बाप म्हणून हे देवा, माझं काही चुकेल का?

सुखाचे दिवस देण्याआधी,
माझ्या मुलांना;
थोडी दुःखाची चव चाखुदे,
असं काही जगावेगळं मागणं मागितलं,
तर बाप म्हणून, हे देवा,
माझं काही चुकेल का?

प्रकाशा आधी त्यांना,
थोडा अंधार कळू दे.
ज्ञानाच्या ही आधी,
अज्ञानाची निरागसता,
त्यांच्या उरी, ठाम ठसु दे.

न येण्या श्रीमंतीचा माज,
थोडे गरिबीचे घाव सोसू दे.

सहज सुखासीन आयुष्याची
किंमत त्यांना कळण्यासाठी,
आधी कष्टाची सवय होवू देत,
आकाशात झेप घेण्या आधी
जमिनीत थोडे पाय मळू देत.

माणसे उगवतीची की मावळतीची,
आयुष्य प्रकाशित करणाऱ्या
प्रत्येक सूर्यां पायी,
कृतज्ञतेने हात जोडू देत.

नाही काही मिळविले जरी,
तरी संस्कार अन मूल्यांशी
हे देवा, पक्की त्यांची नाळ टिकू दे.

काल जिथे होता तिथून थोडे,
दररोज पुढे जात रहा,
देह आणि श्वासा बरोबर
मागचे काही हुंदकेही आठवत रहा.

अरे या नव्या जमान्यात
साधनांच्या गर्दीत हरवून जाता तुम्ही,
त्यांचे ओझं नाही रे पेलवत आम्हाला,
तुमच्या कडून झालेल्या अपमानात
मग जणू धन्य होतो आम्ही.

असो,
जात रहा पुढे,
पण वळून थोडे मागे बघत रहा.

दोन घास मनी सात्विक विचार,
डोक्यावर उभी चांदण रात्र,
अरे एव्हढ चिक्कार आहे जगायला,
माणूस म्हणून एक दिवस
सुखाने इथला निरोप घ्यायला.

हे कळण्यासाठी मोठे व्हा,
दिलेलं दान अन केलेली मदत,
ओठावरच काय? नजरेतही आणू नका.
माणस वागत राहतात त्यांच्या पद्धतीनं,
म्हणून आपली रीतभात सांडू नका.

आयुष्यातला एकेक दिवस सरला कसा?
याचा थोडा हिशेब लिहा.
पैलतीरावर जाण्यासाठी
पुस्तकांच्या कुशीत रहा.

तुम्हां सर्व सहज मिळाव,
अशी माझी अपेक्षाच नाही,
थोडं दुःख, थोडे अपमान,
नंतरच सुख, अन नंतरच सन्मान
हाच असुदेत ईश्वरा
तुझ्या आशीर्वादाचा क्रम.

पोट भरण्या आधी त्यांना,
थोड उपाशी राहू देत,
भुकेजल्या पोटाला त्यांच्या
हे देवा,
अन्नाची किंमत कळू देत.

जसे जगतात भवतालचे जीव-जंतू,
अन कधी कधी माणसं सुद्धा,
तसे जगणे हा ही एक शापच असतो,
अंधाराशी नातं जोडणं,
हाही एक घातच असतो.

चंदन होण्याचा प्रयत्न करा,
पण दुसऱ्याच्या चांगुलपणावर जळणारी
‘जळावू लाकडाची’
वखार तुम्ही होवू नका.

डोळ्या आधी दृष्टीची,
दाई आधी आईची,
अन आजारा आधी कायेची
किंमत त्यांना कळावी,
हीच माझी प्रार्थना आहे.

देता आली नाही जरी
सावली कधी कुणाला,
तरी बाभळीचा काटा होवून,
कुणा आयुष्यात रुतु नका.

ध्यानी हे सदैव असुद्या,
जग जे चालते आहे,
हि त्या ‘कर्तुम-कर्तुम-अन्यथा-कर्तुम’
ईश्वराची सत्ता आहे,
देव नाकारणाऱ्या वृत्ती पुढेही,
नम्रतेने ती उभी आहे.

दोन हात अन तिसरं मस्तक
त्यापुढे झुकवित जा,
देव देश अन् धर्मपायी
काही काळ वेचीत जा.

पुढे जाण्याच्या नादात
कुठून आलो, ते विसरू नका
पैशाच्या नादात, कुणा
अगतिकाला लाजवू नका.

गरजवंत येता दारी,
अहंकाराने फुगू नका,
दिवस प्रत्येकाचाच उगवतो,
उगा त्यां, तुमच्या देहबोलीने हिणवू नका.
आयुष्याची किंमत कळण्यासाठी,
मरणापर्यंत तुम्ही थांबू नका.

स्वतःच्या आयुष्यातील सुख मोजताना
दुसऱ्याच्या दु:खांची फुटपट्टी करा.
जगायचेच असेल सुखात तर,
स्वकष्टाची कोरभर भाकर,
भुकेल्या जीवा थोडी देत रहा.
…………………………………………………..
प्राध्यापक (डॉ) विवेक रणखांबे, पुणे
१७-०२-२०२२, मोबाईल: ९८५०५५८४०४
…………

10 thoughts on “बाप म्हणून हे देवा, माझं काही चुकेल का?”

 1. डॉ जी व्ही माळी

  अगदी बरोबर आहे सर…कटू सत्य मांडले आहे आपण या कवितेतून ….

 2. Sanjay Dadasaheb Thigale

  देवाच्या चरणी केलेली मागणी रास्त आहे. देवाला जेव्हा आपण चुकले का असे जेव्हा विचारतो तेव्हा दुसरा प्रश्न निर्माण होतो आपण जरी चुकलो तरी तो आपल्याला माफ करतो. खुप छान कविता…
  प्रा संजय ठिगळे सांगली

 3. Mrs.Harsha Balkrishna Pisal

  किती सुंदर साधी सोपी मनाला भिडणारी रचना
  प्रकाशा आधी थोडा अंधार कळू देत 👌👍
  चंदन होण्याचा प्रयत्न 👏👏

 4. एच. पी. देशमुख

  अतिशय सुंदर कविता आहे. खरोखरच हृदयाला भिडणारी अशी कविता आपण केली.
  डॉ. एच. पी. देशमुख

 5. Dr. Sachin Bhumbe

  किती अर्थपूर्ण, सहज सोपी पण आयुष्यचा सार सांगणारी कविता…. 😊👌👌👌👌👌

 6. Adsul Vijaykumar Vishwanath

  खऱ्या अर्थाने बाबांची ओळख
  मनाला खोल भिडणारी
  खूप सुंदर रचना
  धन्यवाद सर 🙏

 7. प्रा. नितीन पाटील

  सर,
  खूप छान कविता आहे, आजच्या संगणकीय युगात यंत्रवत मानवाला ‘माणूस’ बनायला शिकवणारी ही कविता म्हणजे दीपस्तंभच !

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *