| तीर्थरूप श्री. महादेव हरी कुलकर्णी यांना ९१ वर्षे पूर्ती समारंभानिमित्त कुटुंबीय, नातेवाईक आणि स्नेहांकित यांचेकडून I I कृतज्ञतापत्र I I अर्पण समारंभ शुभहस्ते: मा. श्री. बाबूजी नाटेकर उपाध्यक्ष, महारष्ट्र प्रांत प्रति, आदरणीय अण्णा, स्वातंत्र्य लढ्याच्या ऐन रणधुमाळीत दि. २३-०२-१९२६ रोजी आई रुक्मिणी आणि वडील हरिपंत यांच्या पोटी एका शेतकरी कुटुंबात आपला जन्म झाला. तीन भावंडात आपण त्यांचे दोन नंबरचे अपत्य. उमलत्या वयात अल्प-स्वल्प शिक्षणाचा श्रीगणेशा करून, “आयुष्यात काही कार्यकर्तृत्व आपल्या नावावर असावे,” “आयुष्यात आपले काही स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावे”, या हेतूने वयाच्या १२ व्या वर्षी अंगावरच्या कपड्यानिशी आपण घर सोडले. उदरनिर्वाहासाठी जे पडेल ते काम करायचे पण कोणत्यातरी एका क्षेत्रात स्वकर्तृत्वाने, स्वाभिमानाने आणि नितीमुल्यांच्या पक्क्या अधिष्ठानावर स्वतःची जागा निर्माण करायची, या उद्देशाने आपण सातारला गाठलेत. काळाराम मंदिराचे विश्वस्त असणारया रामभाई या मारवाडी गृहस्थाकडे महिना १० रु. पगारावर आयुष्यातील पहिल्या वहिल्या नोकरीची सुरुवात झाली. काही महिन्यानंतर त्यांनी आपली ओळख हार्डवेअर, पाईपलाईन अशा व्यवसायातील श्री. हणमंतराव पेंडसे या सद्गृह्स्थांशी करून दिली. ईश्वराची मनुष्य रूपात झालेली तुमची ही पहिलीच भेट. विशीत असताना त्यांच्याच मार्गदर्शना नुसार आपण सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात हार्डवेअर व्यवसायाची माहिती करून घेण्यासाठी आपण बराच कष्टप्रद प्रवास केलात. या काळात या व्यवसायाचा आपण जो बारकाईने अभ्यास केलात, तोच तुमच्या पुढील आयुष्यात हार्डवेअर व्यवसायाचे अधिष्ठान झाला. कोणताही मुलाहिजा न बाळगता सुरुवातीच्या काळात आपण अगदी गडी, गवंडी, सुतार यांच्याही हाताखाली काम केलं. “जो माणूस मनापासून कष्ट करील, तोच उत्तम मालक होईल, मग तुम्ही गावातच काय, जंगलातहि जावून बसलात तरी गिऱ्हाईक तुम्हाला शोधत तिथे येईल,” या पेंडसेंच्या परिमाणाला शिरोधार्य मानून वाटचाल सुरु झाली. आपल्या पत्नी सौ. प्रमिला यांच्याशी आपला विवाहही पेंडस्यानीच लावून दिला. एकीकडे संसाराचे प्रश्न, दुसरीकडे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आणि तिसरीकडे स्वतंत्र व्यवसाय या स्वप्नपूर्तीच्यासाठी पेंडस्याना सोडावे लागणार; या मानसिक कोंडीत आपण सापडलात. अत्यंत बिकट अवस्थेत ज्यांनी आपणास मोलाची साथ दिली, आई-वडिलांची जागा घेत पालक होवून लग्नासहित कर्तव्येही पार पाडली, त्या पेंडसेना सोडणे, मनाला पटत नव्हते. अनंत अडचणी समोर होत्या, पण शेवटी सारे पाश तोडून स्वतंत्र व्यवसाय उभारणीचा निश्चय केला. साताऱ्यातील कालिदास शहा बंधू पैकी एक बंधू हे ब्रिटीश काळात रेल्वेचे स्टेशन मास्तर होते. आपल्या बुद्धीची चुणूक पाहून त्यांनी आपल्याला स्वतंत्र व्यवसायाची प्रेरणा दिली. सातारा एसटी स्टडवर तारगावचे सोनोपंत मारुलकर या नावाचे गृहस्थ आपणास अगदी योगायोनेच भेटले. काहीही संबंध नसताना, मारुलकरानी प्रथम भेटीतच कोरेगावात ओळखीने जागा देण्याची तयारी दर्शवली. इथे परमेश्वर तुम्हाला पुन्हा एकदा भेटला. कोरेगावात येताच तुळजापूरच्या भवानीचे उपस्थान असलेल्या “तुरजाभवानी”चे आपण दर्शन घेतलेत आणि आज जिथे जुने दुकान आहे त्या दुकानात अर्थात बोकिलांच्या वास्तूत आलात. या वास्तूत दोन खणाची जागा भाड्याने मिळाली आणि १९४९ सालच्या अक्षयतृतीयेला “कुलकर्णी बंधू हार्डवेअर” या स्वतंत्र दुकानाची सुरुवात झाली. आज या घटनेला ६९ वर्षे पूर्ण होत आहेत. स्टेशनमास्टर शहा यांना मुहूर्ताची बातमी सांगण्यासाठी आपण सातारा गाठला आणि रक्तानात्याचा काहीही संबंध नसताना केवळ आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी ताबडतोब चेक हाती दिला. हि मदत, हा पुन्हा एक ईश्वरी संकेत मानून आपण मोठ्या उत्साहाने नव्या जोमाने व्यवसाय उभारणीला वाहून घेतले. सकाळी ७ वाजता दुकान उघडायचे आणि रात्री आठ-नऊ वाजता गिऱ्हाईक संपल्यावर बंद व्हायचे. सुरुवातीच्या काळात शासना मार्फत राबविण्यात आलेल्या अनेक उपक्रमांची मदत आपल्याला स्वतंत्र व्यवसायाची घडी बसवताना झाली. तीन तालुक्यांसाठीचे शासन नियुक्त हार्डवेअर पुरवठा कंत्राटदार म्हणून आपण शासनाचा, जनतेचा आणि ग्राहकांचा विश्वास संपादन केलात. कोरेगावसह, शेजारच्या म्हसवड, दहिवडी आणि खटाव या भागातून गिऱ्हाईक यायला सुरुवात झाली. आपले कनिष्ठ बंधू दिगंबर उर्फ तात्या यांनीही पुढे याच व्यवसायात येण्याची इच्छा व्यक्त केली. दोघांनीही मग शेजारच्या तालुक्यातील गावात, तालुक्यात सायकलवर फिरून ऑर्डर्स मिळविल्या. सातारा असो की म्हसवड सायकल हेच वाहन. असे कष्टप्रद आयुष्य आपण जगलात. व्यवसाय वृद्धीच्या या बिकट वाटेवर मदतीला आले ते कोरेगाव कोऑपरेटिव्ह पीपल्स बँकेचे संस्थापक श्री. जी. आर. कुलकर्णी. त्याच बरोबर सध्या वास्तव्य असलेल्या या वास्तूचे मालक श्री. मुकुंद दत्तात्रेय बोकील आणि नव्या दुकानाचे जागा मालक श्री. बाबुराव गणपती बर्गे. दोन्ही दुकानांच्या उभारणीत त्यांचे विशेष प्रेम आणि सहकार्य लाभले. अण्णा, आपल्या आयुष्यात जो जो आला, त्याला आपण नेहमीच ताटा मधला घास दिलात. त्याची स्वप्ने साकारावीत यासाठी, बोलण्याचं कर्तृत्व करण्याऐवजी मितभाषी रहात, त्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण कर्तृत्वाने बोलके झालात. आपण केवळ दुकान सुरु करून थांबला नाही तर परिसरातल्या लोकांचेही मार्गदर्शक झालात. घरे कशी रंगवायची, हेही तुम्ही लोकांना शिकवलेत. घर बांधणाऱ्याना गडी, गवंडी, सुतार आदी कुशल कारागिरांची मोट बांधून दिलीत. अजाणतेपणी हजारो हाताना काम दिलेत आणि कितीतरी जणांची स्वप्नं साकार झाली. जिल्ह्याचे प्रमुख हार्डवेअर व्यावसायिक असणाऱ्या श्री. रंगराव शालगर यांनी या वाटेवर आपणास मोठी मदत केली. त्यांच्याच सांगण्यावरून सातारयापर्यंत येणारे एजट पुढे कोरेगाव पर्यंत येवू लागले. जुन्या कोरेगावातल्या मुळच्या दुकानाला १९७९ साली ४० वर्षे पूर्ण झाली. तसे पहाता, कोरेगावचा अजूनही विस्तार झाला न्हवता. कोरेगावच्या पूर्वेला उगम पावून पश्चिमेला केदारेश्वरा जवळ वसनेला जावून जी नदी मिळते तिचे नाव आहे तीळगंगा. या तीळगंगेच्या पैलतीरावर केवळ स्थानिक व्यावसायिकांची गोडाऊन्स होती. परंतु इथे प्रथम व्यवसाय सुरु करणार्यापैकी एक होते ते “कुलकर्णी बंधू”. स्थानिक व्यापारी मित्रांच्या सहकार्याने इथे नव्या पेठेची उभारणी झाली. मोडर्ण एजुकेशन सोसायटीचे अर्थात सरस्वती विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष असणाऱ्या ज्या श्री. जी. आर. कुलकर्णीनी आपल्याला प्रारंभिक काळात मोलाची मदत केली, त्याच संस्थेचे संचालकपद आज आपले पुत्र सुरेश हे भूषवित आहेत. मुले, नातवंडे, सुना, जावई हे व्यवसाय वृद्धी करत, मुल्यांची आराधना करत, आपण घालून दिलेल्या वाटेने पुढे चालली आहेत. अण्णा, व्यवसाय जीवनाच्या वाटेवर, “आर्थिक व्यवहार चोख ठेवा, म्हणजे जीवनात कधीही कसलीही अडचण येणार नाही” हे आपल्या जीवनाचे सार आम्ही सर्वजण सदैव उरीशिरी धरू. अण्णा, ७० वर्षानंतर “कुलकर्णी बंधू” या नावाला केवळ गावातच काय तर शेजारच्या तालुक्यात, जिल्ह्यात, ग्राहकवर्ग आणि संघपरिवारात एक प्रतिष्ठेचे स्थान मिळाले आहे. या साऱ्या गोष्टीचे श्रेय, अण्णा, आपण अनेक वर्षे परिश्रमपूर्वक उभ्या केलेल्या कुलकर्णी कुटूम्बियांच्या प्रतिमेसच द्यावे लागेल. आपले कनिष्ठ बंधू तात्या, त्यांच्या पत्नी श्रीमती मंगलाबाई, त्यांची मुले श्री. प्रसाद व त्याची पत्नी सौ. प्रज्ञा व मुली वैशाली आणि प्रतिभा यांना आपण कुटुंबप्रमुखाचेच प्रेम दिलेत. प्रामाणिकपणा, सचोटी, पडेल ते कष्ट उचलण्याची वृत्ती, हव्यास न करता जे मिळाले त्यात समाधान मानण्याचा मोठेपणा आणि अंतकरणाची शुद्धता ही महत्वाची मानून आपण अनेक माणसे जोडलीत. आयुष्याच्या वाटेवर आपल्याला जर परमेश्वरानं काही दील असेल तर ती आपल्या प्रगतीची प्रार्थना करणारी, अहेतुक जीवन जगणारी आणि आपल्यावर निर्व्याज प्रेम करणारी रक्ताच्या नात्यापलीकडली माणस. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा आणि आपला तसा जुना संबंध. पुढे हाच संबंध आपले चिरंजीव सुरेश आणि रमेश यांच्या निमित्ताने दृढ झाला. संघाच्या प्रचारकांच्या साठी तर हे घर एक हक्काचे ठिकाण झाले. सुहासराव मोपय्या हिरेमठ, अनिल अन्धोरीकर या व अशा प्रचारकांच्या पिढ्यांना, आपण आणि आपल्या कुटुंबीयांनी दिलेलं प्रेम, आपलेपण याचे आजही कृतज्ञता पूर्वक स्मरण होते. आयुष्यात जगण्याचेच प्रश्न सदैव ‘आ’ वासून उभे होते, त्यामुळे लौकिक अर्थाने निवांतपणा लाभताच, साहित्य, कला, संगीत, पर्यटन यांनी जीवन समृद्ध करावे, हे अस काही कधी ध्यानातच आले नाही. आयुष्य…चा सारा प्रवास आपण एखाद्या स्थलसन्यास घेतलेल्या साधका प्रमाणेच केलात. कदचित यामुळेच आपली तुलना ही कोरेगावच्या पूर्वेस उगम पावून पश्चिमेस केदारेश्वर मंदिराजवळ वसनेला मिळणाऱ्या आणि केवळ सातआठ किलोमीटरचा प्रवास करीत जणू आपल्यासारखाच स्थलसन्यास घेतलेल्या “तीळगंगेशीच” करावी लागेल. दिवस रात्रीचा कोणताही प्रहर असो, कष्ट कोणत्याही प्रकारचे असो, गेली ९१ वर्षे तुम्ही हसतमुखाने उभे आहात. “नसे राउळी वा नसे मंदिरी, जिथे राबती हात तेथे हरी” या श्रद्धेने आपण आयुष्यातील प्रत्येक क्षण वेचलात. अण्णा, जीवन प्रचंड अस्थिर आहे, हे कितीही खर असलं तरी आपल्याकडे आणि वयाच्या नव्वदीतही कार्यमग्न असणाऱ्या आपल्या दिनचर्येकडे पाहता, एक गोष्ट निश्चित सांगता येईल, आणि ती म्हणजे “आपल्या शतायुषी होण्याची”. आयुष्यात कितीतरी वेळा ईश्वराने आपली पाठराखण केली, त्या ईश्वराचे स्मरण व्हावे म्हणून कि काय, आपण आपल्या मुलां-मुलींची नावे देखील सुरेश, रमेश, उमेश, मंदाकिनी आणि विमल अशी ठेवलीत. आपल्या जेष्ठ सुनबाई सौ. संध्या यांच्या रुपान तर जणू कोरेगावची “तुरजाभवानी”च तुम्हाला प्रसन्न झाली. परवा सौ. संध्या, सौ. सुजाता आणि सौ. शितल यांच्या बद्दल बोलताना आपल्याला भरून आलं. कुण्या घरच्या या पोरींनी आपल्याला जो जीव लावला त्याची त्यांना जणू पोहोचपावतीच मिळाली. गंभीरवृत्तीसाठी प्रसिद्ध असणारया आपणास आम्ही पहिल्यांदाच एव्हढ हळव झालेलं अनुभवलं. आपल्या आयुष्यात चांगल्या माणसांच्या रूपाने परमेश्वर आपल्याला भेटला आणि तोच परमेश्वर आमच्या आयुष्यात तुमच्या रूपाने अवतरला, तुमच्या सहवासाने आमच्याही आयुष्याला संपन्नतेचा स्पर्श झाला, अशीच आमची धारणा आहे. या कृतज्ञतेच्या भावनेनं, हे पत्र आपणास प्रदान करताना आणि परमेश्वराजवळ आपल्या शतायुषी आयुष्याची प्रार्थना करताना एव्हडच सांगाव वाटत कि: ऋण नक्षत्रांचे असते आभाळाला, ऋण फळा फुलांचे असते या धरतीला… ऋण फेडायचे आमुचे राहून गेले, ऋण फिटता फिटता डोळे वाहून गेले… आपले विनीत …कुलकर्णी कुटुंबीय, नातेवाईक आणि स्नेहांकित… ……………………………………………………………………………………………………………………………………………………… |
श्री. महादेव हरी कुलकर्णी, कोरेगाव यांना देण्यात आलेले ‘कृतज्ञतापत्र’ २ मे, २०१७

