‘निर्मळ मनाची: निर्मला आक्का’

(माझ्या वडिलांचे मित्र स्व. श्री. एकनाथ (बापू) फाळके यांच्या पत्नी ‘निर्मला एकनाथ फाळके’ यांचे नुकतेच मुंबई येथे निधन झाले. त्यांना वाहिलेली ही श्रद्धान्जली)

निर्मला एकनाथ फाळके तथा आक्का. वय वर्ष 78. अनेकांच्या आयुष्याला पूर्णत्व प्राप्त करून देणारा एक जीवन प्रवास परवा संपला. जगाला ग्रासलेल्या आजरानं; आमचा एक आधार काल हिरावून नेला. ‘आई-बापाच्या जाण्यानं जाणवणारं पोरकेपण आक्काच्या जाण्यातही आहे’, असं म्हणत “परमेश्वराने आम्हाला जन्म देणारी माता दिली, तर आईच्या मायेनं सांभाळणारी आक्का दिली”, हे अर्जुन नानांचे आणि प्रल्हाद आबांचे शब्द आक्का बद्दल तंतोतंत खरे आहेत.

तस बघितलं तर आक्का ही आमच्या ‘ना रक्ताची ना नात्याची’, पण आक्का ही आमच्याही ‘तितक्याच हक्का’ची होती. तिच्या मुलांनी तिला एकेरी हाक मारावी, अगदी आम्हीही तिला आयुष्यभर तसच बोलवलं आणि अगदी तशीच ती आमच्याही अंतकरणा जवळ होती.  नव्हे नव्हे, तिच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाच्याच ती तितक्याच हक्काची होती. पण काळाच्या ओघात, घटनांच्या आणि व्यस्त जीवनक्रमाने ही नाती जरी दूर गेली, तरी तिच्या मुळाशी असणारा ओलावा कायम आहे.

बापूं नावाच्या आधारवाडाची ‘आक्का’ ही एक सावली होती. बापूंच्यावर फक्त तिचीच मात्रा चालायची. आक्का नावाची आदरयुक्त दहशत-दरारा  तिच्या प्रत्यक्षात आणि अपरोक्षही कायम असायचा. आक्का आणि बापू यांच्या बरोबरच्या सहवासाच्या कितीतरी आठवणी आज या प्रसंगी मनात दाटून येतात.

बापू आणि माझे वडील श्री. अर्जुनतात्या हे बालपणीपासूनचे मित्र. ही मैत्री जिवाभावाची. बापूंच्या आई-वडिलांचे माझ्या वडिलांवर मुलासारखे प्रेम. या संबंधांचे, ऋणानुबंधांचे अनेक दुवे आहेत. बापूंच्या लग्नानंतर मुराळी म्हणून निर्मला आक्काना माहेरहून आणायला प्रल्हाद आबा आणि माझे वडील अर्जुनतात्या गेले होते. 1956 साली माझे वडील सातारा-रोड सोडून आमच्या सांगली जिल्ह्यातल्या मूळ गावी निघाले. घरात पोटच्या पोरासारखा वाढलेला हा पोरगा आपल्याला सोडून जाणार, हे बघून बापूंच्या आई रडायला लागल्या.  याच वेळी घरात शेवटच्या मुलाचा अर्थात नानांचा जन्म झाला होता. आपल्या पत्नीची समजूत घालताना बळवंत आण्णा म्हणाले, “अग, रडू नको. ‘एक अर्जुन निघाला पण परमेश्वरान तुला दुसरा अर्जुन दिलेला आहे’. घरातल्या सर्वात धाकट्या मुलाचं नाव ठेवलं गेलं ‘अर्जुन’. असे हे रक्ताच्या नात्यापलीकडचे पिढ्यांपिढ्यांचे ऋणानुबंध.  

एके दिवशी बापू मला म्हणाले, ‘विवेक; बॅग भरून ये, गोव्याला जायचय’. लहानपणी गोव्या बद्दल एक गूढ आकर्षण होतं. मोठ्या उत्साहात बाबाच्या-वाडीत पोहोचलो. बापूंची जीप सुरू झाली आणि अर्ध्या-पावूण तासात ती थांबली सुद्धा. “झालं, उतरा खाली”…. ‘असं का? मध्येच का उतरायचं?, म्हणून विचारलं, तर सांगितलं की “आपण गोव्यात आलो सुध्दा”. गावाचं नाव होतं ‘लिंब-गोवे”. हे आक्काचं माहेर. माहेरची माणसं मोठी प्रेमळ. आपल्या जावयाच्या अर्थात बापूंच्या कर्तृत्वाबद्दल नितांत अभिमान असणारी. आक्काचा जसा सासरी दरारा होता, तसाच तो माहेरीही होता. तो दरारा तिने आयुष्यभर मन भरून केलेल्या प्रेमामुळे कमावलेला होता.

सासर आणि माहेर दोन्ही घरात माणसांची उठबसं होती. घरातल्या कर्तृत्ववान माणसाची पत्नी म्हणूनच केवळ आक्काच्या शब्दाला मान होता असं नव्हे, तर तिनं आयुष्यात तो मिळवलेला होता. कधीही काहीही चुकीचं अस तिनं काही केलंच नाही. आक्काला वावंग खपायचं नाही. आक्कान आयुष्यभर आईपण पांघरलं. घरातल्या कुणाचीही काहीही अडचण असो, ती सुटण्याचं आक्का हे एक निश्चित ठिकाण होतं. तिच्या जाण्यानं आज ती जागा कायमची मोकळी झाली आहे.

घरात लहान धाकट्या दिरांचे संसार उभे करणारी आक्का, आप्पां सारख्या वडीलधाऱ्या दिराची आधार असणारी आक्का, नणंदांच्या कुटुंबांची मायमाऊली आक्का, लहान धाकट्या पिढ्यांच्या गुणवत्तेची पाठराखण करणारी आक्का, बापूंचे आर्थिक व्यवहार आणि नाती सांभाळणारी आक्का, आज कितीतरी रुपात आठवते आहे.

माझे कितीतरी हट्ट आक्कांन पुरवले आहेत. एका उन्हाळ्याच्या सुट्टीत तर सातारला जाण्यासाठी मैत्री पार्कला आक्काच्या बरोबर उभा होतो. नुकत्याच एशियाड साठी दिल्लीत वापरलेल्या गाड्या महाराष्ट्रात आल्या होत्या. किम्बहुना त्यात बसण हा आमच्या लहानपणी स्टेट्स सिम्बोल होता. मला त्यावेळी त्या लक्झरीचं मोठं आकर्षण वाटायचं. गाड्यांना खूप गर्दी असतानाही केवळ माझ्या आग्रहा खातर आक्कांनी हिरव्यागार एशियाड लक्झरीत जागा मिळवली आणि माझा हट्ट पुरा केला. अशी ती आक्का आज आपल्यात नाही.

उमेशला जसा शर्ट घेतला तसाच शर्ट मला आणण्यासाठी, तीन मला आणि उमेशला दादर पालथं घालायला लावलं होतं. मुंबई-सातारा-बाबाचीवाडी-सातारारोड स्टेशन-कोरेगाव-रहिमतपूर-पंढरपूर-आणि परत अकलूज मार्गे मुंबई असा बापूंचा प्रत्येक महिन्यात भरगच्च दौरा असायचा. या दौऱ्याची सगळी व्यवस्थित माहिती आक्कांकड असायचीच.

कपाळावर लावलेलं ठळक गोल कुंकू, गळाभर दागिने, पैशांन सदैव गच्च भरलेली पर्स, या पेक्षा आक्काच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि श्रीमंती मोठी होती. तिचं अंगकाठी तिला शोभून दिसायची. तिच्या आचार-विचार आणि व्यवहारातही रुबाब असायचा. कुणाच्या तरी माघारी कुणाची तरी चर्चा करत बसणं, कुणाला तरी कमी लेखण; हे तिच्या स्वभावात नव्हतं. “ज्याचं त्याचं ज्याच्या त्याच्या बरोबर” असं म्हणून ती वादविवादातून बाहेर पडायची. तशी ती कडक स्वभावाची होती पण तरीही ती बोलल्याचं, रागवल्याच कुणाला कधीच वाईट वाटायचं नाही. पोटच्या मुलांपेक्षा तिनं तिच्या आयुष्यात आलेल्या नात्याच्या आणि जोडलेल्या नात्यातल्या मुलांना नेहमीच प्राधान्य दिलं.

आपला नवरा कर्तृत्ववान आहे. बापूंच्या आसऱ्याने कितीतरी कुटुंब उभी आहेत, घराच्या, नात्याच्या, कितीतरी जबाबदाऱ्या पार पाडायच्या आहेत, याची तिला जाणीव होती. या जबाबदाऱ्या पार पाडताना ती नेहमीच बापूंच्या मागे खंबीरपणे उभी राहिली. इतकेच नव्हें, तर बापूंच्याही एक पाऊल पुढे जातं तिने त्या जबाबदाऱ्या आनंदानं पार पाडल्या. हे सर्व करताना तिच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहायचा. बापू आणि आक्का यांनी केवळ त्यांचाच संसार केला नाही, तर त्यांच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येकाला ‘ताटा मधला घास दिला’. हे मान्यच करावं लागेल.

माझ्या 11 वी च्या परीक्षेचा रिझल्ट लागायचा होता. खरे तर बापू आणि आक्कां बरोबर आम्ही सातारा रोड वरून कोरेगाव मार्गे पंढरपूरला निघालो होतो. पण त्या दिवशी माझा रिझल्ट लागणार हे कळताच आक्का आणि बापुनी (ऐसक या ड्राइवरला) गाडी स्टेशन वरून परत फिरवायला सांगितली आणि सातारा मार्गे आम्ही पंढरपूरला गेल्याचे मला आजही स्मरते. मी वर्गात पहिला आल्याचे कळताच आक्काने पंढरपुरात सगळ्यांना पेढे वाटले होते. माझी थोरली बहीण सुनंदा हिला पहिला चुडीदार ड्रेस आक्कानेच शिवल्याची आठवण ती काल सांगत होती. ताई आणि माई (वसुंधरा) यांच्या लग्नात बापू-आक्कां लग्नमालका सारखे उभे होते.

खंडाळ्याच्या घाटात रामकांतचा वडा खायला, खेड शिवापूर आणि इतर घाटातल्या देवांना नमस्कार करायला बापूंची गाडी हटकून थांबायची. या गाडीत सायरन सारखा आवाजकरणारी बटरी असायची. गर्दीतून वाट काढण्यासाठी गाडीचा ड्राईव्हर ती वाजवायाचा. साताऱ्यात ‘अजिंक्यतारा’, ‘मोनार्क’, पंढरपूरला ‘भक्तनिवास’, अशा कितीतरी हॉटेलात आक्का बापूंच्या मूळ लहानपणी राहता आलं. कास-बामणोली अशी सहलही आक्का बापूंच्या सोबत झाल्या.

फार कमी वेळात, केवळ आक्का पाठीशी असल्यानं बापुनी आपल्या कर्तृत्वानं मोठा पसारा निर्माण केला. हॉटेल व्यवसाय, शिक्षण, राजकारण, शेती, मंगल कार्यालय असे एक ना अनेक व्यवसाय. बापूंच जीवन हे विविध संकल्पानी भारलेलं होतं आणि आक्का ही त्या संकल्पानची अधिष्ठान होती. सकाळी न्याहारी करून बाहेर पडलेले बापू रात्री उशिरा घरी परतायचे. आलेल्या गेलेल्या प्रत्येकाचं आक्का आणि छाया काकी मन भरून करायच्या. घराला माणूस तुटायचे नाही. गावाकडून, तसेच कोल्हापूर-सांगली-साताऱ्यातून अचानकपणे पहाटे उतरून मुंबईत सहा-सात वाजता घरात येणारी माणसं दररोज असायची. पण आक्काच्या चेहऱ्यावर त्रास दिसायचा नाही. “ज्याच्या त्याच्या हक्काचा घास जो तो खाऊन जातो”, असं म्हणत ती प्रत्येकाचं मनभरून करायची.

आक्काच्या भरल्या संसाराला काय दृष्ट लागली कुणास ठावूक? आप्पा गेले, बापू गेले, पाठोपाठ उमेश आणि मधुभाऊ गेले. तिची उभारी गळून गेली. आनंदाची जागा उदासीनतेनं घेतली. स्वतःच्या मुलांसोबत तिने मोठ्या केलेल्या आमच्या पिढया आपापल्या संसारात गुंतल्या. यातच आक्कांन तिच्या आयुष्याचीही इतिकर्तव्यता मानली. आयुष्याची गाडी पुढे जात होती पण आमची ती पूर्वीची आक्का, गेल्या दहा वर्षात आम्हाला पुन्हा कधीच भेटली नाही.

बापूंच्या जाण्या नंतर शुभांगी वहिनींनि आक्काच्या आयुष्यात सुख पेरण्याचा आटोकाट प्रयत्न केला. शुभांगी बहिणींच्या आयुष्यावर कोसळलेला ‘दुःखाचा पर्वत’ पहात, आक्का तिच्या ‘दुःखाचा डोंगर’ दूर करीत राहिली. बापूंच्या पश्चात शुभांगी वहिनींनी आक्काचा जो सांभाळ केला, त्याच्या प्रति संपूर्ण कुटुंबा मध्ये शुभांगी वहिनी बद्दल खूपच कौतुकाची आणि अभिमानाची भावना आहे. त्याच्या उल्लेखा खेरीज ही श्रधांजलीच अपुरी आहे. या दु:खाच्या क्षणी वर्षा, मनिषा आणि तृप्ती यांच्या सांत्वनासाठी शब्दच नाहीत. कारण दुखाची जी खोली त्या अनुभवत आहेत, तेव्ह्डेच दुःख आक्काच्या जाण्याने आज सम्पूर्ण परिवारात आहे.

आता तर आक्का पुन्हा कधीच न भेटण्यासाठी अनंताच्या प्रवासाला निघून गेली. ग्रामीण भागातून पुढे येत, लौकिक शिक्षणाचं अपुरेपण असतानाही ती एक आदर्श जीवन जगली, इतरांच्या आयुष्याशी एकरूप होतं राहिली, स्वतःला लाभलेलं मोठेपण-श्रीमंती, दोन्ही हातानी जगाला वाटत राहिली. तिच्या आठवणींच्या सावलीत उभ्या असलेल्या प्रत्येकाला, तिच्या हातचा घास खाल्लेल्या प्रत्येक जीवाला, एक गोष्ट मान्यच करावी लागेल, की आज कर्तृवाच्या शिखरावर कुठेही उभे असलो, तरी आक्का नावाचा परमेश्वर आयुष्यात कधीतरी भेटला होता. आक्काचा इहलोकीचा प्रवास अंतकरणाच्या पावित्र्याने भारलेला होता. नावाची ‘निर्मला’ असणारी आक्का, अंतकरणातही तितकीच निर्मळ होती. तिच्या जाण्याने एक पोकळी कायमची निर्माण झाली, यात शंका नाही. मुंबई ही आक्काची कर्मभूमी आज आक्काला स्वतःत सामावून घेती झाली. आता या पुढचं आयुष्य तिच्या सहवासाशिवाय आणि केवळ तिच्या  पवित्र सहवासाच्या आठवणींच्या सोबत. तिच्या पर्थिवाचं अंत्यदर्शनही घेता न आल्याचं दुःख कोणत्याच सांत्वनान भरून येणारं नाही…

डॉ. विवेक रणखांबे, 9850558404, सातारा-रोड

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *