Dr. Vishwajit Kadam Kary-Gaurava Issue: 2020-2021

‘भय इथले संपत नाही…’: डॉ. विवेक रणखांबे मुख्य-संपादक, यशोभारती २०२०-२०२१

आज ३० जून, २०२०. प्रतिवर्षी ३१ मे पर्यंत पूर्ण होणारं हे नियतकालिक यंदा अजूनही प्रकाशित झालेलं नाही. एका अमुलाग्र जीवन बदलाला कवेत घेवून जग पुढे निघाले आहे. कोरोना (कोविड-१९) या अनाकलनीय रोगानं जगातल्या तमाम माणसांना निसर्गाच्या रौद्र रूपाचा आणि विजातीय शक्तीचा परिचय घडवला. सर्वाधिक प्रगत अर्थसत्ता म्हणून परिचय असलेल्या अमेरिका, युरोपीय अशा महासत्ता या रोगाशी लढताना, पत्त्याच्या मनोऱ्या सारख्या कोसळल्या. बाकी सर्व गोष्टींसाठी “पुक्ता-सबुत” अजूनही उपलब्ध नसला, तरी चीनी माणसांच्या अघोरी जीवन पद्धतीतूनचं या रोगाचा फैलाव झाला, हे एक सर्वमान्य सत्य आहे. पृथ्वीच्या पाठीवर असा एकही प्राणी राहिला नाही की जो या चीनी माणसांनी खाल्ला नाही. “जो प्राणी जिभेने पाणी पितो; त्याच्या साठी मांसाहार तर, जे प्राणी ओठांनी पाणी पितात; त्यांच्या साठी निसर्गाने शाकाहार’ नेमून दिला आहे, हे मानवप्राणी सोयीनुसार विसरला. एका ऐकीव कथेनुसार, “गुहेत लपून राहणारी वटवाघूळ” ही देखील त्यांनी पकडून खाल्ली. चीनी बाजारपेठांच्यात प्राणी आणि त्यांचे मांस यांची खुलेआम होणाऱ्या विक्रीतून “वूहान” नावाच्या शहरातून कोरोना बाहेर पडला. तर दुसऱ्या बाजूने याच वूहान शहरातल्या “वायू प्रयोगशाळेतून कृत्रिम रीत्या तयार केलेला हा रोग, कुणा तरी शास्त्रज्ञ-कर्मचाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे बाहेर पडला. एक अशीही वदंता आहे की दुर्दैवाने ज्या अमेरिकेत या रोगामुळे लाखो लोक मरण पावले, त्याच अमेरिकेतल्या एका नोबेल विजेत्या शास्त्रज्ञाने चीनमधली ‘वूहान’ची ही वायुशास्त्र प्रयोगशाळा उभारली आणि त्याही पलीकडे जात चीनच्या भ्रष्ट कारभाराचा बळी पडत, त्याने त्याचे ज्ञान आणि देशाची गोपनीय माहिती चीनला पुरवण्यास मदत केली. सत्य काय ते अजूनही गुलदस्त्यातच आहे.

काही सर्वेक्षणानुसार चीन मध्ये ऑगस्ट महिन्यातच कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. अमेरिका, इटली सारख्या देशांनी चीन कडून कोट्यावधी डॉलर्स (आकड्यात न मोजता येणारी) नुकसानभरपाई मागितली आहे. पहाता पहाता चीन मधून बाहेर पडत हा रोग अमेरका, युरोपला आपल्या जाळ्यात ओढत गेला. आंतरराष्ट्रीय प्रवाशांनी तो अगदी थोड्या काळात देशोदेशी नेला. देशोदेशी लॉकडाऊनच्या घोषणा झाल्या. माणूस एकमेकांकडे संशयाने पाहू लागला. तोंडावर मास्क आले. रातोरात सनिटायझर, पिपियी कीट्स याच्या किमती वाढल्या. २२ मार्च ते  ३० जून असा लॉकडाऊन घोषित झाला. चीन मधले वूहान शहर तर तब्बल ७६ दिवस बंद होते. २४ तास टीव्ही वर केवळ कोरोनाच्याच बातम्या होत्या. सर्वसामान्य नागरिकच काय, काही देशांचे पंतप्रधान, मंत्री, उच्चपदस्थ यांच्या शारीरिक आणि आरोग्य सुरक्षेचे कवच फोडून हा रोग त्यांच्या पर्यंत पोहोचला.  हे लोक देखील या कोरोनाच्या तावडीतून सुटले नाहीत.

     २२ मार्च, २०२० रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. मनातल्या भीती पलीकडे काही तरी नवीन घडतंय, या भावनेनं या घटनेकडे काहीसं कुतूहलानेचं पहाण्यात आलं. पोलीस आणि डॉक्टर्स यांनी दाखवलेल्या धैर्या बद्दल लोकांनी त्यांना मानवंदना दिली. २१ मार्च, २०२० हा दिवस पुन्हा कधी उजाडेल का? कदाचित कधीच नाही किंवा ती एक दूरवरची धूसर शक्यता आहे. बस, रेल्वे सारी वाहतूक बंद पडली. रस्ते ओस पडले. मोर-हरणे, काही ठिकाणी तर वाघासारख्या जंगली श्वापदांनी मानवी वस्त्यांजवळ येत आपलं दर्शन घडवलं. प्रदूशणामूळ जवळ असूनही कधीच न दिसलेल्या डोंगर रांगांचे दर्शन शहरवासियांना झाले. महिना-महिना घरात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांनी मग जेवढं घेता येईल तेव्हड सामान बरोबर घेवून घर सोडलं. लहान मुल, वृद्ध यांना खांद्यावर घेवून, अक्षरशः हजारो किलोमीटरचे अंतर पायी कापलं. प्रवासाने कंटाळून रेल्वे रूळावरवर झोपलेल्या मजुरांना कधी झोप लागली ते कळालंच नाही आणि पहाटेची मालगाडी त्यांच्या अंगावरून कधी गेली, ते ही कळाले नाही. सोशल-डीस्टनसिंग, क्वारंटाईन, होम- क्वारंटाईन, इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन, सोडियम हायड्रोक्लोरोक्वीन, हायपोक्लोरोक्वीन, पँनडे मिक, हे शब्द जणू मायबोलीतील शब्द असल्यासारखे वापरले गेले. माणसाच्या शरीरातल्या प्रतिकारशक्ती वर आघात करून, श्वास मार्गातून शरीरात प्रवेश करणारा हा आजार, सरकारी अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडणारे ठरला. काही महिन्यांचे पगार अर्धेच झाले, तर अक्षरशः कोट्यावधी लोकांचे जगभरात नोकऱ्या गेल्या.  माणसान बरं बोलण्यापेक्षा खरं बोललेलं चांगलं. एकंदरीत पहाता, मानवाला ज्ञात असलेल्या इतिहासातील एक अत्यंत भयावह कालखंड म्हणून आजच्या काळाची नोंद भविष्यातील पिढ्या घेतील. मृत्युचं एक भयानक तांडव जग अनुभवत आहे.

आर्थिक कोंडी फोडणे, या केवळ एकाच हेतूने जनजीवन पुन्हा सुरु केलं गेलय. पण मृत्यू झालेल्या लाखोंच्या संख्येत होणारी वाढ, यांच्याच बातम्या कानावर पडतायतं. न्यूयॉर्क सारख्या शहराचा मृत्युदर डोके सुन्न करणारा आहे. मृतांच्या अंत्यविधी असो की लग्न, पाचच व्यक्तींना त्या विधीला उपस्थित राहण्याची परवानगी दिली गेली. एखादे थडगे खणण्या ऐवजी, कितीतरी पाश्चिमात्य राष्ट्रात शेकडो मीटर्सचे खंदक खणून त्यात प्रेतांवर सामुहिक अंत्यसंस्कार करावे लागले. रात्रंदिवस शवपेट्या तयार केल्या गेल्या. घरातून दवाखान्यात नेलेल्या माणसाचे, त्याच्या मृत्युनंतर  अंत्यदर्शनही घडले नाही. इतकेच काय तर प्रेतावर अंत्यसंस्कार करायलाही माणसांनी नकार दिला, एव्हडी भयावह अवस्था. गावांच्या वेशी बंद झाल्या, विश्वाची जागा संशयाने घेतली. रक्ताच्या घट्ट नात्याचा बंध सैल झाला. एका अनामिक भीतीने जग अवंगठून गेले. मानवी संहाराच्या इतिहासात, हा असा एकमेव कालखंड आहे, जेंव्हा ‘आयसीस’ सारख्या कृरकर्मी-अतिरेक्यांच्या बंदुका, तलवारी आणि माणसांच्या मानेवरून फिरणारे कट्यारीलाही रक्त लागले नाही.  या अतिरेक्यानाही जीवाचे मोल काय असते? भीती काय असते? याचा परिचय करून देणारा हा काळ. ताटातल्या एखाद्या शिताचीही किंमत सांगणारा, पैशाचे मोल शिकवणारा, आपल्या माणसांचे महत्व पटवून देणारा, घरट्याची आणि नात्याची ऊब वाढणारा हा काळ.

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकार आणि केंद्रात नरेंद्र मोदी यांनी देशभराची स्थिती हाताळण्याचा कमालीचा प्रयत्न केला. देश आणि राज्य सावरण्यासाठी अक्षरशः हजारो कोटींची तरतूद करण्यात आली. यातच पश्चिम बंगाल मध्ये ‘अम्फन’ या वादळाचा तर कोकणाला ‘निसर्ग’ या चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा बसला.

आव्हानांनी भारलेल्या अशा कठीण काळात भारती विद्यापीठाचे सेक्रेटरी डॉ. विश्वजित कदम हे महाराष्ट्र सरकारमध्ये “सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा” या   खात्यांचे मंत्री म्हणून कार्यरत झाले. भारती विद्यापीठ परिवारासाठी आणि कडेगाव-पलूस या मतदार संघासाठी हा एक आनंदाचा क्षण. पण तो अनुभवायला साहेब हवे होते, याची खंत शब्दांनी न भरून येणारी. २०१९ च्या महापुरात भक्कमपणे पाय रोवून उभा रहाणारे डॉ. विश्वजित कदम, कोरोनाच्या प्रादुर्भावाची तमा न बाळगता, जीवाची पर्वा न करता आजही गावोगावी फिरत आहेत. समस्यांचे निराकरण करत, शासन, विद्यापीठ, व्यक्तिगत स्तरावर जे जे करता येईल टी ती सर्व मदत करतायत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पहिल्या टप्प्यात जेंव्हा इतर सर्व हॉस्पिटल्स बंद होती, त्या काळात सरकारी यंत्रणे सोबत काम करणाऱ्या मोजक्या हॉस्पिटल्स मध्ये, संचालिका डॉ. सौ. अस्मिता जगताप (ताईसाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली भारती हॉस्पिटल उभे होते. डॉ. पतंगराव कदम साहेब आणि मा. विजयमाला कदम तथा वहिनीसाहेब यांचे संस्कार कृतीने साकार करीत, या बहिण-भावांनी केलेल्या कामाचे राज्यातील जनतेने कौतुक केले. मजुरांचे होणारे हालं पाहून, स्वतः आर्थिक तरतूद करून त्यांनी एक रेल्वे मजुरांना सोडण्यासाठी पुण्याहून पाठवली.

            जगात जेव्हा कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या तिथे आमच्या कॉलेजमध्ये मात्र ‘काही भाग्यवंत’ नियमित सेवेत रुजू झाले. कॉमर्स, भूगोल, केमिस्ट्री, मथेमातीक्स, फिजिक्स अशा डीपार्टमेंटमध्ये नियमित प्राध्यापक रुजू झाले. त्यांच्या येण्याने एक चैतन्य निर्माण झाले आहे. नव्या पिढ्यातील हे तरुण-प्राध्यापक एक विश्वासक वाटचाल करतील, अशी आशा आहे.

            शैक्षणिक जगात ऑनलाईन झाले आहे. वर्गातल्या शिक्षक-विद्यार्थी संवाद-सहवासाला कायमचा पूर्णविराम मिळेल कि काय? या शंकेला पूर्ण वाव देणारे वातावरण आहे. ऑनलाईन मिटींग्ज, नवीन प्रवेश प्रक्रिया, लॉकडाऊन मुळे बंद झालेली परदेश-शिक्षणाच्या संधींची दारे, घरा पासून हजारो मैल दूर, अडकून पडलेले परदेशी विद्यार्थी, यातच सुरु असणारे वेबिनार्स, सोशल-मेडियाचा चालू असलेला पुरेपूर वापर, शिक्षकांच्या अंगी असलेल्या क्षमतेला विस्तारित करण्याची गरज प्रतिपादन करणारा पालक वर्ग, शेकडो वर्षांपासून उभ्या असलेल्या आणि कोट्यावधी रुपये खर्चून बांधलेल्या परंतु आज ओस पडलेल्या इमारती, कमीत कमी कागदपत्रे आणि जास्ती-जास्त डिजिटल होण्यावर भर देणारे संस्थाचालक, घरा पासून दूर राज्यात, परदेशात मुलाला शिक्षणासाठी पाठवण्या ऐवजी, घराजवळच्या उत्तम कॉलेजच्या निवडीचा विचार करणारा पालक-वर्ग, आर्थिक ताणताणाव वाढवणारा आणि सुसह्य जीवनाची शाश्वती संपवणारा हा काळ शिक्षण क्षेत्राला कुठे घेवून जाणार आहे, कुणास ठावूक?

अशाही अवस्थेत महाविद्यालयातल्या प्राध्यापकांनी केलेले ३२५ अधिक वेबिनार्स, त्यांच्या मनी असलेल्या व्यावसायिक उत्तरदायित्वाची साक्ष पटवतात. प्रभारी प्राचार्य डॉ. एस. आर. पाटील यांनी ऑनलाईन मिटींगच्या माध्यमातून केलेले मार्गदर्शन, यातून महाविद्यालय पुढे चालले आहे. दिनांक ८ जून, २०२० पासून, अनलॉक-१ सुरु झाला. लोक कामावर रुजू होवू लागलेत. अशा वेळी मी जेंव्हा गेल्या तीन महिन्यांकडे पाहतो, त्यवेळी मला जाणवतं की, कशाचा तरी शोध घेत अहोरात्र पळणाऱ्या या जगाने एक सक्तीची विश्रांती दिली. ज्यांना आयुष्यात काहीतरी करायचे होते, ज्ञानाचा बकलॉक भरून काढायला वेळ हवा होता, जगण्याची पुनर्व्याख्या करीत, पुनश्चः हरिओम म्हणण्यासाठी जे लोक सदैव तयार असतात, त्यांच्या साठी; कोणत्याही कला-विद्या यांची साधना करणाऱ्या साधकांसाठी मात्र हा काळ पर्वणीचा ठरला.

व्यक्तिगत असो अथवा सामाजिक, ‘कोणताही प्रश्न हा त्याच्या उत्तराला घेवून जन्माला येतो’. १९२० साली प्लेग देखील असाच आला होता. १०० वर्षानंतर त्याचा मागमूसही नाही. निसर्गावर कुरघोडी करणाऱ्या माणसाच्या अघोरी-महत्त्वाकांक्षी वृत्तीला, निसर्गानेच एक चपराक ठेवून दिली आहे. माणूस नावाचा प्राणी यातून शिकेल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी संकटावर स्वार कसे व्हायचे असते, ते कृतीने शिकवेल. त्या दिवसाची वाट पाहूयात. जगावर संकट आलेले असताना, भारताने अमेरिकेसह ज्या ज्या देशांनी, जी जी मदत मागितली, त्या त्या प्रत्येकाला सर्वतोपरी मदतच केली.

“भूतकाळाची नोंद घेत, वर्तमानाचे भान ठेवत जो भविष्याचा वेध घेतो,  त्याला समाज आणि इतिहास “द्रष्टा नेता” म्हणून गौरवितो”. 2019 साली आलेल्या महापुरात ब्रह्मनाळ येथील बोट दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, “प्रत्येकाचा जीव ही माझी जबाबदारी” असे मानून, नामदार डॉ. विश्वजित कदम यांनी यावर्षी खास नेदरलँड मधून 7 अत्याधुनिक बोटी मागवून कृष्णेकाठच्या जनतेला जो दिलासा दिला, तो त्यांचे द्रष्टेपण सिद्ध करणाराच आहे. नामदार डॉ. विश्वजित कदम यांच्या कार्यकर्तृत्वाला, कोरोनाच्या भीतीची आणि जीवाची पर्वा न करता बेधडकपणे कामाला वाहून घेण्याच्या, संकटावर स्वार होण्याच्या वृत्तीला आणि साहेबांचे वारस म्हणून अंगी वसणाऱ्या द्रष्टेपणाचा परिचय देणाऱ्या त्यांच्या ‘नित्यनूतन व्यक्तिमत्वाला ‘सलाम करणारे यशोभारतीचे मुखपृष्ठ’ व हा अंक त्यांनाच अर्पण करीत:

सर्वेपि सुखिन: सन्तु, सर्वे सन्तु निरामयाःI 

विश्वकल्याणाच्या दिशेने मार्गस्थ होताना, प्रत्येक भारतीयाच्या उन्नत  आणि पवित्र अशा अंतकरणाचे  दर्शन घडवणाऱ्या, प्रार्थनेच्या या ओळी ओठावर ठेवत, इथेच विरमतो.    

डॉ. विवेक रणखांबे, पुणे. मुख्य-संपादक, यशोभारती (9850558404)

                                                                                                                  

                                                                                              

1 thought on “Dr. Vishwajit Kadam Kary-Gaurava Issue: 2020-2021”

  1. शतकानंतर आलेल्या चक्ररूपी साथीच्या पार्श्वभूमीवर अखंड मानवजातीस भोगावा लागलेला सक्तीचा गृहकारावास, झालेली दुरावस्था.. चिंतातुर आणि भीतीचे वातावरण.. सर्वच क्षेत्रात उडालेली दाणादाण .. याचा यशोभारतीचे मुख्य-संपादक प्राध्यापक डॉ विवेक रणखांबे यांनी कालक्रमानुसार घेतलेला आढावा… मंत्रीमहोदय नामदार डॉ. विश्वजित कदम यांची कार्यक्षम, गतिशील अशी अद्वितीय कार्यशैली तर सर्वश्रुत आहेच. खरंय तेरा महिन्यानंतरही अजून ‘भय इथले संपत नाही…’

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top