“पन्नाशिची प्रेमकविता”

तू पुन्हा भेटलीस अशी कशी अवचित
अणि तेहि वयाच्या पन्नाशीत?

अन मग…
‘उघड्या पुन्हा जहाल्या जखमा उरातल्या’

मला अनेकदा वाटायचं, कधीतरी तुला सांगाव
की तुझ्याबरोबरच संसाराचं स्वप्नगीत गायला आवडेल मला…

पण कधी आडवं येत होतं
तुझ्या कुटुंबाचं सोशल स्टेटस
कधी तुझी जात तर कधी माझी जात
कधी कधी तर
‘तुला माझ्या पेक्षा चांगलं स्थळ मिळेल’, या समजुतीने
माझा मीच स्वत:हुन विसरून जायचो तुला.

या गोष्टीला जवळपास विसे-एक वर्ष झाली असतील
जेंव्हा मनात ‘असता-नसताना’ही…
तुझं तुझ्या नवऱ्या बरोबर
आणि माझं माझ्या बायको बरोबर लग्न झालं

तस पाहिल अणि समजुन घेतल तर
तुझ्या नवऱ्याला….’त्याला त्याच्या मैत्रिणीशी’ लग्न करायचं होतं
अन ‘माझ्या बायकोला’ तिच्या वर्गमित्राशी
पण घडलं वेगळंच अन जुळवावी लागली नाती,
अरेंज मेरेज कुठलं, करावं लागत एक अरेंज प्रेम
ते ही एका शाश्वत कॉप्रमाईझला
आयुष्यभर योग्य ठरवण्यासाठी

आज पन्नाशीतही तुला सांगावं वाटतंय की
मला तू हवी होतीस माझी पत्नी म्हणून
पण तुझ्या आणि माझ्या आड होते
असंख्य प्रश्न…..त्यांच्या मृगजळासारख्या उत्तराना घेवुन

आयुष्याच्या वाटेवर आता आज
माझं कर्तृत्व फुलून आलंय,
जो निर्णय आपण घेतलाच नाही,
तो आपल्या दोघंकडून चुकल्याचं सिद्ध झालंय,

आता तू अन मी
जिथ असू तिथ फ़क्त कुढत जगायचं
कौप्रमाईझ म्हणून स्वीकारलेल्या आयुष्याला
योग्य निर्णय म्हणून पुढे रेटायचं…

आणि एकमेकाला होणाऱ्या पश्चातापातच आपल मन सुखवायच…

पण खरं सांगतो,
अशी काही सोय असती तर बरं झालं असतं
आयुष्याच्या वाटेवर कुणालाही कधीही
आपलं माणूस आपल्याजवळ कायमचं आणता आलं असतं.

आज तुला सांगायला हरकत नाही,
पण लग्नाआधी मी तुला भेटायला आलो होतो,
भेटायला कुठला? तुला मागणीच घालायला आलो होतो.
तुला काय काय आणि कसं कसं सांगायचं? तेही नीट ठरवून आलो होतो,
आधी तू फ्री आहेस का?
किती वेळ देशील?
दहावी नंतर काय केलंस?
आई-बाबा कुठायत?
लग्नाचा काही विचार आहे का?
तुला कोणती स्थळं आली?
अस बोलत बोलत तुझ्यासमोर
मग माझ्या कर्तृत्वाच्या गाथा उलगडायची
तुझ्याच सुखाच्या व्याख्येत ती लिहून काढायची.

आता थोडी माझ्या स्थळाची माहिती घेवु.
मी एकुलता एक, बहिणीचं पण लग्न झालयं
आई-बाबांची तबयेतपण चांगली आहे,
तुला त्यांची सेवा करायची गरज नाही
कुटुम्बात कुणी आजारीही नाही….
या उलट; लेकाला नि सुनेला
थोडं मोकळं रहाता आलं पाहिजे म्हणून,
आमच्या कॉलनीतच त्यांच्या साठी एक वन बीएचके फ्लॅट घेतलाय,
गरज असेल तेंव्हा मुलाना त्यांच्याकडे सोडता आलं पाहिजे,
स्वाभिमानान रहाता आलं पाहिजे.
हवं त्यावेळी, ‘त्यांना आपल्याकडे आणि आपल्याला त्यांच्या कडे’
पाहुण्यासारख जाता आलं पाहिजे

अग इतकं सगळं तयार आहे,
तू फक्त ‘हो’ म्हण

पण झालं…..
माझ्या योजनेची मीच सगळी वाट लावली….
आणि तुला काहीच न विचारता मी तुझ्या ऑफिस मधून बाहेर पडलो,
अर्थात जाताना मी तुला माझा नंबर दिला होता,
‘कधी वाटलं तर फोन कर’
अस सांगूनही माझा आत्मसन्मान अबाधित राखत,
बाहेर पडलो होतो,

मनाला निग्रहाची सवय लावून घेतलेली तू,
मनाविरुद्ध जगायला शिकलेल्या तू,
‘हायवेला मोठी वाहने टू-व्हीलर वाल्याला बाजुला सारतात ना?’,
अगदी तसच मलाही सहज बाजूला केलंस

त्यानंतर काही दिवस गेले…
एकदा असाच काहीसा मी माझा फोन बंद केला होता,
जेंव्हा तो सुरू केला
त्यावेळी त्यावर कंपनीचा मेसेज होता,
की तू माझा नंबर ट्राय केला होता

कामाच्या गराड्यात मी ते जाणीवपूर्वक विसरून गेलो,
येईल पुन्हा तुझा कॉल, असेही म्हणालो,
गरजवंताचाच येत असतो कॉल,
आणि मग लग्नानंतर पुढे भांडणात
‘तूच मला प्रपोज केलं होतं, मी नाही’, असं सांगून
तुझ्यावर कुरघोडी करण्यासाठी’ मी राहिलो होतो थांबून,
तुझ्या कॉलची वाट बघत
तेहि अगदी आजपर्यंत

आता तू तुझ्या अन मी माझ्या संसारात,
फिरतो आहोत दोघेही सुखाच्या शोधात,
तू तुझ्या जोडीदाराबरोबर आणि मी माझ्या,
‘स्वर्गातच बांधल्या जातात हो या लग्नगाठी’,
अशी आपल्याच मनाची आपणच समजूत घालत
आणि आपल्या १० वी च्या च्या ग्रुपवर,
मनात आणि वस्तुस्थितित नसतानाही,
तुझ्या आणि माझ्या लग्नाच्या फोटोना ‘Nice Couple’ म्हणत

आजही हे लिहिताना
मला भीती वाटतेय
ती याचीच की या लेखनप्रपंचा मुळे
तुझ्या मनातल्या माझ्या प्रतिमेला तडे जाऊ देवू नकोस,
कारण एक तर तू किती तरी वर्षांनी भेटलीयेस,
आणि वयाच्या पन्नाशीत तुला गमावण्याची इच्छाही नाहीये,

खरच सांग,
किती ढोंगी असतो आपण
अन स्वतःलाच फसवत
जगत असतो आपण

दूर असलीस तरी,
जशी असशील तशी पण तू मला हवी आहेस,
फक्त व्यक्त केलेल्या माझ्या या भावनांकडे पाप म्हणून बघू नको,
मनात ‘भलत-सलतं’ आणून या भावनाना हीनऊ नको,

पण असो, एक कवी म्हणाला तस…
आयुष्याच्या वाटेवर….. आता हे सारं काही विसरायचं,
आपणच आपलं चांदण होऊन आपल्या अंगणात पसरायचं.

डॉ. विवेक रणखांबे , पुणे 9850558404
……………………………………………………………
(Disclaimer: The present piece of literature is an outcome of the spontaneous emotions in the form of poem & having no resemblance with any person; living or no more as a part of our lives. If so, it may be treated as a sheer coincidence, but truly speaking the formation of the group has paved the way for the expression.)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *