ति. आण्णांच्या सेवेशी….

कृतज्ञता पत्र

एक कृतज्ञता पत्र

स्वर्गीय ति. आण्णांना,

शिरसाष्टांग नमस्कार,

इहलोकीची यात्रा संपवून; तुम्ही पंचत्वात विलीन झालात, त्याला आता  14 वर्षे लोटली. पण तुमच्या आठवणीं शिवाय एकही दिवस सरला नाही. तूम्ही जीवन काळात पाहिलेल्या स्वप्नांचा पाठपुरावा करित, आम्ही मार्गक्रमण करीतच आहोत. आयुष्याच्या वाटेवर तुम्ही दिलेल्या संस्कारांची आणि स्मृतींची शिदोरी घेऊन काही संकल्प देखील परीपूर्ती साठी हाती घेतले आहेत. 

भविष्यात मी कीर्तनकार व्हावं, वक्ता व्हावं, असं तुम्हाला नेहमी वाटायचं. या भाबड्या आशेनं तुम्ही मला आळंदी-पंढरपूरच्या मार्गावर वारीत घेऊन जायचा. तुमच्या खांद्यावर बसून, मी विठुरायाच्या भक्तांच्या त्या दिंडीत सामील व्हायचो. मी दिंडीत हरवू नये म्हणून, मला उंच झाडावर बसवून; तुम्ही टाळ-मृदुगांच्या गजरात सामील व्हायचा. कितीही दुरून तुम्हाला मला बघता यायचं. एकुलता-एक मुलगा असल्यामुळे आई मला आळंदीस कीर्तनकुलात पाठवायला तयार नव्हती. या पार्श्वभूमीवर, वयाच्या पन्नाशीत का होईना, राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. चारूदत्त आफळे यांच्या मार्गदर्शनाखाली, माझा वारकरी आणि नारदीय कीर्तनाचा अभ्यासक्रम, आता पूर्ण होतो आहे, हे सांगताना मोठा आनंद होतो आहे.

 1993 साली मी भारती विद्यापीठात रुजू होताना, मला आशिर्वाद देताना तुम्ही म्हणाला होतात की “एव्हडी मोठी संस्था उभी करतानाही डॉ पतंगराव कदम यांनी “एम. ए. एलएल. बी., पीएच. डी”, अशा पदव्या धारण केल्या, ही  आपणही करू शकतो का? त्या वाटेवर पीएचडी तर तुमच्याच जीवन काळात संपादित केली, तर विधी-विद्याशाखेच्या पद्विचाही विचार सुरु आहे. आज जगात आंतर-विद्याशाखीय अभ्यासाचा विचार जोर धरतो आहे. परंतु अल्पशिक्षित असतानाही, हाच विचार तुम्ही कितीतरी वर्षांपूर्वी केला होता. तुमच्या या द्रष्टेपणाचं आज अप्रूप वाटल्याखेरीज रहात नाही.

         आण्णा, क्रिकेट हा तर तुमचा जीव की प्राण. त्यातही भारत-पाकिस्तान मॅचमध्ये ‘भारताचा विजय’ म्हणजे तुमच्या साठी पर्वणीचा क्षण. आता क्रिकेट खूप बदललंय. कसोटी आणि 50 शटकांची क्रिकेट मागे पडून आता 20-20 हा नवा प्रकार आलाय. पण उद्योगपतींच्या साठी जीवाची बाजी लावणारे क्रिकेटवीर, देशाकडून खेळताना मात्र जिगरबाज खेळाचं दर्शन घडवत नाहीत, ही गोष्ट तुमच्या देशभक्त मनाला कधीच रुचली नसती, हेच खरं.

 ‘सुख आताशा कुठं दारात उभं होतं. जगण्याची सुरुवात आता कुठे होते आहे’, असे वाटत असताना तुम्ही गेलात. तुमच्या पश्चात अमेरिका, कॅनडा आणि फ्रांस इथल्या आंतर-राष्ट्रीय परिषदात व्याख्याने देता आली. अटलांटिक महासागराच्या दोन्ही तीरावरून, तिथल्या समुद्रांत उभे राहून तुमच्या स्मृतींना अभिवादन करताना, जणू तुमच्या पुर्नभेटीचेच सुख मिळाले. परमेश्वराने निर्माण केलेलं हे जग बघण्याची तुमची इच्छा होती, पण ते घडणं नव्हतं. जीवनाची क्षणभंगुरता समजल्याने, आता कोणतीही वेळ न दवडता आईला हे जग दाखवलं पाहिजे, हे ध्यानात आलं. पण एव्हडे पैसे आणायचे कुठून? कर्जाचे डोंगरही समोर उभे आहेतचं. अशा स्थितीत भविष्य निर्वाह निधीला हात घातला आणि आईची पूर्व-आशियायी देशांची सहल आणि युरोपवारीही संपन्न झाली.

तंत्रज्ञानाच्या विविध आणि अविश्वसनीय अविष्काराने भारावलेलं हे जग अनुभवायला आज तुम्ही हयात नाही, याची अनेकदा खंत वाटते. पण सुधारणेच्या हव्यासापोटी निसर्गावरही मात करू पाहणाऱ्या माणसांच्या या जगात, सध्या “कोरोना” नावाच्या रोगांन थैमान घातलंय. हा रोग निसर्ग निर्मित नसून, मानवनिर्मित असल्याचं मत, एका नोबेल विजेत्या जपानी शास्त्रज्ञांनं व्यक्त केलं आहे. साहजिकचं त्यांचा अंगुली-निर्देश चीनकडेच आहे. “जे प्राणी जिभेने पाणी पितात; त्यांना निसर्गाने मांसाहार  दिला आहे, तर जे ओठांनी पाणी पितात; त्यांना निसर्गानं शाकाहार  दिला आहे”, या तुमच्या निरीक्षणाची आज आठवण येते आहे. चीनी लोकांनी खाल्ला नाही, असा एकही प्राणी पृथ्वीवर उरला नाही. अगदी गुहेत राहणारी वटवाघळ देखील खाल्ली, असेही अनेकजण सांगतात. यातूनच या रोगाचा फैलाव झाल्याचे काही शास्त्रज्ञही मानतात. या मागील ‘सत्याचा, वदन्तांच्या शहानिशांचा आणि औषधाचा’ही शोध अजूनही जगात सुरूच आहे.

निसर्गावर स्वार होण्याच्या माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेला, निसर्गच ठेचून काढताना दिसतोय. अमेरिका, युरोपातल्या अनेक देशांनी तर या रोगापुढे अक्षरशः लोटांगण घातलेलं असताना, आपला देश मात्र समर्थपणे उभा आहे. निवडणुकीच्या काळात कोट्याधीश म्हणून माहित झालेल्या पुढाऱ्यांची संपूर्ण देश वाट पाहतोय. पण अद्यापतरी त्यांनी ‘सरकारी तिजोरीतून येणारं त्याचं मानधनच सरकारला परत करण्याचा मोठेपणा दाखवलेला आहे.’ सर्व स्वदेशी कंपन्यांनी अक्षरशः हजारो कोटी रुपये मदत शासनास देवू केली आहे.  त्यामुळे यापुढे ‘ स्वदेशी उद्योजक आणि स्वदेशी उत्पादने’ हेच आयुष्याचे सूत्र ठेवावे लागेल.

या बिकट काळात, डॉक्टर्स, नर्स आणि पोलिसांनी केलेल्या कामाचं, नागरिकांच्या संयमाचं आणि कोणताही हट्ट न करता, घराघरातल्या चिमुकल्या जिवांनी दाखवलेल्या परिपक्वतेचं कौतुक करेल तेव्हडे थोडंच आहे. वाढता मृत्यूदर चिंताजनक आहे. यातच तुमच्या बरोबर काम करणाऱ्या साध्वी लीलाताई रामदासी यांचं नुकतंच निधन झालं आहे. अत्यंत मोजक्या लोकांच्याच उपस्थितीत मृतांच्या पार्थिवांवर  अंत्यसंस्कार करण्यात येतायत. मरणाऱ्यांच्या मृत्यू बद्दल शोक व्यक्त करण्यासाठीही बाहेर पडता येत नाही. माणसा-माणसातल्या विश्वासाची जागा एका अनाकलनीय भयाने, दुस्वासाने आणि संशयाने घेतली आहे. जगात यापूर्वी कधीही आली नसेल, एव्हड्या मोठया प्रमाणात आलेल्या आर्थिक मंदीचे असह्य चटके, या जगाला यापुढे किती वर्षे सहन करावे लागतील? त्याचा अंदाज करणं कठीण आहे.

सौ. मेघना, आदित्य, मृणाल व मी, आम्ही सर्व पुण्यात सुखरूप आहोत, तरीही इथं १९२० साली आलेल्या  प्लेगच्या कथांना पुन्हा जाग आली आहे. सौ. माई कडे कराडला रुग्णांची संख्या वाढतीय. पण तरीही ‘माध्यमिक शिक्षक’ असल्याने, तिला कर्तव्य सेवेची संधी मिळाल्याने अडचणीतही ती खुष आहे. तिकडे ताईकडे कोल्हापुरात स्थिती बरी आहे. आई तिकडे ‘सातारा-रोड’लाच आहे. निसर्गाच्या सानिध्यात  ती तिथे सुखरूप आहे. गंगेच्या निळ्याशार पाण्याचे, दुरूनच दिसणाऱ्या पर्वत शिखरांचे व्हायरल झालेले फोटो, वातावरण शुद्ध झाल्याची ग्वाही देतायत. आजवर वेळेअभावी राहून गेलेला अभ्यास, वाचन, नव्या युगाची नांदी ठरलेले वेबिनार्स आणि इतर संकल्पांना देण्यासाठी, या लॉकडाऊनच्या काळात मला वेळ अपुराच पडतो आहे. माझ्यासाठी कोरोनाची ही आपत्ती एका अर्थी इष्टापत्तीच ठरली आहे. खरं तर, जगाच्या कल्याणासाठी स्वयंस्फूर्तीने पाळलेला ‘लॉकडाऊन,’ ही आपली सामाजिक सवय होवू शकते का? असाही विचार आपण करू शकतो का? होय, हे शक्य आहे. भविष्यातील पिढ्यांनी मोकळा श्वास घ्यावा, म्हणून एका वैश्विक उत्तरदायित्वापोटी वर्तमान पिढ्यांना, हे करावेच लागेल. 

आज २ मे, २०२०. रात्रीचे 11 वाजलेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने लोकप्रिय मालिकांचे पुन:प्रक्षेपण सुरू केले आहे. माझ्या समोर दूरदर्शनवर तुमच्या आवडत्या ‘रामायणा’ची आज सांगता होते आहे. “इहलोकीचा अवतार संपवून, प्रभू रामचंद्र निजधामाला निघाले आहेत”, असा प्रसंग सुरु आहे. आण्णा, तुमच्या या आवडत्या रामरायाच्या स्वागतासाठी, ‘तिथे निजधामात’ तुम्ही तर आधीच पुढे गेला आहात.  तुम्हीच शिकवलेल्या “यं ब्रह्मा वरूणेन्द्र रुद्र मरुत:, स्तुनवंती दिव्ये:स्तवै:’ या श्लोकाने या रामायणाची सांगता होतं आहे.  तुम्हाला पत्र लिहिताना अनुभवीत असलेल्या या दैवी योगायोगाचं, एक अनाकलनीय गूढ, तुम्ही आसपास इथेच कुठेतरी आहात, याचा विश्वास देतंय.

 “उत्तम आयुष्य जगण्यासाठी, समाधानाची कुठेतरी व्याख्या करावी, हे तुम्हीच शिकवलतं”. तेंव्हा, शब्दमर्यादा आणि भोवतालाचे भान राखत इथेच थांबतो.

II इति शुंभम भवतू II

तुमचा आज्ञाधारक, “बाळ”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *