“चार तपां नंतर…”

22 एप्रिल, 2020

(तीर्थरूप आण्णांच्या १४ व्या पुण्यस्मरणाच्या पूर्वसंध्येला)

१९७१ ते २०२०, माझा आयुष्याच्या वाटेवरचा हा ‘चार तपांचा काळ’,  या महिन्यात अर्थात एप्रिल, २०२० मध्ये पूर्ण होईल. माझी आई माझा वाढदिवस तिथी नुसार मानते, तारखेनुसार तो २५ एप्रिल या दिवशी येतो आणि सरकार दरबारी असलेल्या नोंदी नुसार तो २६ एप्रिल या एका आणखी वेगळ्याच तारखेला असतो. माझ्या आईला (‘कोल्हापूर’ या तिच्या माहेरची ‘सुर्याक्का’ आणि माझ्या वडिलांचे नाव ‘अर्जुन’ असल्याने लग्नानंतरची ‘सुभद्रा’) हिला जर कुणी माझ्या जन्मा बद्दल विचारलं तर ती सांगते, की “अक्षयतृतीया” हि माझ्या जन्माच्या तिसऱ्या दिवशी आली होती, प्रतिपदेच्या त्या दिवशी नक्षत्र भरणी होते.” माझ्या जन्माचा बादरायण संबंध अक्षयतृतीयेशी जोडण्याचा तिचा हा आग्रह कशासाठी? या शोधाचा शेवट हा  तिच्या निरागस मानसिकतेत आणि आपल्या मुलाच्या मांगल्यपूर्ण आयुष्याच्या प्रार्थनेत होतो. तिने आजवर चाललेल्या कष्टप्रद वाटेवर सुखाचा हा आभासात्मक कवडसाही, ‘आजचा हा अंधार उद्या कधीतरी दूर होईल’ असा आशेचा दिवाही तिच्या मनात प्रकाशताना दिसतो. सामान्य माणसाच्या मनातल्या सुखाच्या शोधाची दिशा दाखवतो, असेच म्हणावे लागेल. कसेही असो, ‘जाणता-अजाणता’ साडेतीन मुहुर्ताशी, अर्थात ‘आपल्या मुलाच्या जन्मवेळेचं नातं त्याच्या जीवनाच्या मंगलमय प्रवासाशी जोडणाऱ्या’ भारतीय मातांचंच, ती प्रतिनिधित्वचं करते, असं मला वाटतं. ‘चांगभलं, अर्थात चांगलं होवो, भलं होवो’ या सांस्कृतिक मुल्यालाच ती नकळतपणे अधोरेखित करते.  

आपणा पैकी कुणीही असो, या इथे जन्मलेल्या प्रत्येकाला किमान दोन दिवस वाढदिवस म्हणून साजरे करावे लागतात. एक तिथी नुसार, तर दुसरा तारखे नुसार. अर्थात, अशा कोणत्या गोष्टीचा माझ्यावर कधीच काही परिणाम झाला नाही. वाढदिवसाचा आनंद किंवा कमी होत चाललेल्या आयुष्या बद्दलची खंत देखील कधीच वाटली नाही आणि तो साजरा व्हावा, असे कधी वाटलेही नाही. परंतु, मागे वळून पाहण्यासाठी, स्वतःच्या आतमध्ये डोकावण्यासाठी, पुढचा प्रवास ध्यानात घेण्यासाठी आणि अनुभवाचे काही बोल कागदावर उतरवण्यासाठी, मला वाटते कि ‘चार-तपं’ एव्हडा काळ पुरेसा आहे. आधुनिकतेच्या वादळात हरवत चाललेल्या आजच्या या जगात आज कोरोना सारख्या अनाकलनीय रोगाने जगासमोर आणि शास्त्रज्ञांसमोर एक न संपणारे आव्हान समोर ठेवले आहे. अत्याधुनिक वैद्यकीय सोयी असलेल्या पाश्चात्य जगातल्या लाखो लोकांचे प्राण घेणाऱ्या या रोगाने, माणसाला आज दिग्मूढ-असहाय्य-हतबल केले आहे, अशा वेळी जेवढे आजवर लाभले, तेव्हड्याच आयुष्याची पुन्हा अपेक्षा करणं, हे विधिलिखिताशी केलेली प्रतारणाच  ठरेल.

      इथं येईपर्यंत, परमेश्वरानं खूप काही दिलं आहे. थोडं वेगळ जगण्यासाठी आवश्यक असलेलं  आणि पृथ्वीवर पाठवण्यापूर्वी काही गुणांची, कलेची आणि जीवनाच्या वाटेवर ‘उदात्त, उन्नत, मंगल’ असणाऱ्या गोष्टींशी नातं जोडण्यासाठीची शिदोरी दिली, असूया; द्वेष-विद्वेषभावरहित अंत:करण दिलं, सिद्धबेटावर ज्ञानदेवांदि भावंडानी अनुभवलेल्या सहनशक्तीकडे पहात, अन्याया विरुद्ध पेटून उठतानाही ‘संयमाचा’ अंकुश कसा धारण करावा? त्याचं दर्शन घडवलं, ‘आपलं नातं कष्टाशीच असावं; खरं सुख त्यातच आहे’ ही धारणा मनाशी पक्की होईल’ असा ‘From Nowhere to Somewhere but Still Spectacular’  असा प्रवास घडवला, ज्यांच्या सहवासाने, सहवासाच्या आठवणीनेही मन भरून येतं असे मित्र, स्नेहांकित दिले, पवित्र अंत:करणाची अनुभूती देणारे डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. पी. ए. अत्तार, ह. भ. प. राष्ट्रीय कीर्तनकार गुरुवर्य चारुदत्त आफळे, यांच्या सारखी माणसे दिली, गुणावगुणाने युक्त असा हा देह आणि बुद्धी दिली, त्याचे विश्वस्त म्हणून ‘तितकेच ताकतीचे ‘आई-बाप’ दिले, या ईश्वर कृपेची धन्यता शब्दातीत आहे.  

      खरे तर, आयुष्य हे ज्याचे त्याचे असते. आयुष्याची ज्याची त्याची अशी एक व्याख्या असते. आपल्याला लाभलेल्या उन्नततेपोटी अथवा अवनतीपोटी; जीवनाची आपली व्याख्या आपण दुसऱ्यावर लादू नये, असे मला वाटते. ज्या त्या पिढ्यां बरोबर येणाऱ्या नव्या युगधर्माच्या सावलीत; ज्याचे त्याचे आयुष्य पुढे जात रहाते. त्यागाचा संस्कार झालेल्या माझ्या वडिलांच्या पिढ्या ऐहिकाच्या आसक्तीत कधीच गुंतल्या नाहीत. त्यांच्या अनुरागी मनाला भोगाचा स्पर्श कधीच झाला नाही. त्यांच्या आयुष्याच्या अखेरीस काही ऐहिकसुखोपभोचा, चांगलं जगण्याचा आग्रह मी धरला,  तेंव्हा तो मी त्यांच्या आयुष्यावर केलेला अन्यायच होता, असेच म्हणावे लागेल. परंतु आता ते इतके दूर गेलेत, की त्या माझ्या भुमिके बद्दल मी त्यांची माफीही मागू शकणार नाही. ‘साधूचे पोट उपवासाने भरते; अन्नाने नाही’, हे माझ्या ध्यानातच आलेनही. एस-टी स्टँड वर लागलेल्या कोणत्याही गाडीत बसून; ती गाडी नेईल त्या दिशेला जावून, मनात येईल त्या गावात उतरून संघाचं काम करता येतं, या त्यांच्या फकिरी-वृत्तीला सुखाच्या धाग्यात बांधण्याचा मोह मला का झाला? ते मला आज कळूनही उपयोग नाही. ते गेले, त्याला येत्या २२ एप्रिलला १४ वर्ष पूर्ण होतील, पण माझ्या साठी माझे वडील हेच त्या ईश्वराचं ‘सगुण-साकार’ रूप होते आणि माझं उर्वरित आयुष्य देखील त्याचं ‘निर्गुण-निराकाराच्या’ चिंतनाची समाधी असेल, यात शंका नाही.

      सुमारे ४८ वर्ष. म्हणजे ५७६ महिने, १७,५२० दिवस. या काळात सुख-दुखा:च्या बऱ्याच गोष्टी घडून गेल्या. ज्याचा क्लेश होतो आहे, अशा थोड्याश्याच आहेत. कष्ट आणि दु:ख देवून गेलेले कितीतरी दिवस आज सुखाचे झाले आहेत. आयुष्याच्या गुढीला दाखविलेला कडूनिम्बाचा नैवेद्य साखरेची माळही देवून गेला आहे, हे विसरून कसं चालेल? अशा वेळी, थोडं थांबावं, जसं मागे तसचं थोडं पुढही बघावं, इथवरं  येताना प्रसंगी ‘ज्यांनी उचलून घेतलं, त्यांच्याप्रती काही ऋणनिर्देश करावा’, पुढच्या प्रवासासाठी निघताना, नम्रता आणि सभ्यतेचा दागिना न विसरता घ्यावा आणि मनोमन जीवनध्येयाला स्मरावं, यासाठी हा सारीपाट “ब्लॉग’ नावाच्या आधुनिक माध्यमातून उलगडण्याचा मनोदय आहे.

      हा ब्लॉग हि केवळ आत्मचरित्र नसेल, तर या सगळ्या प्रवासातील अनेक निरीक्षणे, व्यक्त होण्याची संधी न मिळालेल्या माणसांची जीवन दर्शनं, खूप काही असतानाही अभिमान विरहीत आयुष्य जगलेल्या व्यक्ती, त्यांच्या आचार-विचार आणि सहवासात झालेले भव्यतेचे संस्कार, प्राध्यापक म्हणून आयुष्यात आलेले-भावलेले विद्यार्थी; त्यांच्या हृदयस्पर्शी कथा, डॉ. पतंगराव कदम नावाच्या मुलखावेगळ्या संस्थापकाने दिलेल्या कामाच्या संधी, पुण्यात झालेले मानपत्र लेखन प्रवासाचे पर्व, अक्षरश: शेकडो सूत्रसंचालने, कार्यक्रमांची रेलचेल, वृत्तींशी लढताना आणि लढणाऱ्या माणसांच्या सहवासाने होणारा आनंद, ‘मूल्य आणि संस्कार’ या शब्दांना साकार करण्यासाठी मिळालेल्या संधी, ‘उपभोगाची संधी समोर असतानाही, ती नाकारणारे लोक, तडजोड न करता संकटावर स्वार होण्याच्या स्वभावापोटी जादा संकटं ओढवून घेणारे लोक, ‘आपला कुणीतरी वापर करून घेतय’ याची जाणीव झाल्यावरही एखाद्याला मदत करणारे लोक, पैशाची-आणि-अमूल्य अशा वेळेची पदरमोड करून, दुसऱ्याचे भले व्हावे म्हणून राबणारे लोक मला पहाता आले. अण्णांच्या स्वप्नं पूर्तीचा भाग म्हणून गेल्या चार वर्षापासून सुरु झालेल्या कीर्तन साधनेच्या वाटेवर लाभलेले धन्यतेचे क्षणं, या साऱ्या गोष्टी यथाशक्ती शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न. थोडक्यात सांगायचे की ‘नीती-मूल्य-अभ्यास-साधना-त्याग-उदात्तता-आयुष्यातली भोगविरहीत रम्यता-यांनी सजलेल्या माणसांच्या सहज सहवासाने माझेही आयुष्य महोत्सवी झाल्याची भावना आहे.

या भूमीच्या भूत-वर्तमान-भविष्यावर प्रेम करणाऱ्या, इथल्या संचिताला उरीशिरी धरणाऱ्या, या भूमीवर जन्मल्याचा आनंद होणाऱ्या, ज्ञानदेवांच्या पसायदानात आणि तुकारामाच्या अभंगात अभिषिक्त होताना जीवनाची इतिकर्तव्यता अनुभवणाऱ्या आपणा सारख्या वाचकाला, या लेखनाच्या वाचनातून,  ‘स्वतःच्याच जीवनप्रवासाचे’ कवडसे दिसतील, असे वाटते. शेवटी एक गोष्ट मात्र निश्चित की, ब्लॉग लेखनाची कल्पना सुचवणाऱ्या ‘भागवत पवार, या माझ्या मित्राने मला ‘लिहायला एका विषयावर सांगितलं आणि शब्द मात्र दुसरेच उतरत गेले’. माणूसही ‘जगायचे एक ठरवतो आणि त्याला जगणे मात्र दुसरेच लाभते.’ असेच हे देखील नाही का? जीवनाची ही पराधीनता हीच खरी शाश्वत आहे.             

डॉ. विवेक रणखांबे, पुणे

37 thoughts on ““चार तपां नंतर…””

  1. Aditya Vivekanand Rankhambe

    Your journey of four decades is an example before the world. The hard times in your life have taught us to survive in any situation as we have not faced the challenges which you already have. Your writing inspires us to live an unexpected life with our expected goals. You writings also teach us that things in life can happen unexpectedly be it a victory or a defeat. We should be ready for the challenges and win over them but with a humble gratitude………. Aveer

    1. आशा उमेश मोरे

      लेख अप्रतिम आई आणांची प्रतिमा समोर उभी राहिली.

  2. सुनंदा

    मन भूतकाळात गेलं.खूपच सुंदर लिहिले आहे.केवळ अप्रतिम . असे आई -वडिल मिळायला भाग्य लागतं .

  3. Prashant Dharmadhikari

    केवळ अप्रतिम।आपण सिद्धहस्त लेखक आहात हे तर सर्वविदीतच आहे मात्र आपल्या लेखणीला चैतन्याचा गाभारा ठाऊक लाभला आहे. आपलं लेखन वाचत रहावं वाटतं. आयुष्यातील काही मंतरलेले क्षण आपणासोबत घालवता आले व समृद्ध होता आलं याचा मोठा अभिमान वाटतो.

    आपली लेखणी अशीच दरवळत राहो ही मंगल कामना

    डॉ प्रशांत धर्माधिकारी

  4. Vidula Vinay Sathe

    विवेक,तुझं लिहीणं हे नुसतं छान म्हणावसं मला कधीच वाटलं नाही.तुझ्या एकेक वाक्याबरोबर मला तरी एक वेगळाच अनुभव मिळत रहातो.कारण तुझं लेखन हे फक्त likes साठी नाहीच.
    नाहीतर तू यापूर्वीच लिहायला सुरवात केली असतीस.
    तू म्हणालास,’ हे आत्मचरीत्र नाही’ .

    The more you write personal it becomes universal .
    असही आहे ना,म्हणूनच या वाचनातून स्वत:च्याच जीवनाचे कवडसे दिसतील असे ही लिहीलेस.
    सुरवात तर चांगली झालीच आहे.
    तुला खूप खूप शुभेच्छा.

  5. खरच अतिशय उत्तम मिमांसा केली आहे तुम्ही तुमच्या आयुष्याची आणी तुमचे मत हेच सांगते की तुम्ही खुप कृतज्ञ आहात
    आणी तुमच्या विचारांना एक आध्यात्मिक पदर आहे
    🙏🙏🙏

  6. Pratik Sanjay Potekar

    Respected sir,
    Greetings of the day !!!
    ४ तपा नंतरने आपल्या जीवनातील यशोगाथाच चित्रीत केली. आजवर भेटलेल्या मोठमोठ्या हस्ती यांमुळे आपले जीवन सर्वस्वी उजळून निघाले.

  7. इ डी पाटील

    सुंदर कल्पना भूतकाळात डोकावून, भविष्य चा वेध घेणं. Annanchi आठवण चिरकाल सुगंध दरवळणारी ठरणार आहे

  8. सर खूप सुंदर लेखन
    त्यातही आई वडिलांचा साधेपणा वडिलांची त्यागमय मूर्ती आणि त्यांना आपण ज्याला सुख म्हणतो ते मिळावे ही तुमची प्रामाणिक अपेक्षा पण कदाचित वडिलांच्या दृष्टीने ती केलेली अवास्तव उधळपट्टी
    पूर्वीची पिढी खरच अशी तत्वनिष्ठ होती माफक गरजा दुसऱ्यांसाठी करण्याची वृत्ती घरामध्ये जिव्हाळा आणि घर एकत्र बांधून ठेवण्याची शिकस्त आणि सात्विक अन्न योग्य शारीरिक कष्ट आणि आज मात्र याचाच पूर्ण अभाव होता म्हणून पुढच्या पिढीला मागच्या पिढीची मूल्ये हा कोरोना शिकवून गेला
    लेख सुरेख तुमच्या लेखातील प्रसंगाशी माझ्या लहानपणीच्या आयुष्यातील प्रसंग मनातल्या मनात आपोआप जोडले गेले आणि दोन्हीत साधर्म्य दिसू लागले🙏🙏🙏

  9. Dhananjay Suryawanshi

    प्रिय आदित्य.

    आपके पिताजी का लेख मैंने पढ़ा.
    जीवन विविधताओं से भरा हुआ है मानवी जीवन के सुंदर अंगों के एवं उनके पुरुषार्थ के दर्शन हुए. एक शिक्षक, एक बेटा, एक पिता , एक मित्र , एक पती , देश का एक सुजान नागरिक इन सभी रूपों मे उन्होंने अपना दायित्व बहुत अच्छी तरह निभाया है , और जीवन के हर पल को उन्होंने उसकी समग्रता में जीने का प्रयास किया है. उनका लिखा ब्लॉग सभी के लिए पढ़ने जैसा है , क्योंकि हर मनुष्य इस धरती अपना नया साम्राज्य लेकर आता है, अपने विराट सामर्थ्य एवं सर्वोच्च पुरुषार्थ के बल पर वह अपनी सीमाओं को कहाँ तक पहुँचाता है , यह स्वयं पर निर्भर है.

    कुछ ऐसे भी लोग होते है, जिनका महान पुरुषार्थ सभी सीमाओं को लांघते हुए असीमित हो जाता है, लेकिन ऐसे लोगों की संख्या पूरी पृथ्वी पर केवल एक प्रतिशत होती हैं, हमें इस संख्या को बढ़ाना चाहिए. प्रिय आदित्य आपके पिताजी ने तो उनकी जीवन गाथा लिख ली, अब क्यों न हम उस एक प्रतिशत लोगों में अपना स्थान मज़बूती से बनाने का पूरा प्रयास करें , और उसका दायरा भी बढ़ाए . मौत से पहले असंभव कुछ भी नहीं है मेरे दोस्त, चलो हम प्रयास तो करें, कदम तो उठाए , हमने जब पहला कदम पूरी सामर्थ्य,समग्रता,एवं जागरूकता के साथ उठाया तो समझो हम पहुँच हि गए. आपके पिताजी को मेरा प्रणाम, में उनके अच्छे सेहत और लंबी आयु की कामना करता हूँ.
    अपना ख़्याल रखिए.
    आपका एक दोस्त-
    धनंजय सूर्यवंशी.

    बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार.
    🙂
    🌍👏

  10. सौ. वैशाली बाळासाहेब खाडे

    अतिशय सुरेख लेखन झाले आहे की त्यामुळे प्रत्येक जण लेखन वाचून स्वतः ला भूतकाळात नेऊन आपल्याला लाभलेले गुरुरुपी आई वडील आणि जीवनातील छोट्या मोठ्या व्यक्ती प्रेरक आहेत असे जाणवते आणि अक्षय तृतीया निमीत्ताने स्मरण होते. सध्याच्या परिस्थिती पहाता मागील 4 दशकांच्या काळात आपण गरीबीतही जगलेलो ते अयुष्य सुखी वाटते. भविष्याची चिंता न करता आपण प्रत्येक जण एकमेकांना गुरुरुपी मिळालेलो वरदान आहोत. म्हणून हा जन्म सार्थकी लावायला प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते. 🙏🙏🙏 त्रिवार वंदन करुन तुमच्या लेखनातून उमटत गेले ते वेड्यासारखे मनुष्य लिहीत जातो. हे अप्रतिम लेखनशैलीमुळे जिवनपट उलगडतो.

  11. अभिजित बाबर

    अप्रतिम ब्लॉग. मला पण माझ्या आज वरच्या प्रवासात डोकावून बघण्याची संधी मिळाली. आणि तुमचा प्रवास खूप काही सांगून गेला. असेच लिहित रहा.

  12. Dhananjay Suryawanshi

    प्रिय आदित्य.

    आपके पिताजी का लेख मैंने पढ़ा.
    जीवन विविधताओं से भरा हुआ है मानवी जीवन के सुंदर अंगों के एवं उनके पुरुषार्थ के दर्शन हुए. एक शिक्षक, एक बेटा, एक पिता , एक मित्र , एक पती , देश का एक सुजान नागरिक इन सभी रूपों मे उन्होंने अपना दायित्व बहुत अच्छी तरह निभाया है , और जीवन के हर पल को उन्होंने उसकी समग्रता में जीने का प्रयास किया है. उनका लिखा ब्लॉग सभी के लिए पढ़ने जैसा है , क्योंकि हर मनुष्य इस धरती अपना नया साम्राज्य लेकर आता है, अपने विराट सामर्थ्य एवं सर्वोच्च पुरुषार्थ के बल पर वह अपनी सीमाओं को कहाँ तक पहुँचाता है , यह स्वयं पर निर्भर है.

    कुछ ऐसे भी लोग होते है, जिनका महान पुरुषार्थ सभी सीमाओं को लांघते हुए असीमित हो जाता है, लेकिन ऐसे लोगों की संख्या पूरी पृथ्वी पर केवल एक प्रतिशत होती हैं, हमें इस संख्या को बढ़ाना चाहिए. प्रिय आदित्य आपके पिताजी ने तो उनकी जीवन गाथा लिख ली, अब क्यों न हम उस एक प्रतिशत लोगों में अपना स्थान मज़बूती से बनाने का पूरा प्रयास करें , और उसका दायरा भी बढ़ाए . मौत से पहले असंभव कुछ भी नहीं है मेरे दोस्त, चलो हम प्रयास तो करें, कदम तो उठाए , हमने जब पहला कदम पूरी सामर्थ्य,समग्रता,एवं जागरूकता के साथ उठाया तो समझो हम पहुँच हि गए. आपके पिताजी को मेरा प्रणाम, में उनके अच्छे सेहत और लंबी आयु की कामना करता हूँ.
    अपना ख़्याल रखिए.
    आपका एक दोस्त-
    धनंजय सूर्यवंशी.

    बहुत बहुत धन्यवाद. नमस्कार.
    🙂
    🌍👏

  13. प्राचार्य बी एन पवार

    ब्लॉगवर लिहिते झालात छान वाटलं। स्वचा परिसर अनुभव उत्कृष्ट लिखाणाने मांडला। मनापासून शुभेच्छा।

  14. Respected Sir Your Journey of four decades is great achievement in your life. It is an example of you have faced so many challenges . It is fantastic and nice

  15. Respected Sir Your Journey of four decades is great achievement in your life. It is an example of you have faced so many challenges. It is fantastic and nice

  16. सुनिल ( उमेश )रावजी मोरे

    फारच प्रतिभाशाली लेखन व वस्तुस्थिती आहे आण्णांन सारखे वडिल व गुरु आपल्यास लाभले. हे फार भाग्याचे आहे.. माझ्या सारख्याला तर आण्णा, आई व आपण घरातील सर्वाचा सहवास लाभला माझ्या वरील सर्व संस्कार आपले आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे. आपण असेच लेखन करीत चला आपल्यात फार मोठा साहित्यीक दडलेला आहे त्यास बाहेर काढा . हि आपणास कळकळीची विनंती.

  17. Thank you for sharing your self revealing life experiences. After reading the blog i could relate it to what i am going to experience in my coming journey of life. Your writing clearly depicts the hard work and dedication you have put in. You are an inspiration to many..

  18. ॲड. संतोष जाधव

    भावोजी खरेच खूप अप्रतिम लिहले आहे . आणि सुरवातच खूप छान आहे त्यामुळे तुमच्या वाणी बरोबर तुमची लेखणी हि अप्रतिम आणि जबरदस्त आहे याचा प्रत्यय आला .

  19. सुजाता श्रोञी (निलाखे)

    तुम्ही मुक्तहस्ते न ठरवता लिहीत गेलात
    मनातील विचार कागदावर जसेच्या तसे उमटले
    पराधीन आहे जगती ़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़

  20. Surekha Dipak Patil

    सर, छान लिहीलाय लेख.
    चटका बसला, ठेच लगली, फटका बसला तर
    “आई ग…!”हा शब्द बाहेर पडतो,
    पण रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ
    येऊन ब्रेक दाबतो तेव्हा “बाप रे!”
    हाच शब्द बाहेर पडतो.
    छोट्या संकटासठी आई चालते पण मोठ्मोठी वादळ पेलताना बापच आठवतो.

  21. रूपा स मोकाशी

    सर खूप अप्रतिम ,हृदयस्पर्शी आणि संवेदनशील लेखन. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यात आपल्या आई वडिलांची पुण्याई आपल्या पाठीशी असते. तुमचे विचार नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरतील.तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा .तुमचे असेच उत्तम लिखाण वाचण्याचे भाग्य आम्हाला मिळत राहो .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *