रकुलगुरू-कुलसचिव निवास… असे सारे सारे विश्व डोळ्यांसमोर तरळून गेले.

विस्तीर्ण अशा या  विद्यापीठाच्या परिसरात झाडाच्या सावलीत जात पंचायतिन्च्या सभा झालेल्या आम्ही पाहिल्या आहेत. अशिक्षित भटक्या-विमुक्क्त जाती-जमातिंच्या त्या सभा अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने होताना आम्ही खुप अंतरावरून पाहिल्या आहेत. कालाच्या ओघात नंतर त्या बंद झाल्या. विद्यापीठ परिसरात दूर अंतरा पर्यंत कुणीच नसायचे, त्यामुले या सभात होणारे वाद-विवाद, निवाडे सम्बंधित जमातीतील लोकांशिवाय कुणालाच कलायचे नाहित. आम्हा विद्यार्थ्याना या सभांचे मोठे कुतुहलही होते. या सभां विषयी अशीही वदंता होती, की ‘इथल्या बैठकात अपराध्याला अगदी मृत्युदंडाचीही शिक्षा दिली जायची; आणि अत्यंत गोपनीय रित्या बेमालूमपणे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणीही केली जाते. शिवाजी विद्यापीठाच्या स्थापने आधी पासून या पंचायती इथल्या झाडांखाली भरायच्या.  

कर्मवीर भाऊराव यांच्या खांद्यावर बसण्याचे भाग्य लाभलेले गुणवंत असे बॅ. पी. जी. पाटील, नामवंत वक्ते, प्रशासक म्हणून गौरव लाभलेले डॉ. के. भोगिशियन, शिवाजी पेठेतील न्यू कॉलेजचे पहिले प्राचार्य डॉ. रा. कृ. कणबरकर, डॉ. के.बी. पवार, डॉ. ए. टी. वरुटे, जागतिक कीर्तीचे समाजशास्त्रज्ञ डॉ. द. ना. धनागरे, देशातील विविध विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविणारे डॉ. माणिकराव साळुंखे, डॉ. एम्. जी. ताकवले, डॉ. एन. जे. पवार व डॉ. डी. बी. शिंदे यांनी आपापल्या कुलगुरूपदाच्या कारकिर्दीत विद्यापीठाच्या प्रगतीचा वारू निश्चितच पुढे नेला. कुलसचिव म्हणून काम केलेल्या डॉ. उषा इथापे, डॉ. बी. पी. साबळे यांनी प्रशासनाची उत्तम घडी घालून दिली. गुणवत्तेच्या या दीर्घ परंपरेचा विजय म्हणूनही विद्यापीठाच्या या यशाकडे पाहावे लागेल.

काळाच्या त्या त्या टप्प्यावर विद्यापीठाला, विविध विभागांना प्रगल्भ नेतृत्व लाभले. रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, पदार्थविज्ञान शास्त्र, गणित आणि संख्याशास्त्र, भूगोल, राज्यशास्त्र, हिंदी, इतिहास, मराठी, इंग्रजी, वृत्तपत्रविद्या, शिक्षणशास्त्र, बहि:शाल शिक्षण, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वनस्पतीशास्त्र, अलीकडच्या काळात भूषण ठरलेला ‘दूरशिक्षण विभाग’, नाट्य व ललितकला विभाग आदी सर्वच विभागांनी विद्यापीठाच्या गौरवशाली इतिहासात मोलाची भर घातली.

समाजाच्या भल्यासाठी काम केलेल्या, लोकशाहीचा आणि कर्तव्यनिष्ठेचा झेंडा घेतलेल्या प्राध्यापक आणि सेवक संघटनानी देखील वैचारिक संघर्षाच्या क्षणी, विद्यापीठाच्या इतिहासात, परिपक्वतेचे दर्शन घडविले. त्यामुळेच विद्यार्थीहित केंद्रस्थानी मानून काम करणारे विद्यापीठ म्हणून शिवाजी विद्यापीठाचा लौकिक झाला. यातून एक सामाजिक मन तयार होत गेले. ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्याला इथे संधीचे अवकाश मिळू लागले. गुणवत्तेच्या आधारे इथे संधी मिळते, याचा विद्यार्थ्यांच्या मनी विश्वास जागा झाला. खेडोपाड्यात शिकणाऱ्या गुणवंत मुलांनी शाहूंच्या या भूमीत शिक्षण घेणे, हे घराला-गावाला आणि पंचक्रोशीला भूषण वाटू लागले. विद्यापीठाच्या स्थापनेनंतर जवळपास चाळीस वर्षे, महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या एस.टी.च्या ड्रायव्हर्स आणि कंडक्टर्सनी; गावागावातून कोल्हापूरला शिकायला आलेल्या याच विद्यार्थ्यांचे डबे कोल्हापूरला वाहून आणले. ‘त्या डब्यांतील थंडगार झालेला घास प्रसंगी पाण्यासोबत गिळून’ या विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या पिढ्या मोठ्या झालेल्या आहेत. कर्मवीरांच्या ‘कमवा आणि शिका’ योजनेला विद्यापीठ स्तरावर प्रभावशाली पद्धतीने राबविणारे शिवाजी विद्यापीठ देशातील पहिले आहे. श्रमाशी आणि कष्टाशी असलेले या पिढ्यांचे नाते त्यांना नेहमीच भूषणावह वाटत आले आहे. विद्यापीठात शिक्षण घेत असतानाच्या या आठवणी आजही त्यांच्या डोळ्यांच्या कडा सहजपणे ओलावून टाकतात.   

 अशाच मातीतल्या कसदार माणसांपैकी कितीतरी गुणवंतांनी पुढे शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र आणि देशातील इतर विद्यापीठांचेही नेतृत्व केले. डॉ. पतंगराव कदम यांच्यावर कर्मवीरांचा मोठा प्रभाव. प्रि-डिग्रीला शिवाजी कॉलेजचे विद्यार्थी असताना आणि आपल्या गाव पांढरीतले विद्यापीठ म्हणून त्यांना शिवाजी विद्यापीठाविषयी आपुलकी होती, आंतरिक जिव्हाळा होता. विद्यापीठ अनुदान आयोग आणि एआयसीटीईसारख्या राष्ट्रीय संस्थांचे सदस्यपद भूषविलेले कुलपती डॉ. शिवाजीराव कदम हे देखील याच शिवाजी विद्यापीठात शिकले. चार आणे वाचवण्यासाठी प्रसंगी मैलोनमैल चालत शिक्षण पूर्ण केलेल्या या माणसांनी पुढे भारती विद्यापीठाच्या माध्यमातून, आयुष्यभर माणसांच्याच चालत्या बोलत्या गुढ्या उभ्या केल्या, हजारो संसार उभे केले.  या संदर्भात भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह प्राचार्य डॉ. के. डी. जाधव सर यांची आठवण मोठी बोलकी आहे. अगदी सुरवातीच्या काळात विद्यापीठाचा निकाल वर्तमानपत्रातून यायचा. शेवटच्या गाडीने ते कोल्हापूरला पोहोचायचे. सगळी रात्र स्टँडवरच झोपून काढायचे. सकाळी आलेल्या वर्तमानपत्रात ‘विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेली बातमी’ तिथेच, स्टँडवरच मिळायची. विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत आलेल्या याच विद्यार्थ्यांची गावातून बैलगाडीतून मिरवणूक निघायची, सत्कार व्हायचे. त्या साऱ्या पिढ्यांसाठी हे मानांकन महत्त्वाचे आहे.

डॉ. अरुण अडसूळ नावाचा एक गुणवंत विद्यार्थी बार्शीला मामासाहेब जगदाळे कॉलेजमध्ये शिकला. शिवाजी विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या काळात त्यांनी शिवाजी विद्यापीठातून एम.एस्सी. केलं; आणि पुढे पुणे विद्यापीठाचे कुलगुरूपद आणि ‘एमपीएससी’चं सदस्यपदही भूषविले. पाटण तालुक्यातल्या साईंकडे-तळमावल्यासारख्या ग्रामीण भागातून पुढे येत प्राचार्य डॉ. के. आर. यादव शिवाजी विद्यापीठाचे प्रथम प्र-कुलगुरू झाले, विद्यापीठाच्या सामर्थ्याची प्रतीकं असलेली गुणवंतांची अशी कितीतरी उदाहरणे देता येतील. कितीतरी ज्ञात-अज्ञात अशा कितीतरी विद्यार्थ्याच्या यशाचा हा एक प्रातिनिधिक परिचय म्हणावा लागेल.  

माता लक्ष्मीबाईंच्या आणि कर्मवीरांच्या ‘रयत शिक्षण संस्थे’चा स्वावलंबनाचा, बापूजींच्या ‘विवेकानंद शिक्षण संस्थेचा सुसंस्काराचा, समाज-परिवर्तनाचा आणि दोन्ही हातांनी समाजाला भरभरून परत करण्याचा संस्कार लाभलेल्या या संस्थांचा आदर्श समोर ठेवत, जिल्हा आणि तालुका स्तरावर, स्थानिक पातळीवर गुणवत्तेचा हाच पोत शिवाजी विद्यापीठ क्षेत्रात इतर संस्था आणि संस्थापकांनीही पोसला. तत्वं-मूल्यं आणि संस्कारांना उरीशिरी धरणाऱ्या शिक्षकांच्या पिढ्यांनी विद्यार्थ्यांच्या पिढ्यांचं वैचारिक भरणपोषण केलं. यामुळेच इथली मुलं शिकू शकली. स्वावलंबी शिक्षणातुन आपले शिक्षण पूर्ण करणारे विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव डॉ. अशोक करांडे भविष्यात इंग्रजीचे नामवंत प्राध्यापक, प्राचार्य झाले. वाई तालुक्यातील अनपटवाडीसारख्या छोट्या खेड्यात कंदिलाच्या उजेडात शिकलेला रयतच्या लोणंद कॉलेजचा विद्यार्थी डॉ. केशव राजपुरे आज जगातील दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळवित विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान शास्त्र विभागाचा प्रमुख झाला. अगदी अलीकडच्या काळातील ही प्रातिनिधिक उदाहरणे आहे. विद्यापीठात शिक्षण घेतलेल्या अनेकांची ही कथा आहे. त्यामुळेच आज जगातील दोन टक्के शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळविणारे तब्बल ८ प्राध्यापक या विद्यापीठात कार्यरत आहेत, हे यश अभूतपूर्व आहे.

विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभाला येणारे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाहुणे, भव्य सभामंडप, विणेच्या तारा छेडत डॉ. भारती वैशम्पायन यांच्या प्रसन्न आवाजात सादर होणारे पसायदान, आचारसंहितेचे तंतोतंत पालन करीत गांभीर्यपूर्वक  पार पडणारा समारंभ, प्रमुख पाहुण्यांच्या भाषणात काही नवे शब्द शिकायला मिळतात का? ते प्रेक्षकात बसून पाहणारे माजी कुलगुरु बॅ. पी. जी. पाटील सर, नवपदवीधर स्नातकांनी फुललेला विद्यापीठाचा परिसर, ठिकठिकाणाहून आलेले पालक, मान्यवर, विद्यार्थ्यांना दिली जाणारी शपथ अशा सर्वार्थाने सजलेल्या पदवीप्रदान समारंभाचे नेटके आयोजन… अशा कितीतरी आठवणी आज या प्रसंगी आल्याखेरीज राहत नाही.

विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांत कार्यरत असणाऱ्या, परिवर्तन चळवळीत मोलाची भर घालणाऱ्या कितीतरी शैक्षणिक, सामाजिक संस्था आणि प्रबोधानाचे काम करणाऱ्या संघटना यांनी या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे घडवलं. यामुळेच तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, प्रा. डॉ. एन. डी. पाटील, आचार्य शांताराम गरुड, नागनाथआण्णा नायकवडी, कॉ. गोविंदराव पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोळकर, प्रा. संभाजीराव जाधव, डॉ. बाबुराव गुरव, प्रा. राम पवार, विद्यापीठ सेवक संघाचे श्री. व्ही.आर. पाटील, श्री. बाबा सावंत अशा कितीतरी कर्यकर्त्यांच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष योगदानाच्या आठवणीचा आणि जागराचा हा क्षण! त्या आठवणींशिवाय हे यश साजरे करता येणार नाही.

प्राचार्य सौ. सुमतीबाई पाटील यांच्यासारख्या प्राचार्यांच्या पिढयांचा विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर शाश्वत प्रभाव होता. वि.स. खांडेकर यांच्यासारख्या भाषाप्रभूच्या आशिर्वादाने पुलकित झालेल्या विद्यार्थ्यांच्या पिढ्यांना, तत्कालीन इंग्रजी विभागप्रमुख डॉ. एस. के. देसाई, डॉ. चंद्रशेखर जहागीरदार, डॉ. एस. व्ही. शास्त्री, वाईचे प्रा. यशवंत कळमकर, साताऱ्याचे प्राचार्य डॉ. एम्. ए. शेख आदी मान्यवर विद्वानांच्या  सहवासाचे भाग्य लाभले. ‘ज्याला काही येते, त्याला कोणीही शिकवेल; पण ज्याला शिकविण्यासाठी सुद्धा उचलून घेण्याची गरज आहे, अशा होतकरू विद्यार्थ्यांना त्यांच्या अंगी असणाऱ्या क्षमता वाढवित कुटुंबातील सदस्याप्रमाणे घडविणारा डॉ. पी.ए. अत्तार यांच्यासारखा शिक्षकाचेही आज स्मरण होते! विद्यापीठाच्या विविध विभागांचे विभागप्रमुख हे जसे त्यांच्या त्यांच्या विषयांत पारंगत होते, तसेच त्यांना तत्त्वज्ञानाचीही चांगली जाण होती, म्हणूनच राज्यशास्त्र शिकविणारे डॉ. के. के. कावळेकर, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. अरुण भोसले, अर्थशास्त्राचे डॉ. जे. एफ. पाटील, बहि:शालचे डॉ. भालबा विभुते यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सर्वच विषयांच्या विद्यार्थ्यांत कुतूहल असायचे. डॉ. गो. मा. पवार, डॉ. ल. रा. नसिराबादकर, डॉ. विश्वनाथ शिंदे, हिंदीचे डॉ. मोरे आदींच्या भाषाविषयक, लोकसाहित्यविषयक ज्ञानाप्रति विद्यार्थ्यांच्या मनात आजही अपार आदर भावना आहे.

तसे बघितले तर विद्यापीठाच्या अंतर्गत चारही जिल्ह्यातल्या कितीतरी महाविद्यालयातुन विद्यार्थ्यांच्या पिढ्या घडवणारे सर्वच विद्याशाखांचे कितीतरी प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षकेतर सेवक यांच्या योगदाना प्रति कृतद्न्यता व्यक्त केल्या खेरीज हा लेख पूर्ण होवू शकत नाही. परंतु लेखनसीमेचा विचार करता इच्छा असुनही हे शक्य नाही.

संशोधनामध्ये विज्ञान विभागांनी मोठीच कामगिरी केली आहे. स्कोपस आणि मान्यताप्राप्त  आंतरराष्ट्रीय इंडेक्स जर्नल्समधील शोधनिबंध, संशोधनाची सद्य जगतातील आंतरराष्ट्रीय परिमाणे याबाबतीत विद्यापीठाच्या विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्र-विज्ञान विभागांनी मोलाची भर घातली आणि यामुळेच हे यश मिळू शकले, असे म्हणावे लागेल. संशोधन-प्रकल्पांतून प्राध्यापकांनी, विद्यापीठ अनुदान आयोग तसेच अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळविलेल्या कोट्यवधी रुपयांच्या अनुदानातून विद्यापीठाच्या संशोधकीय प्रगतीला विशेष हातभार लावला. विद्यार्थ्यांच्या, संशोधक आणि मार्गदर्शकांच्या पिढ्या-पिढ्या एकमेकांना उभ्या करत गेल्या आणि मग गोपाळकाल्याची दहिहंडी हाती यावी, तशी नॅकच्या मुल्यांकनाची A++ ही ग्रेड (3.52 CGPA मिळवत) हाती आली. 

अभ्यासक्रमाचा दर्जा, पारंपरिक आणि अभिमत तसेच स्वायत्त महाविद्यालयांच्या निमित्ताने आज व्यक्त होत असणारी महाविद्यालयांची गुणवत्ता वाढ, संशोधन परंपरा; संशोधनशुचित्व आणि काळाच्या ओघात निर्माण झालेल्या मापदंडांचे पालन, यासाठी शिवाजी विद्यापीठाची देशपातळीवर प्रमुख ओळख आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने तर देशपातळीवर स्वत:चा एक वेगळा ठसा उमटवलेला आहे. इथल्या पीएच.डीच्या विद्यार्थ्यांचे थेसिस तपासताना, परीक्षेचे कामकाज करताना, बाहेरील विद्यापीठांतील प्राध्यापक शिवाजी विद्यापीठातील कार्यपद्धतीचा आवर्जुन उल्लेख करतात, त्यांच्या त्यांच्या विद्यापीठात अनुकरणाचा आग्रह धरतात.

विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष जड़ण घडणिशी ज्यांचा प्रत्यक्ष सम्बन्ध येतो ते विभाग म्हणजे ‘विद्यार्थी कल्याण विभाग’, ‘एन. एस. एस.’ आणि ‘कमवा-शिका’ योजने अंतर्गत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे ‘आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवन’. १९९१ साली प्रा. आर. एस. माने हे संचालक-समन्वयक असताना मला दिल्लीच्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनात विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करता आले, देश पातळीवर अनेक वक्तृत्वस्पर्धात भाग घेता आला. त्यानंतरच्या सर्वच संचालक-समन्वयक यांच्या, ‘दिले गेलेले काम भक्तिभावाने करण्याच्या स्वभावामुळेच’ त्यांच्या नावांची मोहोर विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर यामुळेच आजही कायम आहे.  

या सर्व यशाचा विचार करताना विद्यापीठातील प्रशासकीय सेवक वर्गाचा आणि त्यांनी दीर्घ काळ आपल्या कामातून उभ्या केलेल्या विद्यापीठाच्या प्रतिमेचा विशेष उल्लेख करावा लागेल. आपल्या विद्यापीठाविषयी त्यांना वाटणारा कमालीचा अभिमान, हे त्यांचे वैशिष्ट्य. दिलेले काम सकारात्मक मानसिकतेने करणारा आणि विद्यापीठातील आजी-माजी प्राध्यापकांच्या क्षमतेबद्दल भरभरून बोलणारा, प्रश्न सोडविण्याची मानसिकता असलेला, विद्यार्थ्याना आपलेपणानं वागविणारा प्रशासकीय सेवकवर्ग म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या कार्यालयीन सेवक वर्गाचा उल्लेख करावा लागेल.

विद्यापीठाची अभ्यास मंडळे, अधिसभा, विद्वत-सभा, व्यवस्थापन परिषद अशा सर्व स्तरांवर होणारी बौद्धिक आणि सकारात्मक चर्चा, विद्यापीठ आणि विद्यार्थी कल्याणाच्या वाटेवर आपापसातील मतभेदांच्या भिंती पाडून टाकणाऱ्या संघटना, विद्यापीठाने घालून दिलेल्या आचारसंहितेचा आदर करणारे संस्थापक, प्राचार्य आणि सभोवतालचा सारा समाज, या साऱ्या-साऱ्या घटकांच्या तप:श्चर्येचे फलित म्हणून विद्यापीठाच्या या भव्य-दिव्य यशाकडे पहावे लागेल. जगात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या आणि काही शतकांच्या प्रवासाचा अनुभव गाठीशी असणाऱ्या विद्यापीठांच्या गुणवत्तेशी नाते सांगणारे यश; आज शिवाजी विद्यापीठाला मिळालेले आहे. मोठे यश मिळवून आईच्या कुशीत शिरताना, आपल्या डोक्यावरून फिरणारा तिच्या हाताचा स्पर्श अनुभवताना होणारा आनंद, आज विद्यापीठाशी नाते असलेला प्रत्येकजण अनुभवतो आहे. ना. धो. महानोरांच्या शब्दांतच सांगायचे तर:

या मातीने लळा लावला असा असा की, सुखदु:खाला परस्परांच्या हसलो रडलो, याने तर हा जीवच अवघा जखडला, मी त्याच्या हिरव्या बोलीचा शब्द जाहलो II

यासाठीच ‘मी कोण आहे, हे विचारण्यापेक्षा, मी कुठून आलो? हे विचारणे अधिक महत्त्वाचे. मातीत ज्यांचे जन्म मळले, त्यांनीच आज गुणवत्तेचे आकाश पेलले आहे. आज जगाच्या पाठीवर जीवनाच्या सर्व क्षेत्रांत; सर्वदूर पसरलेल्या, संकटांवर स्वार होणाऱ्या असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याची जी यशोगाथा आहे, तीच यशोगाथा त्यांना उरिशिरी धरणाऱ्या शिवाजी विद्यापीठाचीही आहे. यातच या यशाचे, आनंदाचे आणि सर्वांच्या अंतःकरणात भरून पावलेल्या ‘समाधानाचे-सार’ सामावले आहे.

ही विजयश्री परिश्रमपूर्वक खेचून आणणारे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील, डॉ. नांदवडेकर आणि सर्व संबंधित घटकांचे विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने मनापासून अभिनंदन!!!

प्राध्यापक (डॉ) विवेक रणखांबे

भारती विद्यापीठ, पुणे Mob: ९८५०५५८४०४, Email: vivekrankhambe@gmail.com

(लेखक हे कला शाखेचे विद्यार्थी असून शिवाजी कॉलेजसातारा, न्यू कॉलेज, कोल्हापूर, शिवाजी विद्यापीठ इंग्रजी विभाग तसेच  वेणुताई चव्हाण कॉलेज, कराडचे ते माजी विद्यार्थी आहेत.)







Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *